Thursday, January 3, 2013

सोशल सेन्स


( सगळे विचार वैयक्तिक आहेत , त्याच्याशी कोणीही सहमत असले पाहिजे असा  आमचा काही आग्रह नाही. )

" टाऱ्या साल्या तुला काही सोशल सेन्स नाही . अरे एवढा क्रूर ग्यांगरेप झाला दिल्लीत .. एक मुलगी जिवानिशी गेली. अरे तिच्या कहाण्या सांगणाऱ्या स्टेटसेस णे बघ कश्या भिंती च्या भिंती भरल्या आणि कोरड्या भिंतींनाही रडू आवरेनासे झाले. प्रत्येकजण हळहळला आहे . तुला रे कसं काही वाटत नाही ? एवढा निर्दयी ?   "  तो अखंडित पणे माझ्यावर माझ्या संवेदनहीनतेचे आरोप करत होता. त्याला कारणही तसेच होते . त्याने टाकलेल्या  एका भावनिक स्टेटस वर मी  " ह्या दु:खात आपण किती दिवस जेवण सोडलंत"  म्हणून एक नेहमीप्रमाणे कुत्सित कमेंट टाकून आलो होतो . तो दुखावला होता. त्याच्या सोशल अवेयरनेस वर असा " पब्लिक " वार तो खाऊ शकत नव्हता. 
असे बरेच जन मला फेसबुक वर दिसतात . हल्ली फेसबुक म्हणजे भावनांना मोकळीक देण्याचं फुकाचं आणि सिम्पली उपलब्ध असणारं साधन. अर्थात इथे भावनाच काय बाकी गोष्टीही शेयर होतात . त्याला आमची ना नाही . आम्ही पण कळत नकळत शोबाजी करतोच. पण अतिरंजित , ओव्हरएक्टिंग , आणि मनापासून नसलेली पण बळेच आव आणून दाखवलेली कळकळ किंवा मळमळ पहिली की हसायला येतं .

काय असतो हा सोशल सेन्स ?
सोशल सेन्स म्हणजे आपल्या आजूबाजूला जे चालू आहे त्याला जास्तीत जास्त प्रखरपणे आणि उत्स्पुर्फ पणे भावना प्रकट करने.  बॉम्बस्फोट झाला , रेप झाला , कुठे घोटाळा झाला , कुठे फोलीस लाच खाताना सापडला , कुठे कोणता मंत्री कोणत्या स्केंडल मध्ये अडकला , किंवा कुठे काहीही झालं आणि आपल्या मिडीयाने तो  विषय तापवला की फेसबुक ( होय , आजचा सोशल कट्टा फक्त फेसबुक आहे ) वर आपले भारीतले स्टेटस आले पाहिजेत किंवा आपली लिहिण्याची कुवत नसेल तर दुसऱ्याचे टेपुन ( किंवा सभ्यता असेल तर ) शेयर करून आपली त्या विषयातली कळकळ अत्यंत वैयक्तिक पणे दाखवणे म्हणजे सोशल सेन्स.

