Friday, July 25, 2008

ईट्स् अफ्रिका ब्वना !



घरी :
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !
"अरे हा काळा टी-शर्ट पण ठेऊ का ? आणि तुच एकदा चेक करून बघ ! " - ईति मातोश्री.

छोट्याश्या हॉल मधे मला लागणार्‍या न लागणार्‍या गोष्टींनी पसारा घालून ठेवला होता. आई बहीन एक एक गोष्ट आठवून काय काय लागेल याचा विचार करत होते. वडील गुपचूप माझ्या बुटांना बाहेरून पॉलिश करून आले होते. कारण त्यानी माझ्या बुटाला हात लावलेला मला मुळीच आवडत नाही हे त्यांना माहीत आहे.पासपोर्ट,स्नॅक्स,क्लोज अप ,टुथ ब्रश, कंगवा , हातरूमाल , नेक टाय ,सॉक्स, किरकोळ आजारांवरची औषधे,कॉस्मेटिक्स (हे आमच्या भगिनींचं प्रेम) , वॅसलिन , फॉर्मल शर्ट-पँटस् , कॅजूअल्स पासून ते नेलकटरच काय पण काही प्लास्टिकच्या पिशव्या (मला अफ्रिकेत गरज भासेल म्हणून) एवढ्या सार्‍या बारिक-सारिक गोष्टींची तयारी आईने केली होती, तिच्या मनात अजून काहीतरी राहीलय हेच विचार आणि त्यामुळे तिला कोणी आपल्याला काय बोलतंय हे प्रथम हाकेला ऊमगत नव्हतं. त्यात आई-बाबांचं भारत-पाकिस्तान युद्ध झालेलं असल्यामुळे काही चुक झाली की एकमेकांना टोमणे मारणे चालू होतं.पहील्यांदाच पोरगं घरं सोडून देश सोडून एवढ्या लांब चाललं होत.गेल्या २३ वर्षात कधी आईला सोडून एक आठवड्यापेक्षा जास्त राहिलो नव्हतो. आमच्या खानदानात कधी कोणी ग्रॅज्यूएशन ची पायरी चढलं नव्हतं आणि साधारण मध्यमवर्गिय खाऊन-पिऊन सुखी मराठी कुटूंबात जन्मल्या मुळे कोणी फिरण्याचे शौक पुरे करण्यासाठी परदेशवारी करण्याचा संबंध नव्हता. आप्पा-काकू आल्या होत्या आईच्या खास मैत्रिणी पण आल्या होत्या.चुलत भाऊ आलेला.जिगरी मित्र आले होते.सगळे अगदी ऊत्साहात होते. बाबांच्या डोळ्यात एक गर्व एक अभिमान होता. त्यांचे डोळे नक्कीच पाणवलेले होते.ते बोलणे पण टाळत होते कारण बोललो तर तोल सुटेल अशी त्यांना भिती असावी. त्याना काही विचारले की ते हातवार्‍यांनीच ऊत्तर देत होते. त्यांनी मी जाणार असं कळल्यावर सर्व नातेवाईकांना फोन करून करून बातमी पसरवून मोकळे झाले होते, तर आईने "कशाला सांगायचं?कळतं आपोआप !" म्हणून नेहमी प्रमाणे विरोधप्रदर्शन केलं. बाबांना मला कष्टाने शिकवल्याचा अभिमान होताच. पण आता मी ईतक्या लगेच परदेशात जाणार म्हणून एक सार्थक झाल्याचा आनंदही झाला होताच. आईने लगेच आपल्या स्त्रीसुलभतेची ऊदाहरणे द्यायला सुरूवात केली. "शेजारच्या आवटे बाईंना मी बोलले की आमचा गणेश अफ्रिकेला चाललाय , तर ते ऐकून न घेता तिने माझा धाकटा भाऊ कॅनडाला जाणार , त्याला किती डॉलर पगार मिळणार ई. चालू केलं , तो कॅनडाला जाणार हे मी गेली १० वर्षे ऐकते आहे (अतिशयोक्ती आहे, समजून घ्या) , बिड्या फुकत गावगुंडांबरोबर तर फिरतो गांजा न ताडी पण पितो असं ऐकलय(आमच्या आईला एवढ्या बातम्या कुठून मिळतात मला अजून कळालेलं नाही) , मरू देना आपल्याला काय करायचय ?(स्वत:च विषय काढून स्वतःलाच त्यात इंटरेश्ट नाही असं दाखवते) ". बहिण कोणतं क्रिम कशासाठी, काय कशात मिक्स करून तोंड रंगवायचं हे एकदम ऊत्साहाने सांगत होती. मी अफ्रिकेला जाऊन निग्रो होईल असं तिला वाटत असावं

