Saturday, May 2, 2009

आउटस्टँडिंग

णमस्कार्स लोक्स ,

आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच ..

विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत ,

जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले. बारावी पास होउन इंजिनियरींगला ऍडमिशन खाणदाणातला पहिला वहिला इंजिनियर बनन्याची शक्यता असल्याने कौतुकाचा विषय होतो. पण म्हणतात ना ,,, आपला द्वेश बाकी लोकांपेक्षा आपलेच लोक करतात ... कोणीतरी नातेवाईक पिचकलाच ... काय रे .. जरा तुझ्या शरीराकडे पहा.. नुसतात वाकडा तिकडा वाढलाय .. तेवढ्यात तिर्थरूप कुजबुजले ... "तो शिवशेनेच्या प्रचाराचं काम करतो, त्यामुळे त्याने धनुष्या सारखी वाकडी बॉडी खास बनवलीये" एकच हशा !! अस्मादिक खट्टू ...

बसने प्रवास करताना नेहमीचाच त्रास... स्टंट्स करून बसमधे पहिला प्रवेश मिळवायचो .. आणि शेवटच्या सिट वरची मधली सिट पकडायचो !! करणार काय ? पाय बसायला हवेत ना सिटींमधे .. उगाच वाकडं तिकडं बसायला लागे .. कधी गर्दीत सिटाबाहेर पाय बाहेर काढून बसलो की उभे असलेले नाकं तोंडं मुरडायचे, खिडकीशेजारी बसलो तर शेजारी बसणार्‍याला पायांमुळे अर्धंच सिट टेकवण्यापुरती जागा मिळे. कधी कधी रोजच्या बस रूट ला असलेली मुलगी आवडली तर जागा पकडायचो ... पण तिला कधी " बस ना, तुझ्याच साठी जागा पकडलीये" असं म्हणायची हिम्मत होत नसे .. मग उगाच हे सिट चुकून भेटलंय .. आपल्याला बसता येत नाही ... म्हणून आपण बसा .. असं दाखवून मी तिला सिट देत असे. ती माझ्याकडे कसल्याश्या नजरेने ओठ वाकडे करून जागेवर अशी बसत असे जसं तिनेच माझ्यावर उपकार केले. ( ह्या मुलींचे ओठ एवढे लवचिक कसे बरं असतात ,,, एकदम शिताफीने सिल मासा पाण्यात जश्या कलाकृती करतो ,,,, तश्या ह्या ओठांच्या कवायती दाखवतात ... आमच्या सारख्यांचा अजुन मोठा होत जातो हो .. न्यूनगंड... मग कसलाच धीर होत नाही ... मनातल्या मनात लाईन मारण्याचा सुद्धा .

