Sunday, June 29, 2014

आधुनिक तुकाराम

मागासपण देगा देवा |
त्यांसी आरक्षणाचा खवा ||

ओपनवाले रत्न थोर |
तया ओपनचा हा मार ||

ज्याचे जाती उच्चभ्रूपण |
तया जगणेही मुश्कील ||

तुका म्हणे जात |
व्हावे मागसाहून मागास ||

- संत तुकाराम

ता.क. तुकाराम महाराज स्वत: बेनीफीशीयरी होत. त्यामुळे तुकारामांना द्राक्ष आंबट नव्हेत.

तिरस्कारमूर्ती माणूस

मला वाटलं संपूर्ण पृथ्वीवर  जर एकच देश असता तर माणसाने कदाचित कोणाचाही दुसऱ्या देशाचा म्हणून तिरस्कार केला नसता. ही देशाची बंधनं तोडली पाहिजेत.  पण तोच पाहिलं , एकाच देशातली लोकंही  धर्माच्या नावाने दुसऱ्याचा करतच असतात की .

मग मला वाटलं, जर हा धर्मच नसता तर किती बरं झालं असतं , सगळेच एका धर्माचे असते तर हे दुसऱ्या धर्माला कमी लेखणे , त्यांचा तिरस्कार करणे कदाचित थांबलं असतं . पण नाही , सगळे एकच धर्माचे असते तर त्यात जाती आहेत.

मुद्दा जातीच्या उच्च-नीचतेच असो किंवा आरक्षणाचा , काहीतरी कारण आहेच तिरस्काराला. मग मला वाटलं, साला एकच धर्म आणि एकच जात असती तर निदान हा तिरस्कार कमी झाला असता .

पण नाही .. त्यातही आमच्या पोटजाती आहेतच . स्वत:ला वरचा समजायचं दुसऱ्याला कमी लेखन म्हणजे तिरस्कार एकच धर्म एकच जात असली तरीही आहेत.

मग मला वाटलं , पोटजातीही नकोत. सगळ्यांत भावकी हवी. सगळेच एकमेकांचे भौभौ. तोच मी पाहिलं भावकी-भावकी मध्ये तर अजूनच जास्ती तिरस्कार आहे. एकच धर्म जात पोटजात आणि भावकी असली तरीही तिरस्कार मात्र कायम आहे .

तिरस्कार काय संपत नाय लका !

Thursday, June 26, 2014

प्रोफाईल पिक अर्थात डीपी ग्रुप

    फेसबुकवर वावरताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती दिसतात . प्रत्येकाची आपली एक तऱ्हा असते पण तरीही काही बाबतीत एकसमानता आढळते. उदाहरणार्थ, प्रोफाईल पिक. त्यारून सुचलेली काही निरीक्षणे

०. पालक ग्रुप : यांचे आयुष्य म्हणजे यांची मुलं . यांच्या आयुष्यातली इतकी स्पेस मुलांनी व्यापलेली असते की त्याची व्याप्ती फेसबुक वर न आली तर नवलच . हे आपल्या मुलाचे किंवा मुलीचे गोंडस गोंडस फोटो प्रोफाईल ला लावतात . आपले फोटो दाखवण्यात त्यावर लाईक मिळवण्यात यांचे स्वारस्य संपलेले असते . आता जे काही आहे ते मुलांचे . समर्पणभावाचा आदर्श नमुना आपल्याला येथे पाहायला मिळतो .

१. बकुळा ग्रुप :  या ग्रुप मध्ये शक्यतो म्हैलावार्गाचा समावेश होतो. गुलाब , मोगरा, बकुळा वगैरे देशी फुलांचे प्रोफाईल पिक लावणे हे या ग्रुप मध्ल्यांचे लक्षण. व्यक्ती जर फॉरीन रिटन/सेटल असेल तर ट्युलिप वगैरे सारखी उच्च जातीची फुलं यांच्या प्रोफाईल वर झळकत असतात. झेंडू , धोतरा वगैरे सारखी डीपी लावणारी बाप्या लोकं अजून तरी दिसली नाहीत 

२. सॉक्रेटीस ग्रुप :  या ग्रुपच्या डीपी मध्ये काही तरी गहन अर्थ असतो. किंवा एखाद्या महान विचारवंत / समाजसुधारक वगैरेच्या कोट्स फोटोसह असतात . ही मंडळी शक्यतो चाळीशी ओलांडलेली विचारवंत किंवा शिकून घरी बसलेल्या गृहिणी असतात. यांच्या प्रोफाईल पिक वरून हे धीरगंभीर आणि हायली इंटेलेक्च्युअल स्वभावाचे असल्याचे दिसते.

३. पेज थ्री ग्रुप : करीना, कतरिना, विद्या, रणबीर, ह्रितिक वगैरेचे डीपी पहिले की पेज थ्री ग्रुप वाले ओळखावेत. शक्यतो यांच्या प्रोफाईलवर, कव्हरवर किंवा वॉलवर  जळीस्थळी सगळीकडे सेलेब्रिटीज चे नेटवर फिरणारे फोटो असतात. यांचा फेसबुकचा वापार बहुतांशी   "प्लीज एड मी , सेंड मी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे टाईप कमेंट टाकून  वासूगिरी करण्यासाठी असतो. नवे नवे फेसबुक वर आलेले टीनेजर किंवा वयाने वाढलेले परुंतु मनाने अजूनही अठराव्या वर्षातच अडकलेले या प्रकारात समाविष्ट होतात. 

४. अंडरकवर ऑफिसर :  यांच्या प्रोफाईलची स्थापना झाल्यापासून यांनी प्रोफाईल पिक ला हात लावलेला नसतो. हे कायम कोरे करकरीत असतात. यांच्या प्रोफाईल बऱ्याचदा पूर्ण कोऱ्या असतात . आपण कोण कुठले का कधी कुठे कसे आहोत हे सांगण्यासाठी हे फेसबुक वर नसतात. हे अंडरकवर राहून टेहेळणी करतात. 

५. तुकाराम ग्रुप : "लहानपण देगा देवा ... " या तुकारामांच्या उक्तीने प्रेरित यांचे वय काहीही असले तरी प्रोफाईल पिक मात्र बालपणीचाच असतो. यांना भूतकाळात रमणे आवडते . हे बर्याचदा दवणीय पोस्ट्सचे शिंतोडे उडवत असतात.

६. गरिबांचे आंद्रे इस्तेवान ग्रुप :  हे पट्टीचे ( हौशी नव्हे)  फोटोग्राफीची आवड असणारे, भल्या मोठ्या लेन्सेस आणि महागडे DSLR राखणारे फोटोग्राफर.  कुठेतरी मिलिटरी स्टाईल मशीनगनचा नेम धरावा तसा कॅमेरा हातात धरून गवतात लोटांगण घातलेले किंवा ते ५ किलोचे कॅमेरे खांद्यावर टाकून हसरा चेहरा करणारे , कधी डाव्या कानामागून कमरेच्या हाईटच्या कोनातून काढलेला आकाश अर्ध शरीर आणि अर्ध आकाश दिसणारा तर कधी डोंगरदऱ्याच्या कड्यावर उभे राहून गड जिंकल्याच्या अविर्भावात असणारा फोटो यांच्या डीपीवर असतो .