ऑफिसात :
(शुक्रवार) आज रात्री मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघायचं होतं. कंपनी मध्ये इंश्योरंस , डॉलर्स ,इंव्हीटेशन लेटर आणि बाकी फॉर्मालिटी मध्ये अर्धा दिवस गेला होता.कॅब कनफर्म करून घेतली. ई-टिकीट च्या प्रिंटस मारल्या.पिएम या जायच्या वेळी पण नेहमी प्रमाणे चरख्यात ऊस ७-८ वेळा पिळतात तसा पिळत होता. तो जगातला एक नंबरचा रिकामटेकडा माणूस आहे आणि त्याच्या कडे मला पकवण्याशिवाय एकही काम नाही असं मला वाटत होतं. या गोष्टींची कुनकुन असल्याने आज धाकट्या भावाची सिबीझी मागून घेतली होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काम ऊरकंलं. गाडीला किक मारली न सुसाट घराकडे निघालो. कॅब वाल्याला घर सापडेल का ? तो वेळेवर येईल का ? आला तर निट विमानतळावर पोचवेल का ? आपला पासपोर्ट गायब होऊन घरी गेला तर ? ई-टिकीट हारवलं तर ? हे ईमिग्रेशन काय ? अरायव्हल विसा नाकारला तर ? एक ना अनेक प्रश्न डोक्यातून बाहेर पडायला तडफडत होते. सिग्नल सुटायच्या आधीच पळायचा पुणेरीपणा अंगात असल्याने सराईत पणे सिग्नल तोडत मनातल्या प्रश्नांना ऊत्तरे देत देत २० मिनीटात घर गाठले.गाडीपार्क करून जिना चढून वर गेलो. छोट्याश्या घरातला पसारा न गर्दी पाहून वैतागलो. बॅग टाकली अन फ्रेश होण्यासाठी बाथरूम कडे वळालो.
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !

कॅब वाल्याला दर १० मिनीटांनी फोन करून करून वैतागावला. शेवटी ८:१० ला कॅब आली. घराखाली कॅब लागताच घरचे आणि शेजारचे "मला घ्यायला विष्णू ने गरूड पाठवलाय" या अविर्भावात कॅब कडे पाहात होते. शेजारचे मास्तरचे कुटूंब हळूच दरवाज्याच्या फटीतून काय चाललय हे बघत होतं ( हे मास्तरच कुटूंब एक नंबर भेदरट पण निर्लज्ज पणे लांबून गंमत बघणार्‍यातलं ,एकदा कॉलनीत भांडण-मारामार्‍या झाल्या, हे पब्लिक दरवाज्याच्या फटीतुन नेहमी प्रमाणे एकावर एक डोकी बाहेर काठून ऊंदरासारखी गंमत बघत होतं,कार्टून मधल्या अंलक स्कृज च्या पुतण्यांसारखं). भावाने गाडीच्या डिकीत बॅग्ज भरल्या. आईच्या पाया पडायला वाकणार ईतक्यात आईने कवटाळून ऊराशी लावलं. बाबा कुठे गायब झाले ते कळल नाही,ते टेरेस वर गेल्याचं नंतर कळालं.सर्व वडीलधार्‍यांच्या पाया पडणे ,आशिर्वाद+एक सल्ला घेऊन झालं. आईचं दर मिनीटाला "स्वतःची काळजी घे","नीट रहा","फोन कर","व्यवस्थित जेवण कर" ही वाक्य लूप मध्ये चालूच होती.गाडीत बसताना वडीलांनी मीच त्यांना काल दिलेले १००० रुपये माझ्या खिशात कोंबत म्हणाले "राहूदे, तिकडे कामात येतील" म्हणू माझ्या संयमाचा बांध फोडला.आईने वडिलांना सावरत मला गाडीत बसायला सांगितलं.
शेवटी सर्व मित्रांच हाय-बाय झालं. अतिशय जड अंत:करणाने मी निघालो. कार हायवे ला लागली आणि मी मोबाईल काढून म्युझिक सूरू केलं (विचारांच थैमान चालूच होतं).. किशोरदांचा जादूई सूर कानी पडू लागला ...
जिंदगी के सफर मे , गुजर जाते है जो मकाम.... वो फिर नहीं आते...वो फिर नाहीं आते(२)
फुल खिलते है .. लोग मिलते है.. फुल खिलते है .. लोग मिलते है मगर,,
पतझड मे जो फुल मुर्झा जाते है वो बहारो के आने से खिलते नही...
कुछ लोग एक रोज जो बिछड जाते है .. वो हजारों के आए से मिलते है ..
उमर भर चाहे कोइ पुकारा करे उनका नाम ... वो फिर नही आते (२)

मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट (भारत) :
रात्री १२:१५ ला मुंबई अंतरराष्ट्रीय एअरपोर्टला पोचलो.
माझ्याबरोबर कॅब मध्ये एक अमेरिकेला जाणारा मराठी माणूस आणि एक व्हिएअतनामी होता. मराठी माणूस म्हणूल लगेच पटकन (स्वार्थी हेतूने)ओळख करून घेतली. पहीलीच परदेश वारी असल्याने व्हिसा-ईमिग्रेशन वगैरे भानगडी माहीत नव्हत्या. म्हटलं याच्या बरोबर राहून कळेल तरी.पण बॅडलकने नेहमीप्रमाणे साथ दिली. अमेरिकेला जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल आणि अफ्रिकन कंट्रीज मध्ये जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल वेगळं आहे हा खुलासा झाला. अमेरिका, युरोपात जाणार्‍या टर्मिनल वर सगळे गोरे भारी पॉश लोक होते. पाहून हादरून घेलो होतो . तशाच बॅग्ज घेऊन विचारपूस करत ईथोपियन एअरलाईन्स वाले आपले बस्तान कुठे लावतात शोधत आलो. अफ्रिका, आणि आखाती देशांत जाणार्‍या फ्लाईटचं टर्मीनल सापडलं. ईकडे थोडी कमी वर्दळ, सलवार-बुर्खा धारी पब्लिक होती. ते युएस ला जाणारी वर्दळ ईकडे का नाही? मी का ईकडे ? थोडं वाईट वाटलं. पुर्वीही डोमॅस्टिक विमान प्रवास केला असल्याने टिकीट न बोर्डींगची प्रोसेस माहीत होती. फ्लाईट ५:२५ ला होती. आता ५ तास एकटा काय करायच हा विचार डोक्यात गोंधळ घालत होता. व्हिसा हा ईथोपियाच्या कार्यालयात मिळेल या वेडपट कल्पनेने मी ईथोपियन्सच ऑफिस कुठे आहे हे विचारु लागलो. त्यांनी अजून त्यांच दुकान मांडलं नव्हत. कोणाला तरी पत्ता विचारला त्याने एका बोळकांडातून एका अंधार्‍या रस्त्याने सरळ जायला सांगितले.[डोक्यातले विचार जात नव्हते. कन्या राशीचे गुण जन्मजात असल्याने काही तरी विसरलोय म्हणून अस्वस्थ होत होतो. दर ५ मिनीटाला पासपोर्ट आणि ई-टिकीट ची प्रिंट चेक करत होतो.] मग त्या बोळकांडातुन निघालो. तो भाग रामसेच्या पिक्चर मधल्या भूताटकीवाड्या सारखा
वाटत होता. जवळपास २००-३०० मीटरचा ती अरुंद वाट पाहून मी विचारात पडलो हेच का ते झगमगणारे युएस टर्मिनल
वालं एअरपोर्ट. शेवटी ईथोपियन्स च्या कार्यालयात पोचलो. विचारपूस केल्यावर थोडीफार प्रोसिजर कळाली. विसा ऑन अरायव्हल यूगांडा मधे मिळेल असं कळलं. पुन्हा कन्या राशीने प्रश्न विचारला, तिकडे विसा नाकारला तर ? ते म्हणाले ,तुमचं तिकीट परतीचं आहे. आम्ही तुम्हाला नेऊ शकतो. विसा नाही मिळाला तर तुम्ही पुन्हा भारतात येवू शकतात. थोडा आश्वस्त झालो. पुन्हा माणसात येवून बसलो. शेजारचा ईसम पण माझ्या सारखाच पहील्या परदेशवारीचा असावा. मलाच तो नाना प्रश्न विचारू लागला. शेवटी मी जागा बदलून बसलो. ३:०० ला ईथोपियन्स ने दुकान लावलं. पटकन् बोर्डिंग पास घेतला. चेक इन केलं. इमेग्रेशन वाला मी कोणी आतंकवादी आसावा असा संशय असल्यासारखा प्रश्न विचारत होता. सगळं दिव्य पार केल्यावर शेवटी एकदा योग्य गेट पाशी येवून बसलो. फ्रांसला जाणारी फ्लाईट ही सेम गेटला लागणार असल्याने काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते. कोपर्‍यात येवून बसलो. झोप लागत होती.एक्दा तर डुलकी पण लागली (तेवढ्यात स्वप्न पडलं की मला अशीच झोप लागली आणि मी रवीवारच्या शेड्युल प्रमाणे म्हणजे दु १२ ला ऊठलो आणि माझी फ्लाईट मिस झाली...) खाडकन् जागा झालो.झोप पुर्ण ऊडाली. फ्रेंच संस्कृती आपला प्रचार अजुनही करत होती. चकाचक फ्रेशरूममध्ये जाऊन चकाचक फ्रेश होऊन आलो.काही तरी खाऊ म्हाटलं आणि एक कुरकुरेचा पुडा घेतला, सुट्टे नव्हते ५० दिले आणि ४० मिळतीय या आशेने त्याच्या कडे पाहीले."अरे ४०रुपिया दो ना भाई! ५० दिया मैने"- मी. "वो ५० काही है" - तो. "च्यायला १०रुपयाचं भुसकाट ५० ला देतो काय साल्या.. तुला पचणार नाही.. जुलाबावर बसशील ४० दिवस" -स्वगत.