हल्लीचाच विषय घ्यायचा झाला तर , दिल्ली सामुहिक बलात्कार. ह्या विषयावर एकाने मला विचारले. तू बाकी वेळ लै स्टेटसच्या जिलेब्या टाकतो , ह्या विषयावर कसं काही नाही ? तुला कसं काही वाटत नाही? किंवा तुला ही गोष्ट कॅजूअल वाटते की तिच्यावर कमेंट करणंही जरुरी वाटत नाही ? अर्थात ह्याला उत्तर हो आणि नाहीही.  नाही ह्या साठी की, जे झालं ते वाईट झालं. त्या मुलीसाठी वाईट वाटणे साहजिक आहे . आणि  हो ह्यासाठी की ही खरोखर कॅजूअल गोष्ट आहे कारण ह्या घटनेपेक्षा निर्घृण घटना मी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे. हल्ली मिडियाकडे दुसरा विषय नसल्याने ४-५ सांडोऱ्या-गंडोऱ्यांना तिथे चर्चेला बोलावून गुऱ्हाळ चालवतात. वातावरण एकदम ग्यांगरेपमय करून टाकले आहे. प्रश्न असा आहे की जर मीडियात हा विषय इतका पेटला नसता तर एवढे सगळे कळवळ करणारे जागे झाले असते का ? इंडियागेटवर मोठा हंगामा झाला.  तिकडे पार पोलीस वगैरे बोलवावी लागली . तरुण पिढी जागी झाली , समाज जागा झाला ह्या मथळ्याच्या बातम्या न्यूजवाल्यांनी टाकल्यामुळे आजूबाजूचे युवक युवती जागे झाले ,२ चालले म्हणून ५ जन अजून गेले , तेवढंच न्यूज च्यानेल वर आलो तर एयर टाईम मिळेल ह्या भावनेने गेलेले नमुने आपल्याकडे खूप !  अर्थात बरेच जन खऱ्या आसेपोटी गेलेही  असतील. पण बाकीचे  तिकडे जाऊन तिथे फोटो क्लिक करतात आणि आपला सोशल सेन्स फेसबुक वर अगदी टयाग करून शेयर वगैरे करतात तेंव्हा तो ढोंगीपणा आपलाला काही रुचत नाही बुवा. त्यापेक्षा आपलं मौन बरं .

हल्ली झालेली घटना वाईट, निंदनीय  इत्यादी नक्कीच आहे , पण त्यावर कमेंट न करणं म्हणजे सोशल सेन्स नसनं कसं?  किंवा त्यावर मस्त मजा घेऊन चर्चा करणं ह्यात कसला आलाय सोशल सेन्स ? न्यूज च्यानेल बघणेही आता इरिटेट होते. जिकडे बघावं तिकडे तो विषय. कोर्ट आपले काम करेल, अपराधी लोकं गजाआड जातील विषय मिटेल. परत नवीन बलात्कार होतील. मी लेख लिहेपर्यंत झालेही असतील. ते व्हावेत असं मला वाटत नाही. पण "आपल्या सोशल सेन्स"  मुळे असे प्रकार बंद होतील असे समजणे हास्यास्पद आहे. माझ्या आजूबाजूला कुठे छेडछाड दिसली की मी मोक्याच्या ठिकाणी नक्की मध्ये पडतो. त्यानिमित्ताने मलाही हात मोकळे करायला वाव मिळतात हा दुय्यम फायदा.

मजा तेंव्हा आली जेंव्हा हा सोशल सेन्स जागे असलेले लोकं  भरभरून दर्दभरे स्टेटस लिहितात . दु:ख व्यक्त करतात ,हळहळतात  आणि नेमकं एक जानेवारीला त्यांचे पार्टी करतानाचे फोटो येतात. रात्री ११:५५ वाजता स्टेटस पडतो ,   " एन्जॉईंग न्यू इयर इव्ह  with आमकी , टमकी , ढमक्या & ४ ऑदर्स @ धिंगाणा लाउंज ."  मी आधी बुचकळ्यात पडायचो अरे  , मागे कुठे त्सुनामी की वादळ आलं तेंव्हाही हा खूप दु:खी होता. आपण त्या लोकांचे फेसबुक वर सांत्वन करून त्यांना मानसिक पाठिंबा देण्याविषयी बोलत होता. त्या दु:खाचा ह्यांगओव्हर काढण्यासाठी मग गोव्याला ४ दिवस वैचारिक आराम करून आला होता .

असो जो जे वांछील तो ते लाहो .  सांगणे फक्त एकच ,  आपल्या घरात जर अशा अप्रिय घटना घडल्यातर आपण त्याचे स्टेटस फेसबुक वर टाकूत काय ? त्याच्या चर्चा तेवढ्याच पानभर प्रतिक्रिया देऊन करू काय ? त्यावर पोल-पोल खेळू काय ? असली -नकली फोटो शेयर करूत काय ?