७. कट्टर देशप्रेमी ग्रुप : छावा , मर्द मराठा , कडवा हिंदू किंवा सावरकर आणि भारतमातेवर प्रेमाने ओतप्रत देशावर जान निछावर करणारे , क्षणात देशरक्षणासाठी छातीवर गोळी झेलायला तयार असलेले हे प्राणी आपल्या प्रोफाईलवर राजेंचा अश्वारूढ , किंवा बाळासाहेबांचा एक बोट समोर दाखवणारा , एखादा भगवा फडकणारा किंवा देशप्रेमी फोटो आपल्या डीपीवर कर्तव्य असल्याप्रमाणे लावून असतात . यांची वॉल शक्यतो पूर्णपणे भगवी असते. हे छावे  डेली आपल्या देशप्रमाचा कोटा फेसबुक वर रिते करतात

८. निषेधप्रेमी : कुठे खुट्ट झालं तरी दुसऱ्या सेकंदाला प्रोफाईलवर काळा पडदा पडलाच म्हणून समजावे. किंवा यांच्या प्रोफाईल काळे चित्र आल्यास कुठेतरी काहीतरी अप्रिय घडले आहे हे समजून घ्यावे . अत्यंत हळवी , सेन्सिटिव्ह जमात

९. कार्यकर्ते ग्रुप : मोदींचा , केजरीवालचा , पवार साहेबांचा , राज साहेबांचा , मोठ्या आणि छोट्या ठाकरेंचा किंवा कुठल्याही लोकल नेत्याचे "एकच वादा.... " टाइप्स डिस्प्ले पिक पहिला की कार्यकर्ते आहेत हे समजून घ्यावे. जास्त( किंवा अजिबात) नादी लागू नये

१०. रंगरंगरंगीलारे ग्रुप : सध्या फोटोलाही फोटोशॉप/पिकासामध्ये एक्स्ट्रीम रेड , ग्रीन किंवा ब्लू किंवा कृष्णधवल केलेले फोटो कायम यांच्या प्रोफाईलवर असतात. जर प्रत्यक्ष पहिले नसेल तर हा काळा की गोरा , चकणा की चपटा हे चुकूनही कळणार नाही. बेक्कार इफेक्ट मारलेले फोटो लटकावून असतात. माणसाच्या डोळ्यांना सहन होतील अशा कलरचे फोटोज हे मुद्दाम लावू इच्छित नसावेत असा एक संशय आहे.

११. लक्ष्मीनारायण ग्रुप : यांच्या प्रोफाईल मध्ये हे एकटे कधीच नसतात. जॉईन्ट अकौंट असल्याप्रमाणे नर-मादी कायम एकमेकांच्या गळ्यात हात टाकून, किंवा एकमेकांच्या कुशीत खुशीत असलेले ,लग्नाचे एकमेकांना हार घालणारे किंवा हनिमूनला गेले तर समुद्राकाठी किंवा बर्फात एकत्र आनंद घेताना आपल्याला कायम दाखवतात.कधी कधी हे जन्मल्यापासूनच शरीर जोडून आले आहेत की काय असाही संशय येतो.  

१२.काढलाकीलावला ग्रुप : हे मोबाईलवरून फेसबुक एक्सेस करतात. कुठेही गेले की ताजे फोटो थेट कॅमेऱ्यातून प्रोफाईलवर चिटकवतात. हे फक्त प्रोफाईल पिक्चर बदलत असतात . बाकी प्रोफैल्वर काहीही अपडेट सापडत नाहीत .

१३. आयकॉन ग्रुप  :  हे एकदमच वेगळे असतात.  कधी स्पायडरम्यान , कधी जोकर , कधी चे , कधी कोणता फुटबॉल प्लेयर , क्रिकेट प्लेयर ... कोणता ना कोणता पब्लिक आयकॉन यांच्या प्रोफाईलवर विसावतो. पण त्या आयकॉनमधून यांचा काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो. हे फक्त लावायचे म्हणून लावलेले आयकॉन नसतात.

१४. एकवचनी  श्रीराम ग्रुप : प्रोफाईल बनवते वेळी जो फोटो लावला त्यावर एकनिष्ठता पाळणारे  यांचा ग्रुप पिक फिक्स असतो . श्रीराम एकपत्नी एकवचनी होता , हे एकडीपी असतात. फोटोही बऱ्याचदा लावायचा म्हणून एखाद्या पासपोर्टसाईजचा फोटो लावलेला असतो .

तूर्तास इतकेच .