उंची जास्त असल्याने वर्गात सर्वांत मागची बेंच भेटत असे .. ह्याचं त्यावेळी वाईट वाटे... मी तसा थोडासा सिन्सियर आणि हुशार मुलांशी सलगी असलेला .. ते सर्व बुटलर लोक होते .. त्यामुळे ते जायचे पहिल्या बाकावर आणि मी मागे.( ऍक्चूअली पुढे बसणार्‍या सुबक दिसणार्‍या रुपाली ला चोरून पहाणे मागनं शक्य नव्हतं) त्यामुळे आपण उंच असल्याचा फारच राग येई. पण सगळेच बुटलर थोडी स्कॉलर असतात ? मग टगे लोक ज्यांना मागे यायचं असायचं .. त्यांच्याबरोबर जागा स्वॅप करायचो .. आणि खुष व्ह्यायचो .. दुसर्‍या बाकावर "तुषार भुसारी" नावाचा मुलगा बसे. मुलींच्या ओळींत दुसर्‍याच बाकावर बसणार्‍या एका मुलीवर तो लाईन मारत असे. त्याला तिच्याकडे पाहिल्याशिवाय काही चैन पडत नसे. पण असं शेजारी पहायचं म्हणजे ९० अंशात मान वळवण्याची ना त्याच्यात हिम्मत होती ना मास्तरच्या आणि पोरीच्या नजरेतून सुटलं असतं .. पण हा मान न वळवता फक्त गारगोट्या (डोळ्यांतली बुब्बुळं) वळवायचा.. एवढे ? अल्मोस्ट ९० अंश.. एकदा त्याला म्हंट्ल .. ठोकळ्या .. एवढ्या काय गारगोट्या फिरवतो.. चकणा होशील ना एक दिवस .. त्या पेक्षा तू एक काम कर, तु नवं घड्याळ घेतलंस ना.. ते डोळ्यांसमोर ४५ अंशात ठेव .. डोळा जवळ नेऊन ऍडजस्ट कर.. तुला ती दिसेल ... ह्यामुळे ना मास्तर ला कळेल ना तिला .. तू ही हवा तितका वेळ तिला निहारू शकशील ... आणि चकणा ही होणार नाहीस .. भुसार्‍याने खुष होउन मला वडापाव खाऊ घातला. मास्तरलोकांना त्रास देण्यात आम्ही आग्रमानांकित होतो .. प्रत्येक कमेंट वर पन्नास प्रतिक्रिया (हशा) मिळायच्या .. आणि त्यामुळेच मास्तर लोकं डोळा ठेऊन असायचे ... जोक नाही खरं सांगतो.. आमच्या येडझवेपणाला काही मर्यादाच नव्हत्या .. एकदा बारावीच्या वर्गार बायोलॉजी-२ चं लेक्चर चालू होतं .. मॅडम ने "मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टिमची डायग्रॅम काढली ... आता त्या वेळी तो तास "छे .. काहीतरीच काय?" ह्या प्रकारचा होता. मुलांना डायग्रॅम काढायला सांगून मॅडम क्लासभर फिरत होती .. पोरं पोरी काहीतरी कुजबुजून हासत होती... ६व्या बाकापाशी मॅडम थांबल्या.. चंदनशिवे ने हाल्फस्केप वहीच्या पानावर अगदी छोटीशी डायग्रॅम काढली असावी. मॅडम म्हणाल्या .. काय चंदनशिवे .. "केवढंसं काढलंय आहे .. कसं व्हायचं ?" ह्यावर क्लास मधे एकसाथ एवढा प्रचंड हशा फुटला ... धो धो धो धो ... पुर्ण ज्यूनियर कॉलेजात एवढा कधी हसला नव्हता वर्ग... तेवढा मॅडमच्या वाक्यावर हसला .. ते पुरे की काय ... मागच्या बाकावर मी मोठी डायग्रॅम काढलेली .. मी वेगळ्या आवाजात बोललो .. "मॅम मी मोठं काढलंय ..." आता मात्र क्लास वर हसून हसून मरायची पाळी आली होती .. मॅडम आताशा ओशाळली असावी .. हा प्रकार मागं बसलेल्या महानगांपैकी मीच केला असनार ह्याची त्यांना खात्री होती .. त्यांनी रागाने एक नजर माझ्याकडे टाकली .. आणि निघून गेल्या .. क्लास हसतच राहिला .. नंतरचं लेक्चर ऑफ होतं .. क्लास पुर्ण वेळ हसत होता. झाल्या प्रकाराचा तोटा मला फायनल्स ला झाला ..बायो प्रॅक्टिकल्स ला वीस पैकी ११ मार्क मिळालेले. बाकींना १६ च्या वर होते .. असो .. आम्ही आउटस्टँडिंग ना ?

