Sunday, January 12, 2014

आप'ली आशा

पूर्वी हातात ब्याट न पकडलेले  फलंदाजी कोच  तेंडूलकरने स्ट्रेट ड्राईव्ह कसा करावा ते सांगत. त्याच्या ब्याट-प्याडच्या ग्यापमध्ये मध्ये किती इंचाचा चुकीचा फरक आहे हेही सांगत. तेंडूलकरने १००व्या शतकाचे दडपण न घेता मैदानात कसे दडपण विरहित होऊन नैसर्गिक खेळी करण्याच्या थेरींनी फेसबुकची भिंती लाल होत असत. त्याने कधी निवृत्त व्हावे याचेही तर्कसंगत विवरण येत असे ( ज्यात मी पण होतो  :)  ) तेंडूलकर जर या सगळ्यांचं ऐकून खेळला असता तर आज तो तेंडूलकर असता का असा विचार मी नेहमी करायचो.
पण तेंडूलकर स्वत:च्या खेळाचे समीक्षण स्वत: करत नसेल का ?  आपले फुटवर्क किंवा ऑफकटर फ्रंटफुट वर खेळताना ब्याट आणि प्याड मध्ये किती ग्याप हवी किंवा कधी ब्याट खाली आणावी हे त्याच्या पेक्षा कोणत्या फेसबुक कोचला जास्त कसे कळत असेल ?  तेंडूलकरची झिम्बाब्वे मध्ये खेळण्याची रणनीती पाहून  आपण तो ऑस्ट्रेलिया मध्ये पण असाच खेळेल असा तर्क काढायचो का ? किंवा रणजी सामन्यात ज्या तंत्राने किंवा ज्या स्पीड ने खेळतो त्याच स्पीड ने तो  लॉर्डसच्या मैदानावरची अंतरराष्ट्रीय कसोटी खेळेल काय ?  आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे , तेंडूलकर ने पदार्पणात खेळताना ज्या चुका केल्या असतील , त्या चुकांवरून तो स्वत:च शिकून अधिकाधिक प्रगल्भ होत त्याने आपल्या खेळात सुधारणा केली असेल का ? ती केली असल्याशिवाय तो तेंडूलकर होऊ शकला नाही.
तेंडूलकरचं जाऊ द्या  , आपण रोहित शर्माला पण अधिक चान्स दिले आहेत .

सांगण्याचा मुद्दा असा , आजकाल राजानीती विशेश्द्न्य , अर्थकार , सामाजिक-नागरिक शास्त्राचे तद्न्य किंवा गव्हर्नन्सचा तोंडी अनुभव असलेले विश्लेषक हल्ली केजरीवालच्या कोणत्याही एका कृतीतून त्याच्या दूरगामी परिणामांची अत्यंत विनोदी समीक्षा करताना दिसतात. या समीक्षक तज्ञात आता चेतन भगतचीही भर पडली आहे.  सुतावरून स्वर्ग गाठण्याच्या आणि ललित लेखनातून केजरीवालच्या दिल्लीतल्या एखाद्या शोर्ट टर्म निर्णयाचा पूर्ण देशावर कसा भयंकर परिणाम होऊ शकतो हे समजून सांगणारे  मजबूत आकडेवारी पेरून मेगाबायटी लेखांचे बागायती पिक फेसबुक वर दिसू लागले आहे.  केजरीवाल कोणते निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतो आणि त्या निर्णयाचा परिणाम काय होईल किंवा कृतीचा देशात काय संदेश जाइल याचा त्याने विचारच केला नाही असा बऱ्याच जणांचा समज असावा. त्यातच  ज्याने पहिल्यांदाच आपल्या पार्टीला मिळणारी फंडिंग पब्लिक केली , त्याच्याच फंडिंग वर फुल ऑन ताशेरे ओढले जातात आणि शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे . दुसरीकडे अन्य पक्षांना होणाऱ्या हजारो करोडोंचे बिनामी फंडिंग कुठुन आणि कोणत्या कंडीशन वर होते याबाबद विशेषज्ञांचे पूर्ण मौन आहे . एखाद्या शॉर्टटर्म सबसिडीमुळे  करदात्यांच्या पैशाचा कसा दुरुपयोग आहे आणि त्याने सरकारच्या तिजोरीवर कसा खड्डा पडतो त्याच्याही मेगाबायटी थेरी हल्ली वाचायला मिळतात.  ( सबसिडी चूकच आहे, पण ती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि सगळ्याच पक्षांनी आपापल्या मतपेटीचे हित साधण्यासाठी वेळोवेळी दिली आहे /देत आलेले आहेत ) मात्र  राजकारणात कमावलेला काळा पैसा आणि या सबसिडीच्या पैशाची तुलना केल्यास काळा पैसा बराच जास्त आहे. मग हा पैसा सबसिडीच्या रुपात दिला तर त्राहि होते आणि जर खिशात घालून स्विस ब्यांकेत पाठवला तर मात्र आमच्यात कोणालाही आक्षेप नसतो. दिल्लीतल्या मुद्द्यांवर केलेले राजकारण आणि तिथे घेतलेले निर्णय हे अख्ख्या भारतात लागू होतील आणि तेच निर्णय अनंतापर्यंत लागू राहतील असा तर्क करणारांचा मला प्रचंड हेवा वाटतो.

केजरीवालला मी अण्णा आंदोलनापासून फॉलो करायला सुरुवात केली. त्याची बरीच भाषणं ऐकल्यावर इंटरेस्ट वाढला मग त्याच्या ब्याकग्राउंड वर वाचायला सुरुवात केली . अण्णा आंदोलन केल्यावर मला वाटायचं केजरीवाल राजकारणात यावा , तेंव्हा तो वेगळी पार्टी काढेल ही कल्पनाच नव्हती त्यामुळे तो बीजेपीत असावा असं  वाटे. त्याला कोणतीही पार्टी जॉईन करणे सहज सोपे होते . बीजेपी चे तमाम प्रवक्ते त्यानंतर केजारीवालवर होणाऱ्या कुठल्याही टीकेला आरामात हवेतल्या हवेत परतवण्यात सक्षम होते. ते खूपच सोपे होते. वेगळी पार्टी बनवणे आणि ती नावारूपाला आणणे तेही कोणताही पक्का आधार नसताना …. ही खूप मोठी गोष्ट आहे . तो काय करत होता , त्याचे परिणाम काय होतील , कोणत्या मुद्द्याचं राजकारण करावं , पक्षाचं नाव , चुनाव चिन्ह , रणनीती आणि मुख्य म्हणजे बोलण्याची पद्धत या सगळ्यांमुळे "आप"चे आजचे स्वरूप आहे. कोणी म्हणेल कॉंग्रेस मागून यांना सपोर्ट करते आहे , कोणी म्हणेल हा सगळा मिडियाने उभा केलेला पक्ष आहे . असे म्हणणारे स्वत: या गोष्टींशी किती कन्विन्स आहेत याबबद शंका आहे.

कदाचित मी चुकीचा असेल. केजरीवालच्या पार्टीमध्ये इम्याच्युरीती असेल  , निर्णय चुकीचे अस्तातील. पण हे आधी प्रुव व्हायला हवे.  फक्त विरोधी पार्ट्या म्हणतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे रास्त वाटत नाही. मला आशा आहे. इन वर्स्ट केस सिनारियो , आप फेल होईल …… पण देशाचे वाटोळे होईल किंवा देशाचा पाकिस्तान होईल हे जरा अति वाटते. विरोधी पार्ट्या आरोपच करणार , त्यांच्याकडून आप चे कौतुक करण्याची अपेक्षाही हास्यास्पद आहे. सगळ्या पार्ट्या २०१४ डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. हा हक्क फक्त आप वाल्यांना नाही असे वाटते . कोणी म्हणते  आप मुळे कॉंग्रेस ला फायदा होऊ शकतो . माहित नाही  , पण या वाक्याचा दुसरा अर्थ हा आहे की आप मुळे बीजेपीला तोटा होऊ शकतो. आणि हीच बिजेपिची दुखरी रग आहे .  वोट फोर इंडिया च्या नावाखाली वोट फॉर बीजेपी किंवा वोट फोर मोदीची गोम आहे . त्यात बिजेपिची काही चूक नाही . पण असे करताना आपण कोणत्या पद्धतीचे राजकारण करतो हे पाहायला कोणीही तयार नाही. समर्थकांनी मोदींना प्रधानमंत्री बनवून टाकले आहे. त्यांचे नेतेही म्हणतात  आता फक्त मतदानाची औपचारिकता बाकी आहे , जनतेचे प्रधानमंत्री मोदीच आहेत . मग येवढा विश्वास आहे तर कशाला एवढा त्रागा करताय ? शांत बसून आपली इज्जत वाढवण्यात शहाणपणा नाही का ? वाढते आहे ती फक्त नफरत .  मतदारांचे पोलरायझेशन करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे . आणि सद्यपरिस्थितीत फक्त आप कशी दोषी आहे हे ठासणे चालू आहे . वैयक्तिक सांगायचं झाल्यास मी कोणतीही गोष्ट आजमावल्याशिवाय तिच्या बरोबर-चूक च्या निष्कर्षाशी येऊ शकत नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा गर्विष्ठपणा मला मान्य नाही . निर्णय चुकू शकतो पण म्हणून तो ट्राय करूच नये ही नकारात्मक मानसिकता आहे.

अधिकाधिक वर्षे कॉंग्रेसचीच सत्ता असण्याचे एक ढोबळ कारण आहे की विपक्ष (पक्षी बीजेपी ) मजबूत नव्हता. आज बर्याच जणांना "बीजेपी हवी" यापेक्षा "कॉंग्रेस नको" ही धारणा जास्त आहे. कॉंग्रेसने व्यवस्थित शासन करून जनता समाधानी असूनही अधिक समाधानासाठी बीजेपी हवी असे चित्र कधी नव्हते आणि असेक अशी आशाही  नाही.
उत्तरप्रदेश मध्ये ज्या प्रमाणे  सपा-बसपा या दोघांचा बुद्धिबळाचा खेळ चालतो त्याप्रमाणे केंद्रात युपीए-एनडीए चे आहे . कम्युनिस्ट किंवा डाव्यांचा ऑप्शन एवढा विक आहे की तो कधीच विश्वास संपादन करू शकले नाही . त्यांची तशी महत्वाकांक्षा  होती असेही दिसत नाही . एक न्युट्रलपणे विचार केला तर दिसतं की बर्याच प्रस्थापित पार्ट्या आहेत आणि त्यांचे राजकारण हे त्यांच्या वोट ब्यांकेच्या आजूबाजूला फिरते. कॉंग्रेस सेक्युलर किंवा पुरोगामी आणि मुस्लिम मतदारांना गोंजारते तर बीजेपी हिंदुत्ववाद्यांना गोंजारते. शिवसेना-मनसे मराठी लोकांचे  राजकारण करते. मायावती दलित मतदारांचे राजकारण करते तर ममता पासून जयललिता पर्यंत आपापल्या मतदारांचे हित साधण्याचे चीत्र दाखवणारे राजकारण करते. केजरीवालला मात्र हे राजकारण करण्याचा अधिकार दिलेला नाही असे वाटते.

असो , एकाच परिच्छेद लिहिणार होतो , पण शेवटी रायता पसरलाच.

तळटीप : लेखातले विचार वैयक्तिक आहेत , आणि त्याच्याशी सहमत असावे असा लेखकाचा आग्रह नाही .