Thursday, January 20, 2011

सवय

णमस्कार्स लोक्स ,
असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते. काही जण दुसर्‍यांच्या वस्तु मागण्याच्या सवयीने ग्रस्त असतात. काहींना विसरण्याची सुद्धा सवय असते. मी पाहिलेल्या महाभागांपैकी काहींना तर पैसे मागायची देखील सवय असते. ते असेच १० रुपये आहेत का रे सुट्टे ? म्हणुन पैसे मागायचे. काहींना फुकट खायची सवय असते तर काहींना फुकट प्यायची सवय असते. जसे फुकट पिणारे असतात तसेच काहींना बाजिरावकी ची सवय असते. हे लोक दुसर्‍यांची बिलं भरण्यास फार उत्सुक असतात. काहींना प्रामाणिकपणे वागायची सवय असते (दुर्दैवानं ह्यांच प्रमाण फारंच कमी आहे ). सवयी एक ना अनेक. अगदी 'व्यक्ति तितक्या प्रवृत्ती' आणि 'प्रवृत्ती तितक्या सवयी' म्हंटल्यास वावगं ठरु नये.
हं , तर बहुतेक सवयी अशा असतात की त्या आपण एवढ्या सुलभतेने करुन जातो की समजतही नाही. मला तशी पाय हलवायची सवय . क्रिटीकल केसेस एक्ग्झेक्युट करत असतांना ( इथे क्रिटिकल कामे करत असताना , असं थोडक्यात लिहीणार होतो , पण तुम्हा फॅंटसी प्रेमी लोकांचं काही सांगता येत नाही ) माझा पाय नकळत ऑस्सिलेट होतो , परवाच्या दिवशी तो जरा जास्तंच दुखत होता. ही सवय घालवण्याचा मी बराच प्रयत्न करतो. परंतु त्याने फक्त इरिटेशन येतं.
माझ्या आईचे चुलते ज्यांना आम्ही 'बापु" म्हणत असु , बर्‍याचदा आमच्या घरी येत . त्यांना एक विचित्र सवय होती . ती म्हणजे मोठ्ठ्या आवाजात पादण्याची. आम्ही खुप हसायचो . पण त्यांच्या ही सवय फक्त ध्वनीप्रदुषण करायची. वायुप्रदुषण होत नसल्याने त्यांच्यासवयीचा जास्त त्रास होत नसे. माझे बाबा मात्र त्यांची मस्त फिरकी घ्यायचे. ते येणार आहे असं कळल्याबरोबर आई ला आम्ही कानांच्या सौरक्षणार्थ कापुस मागायचो. बापुंना आपल्या सवयीचं ना वाईट वाटे ना लाज. कोणतेही पाहुणे असोत , कोणतीही वेळ असो , बापु बसल्या जागी एका साईड ने वर करुन मस्तपैकी सिंहगर्जना करायचे. त्यां त्यांच्या त्या ठार्रर्रर्रर्र ठुर्रर्रर्र ने मस्त मनोरंजन होत असायचं Smile गमतीने आम्ही त्यांना "इच्छाधारी पादरे" म्हणत असु.
सवय ही फक्त हलचालींचीच नसते. काहींना बोलताना विषिष्ठ शब्द बोलण्याची सवय असते. आमच्या मित्राच्या कॉलेजातले एक महाभाग " म्हंटलं " म्हणन्याचे आदि होते. प्रत्येक वाक्याच्या शेवटी ते "म्हंटलं" चा फुटर जोडत. एकदा त्यांना पिक्चर ची तिकिटे बुक करायला लावली. तिकडून फोन करताना ते म्हणतात , " अरे मंगला ला हाऊसफुल झालंय म्हंटलं ... " ,"रात्रीचाही शो फुल आहे म्हंटलं .. " "आता राहुल ला आलोय म्हंटलं .. " "पण इथेही हाऊस फुल आहे म्हंटलं ... ' शेवटी मित्र वैतागला आणि म्हणाला ... "मग माघारी या म्हंटलं ... " .
आमच्या जिम मधल्या एका कोच ला (कोच कसला ? पिल्लु साला ) दुसर्‍यांच्या गाड्या मागायची घाणेरडी सवय आहे. एक दिवस त्याने अस्मादिकांना गाडीची पृच्छा केली. तेंव्हा मला त्यांची हिस्ट्रि माहित नव्हती .पण मी माझी गाडी कोणालाच देत नाही , तशी त्यालाही दिली नाही. तर त्याचा त्याला राग आला आणि त्याने आमच्याशी बोलनं बंद केलं , त्याचा तो लाड पाहुन त्याला आम्ही सिंगल आउट करायचं ठरवलं , त्याची दुसरी सवय म्हणजे , जिम मधे समोरच्याला सपोर्ट देताना रिपिटेशन मोजण्याची एक स्टाईल असते .. हा सातव्या रिपिटेशन ला नेमका "सेन " (७) म्हणतसे. त्याचा तो "सेन" आम्ही लक्षात ठेवला आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणुन कुठे ही मोठ्याने .. "कमॉन सिक्स .. . अप .. सेन " म्हणुन त्याच्या "सेन" ची फुल वाट लावली. आता तो व्यवस्थित "सेव्हन " म्हणतो असं कानावर येतंय =)) त्याच्या ह्या गाडी मागण्याच्या सवयी मुळे बाकीच्यांनीही त्याला चिडवण्याचे चान्स सोडले नाहीत .कोणी त्याला चार फुटाचा बिल्डर म्हणतो तर कोणी भुरट्या .. असो जो तो आपापल्या सवयींमुळे ट्रिटला जातो नाही का ?
कधी कधी सवयींची लागण व्हायला वेळ लागत नाही. एखाद्याची सवय आपण चिडवण्याच्या हेतु ने कॉपी करतो खरी पण ती चुकुन आपल्यात कधी शिरते कळत नाही. Smile हनुमान जिम चे संस्थापक असेच. यांना दर वाक्यात दोनदा तरी ब्यानचोद किंवा ब्यान्डी (भेंडी) म्हणायची जाम सवय . जिमात अ‍ॅडमिशन घेतलेल्या कोणत्याही किडमिड्या पोर्‍याला हे हरभर्‍याच्या झाडावर चढवताना "ब्यानचोद ... ३ म्हैन्यात बॉडी होती ... ब्यान्डी .. १० किलो वजन असं वाढेल .. " पोर्‍याची छाती २ इंच तिथेच वाढे. ह्या जिममालकांचं नावंच कालांतराने ब्यानचोद पडलं .. आणि त्यांची सवय कॉपी करता नकळत स्वभावात शिरली .. घरी एकदा नकळत तो शब्द तोंडातुन निघुन गेला.. तिर्थरुपांच्या कपाळावरच्या अठ्या पाहुन नंतर मोठ्या कष्टाने ही सवय घालवण्यात अस्मादिक यशस्वी ठरले.
एकजण ओळखीचा आहे त्याला बसल्या बसल्या चावायची सवय आहे. काय लोचा आहे ते माहित नाही. पण समोर दिसेल ते चावत बसतो. किचेन असो किंवा कार्ड .. किंवा कोणतीही आजुबाजुला पडलेली वस्तु. हे महाशय अगदी त्यांच्याही नकळत त्या वस्तुला अगदी च्युईंग गम सारखे चावतात. असो , असते एकेकाला आवड.
माझ्या ओळखीतल्या एका मुलाला निलचित्रफिती जमवण्याची भलतीच सवय लागली होती. जुण्या काळी जेंव्हा ४० जीबी च्या हार्ड डिस्क्स सुद्धा लज्गरी समजली जायची , तेंव्हा ह्या महाशयांनी ६० जीबी ची हार्ड डिस्क स्पेयर डिस्क म्हणुन पार खिशाला खार लावुन विकत घेतली. आणि तिच्यातला बाईट न बाईट फक्त ह्याच सवयी साठी उपयोगी आणल्याचे स्मरते. ह्यांना आपल्या ह्या सवयीचा फारंच अभिमान. ही सवय यांच्यात इतकी भिणली होती की ६०जीबी भरल्या नंतर ह्यांनी आपल्या मुख्य हार्ड डिस्क वरचा एकेक डेटा उडवुन त्यावरही निलचित्रफिती भरण्यास सुरुवात केली. नंतर जागा पुरेनात म्हणुन महाशयांनी सिस्टिम फाईल्स सुद्धा उडवल्या होत्या. नंतर रिस्टार्ट केल्यावर कंप्युटर काही सुरुच होईना. तेंव्हा आमच्याकडे आले होते तेंव्हा त्यांचा हा पराक्रम पाहुन आम्ही पोटभर हसुन देखील घेतले होते.
आम्ही कॉलेजचे सुरुवातीचे तिनेक आठवडे श्री टींग्या यांच्या चरणस्पर्षाने पतित पावन झालेल्या कॉलेजात काढले. तिथे एक महाभाग मुलांकडुन रिफिल च्या निमित्ताने चाराणे- आठाणे मागत आणि तिन रुपये जमा झाले की जाऊन वडापाव खात. ही अनोखी सवय आम्ही अजुन कोणातही त्यानंतर पाहिली नाही ( त्यापुर्वी देखील पाहिली नव्हती) .
सवयी फक्त भौतिक जिवनातंच असतात असं नाही. आभासी जगात वावरणार्‍यांनाही सवयींपासुन सुटका नाही. हं आता ह्यावर लिहायला घेतलं तर सर्वर्स ची जागा पुरणार नाही. कारण आम्ही काही मेगाबायटी लिहीणार्‍यांतले नाहीत. Smile मोठ्ठाले आणि विषयाचा किस काढनारे प्रतिसाद / किंवा लेख लिहीण्याची सवय काहींना आहे .. त्यांनी ते शिवधनुष्य उचलावं असंच मी म्हणेन. काही जालमानवांना बोजड लिहीण्याची सवय सिद्धी प्राप्त आहे. ते प्रतिसाद लिहीताना जर कात्रज पासुन सुरु करत असतील तर प्रतिसादाचा शेवट होइतो ते चाकण - राजगुरुनगर ला पोचलेले असतात. काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. ह्या सवयीच्या आयडीज ना आवरणे फार मुश्किलंच नाही तर नामुनकीन असते. अलिकडे यांच्यात भरपुर कॉपिटिशन आहे. आपलं मराठी भाषाज्ञान आनि शब्दसंग्रहं किती अमाप आहे हे झळकवण्याची यांत जणु चढाओढ चालु असते. असे पाणभर प्रतिसाद खरोखर् वाचण्याची किती जणांना सवय आहे ह्या बाबद मात्र मी अनभिज्ञ आहे Wink
काही आयडीज ला अंतराष्ट्रीय राजकारणात आपण किती मुरलेलो आहोत हे दाखवन्याची देखील सवय असते. हो आता अंतरराष्ट्रीय राजकारणात फक्त तिन-चार किंवा भारताला गृहित धरल्यास पाच देश आहेत. अमेरिका , चिन , पाकिस्तान क्वचित प्रसंगी कोरिया किंवा रशीया सोडलं तर अंतरराष्ट्रीय राजकारणात ठेवलंय तरी काय ? पण ह्या सवयीची लोकं राजकिय घडामोडींवर मस्त बारिक लक्ष ठेवुन असतात , ओबामा पादले तरी ह्यांना ओबामांच्या आधी त्याचा वास्/आवाज ( अ‍ॅज पर अ‍ॅप्लिकेबल ) येतो . मुषर्रफांचा हल्ली कोटा खराब आहे, अफगाणिस्तानात रस्त्यावर खाल्लेल्या सिख्-कबाबांमुळे त्यांना ढंडाळ्या लागल्या आहेत आणि त्यासाठी ते आमुक आमुक बाबांचे चुर्ण खात आहेत ह्याची माहीती देखिल सवयीदाखल यांना असते. काहींच्यात मग स्त्रीद्वेष भिणलेला असतो तर काही अवांतर गप्पा हाणण्याच्या सवय असते. काही केवळ विरोधासाठी विरोध करतात तर काहिंना स्त्रीयांची प्रतिमा (जरी खालावली नसली तरी ) उजळवण्याच्या सवयी असतात ( ह्यात ते नक्की काय करतात / साधतात ते देव जाणे ). आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते. काही लोकांना सिस्टिम वर खडे फोडण्याची सवय असते . काही कडव्या हिंदुप्रेमींना कॉंग्रेस वर शरसंधाण करण्याची सवय असते तर काहिंना कॉंग्रेस विरोधकांच्या वक्तव्यातला खोटेपणा / गॅप्स दाखवण्याची सवय असते. सवय सगळीकडे आहे .
ही सवय इतकी महान आहे की रजनिकांतला सुद्धा अशक्य गोष्टी शक्य करण्याची सवय आहे.
काहिंना अलिकडे प्रतिसाद/ लेख देखी सवयीदाखल ऊडवण्याची देखील सवय लागली आहे म्हणे
तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?

कुमार गोडबोल्यांची प्रेमकहानी ...

हं तर झालं असं हे कु. गोडबोले नुकतेच एका मल्टिनॅशनल सॉफ्टवेयर कंपनी मधे रुजु झाले होते. मी नुकताच देखील एक महिन्यापूर्वी रुजु झालो होतो आणि नविन जागेवर बसायला आल्याच्या दुसर्‍या दिवशी कु. गोडबोले क्युबिकलात बाजुच्या डेस्कावर आले होते. कु. गोडबोले तसे लाजरे बुजरे दिसत होते. घरचं वातावरण कडक असावं. कारण ते दिवसातुन जेवढे दोन चार शब्द बोलत त्याला देखील साखरेचा मुलामा लावुन गोड आवाजात बोलत. गोडबोले फार हुषार असावेत हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर कळलं. मस्त पैकी सीओईपी सारख्या नामवंत आणि फक्त ओव्हर टॅलेंटेड लोकांसाठी असणार्‍या कॉलेजातुन ह्यांनी संगणक पदवी प्राप्त केली होती. उंचीला तसे अ‍ॅव्हरेजंच . पण गोरेपान आणि अति अभ्यासु किड्याला असतो तसा बर्‍यापैकी नंबरचा चष्मा. पण तो सुबक फ्रेम मुळे त्याला स्मार्ट दिसतो. गोडबोल्याच्या कंपनीत आल्या आल्या काही तरी उच्च अपेक्षा असाव्यात. आपल्याला एखाद्या लाईव्ह प्रोजेक्ट वर टाकावं , पुस्तकांत शिकल्याप्रमाणे सॉफ्टवेयर आर्किटेक्चर आणि मोडयुल डिझाइनचं एखादं टास्क मिळावं किंवा गेला बाजार एखादी कोर फंक्शणॅलिटी पार मुळासकट बदलुन टाकण्याचा आणि स्क्रॅच पासुन कोड लिहीण्याचं काही तरी काम मिळावं म्हणुन गोडबोल्याला नेहमी वाटे. त्यामुळे तो नेहमी कंपनीच्या लायब्ररी मधुन कसलीशी ब्लॅकबुकं किंवा ठोकळे रेफरंस बुकं घेउन यायचा. आणि नुसता यायचाच नाही , तर ती खोलुन पानं च्या पानं खायचा देखील. गोडबोल्याची बुद्धी तल्लख आहे हे मला जाणवलं होतं , पण त्याला योग्य दिशा मिलत नसल्याने एखाद्या रँडमली फिरणार्‍या मोलेक्युल सारखा त्यातुन तो फक्त गॅमा रे पसरवत होता आणि माझ्या बाजुलाच बसत असल्याने त्यांची झळ मला बसत होती . काही दिवसांनी तर मी एखादा उष्मारोधक सुटंच घालुन येईल की काय से वाटु लागले. अरे गोडबोल्या , कॉलेजात केला तो अभ्यास पुरे रे .. आता तरी त्या पुस्तकांतुन बाहेर नीघ , आयटी क्षेत्रातल्या तुझ्या कवीकल्पनांना लवकरंच तडा जाणार आहे तेंव्हा एम् सील घेऊन तयार बैस ! पण ऐकेल तो गोडबोल्या कसला ? आणतोय एकेक पुस्तकं .
हळु हळु सगळे स्थावरले. गोडबोलेही स्थावरले. गोडबोल्या आणि मी एकाच प्रोजेक्ट मधे आलो होतो. प्रोजेक्ट भला मोठा होता , त्यामुले भरपुर टिम पाडुन प्रत्येक टीम ला एकेक मोड्युल आणि त्यातही वेगवेगळ्या स्तरावरच्या फंक्शनॅलिटीवर टाकले होते. गोडबोल्या पुर्ण कॉलेजात कधी पुस्तकांच्या गठ्ठ्यातुन बाहेर पडला नव्हा हा माझा अंदाज खरा होता. व्हर्व असो वा कॉलेज गॅदरींग , कॉलेज आउटिंग ला सुद्धा गोडबोल्या पुस्तकांत गुरफटलेला असे. त्यामुळे गोडबोले अभ्यासात नोबेल विनर असले तरी एक्स्ट्रा करिक्युलर्स मधे मात्र झिरो होते. मग पोरगी पटवणे वगैरे गोष्टी तर लांबच राहिल्या. गोडबोले एकदम हृतिक नसला तरी अगदीच आषिश विद्यार्थी पण नव्हता. पण घरुन "अभ्यास करत जा " , " रँक आली नाही तर बघ " , " नसत्या कटकटींत गुंतु नकोस " , " अभ्यासावरुन विचलीत होईल अश्या गोष्टींत लक्ष घालता कामा नये " , " पैसे जपुन खर्च करणे " असल्या इंस्ट्रक्षण्स मिळाल्यामुळे गोडबोल्याचे कॉलेजपन अगदी बालपना सारखे गेले . गोडबोल्याला भावना नव्हत्या असं नाही. पण त्या भावना त्याने घरच्यांच्या अपेक्षा आणि पुस्तकं या खाली पार दाबुन टाकल्या होत्या. पण हळु हळु गोडबोल्या मोकळा होत होता.
पण गोडबोल्या माझा एवढा पचका करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कंपनीत स्पोर्ट्स इव्हेंट होत होते. सगळा बाजार तिकडे उलंडला होता. म्हणुन मी कंपनीतली हिरवळ दाखवण्यासाठी गोडबोल्याला ग्राउंड वर घेऊन गेलो . व्हालिबॉल चे सामने चालु होते. पोरं मस्त पैकी शॉर्ट्स आणि टिशर्ट्स वर खेळत होती. कोणी नुसतीच स्टाईल मारत होता. तर कोणाला साधा बॉल सुद्धा मारता येत नाही म्हणुन ओशाळत होता पण तरीही खेळमं काही सोडत नव्हता. तर हा गोडबोल्या मला म्हनतो कसा, " अरे तो काळ्या चड्डीतला पोरगा बघ ना , कसला स्मार्ट दिसतोय रे " , मी कपाळावर आठ्या उमटवत गोडबोल्याकडे वळुन पाहिलं , माझे भाव त्याला झेपलेच नाहीत , म्हणतो " तो पिवळ्या टिशर्ट वाला बघ ना यार , काय हाईट अन् बॉडी आहे .. वा ! " . मी कपाळाला हात मारला. म्हंटलं लेकाच्या ग्राऊंडच्या अवतीभवती एवढे अ‍ॅसेट्स नाचवत ललनांचा थवा फिरतोय , त्यातल्या एकीवरही तुझी नजर जाऊ नये ? गोडबोल्या त्यानंतर मग फक्त मुलांच्या खेळाचे आणि त्यांच्या हाईट बॉडीचे कौतुक करत राहिला.
ह्या प्रकरणानंतर गोडबोल्याने माझ्या कडे कितीही भावना प्रकट केल्या तरी मी त्याच्याशी त्या विषयावर बोलत नव्हतो. पण एक दिवस गोडबोल्या चक्क मला बार मधे घेउन गेला. अधुन मधुन कधीमधी गोडबोल्या गुपचुप बियर मारायचा. आज तो मला घेउन गेला होता. एक किंगफिशर प्रिमियम गोडबोल्याने डोळे मिटुन एका झटक्यात रिकामी केली. गोडबोल्या आता झिंगला होता. इतर वेळी एकदम सोफेस्टिकेटेड्ली बोलणारा गोडबोले एकदम पेटलाच होता. "भेंचोद टार्‍या ... " गोडबोले बियरचा ग्लास टेबलावर आपटत म्हणाला , " साला लाईफ झंड आहे राव ... २४ वर्षं फुकट घालवली राव "
मी , ".... "
" साला लहानपणा पासुन नुसता अभ्यास , नुसत्या इन्स्ट्रक्शन्स , आईचे नुस्ते डुज अँड डोन्ट्स चे तक्ते ... आय अ‍ॅम फेडप "
गोडबोल्या रडत होता. आज तो अचानक फेड अप का व्हावा ? आणि आज अचानक त्याचे डोळे का पाणवाले ? माझ्या साठी सगळंच एक "अवघड कोडं " होतं. संस्थळांवरच्या कोड्यांच्या नादी लागण्याची सवय नसल्याने ह्या ही कोड्याचं उत्तर मला मिळेल का नाही ह्यात शंका नव्हती. Smile त्यानंतर गोडबोल्या अखंड रित्या त्याचं फ्रस्ट्रेशन काढत राहिला , आई वडीलांना कोसत राहिला, उरलेल्या शिव्या तो मला देत होता , पण मला त्या शिव्यांचं काही वाटत नव्हतं. कार्यक्रम संपल्यावर गोडबोल्यानं मला घट्ट मिठी मारली. आणि परत ओक्साबोक्षी रडला. मद्यपानानंतर माणुस जेंव्हा बोलायला सुरुवात करतो तेंव्हा आपण फक्त ऐकण्याचे काम करायचे असते हे मी पुनम बारच्या अनुभवांतुन शिकलो होतो.
पाच सहा महिन्यातं गोडबोल्या आता पक्का रुळला होता. त्याची पुस्तकं मागं पडली होती. नेहमी फॉर्मल कपड्यांतला गोडबोलु आता फॅन्सी जिन्स आणि कुल टिशर्ट्स , गॉगल , हॅट्स , डियो न काय काय वापरु लागला होता. त्याला कोणी तरी पोरींना "कुल डुड" आवडतात म्हणुन सांगितले होते. असे वागल्या नंतर पोरी आपल्याला येऊन चिकटतील ह्या भाबड्या कल्पनेत गोडबोल्या जगत होता. गोडबोल्या कधीच कोणत्या पोरीला अ‍ॅप्रोच करत नसे. नव्हे त्याची हिम्मतंच होत नसे. गोडबोल्या एक सुंदर कविताकार आहे हे मला अपघातानेच कळलं . एक दिवस काही कामानिमित्त त्याचा ड्रॉवर उघडला असता त्यातुन कागदांचा भला मोठा गठ्ठा मिळाला . काय सुंदर शब्द बंबाळ कविता करतो गोडबोल्या वा. एवढे गोड शब्द , एवढे गोड शब्द ? " अरे गोडबोल्या , ह्यातला कोणताही एक पिस पोरीच्या हातावर किंवा कानावर टेकवला असता तरी तुझं काम झालं असतं की रे ? " एकेक पान चाळत मी त्याला म्हणालो. गोडबोल्या त्यावर फक्त " च्यक् , असं थोडी असतं ? " म्हणत काहीतरी कमांड टाइप करत राहिला. "अरे खरंच .. पोरींना बाकी काही आवडो वा न आवडो , कविता जरुर आवडतात , आणि त्यात जर त्यांची तारिफ केलेली असेल तर मग काय विचारता ? " मी आपलं ज्ञान पाजळत म्हणालो .. गोडबोल्याला आता जरा इंटरेस्ट आला होता , "ए खरंच का रे ? मला वाटायचं पोरगी चिडेल , कंप्लेंट करेल .. "
" हत लेका .. एवढं गोड बोलल्यावर तर दगड पण पाझरेल , तो कंबख्त लडकी क्या चिझ है ? " मी खांदे उडवत म्हणालो. आता गोडबोल्या साठी मी एक आदर्श गुरु होतो. मी जे सांगेल ते गोडबोल्या करणार होता. त्याला ती कोपर्‍यातल्या क्युबिकल मधली पोरगी आवडायची. पण तिचं नाव गाव पत्ता ह्याला काही ठाऊक नव्हतं , तसा काही चान्स पण नव्हता.
