Saturday, July 25, 2015

रियलिटी शोज आणि मी

"इन्डियन आयडल" हा भारतातला पहिला रियलिटी शो असावा. २००४ साली हे रियलिटी शो चं लोणचं भारतात आलं. "अमेरिकन आयडल"च्या थीमचं देसी व्हर्जन. त्यावेळी हे आपल्याला नविन होतं , मलाही होतं. आपण फुल्टू सेंटी.

सुरुवातीच्या ऑडीशन , त्यातले ते गाण्यातला ग देखील माहिती नसताना गायला आलेले स्पर्धक , एक से बढकर एक विचित्र विभूती यामुळे ऑडीशनचा भाग तसा मनोरंजकच ! ते पाहून क्षणभर हसूही येतं. काही नग एवढे हिमनग असतात की ते कायमचे लक्षात राहतात. मधेच एकेकाच्या घरची गरिबी , ट्रेजीडी ,आई वडिलांची कहाणी सांगून एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न. कोणी गरीब , कोणी चहावाला, पेंटर , दर्जी किंवा कोणी लहानपणापासून संगीत शिकणारी. कोणी पैदा होताच  "मै इंडियन आयडॉल बनुंगा " म्हणणारा.

एक किंवा २ एन्कर. हे शक्यतो इंडस्ट्रीतले स्ट्रगलर असतात. विनोदाचा तडका , हजरजवाबीपणा आणि नॉनस्टोप टेम्पो कमी होऊ न देता शो सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांची.   तीन जजेसचं प्यानेल. ज्यांना काही काम नसतं ते रियालिटी शोज करतात ( आणि ज्यांना काही येत नाही ते डेलीसोपचे संवाद लिहितात, असो ) नंतर राउंड वन .. राउंड टू .. ड्यूएल राउंड , अमका राउंड तमका राउंड करत करत एलिमिनेशन सुरु होत जातात. देशभरातले दर्शक आपल्या फेवरेट सिंगर बद्दल सेंटी होत जातात. हा सेंटीयापा वाढवण्यासाठी जज पण आपल्या अभिनयाचा कस लावतात. हे सगळं नवीन असतं त्यामुळे मला पटत असतं. वाढीव दराचे SMS पाठवून वोट करण्याचे आवाहन केले जाते. मी देखील एलिमिनेशन च्या वेळी नखं चावत बसतो. आपला भिडू वाचला की जीव भांड्यात पडतो. परत मग नवीन च्यालेंज. मग क्वार्टर फिनाले , सेमी फिनले आणि मग ग्र्यांड फिनाले .. मग ते पॉज घेऊन ३-४ वेळा गुगली करून विजेत्यांची नावे झुलवत ठेवणे. आपले देव पाण्यात असतात. आपण ना जिंकणार ना हरणार तरीही आपला रक्तदाब कमी जास्त होत राहतो. मग एक भिडू जिंकणार, महिनाभर त्याचंच कौतुक चालणार. त्याला कार, एक करोड आणि एक वर्षाचे कॉन्ट्रेक्ट. हरणाराला ठेंगा. जो जिता वही सिकंदर , हारा वो बंदर.

नंतर कळतं , केवळ SMS मधून करोडोचा नफा कमावला गेला. विजेता कोण होणार हे आधीच ठरलेलं असतं. मालिकेच्या TRP साठी जे जे काही करता येईल ते केलं जातं. शो मधला सेंटीयापा आठवून माथ्यावरची नस तडकते. आपण चुत्त्या बनलेलो असतो. जजेस चा त्यावेळचा चुतीयापा आठवतो . सगळं डोळ्यासमोरून जातं. नंतर परत रियालिटी शो न बघणे , फिक्स ! डन !

मात्र TRPची उपजाऊ जमीन सापडलेली असते. सगळ्या प्रकारचे शेतकरी सगळ्या प्रकारच्या रियालिटी शो ची शेती करायला लागतात. मग गाणे , नाचणे , पकवणे , कॉमेडी करणे इथपासून तर स्टंट करणे,  एकाच घरात २०-१ नमुन्यांना कोंबून त्यांना रोज तासभर दाखवणे , वगैरे वगैरे. त्यात व्हेरीयेषण म्हणून मुलांचे रियालिटी शोज , सेलेब्रेटीचे रियालिटी शोज. सेंटीयापा अपने चरम तक पाहूच जाता है. सगळ्या पडीक लोकांची जजेस म्हणून नियुक्ती होते. शोज एवढे होतात की अचानक आलेल्या मागणीला त्या क्षेत्रातून मुबलक पुरवठा होत नाही. मग कोणत्याही सोम्यागोम्याला उचलून जज बनवले जाते. जसे नाचण्यात पाय कुठे ठेवावा हेही माहित नसलेला चेतन भगत किंवा करन जोहर आता लोकांना डान्सवर जज करतो. फराह खान गाणे कसे गावे यावर एक्पर्ट ओपिनियन देते. सगळीकडेच एसेमेस मागवण्याची प्रथा असते. दर्शक सगळ्यांनाच मिळत असतात. सेंटीयापाच्या नव्या नव्या क्लुप्त्या काढल्या जातात. एंकर सडेगले जोक मारतो. हसू येत नाही. कोण हरले जिंकले याने फरक पडत नाही. आता जिंकणाराचे २ दिवसही कौतुक होत नाही. सावळा गोंधळ अविरत सुरु राहतो.

रियालिटी शोज ला मात्र मी २००४ च्या इंडियन आयडॉल नंतरच रामराम केला होता. आता मी फक्त ते पाहणारांवर लांबून हसतो . 

No comments: