Monday, April 6, 2015

काळ


काळ, वेळ , समय , टाइम , इत्यादि इत्यादि. महाभारतातला तो नरेशन करणारा "समय" आठवतो. रोज रविवारी सकाळी ९ वाजले की , "मै समय हु .. मै अनंत हु मै निरंतन हु मै अमर हु , मै ये हु मै वो हु " वगैरे सारखी गर्विष्ठ वाक्य फेकत तो आपल्याला पकवत असे. काळ बदलत राहतो. तो आपल्यासोबत सगळ्या गोष्टी बदलतो. गोष्टी बदलत असतात तेंव्हा आपल्याला त्या खास जाणवत नाही, मात्र कालांतराने मागे वळून पाहिल्यावर कळतं, "अरेच्चा, खूप पुढे आलोय आपण.. खूप काही बदललंय "

आज फार सेंटी मारण्याचा इरादा बिलकुल नाही. कधीमधी वेळ मिळाला की मी जुने पुराणे फोटोज बघतो. ज्यावेळी फोटो काढणे हे एक पर्व असायचे , एके काळी फोटो काढायचा म्हणून लोक स्टुडियोमध्ये जायचे किंवा खास नट्टा पट्टा करायचे किंवा मग काहीतरी प्रसंग असेल तेंव्हाच तो फोटो काढला जायचा. तेंव्हाच्या प्रत्येक फोटो बरोबर बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. घघरातली सर्व कामं धामं आटोपली आणि दुपारच्या निवांत क्षणी कधी कोणी अल्बम घेऊन बसलं की मग गप्पांचा आणि आठवणींचा सुकाळ जमतो तो आता जवळपास दुर्लभ आहे. नपेक्षा कोणाला त्याचे सुखदुख नाही . उचलला कॅमेरा , केले बदकासारखे ओठ की काढला सेल्फी. आता च्या फोटो बरोबर काही आठवणी जोडल्या जात असतील आणि भविष्यात त्या आपण आठवू असे मला बिलकुल वाटत नाही. तर ते असो . काळ सर्व बदलत असतो

शाळेतला पहिला दिवस. पहिल्या दिवशी झालेला आपला पहिला मित्र , मग पहिली ते दहावी त्याच्याच बरोबर शेयर केलेला बाक , भांडणं , एकसाथ केलेल्या मारामाऱ्या , शेतातून चोरलेल्या कैऱ्या. कधीकाळी त्या मित्राशिवाय आपले जगणे फारच आळणी किंवा अशक्य वाटतं . पण ते मागे पडलं. नंतर त्या मित्राचं नावही कधीतरी आठवतं. काळ बदलतो, तो नवीन पात्र घेऊन येतो. वेगळ्या प्रकारचे मित्र , वेगळ्या प्रकारची नाती , वेगळ्या आठवणी , परत एकदा वाटतं , हे नसेल तर आयुष्यात काही चार्म नाही. काळ आपल्या वेगाने दौडत असतो. कॉलेजातल्या आठवणी , मित्र , किस्से , वेडेपणा .. सगळं सगळं तिथेच ठेवून काळ आपल्याला पुढे घेऊन जातो. पहिला पगार , पहिली नोकरी , पहिले चुंबन , पहिले प्रेम आणिक बरंच काही .. हे फक्त एकदाच , काळ वन्स मोर देत नाही. प्रत्येक वळणावर आपला एक रोल असतो. आपण त्यात गुरफटलेलो असतो याची त्यावेळी जाणीव होत नाही. पण मग मागचं काही आठवलं आणि आता परत त्या रोल मध्ये राहावंसं वाटलं की ते अशक्य आहे आणि आपण आता नव्या भूमिकेत अडकलो आहोत याची जाणीव होते.

काळ हा प्रकार आधी जवळपास प्रत्येक लेखकाने उष्टा करून ठेवलेला आहे. बऱ्याचदा त्यांच्या काळातल्या घटना वाचून त्याचा आपण आपल्या काळाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो . बरं वाटतं. सुखद. बघता बघता जाणवलं उत्तरायण सुरु झालेलं आहे.

काहीतरी करायला हवं.. काळाच्या ओघात बरंच काही सुटलंय , बघू पकडता येतंय का ते. काळ कधी कोणाला सगळं एकसाथ देत नाही , काहीतरी बाकी ठेवतोच.
घीसापिटा परंतु जरुरी शेवट , कालाय तस्मै नम: !

अरे हो , आणि एक राहिलंच , इथे रीकॅपच बटणही नाही .