गोडबोल्यात हिम्मत तर नव्हतीच , किमान नाव तरी माहिती हवं म्हणुन काही तरी करायला पाहिजे पण सुचत नव्हतं तसा गोडबोले अस्वस्थ झाला. गोडबोल्या ला म्हंटलं एक आयडीया कर. लंच ब्रेक ला सगळा फ्लोर रिकामा होतो तेंव्हा तिच्या कंप्युटर पाशी जा , आणि कोणत्या युजर ने कंप्युटर लॉक केलाय बघ. गोडबोल्याला स्वर्ग २ बोटं राहिला होता. जसं भाकित केलं होतं तसंच घडलं , गोडबोल्या गेला न गपचुप कंप्युटरवर नाव बघुन आला. आणि बावळटा सारखा तिकडुनंच ओरडला " सौम्या .. .सौम्या आहे रे ही ... " त्या सरशी वारुळातुन नागोबांनी डोकं बाहेर काढावं तसं ४-५ क्युब्ज मधुन डोकी वर आली. पण त्यांना त्याचं काही वाटलं नसावं , कारण जशी ती डोकी वर आली होती तशी पुन्हा आत गायब झाली. सौम्या चं नाव कळल्याने गोडबोल्या खुशीत होता. माझ्याकडे येत म्हणाला ... "येस्स .. सौम्या .. व्हाट्स नेक्स्ट मिष्टर टारु ? ? " त्याला म्हंटलं व्हाट नेक्स्ट काय ? ती दुपारी एकदा कधीतरी त्या चहा च्या मशीन पाशी चहा आणायला जाते. तिथं शक्यतो कोणी असतं , पँट्रीवाला / वाली असेल तर त्यांना सरळ इग्नोर करायचं Smile " हो हो .. बरोबर .. आणि ? " गोडबोल्या मी पार घास भरवुन देईन इतपर्यंत अपेक्षा करत होता. " आणि मग मी जातो तिकडे आणि तिच्याशी गुलुगुलु बोलतो "
तसं सौम्या आणि गोडबोल्या एकदम काटकोणात बसत असल्याने दोघांनी माना वळवल्या की एकमेकांची टाळकी दिसत. आयडीइया देऊन आठवडा झाला तरी गोडबोल्याचा धीर काही होत नव्हता. पण गोडबोले हल्ली माझ्याशी वळुन बोलायचा कमी झाला होता. त्याचं सगळं लक्ष त्या कोपर्‍यातली वर होतं .. मी पण जरा प्रश्नपक्षातुन आराम मिळाल्याने मिसळपाव वर व्यवस्थित बिनारुकावट टाईमपास करत होतो. Smile एकदा अचानक गोडबोल्या उठला आणि कॉफी मशीन च्या कोपर्‍यात गेला. ती तिथे कॉफी घेत होती. मी उत्कंठेने हे महाराज काय करतात ते पहात होतो . त्यांचं काहीतरी बोलनं झालं आणि गोडबोल्या हसत हसत आला. म्हंटलं काय रे काय झालं ? झालं का काही ?
"अरे हो मग ... मी तिला सांगितलं , इथंला चहा फारंच पाणचट असतो नाही ? " त्यावर ती म्हणाली सुद्धा ..