त्यावेळी ब्रांडेड कपडे घ्यायला तेवढे पैसे मिळत ... आपला "फॅशन स्ट्रीट" हाच शॉपींग मॉल होता. आता उंची जास्त. त्या पँट्स मला लांबीलाही पुर्ण होत नसत.. थ्री फोर्थ पेक्षा थोड्या लांब .. मी राज कपूर वाटायचो .. च्यायला ह्या उंची मुळे मी पुन्हा आउटस्टँडिंग झालो. बर्‍याचदा मित्र मैत्रिणींच्या घरी जायचो .. तर त्यांच्या दरवाज्याला कपाळमोक्ष करून घेणे जणू अंगवळणीच पडे. रेखा ही बारावीची मैत्रिण... नंतर मी डिवाय च्या इंजिनियरींग कॉलेजात तर ती एम.बी.बी.एस.ला डिवायच्याच मेडिकल कॉलेजात गेली.. बाप्प्या पण बि.जे कॉलेजात.. बर्‍याच वेळेस रेखाच्या घरी जायचो .. तिचं घर जुण्या बांधणीचं.. सिमेंट पत्रे ,, दोन्ही साइड ला उतारावालं.. बोलणे वगैरे झालं .. थंडीचे दिवस होते .. जॅकेट होतं .. निघायच्या वेळेस जॅकेट घालायला हात वर केला .. ताड्ड्ड् ... ताड्ड्ड्ड .. माझे हात वर फॅन मधे गेलेले .. फॅन आता नाचत नाचत फिरत होता .. मला फार ओशाळल्या सारखं झालेलं .. सगळे कौतुकाने (की कसे ते माहीत नाय) हसले .. रेखाची मम्मी म्हणाली .. अरे असू देत .. तो फॅन जुणाच होता ... आम्ही बदलणारच होतो .. बरा मुहुर्त लागेल आता .. पटकन निघू म्हंटलं .. तर दरवाज्याने कपाळ मोक्ष झाला .. ओरडावेसे वाटले .. पण सांगतो कोणाला ... तोंड दाबलं .. आणि बाहेर येउन ओरडून घेतलं .. बाप्या हसत होता .. काय साला मी खरंच आउटस्टँडिंग आहे ?

बापानं धनुष्य म्हंटल्याचं फारच मनावर घेतलं .. आण जिम लावली ... जोषात एकदम फुल्टू व्यायाम सुरू केला .. जेव्हा डिप्स मारताना दम जाई.. तेंव्हा वाकडातिकडा होउन मी रिपीटीशन पुर्ण करे . त्यावेळी बाकी पोरं मला हसत असायची ... म्हंटलं हसा लेको ... पण आता मी "टोटल आउटस्टँडिंग" होण्याच्या मार्गावर होतो ... हळू हळू दिवस पास झाले ... बॉडी बनु लागली .. जुणे कपडे फिट झाले. त्यांना बलजबरी वापरल्याने ३ शर्ट आणि २ पँट अंगावरच आळस देताना फाटल्या ... आता नविन कपडे .. फॅशन स्ट्रिट ला गेलो .. आधी कपडे फक्त उंचीला कमी होत... आता तर रूंदीतही धोका बसला .. च्यायला हा फॅशन स्ट्रीट काय फक्त साडेपाचफुटी लोकांसाठीव बनलाय का ? की मला आउटस्टँडींग दाखवण्याचा प्रयत्न ? कपडे शिउन घेणं फारच बोर आणि आउट ऑफ फॅशन वाटे .. वर्षाकाठी जे २००० रुपये शॉपींग ला मिळत .. त्यातून कसे बरं बजेट बसणार .. मग जरा जांगल्या दुकाणातून ४ ऐवजी २ ड्रेसचीच खरेदी व्हायची .. ते कपडे ओके ओके बसत ... पण वाढ कुठे थांबली ? जास्त व्यायामाचे तोटेच तोटे दिसायला लागले ..
खांदे ब्रॉड झाल्याने शर्ट्स ची साईझ ४४ वर पोचली .. एकदा गिफ्ट मधे मिळालेलं ४२चं शर्ट ट्रायल मधेच उसवलं ... मी ते फॉल्टी पिस आहे .. म्हणून शाळसूद पणे रिटर्न केलं .. आता पँटच्या फिटीगला प्रॉब्लेम येई तो हिप्स आणि थाईज मधे ... ३४ च्या कमरेच्या पँट्स .. आणि थाईज झाल्या २४ वगैरे .. कमरेत लूज होउनही साला त्या पँट्स थाईज मधे अडकायच्या.. नाईलाजाने कंमरेची जास्त साईझ घेउन त्यांना पट्ट्याने आवळावं लागे. टिशर्ट ह्यामुळेच आवडायचे की एक तर बॉडी फिट ... त्यात लवचिक .. आणि बॉडीही दिसे रपचिक .. मला ही मी "आउटस्टँडिंग"च वाटायला लागलो .. बस च्या सिटामधे आधी फक्त पायच मावत नव्हते .. आता तर खांद्यांनी ही शेजारच्याला ढूस्से द्यायला सुरूवात केली .. मला नेहमी प्रश्न पडतो .. आता एक हात ठेऊ उठे ? ऑटोमधेच काय ... स्कॉडा मधे देखिल बसताना थोडंस " आकुंचन पावून " बसावं लागायचं .. हे कमीच हो... साला विमानात .. शिटात पाय पुरना म्हणून आम्ही ४-४ तास स्टँडिंग प्रवास केलाय .. जॉबला लागलो ... आता फॉर्मल शुज घेणे क्रमप्राप्त आहे .. शुजची दुकानं पाहिली ... साला आमच्या पायाला फिट होईल असा एकपण बुट मिळेना .. शेवटी एका मोठ्या दुकानात आमच्या मापाचा शुज मिळाला !! बाईक खरेदीचा टाईम आला .. तेंव्हा तर फारच कससं झालं .. बुलेटही साला छोटीच दिसते .. कोणतरी मित्र बोंबलला .. साल्या तु सन्नी घे .. मस्त शोभेल .. म्हंटलं मेल्या .. घे बोलून .... कुठं भांडणं झाली की ये बोलवायला .. मग सांगतो ..
आणि ह्यामुळे मित्रांना "आउटस्टँडिंग" म्हणून चिडवायला चान्स मिळायचा .. एकदम उठून दिसण्याच्या पर्सनॅलिटीमुळे मित्र गृपफोटो मधे शेजारी उभे रहाणे टाळायचे .. कारण ते एकदमच झाकले जायचे ना ..
ख्वाटं नाय बोलत .. ह्ये पघा ..