पहाटे ५:४५
शेवटी फ्लाईट मध्ये बसलो. आणि अंग टाकून निश्चिंत झालो. पण थोड्याच वेळात लांबसडक पाय आपली जागा करू न शकल्या ने अवघडून आले. कसे बसे वाकडे तिकडे करून बसलो. सिट मागे घेतली. लगेच चिपड्या थोबाडाची एअर होस्टेस पचकली "स', विल यु प्लिस रीसेट द सिट ? यु कॅन रिलॅक्स व्हेन वी'र ईन द एअ' " ..."तुझ्या *******" एअरहोस्टेसला २-३ स्तुतीसुमनं झाडून त्या छोट्याश्या जागेत मन मारून बसलो." धड झोपही येत नव्हती. आजूबाजूला काही भारतिय (मोस्ट्ली केम छो भाई) भयानक अफ्रिकन्स आणि काही गोरे होते. एअर होस्टेस बळेच मधल्या लेन मधून येजा करून करवली सारखी मिरवत होती. "एका जागी गूमान बस की बाई ! का मुळव्याध झाला तुला ? " -माझे स्वगत. शेवटी फ्लाईट थोडी हलली,पुर्वी विमानप्रवास केल्यामुळे मी फारसा ऊत्तेजित नव्हतो, पण बाकी कोण पहीला प्रवास करतय हे त्यांच्या अतिऊत्साहाने चटकन लक्षात येत होते. तरी बरे बाहेर अजून अंधार होता. विमान धावपट्टीवर आले,आणि काही सेकंदात झटका देऊन वेग घेतला.. अलगद जमिनीपासून वर जाताना किंवा खाली येताना, पोटात गुददुल्या होतात, लै भारी वाट्ट.. विमान प्रवासात मला एकमेव आवडणारी गोष्ट.
थोड्या वेळात ती मघाशीचीच चिचकुळी एअरहोस्टेस डिंक्स ची ट्रॉली घेऊन आली. आमच्या शेजारच्या काळ्या महिलांनी द्राक्षासव घेतलं आणि मी लहान मुलाने मागावे तसे "वन, डाएट कोल प्लिज" म्हणताच त्यादोघी माझ्यावर तुच्छतेने हसत असल्याचा भास मला झाला. मग मी त्यांना "बेवड्या कुठल्या" म्हणून एक असूरी बदला घेतला. काल जेवण झालं नव्हतं, निघताना घाई झाली होती. विमानात फुकट आहे .. जाम चेपू म्हटलं तर साला ,"चिकन पफ" आणि केक न फ्रुट सॅलड, ति प्लेट त्या चिचकुळ्या तोंडाच्या होस्टेसच्या मुखकमलावर लेपावी असं मनोमन वाटलं. मग ४-५ वेळा एवढंस "चिकन पफ" मागितल्या वर तिने त्रासून म्हटल " सॉरी स',वी आर फिनिश्ड नाऊ, वुड यु लाईक इन वेज ?". "च्यायला आम्ही काय वाघ-सिंह वाटलो का गवताला तोंड न लावायला ?" . "या! प्लिज गेट ईट!! " -मी. आता कुठे दाढीतल्या फटी भरल्या होत्या पण तरी अजुन मागायला तिचं तोंड बघूनच नको वाटल". मग मस्त सिट लांबवलं तंगड्या पुढच्याच्या पायांपर्यंत गेला. मागून कोणी तरी सिट ऍडजस्टक करा असं केकळलं पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून तानून दिली. मध्येच कसली तरी अनाऊंसमेट सूरू झाली म्हणून जाग आली, तर पुन्हा त्याच चिचकुळ्या होस्टेसचं दर्शन झालं.पुन्हा डोळे बळच मिटून घेतले. आताशा थोडं ऊजाडलं होतं. सुर्योदय सुर्यास्त काय असेल माहीत नही पण सुर्य फार लोभस वाटत होता. एक सोनेरी कडा फारच मनमोहक वाटत होता. फटकन मोबाईल स्टार्ट करून २०-३० सेम दिसणारे फोटो क्लिकवले. आता थकवा थोडा दूर झाला होता.शेजारची ध्यानं , गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यांनतर स्थानिक पूणेकर जशी शांत झोप घेतो, तशा पहूडल्या होत्या. तेवढ्याश्याच जागेत कसं बसं अंग टाईट करून आळस दिला.आताशा पुर्ण ऊजाडलं होतं. खाली निळा प्लेन रंगाचा समुद्र, ढगांच्या छटा लोभस दिसत होत्या, विमानाचं पातं थरथरत होतं,"हे जर आत्ता तुटलं तर ?" -कन्यारास. ईथोपियाला विमान अलगद लँड झालं.

अदीस अबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट (ईथोपिया) :
सकाळचे १०:३०
पहिल्यांदा अफ्रिकन धरतीवर पाय ठेवताना,कोण्या एका पिक्चर मधे अमिताभ ट्रेन मधून जसा मुंबईच्या प्लॅटफॉर्म वर पाय ठवतो तसं वाटून गेलं. (हे फिलींग म्हणजे माझ्या बालपणी जुन्या ब्लॅक&व्हाइट टीवीला केबल पहिल्यांदाच जोडताना आलेल्या फिलींग सारखं वाटलं) ईथोपिया ते युगांडा कनेक्टींग फ्लाईट होती. माझ्यासाठी एक अजुन दिव्य. पुन्हा विचारपूस करत नेक्ट टर्मिनल आणि गेट शोधलं. एव्हाना धीट झालो होतो. २ तास वेटींग होतं. ईकडे तिकडे टाईमपास केला. सगळ्याबरोबर कोणी ना कोणी होतं, मला सगळ्या जगात मीच एकटा आहे असं वाटू लागंल. गर्दीत पण मग एकाकी पणा वाटू लागलं. मग मोबाईल काढला,हेडफोन कानात घुसवला .. आणि एव्हरग्रीन ओल्ड सॉंग लिस्ट प्ले केली...गाणं सुरू झालं
"मेरी भिगी भिगी सी ... पलकों पे रेह गये..जैसे मेरे सपने बिखर के ..
जले मन तेरा भी किसीके मिलनको ...अनामिका तु भी तरसे.........
तुझे बिन जाने ; बिन पेहेचाने.. मैने हृदयसे लगाय......
पर मेरे प्यार के बद्लेमे तूने मुझको ये दिन दिखलाया ............... "
दुपारचे १२:३०
अनाऊंसर : " ऑल पॅसेंजर्स टू एंटीबे आर रिक्वेस्टेड टू प्रोसिड टोवर्डस् गेट नंबर ११ "
तडक ऊठलो, बोर्डींग करताना, पुन्हा कन्यारास कुजबुजली "तुझं लगेज लोड नसलं झालं तर ? " दुर्लक्ष करून मस्त विंडो सिट घेतली, यावेळी शेजारी कोणीच नव्हत.. मग ही फ्लाईट आपल्या तिर्थरुपांचीच आहे अशा अविर्भावात मोकळा बसलो, यावेळी एअर होस्टेस पण जबरा होती नव्हे होत्या , सगळा आनंदी आनंद च होता, यथेछ पफड् एग आणि कोंबडीचा (मराठीत) ऊच्चारता न येणारा पदार्थ ४ वेळा मागून घेतला, आणि तिनेही अगदी गोड चेहर्‍याने दिला,
आणि ईतकी मादक(!) हसली की , एक क्षण "माझ्याशी लग्न करशील का गं, आज आत्ता, ताबडतोब , या ईथे ?" असं विचारावंस वाटलं ...
ऊरलेल्या दाढांच्या खाचा भरल्यावर तरतरी आली.चहा आणि मिल्क केक चापून एक (अत्तृप्तीचा) ढेकर दिला आणि झोपलो आणि ऊठलो ते थेट यूगांडा आल्यावरंच !

एंटीबे इंटरनॅशनल एअरपोर्ट(युगांडा) :
दुपारचे ३:३०
शेवटी ऊतरलो एकदाचा. सुदैवाने बँकेचा (क्लायंट) माणूस "मायकेल" माझ्या नावाची पाटी घेऊन ऊभा होता. व्हिसाला प्रॉब्लेम आला नाही. सगळे त्यानेच केले. चला सुटलो बुआ. आता लगेज साठी कन्व्हेयर बेल्ट पाशी जाऊन ऊभा राहीलो. १० बॅग्स गेल्या ..२० गेल्या ..३० गेल्या ---२० मिनीटे झाली.. कन्यारास-"तुझी बॅग मुंबईतच तर नाही ना राहीली चढवायची ? " टाळक सटकायला लागलं .. नंतर नंतर येणारी प्रत्येक दुसरी बॅग माझीच आहे असं वाटू लागलं, पण ती आधीच कोणी तरी ऊचलून घेत असेल... आआआआआणि शेवटी माझी बॅग सुखरूप हातात आली आणि माझं काळीज पुन्हा छातीत फिट झालं . "मायकेल" माझ्यासाठी चकाचक टोयोटा करोला घेऊन आला होता.
स्वगत ; "मायला! पुण्यात एवढी वर्षे पीएमटी ने कसा प्रवास केला रे आपण? ऑटो करताना ३ जण असून पण किती विचार करायचो ! आणि चक्क करोल्ला ! अर्रे वा !! चला बसा , फुकट आहे !!! फुकट ते (अति) पौष्टीक नाही का ? "
आणि मायकेल ने काही सेकंदात गाडीचा काटा १२० किमी/ताशी वर नेला.

(विमानातुन लँड व्हायच्या आधी जे विलोभनीय (युगांडन) दृश्य मी पाहीले त्याने माझ्या सर्व (दुषित) पुर्वग्रहांना ऊपग्रहा सॉरी धक्का दिला ! ते पुढे ....)

क्रमशः
----------------------------------------------------------------------------Prashant Nimbalkar (२५-०७-२००८ ००:४५)

टिप : ब्वना : मित्र /दोस्त या अर्थी स्वाहीली मधे