"काय ? "
" हो " ... " हो " म्हणाली गड्या ती , आणि हसली सुद्धा. प्रेमात पडलेल्या प्रेम विराला पोरगी कशीही हसली तरी ती फक्त आपल्या साठीच हसल्याचे भास होतात पण हे त्याला कोण समजावेल ? पण समजावणे जरुरी नव्हतं , ह्यामुळे गोडबोल्याचा कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता असते. त्यानंतर रोज आठवडाभर गोडबोल्या तिला कॉफीमशीन पाशी गाठत राहिला आणि काहीतरी फालतुपणा करत राहिला. ह्याने काही यश येणार नाही हे जाणुन मी त्याला म्हणालो . .
" तीला टपरीवरचा च्या का पाजत नाहीस ? चांगला असतो ना ? "
"अरे हो यार .. " गोडबोल्या उत्साहात म्हणाला.
लगेच गडी त्याच दिवशी तिला तसं बोलला देखील . तिने ह्यावेळी मात्र गोडबोल्याला नोटिस केलं . काहीशी संकोचली ती , काही सुचलं नसावं . पण ही शाळा थोडी आहे . गोडबोल्या तिला घेउन चालला होता, आमच्या डेस्क पासुन जाता ना .. "चल रे चल च्या पिउन येऊ" म्हणाला . "येडा रे येडा ... जा लेका .. मला कामं आहेत " मी वर न बघता हसत हसत उत्तर दिले.
त्या दिवशी स्वारी जाम आनंदात होती. गोडबोल्याची भिड चेपली होती. दिसायलाही सभ्य आणि सुरक्षित वाटत असल्यामुळे सौम्या ने त्याला काही इग्नोर केलं नव्हतं . खरं तर ती देखील नविनंच आली होती , आणि कोणीही मित्र नसल्यानं हे गोडबोल्याच्या पथ्यावर पडलं होतं .
"काय मिष्टर गोडबोले , तुमची तर निकल पडी ... काय ऐकत नाय आं पप्लिक आता " मी सकाळी सकाळी हेलमेट ठेवत न जॅकेट खुर्चीला टांगत गोडबोल्याला म्हणालो. तसा गोडबोल्या एकदम लहान मुलासारखा हसला. गोडबोल्याने माझं बघुन लगेच जिम पण जॉइन केली होती. सौम्याची गाडी आता बर्‍या पैकी व्यक्तिगत पातळीवर गेली होती .गोडबोल्या नॉर्मली बोलावं तसं तिच्याशी बोलत होता. ती देखील त्याला मित्राच्या नात्यानेच वागवत असावी.
" काय रे सोंड्या ,एवढ्या छाण छाण कविता करतोस ... एखादी ऐकवलीस का तिला ? " मी.
"हो ना गड्या , केलीये तर .. एक छाण कविता केली ये ... अगदी तिच्यावरंच .. म्हणजे तिचं नाव नाही त्यात पण तिच्या सगळ्या कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत त्यात " गोडबोल्या ड्रॉवर उघडुन कागद पुढे करत म्हणाला.
कविता खरोखर छाण होती . मी आपलं त्यातही नाक खुपसत त्यात २ बदल सुचवले ते त्याने विनासंकोच केले देखील
"आज ही तिला ऐकवणार ... " गोडबोल्या कौतुकाने कवितेकडे बघत म्हणाला.
चार च्यासुमारास गोडबोले तिला घेऊन खाली गेले. खिडकीतुन मी पाहिलं , गोडबोल्या तिला घेऊन झाडाखालच्या एका बाकडावर मस्त बसला होता. मग तिच्या समोर उभा राहुन अगदी भाषण करतात तशी काहीशी पोज घेऊन कविता म्हणत असावा. ती उगाचंच वार्‍याने उडणारे केस सावरत होती .. सगळं सुरळीत चालल्याचं पाहुन मी आपला सिट वर येऊन बसलो . थोड्यावेळानं सौम्या आली. डोळे लाल झालेले , आणि ती रुमालाने पुसत झपझप चालत माझ्या इथुन निघुन गेली. थोड्यावेळानं हताश मुद्रा घेऊन गोडबोल्या आला.
"काय झालं बे ? " खुर्ची वळवत मी त्याला म्हणालो.
( क्रमशः)