तर मित्रांनो अशा ह्या आउटस्टँडिंग मिळणार्‍या वागणूकीमुळे मी फारच परेशान झालो होतो.. मला तर आता जगायचीच इच्छा उरली नव्हती .... असा मी निराशेच्या गर्तेत पोचलो होतो .. पण तेंव्हाच माझा मित्र .. टोनी ह्याने मला टेलेब्रांड्स च्या "चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ" ह्या अफलातून प्रॉडक्ट विषयी सांगतलं . आणि मी ते तत्काळ ऑर्डर केलं .. मित्रांनो .. खरं सांगतो ... इतका इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे हा ... ह्याच्या वापराने मला फार फायदा झाला ... ह्यानेच मला वेगळं विचार करायला शिकवलं .. हॅरी मॉर्गनचं हे प्रॉडक्ट अफलातून आहे .. पहा ह्यामुळे काय फायदा झाला तो ..

मी विचार केला .. आर्रे .. आपण असे आहोत ह्यात काही वाईट नाही .. आठव ... जेंव्हा आपण रस्त्याने टाईट टिशर्ट घालून फिरायचो .. लोकं चोरून चोरून पहायची की नाही ? कितीतरी वेळा लोकांनी तुला "वा !! छान ! काय मस्त बॉडी बनवलीये " अशा कमेंट्स दिल्या की नाही .. आणि त्यामागून जाणारांनी पण "+१", "सहमत आहे" ,"असेच म्हणतो " असल्या प्रतिक्रिया देउन समर्थन केलं की नाही ? मग ?
एकदा जंगली महाराज रस्यावरच्या "सुभद्रा" मधे जेवायला गेलेलो तेंव्हा तिथे एक फॅमिली आलेली.. मी "सुपरमॅन"चा टिशर्ट घालून गेलेलो .. तेंव्हा मला पाहून एक छोटूला मोठ्याने सुपरमॅन ,,, ओरडलेला .. त्याने माझ्याबरोबर फोटू काढायचा आग्रहही केलेला .. तेंव्हा एकदम सेलेब्रेटीच्या थाटात त्याला एकाच हाताने उचलून उभा राहून फोटू काढला .. पोरगं जाम खुष झालं .. आणि मित्र पण गप्प झाले .. पुन्हा कोणी चिडवायचं नाव नाय घेतलं .. Smile
खडकीच्या सिग्नलला फार गर्दी असते .. रोड ही नॅरो असतो.. एकदा मित्राबरोबर पुण्यात चाललेलो .. एक माणूस फुटपाथ सोडून रोडवरून चालत येत होता.. अशा स्वतःला रोड का दादा समजणार्‍यांसाठी मी एक क्लूप्ती करतो.. बाईकनेच त्याला कट मारावा ... बाईकचं हँडल त्याच्या कोपराला असं मारावं की बास ..त्याला चांगलंच खौन लागलं असावं .. बाईक पुढे गेल्यावर तो मागून ओरडला .. "ए (@$ञ$ थांब ... @*@& दिसत नाय का ? @**## " बास .... बाईक स्टँड ला लावली .. मित्र म्हणाला सोड अरे .. जाउ दे .. पण थांब म्हंटलं आणि बाईक वरून उतरलो .. हेल्मेट काढलं आणि त्याच्या डोक्यात घालणार .. इतक्यात .. भाऊसाहेबांचा टोनच चेंज झाला .. इतका वेळ शिव्या देणारा तो .. अचानक "ओ भाउ.. बघा ना तुम्हीच किती लागलंय .. .. हे संध्याकाळी लै सुजल हो .. बघा तुम्हालाच वाईट वाटंल " त्याच्या ह्या वाक्यामुळे सगळा रागंच निघून गेला .. आणि हसू आवरेना .. पहा .. झाला की नाही पर्सनॅलिटीचा फायदा ... बरेचदा बॉडी लँग्वेजनेच आर्धी कामं होतात ... चांगल्या ब्रांड्स चे कपडे घेतले की हव्या त्या मापाचे कपडे भरपूर व्हरायटीज मधे मिळतात ...

"चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ " ह्या अफलातून प्रॉडक्टने माझं अवघ जिवनच बदलून टाकल ... आता माझा चेहरा ही खुलला होता. .. मी फार आनंदी असायचो .. त्यामुळे चिडचिड कमी झाली .. जिवन हे स्वर्ग झालं ...
तर पहाता काय तुम्ही ही लवकर ऑर्डर करा .. "चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ " ..
ह्याचा प्रॉडक्ट कोड आहे ... ए.व्ही.१२९० , किंमत फक्त रुपये ५९९०/- फक्त ...पोस्टेज आणि हँडलिंग खर्च अतिरिक्त.. सर्व प्रॉडक्ट्स व्हीव्हीपीने पाठवले जातील , त्वरा करा .. आजच फोन करून ऑर्डर बुक केल्यास आपल्याला २०% डिस्काऊंट मिळेल .. आणि ह्या बरोबर आपल्याला फ्री मिळणार आहे ...
१. कुंड्या धुवायचं मशीन .. ज्या द्वारे आपण आपली नर्सरी एकदम व्यवस्थित मेंटेन करू शकता , आता मातित हात भरवायला नको .. एकदा मशीन मधे कुंड्या टाका .. एकदम चकाकतील तुमच्या कुंड्या !! ह्याची बाजारात किंमत आहे ९९० रुपये .. पण आपल्याला हे फुकट भेटणार आहे.
२. खास चमचे धुण्याची पावडर , ह्यामुळे चमच्याला आणखी कसलाही वास येणार नाही .. पावडर वासमारी आहे.
३. चष्म्याचे वायपर्स ... ह्यांना एकदा बसवले की वारंवार चष्मा पुसायचा त्रास नाही ...
अर्रे थांबा जाता कुठे .. इतकंच नाही ... आपल्याला भेटते आहे ... एक अन्न चावायचं गॅजेट .. खास दात पडलेल्यांना गिफ्ट देण्यासाठी एकदम उत्तम .. कोणत्याही प्रकारचं अण्ण चाऊन चाऊन चोथा करून बाहेर पडतं .. हे तोंडात बसवलं की आपले आज्जी आजोबा पण अक्रोडाचा आस्वाद घेउ शकतात .. ह्या सर्व प्रॉडक्ट्स ची बाजारात किंमत आहे ३००० रुपये जे आपल्याला फ्रि भेटत आहे ..
तेंव्हा पहाता काय ? फोन करा !! फोन नंबर आहे : ०० ००००० ००००० ...