Sunday, February 27, 2011

पुन्हा एकदा प्रेमात ...

असं म्हणतात " आयडियल सिच्युएशन मध्ये " प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसी सुंदर दिसते ( अगदीच हिरॉइन नसेल दिसत, पण त्याहुन सुंदर ! अर्थात जर तो तिच्यात एखादी हिरॉइन शोधण्याचा येडपटपणा करत नसेल तर ) आणि प्रत्येक प्रेयसीला आपला प्रियकर अगदी हिरो वगरे वाटतो . तो तिच्यासाठी असतो देखील. सगळं अगदी टिपीकल वाटतं नाही ? छ्या , ह्या प्रेमकवींनी आणि लेखकांनी सगळंच उष्टं करुन ठेवलंय नी काही म्हणजे काह्ही म्हणुन लिहायची सोय करुन ठेवली नाहीये.  व पु म्हणतात " The more you write it personal , the more it becomes universal  " . असेलंही ( किंवा नसु ही शकेल)

असो !

पहिल्यांदा जेंव्हा तुझा आवाज ऐकला तेंव्हाच माझी विकेट पडली होती. तसं  कॉलेजच्या कँपस मध्ये टेहेळणी करत उभं राहिलं की चिक्कार फिगरबाज आणि णटुन थटुण  मिरवणार्‍या मुली दिसतात. काही दिसायला अगदीच सुमार काही ठिकठाक  , तर काही  "आईल्ला , भारी डाव आहे रे " इथपर्यंत  :)   पण ते क्षणिक असतं  , दोन क्षणांनंतर ती मुलगी आठवतही नाही. एक गेली की दुसरी येतंच असते , आणि मग तिसरी . एखाद्या  जावा किंवा सी प्रोग्राम च्या व्हाईल ( १) लुप सारखं हे चक्र अखंडित चालु असतं . पण ब्रेक;  मात्र क्वचितंच हिट होतो  !  माझा ब्रेक हिट झाला तो तुझ्यावर.  तुझ्या आवाजात काही तरी होतं. काय होतं ते माहित नाही,  पण तो आवाज  तुझ्याशी बोलल्यावरही मला तुझ्याविषयी विचार करायला लावत असे , तुझी एक इमॅजिनरी इमेज माझ्या मनात तयार झाली होती.
तुझा आवाज , तुझी बोलण्याची स्टाईल  मला तुझ्यात एवढं गुंतवत चालली होती की तुझा फोन कानाला लावुन आयुष्यभर तु मला शिव्या जरी देत राहिली ( आता तुझ्या शिव्यांची मजल मुर्ख , गाढव  आणि दुधखुळा ह्यांच्या पुढे नाही हा भाग वेगळा ) तरी ऐकत रहाण्यात मोठी मौज होती.

मला अजुनही आठवतंय , त्या दिवशी आपण भेटणार होतो. :)   माहित्ये हे पुण्हा लिहुन मी तुला उगाचंच बोर करतोय ( अर्थात तुला हे कधीही बोर होणार नाही हे देखील ठाऊक आहे ) पण काय आहे ना , तो दिवसंच साला वेगळा होता. तुला भेटण्यापुर्वीही आयुष्यात सुखदुखाचे क्षण आले होतेच की ! इंजिनियरिंग ला सिट मिळाल्याचा आणंद होता , डिग्री भेटल्याचा आणंद होता , बाबांनी सायकल घेऊन दिल्याचा आनंद , असे अनेक छोटेमोठे आनंद मी अगदी अलगद पणे संभाळुन ठेवले होते . पण कोणाशी कधी  शेयर केल्याचे स्मरत नाही.  तु पहिल्यांदा दिसलीस तेंव्हा मी पुन्हा एकदा बाद झालो . पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो. केस मोकळे सोडलेलेस , मधेच कलर्स च्या छटा , गोरीपान नितळ त्वचा ,हिरवे डोळे आणि त्या डोळ्यात असलेला "मी" .. "च्यायला दुनिया फाट्यावर मारु , पण तु बरोबर हवीस " असा एक  अंतरजालिय डायलॉग मी मनातल्या मनात मारला.  त्या दिवशी दिसलेली तु !
दिवसेंदिवस अधिकंच सुंदर होत गेलीस . मला तुझा कंटाळा असा कधी आलाच नाही ,येईल असं वाटतही नाही. थिजलो होतो , काय बोलावं काय करावं ?  भान होतं कुठे ?  "ओये हॅलो , असा काय बघतोयेस ? " असं म्हणुन तुच मला भानावर आणलंस !  खजील पणे हसलो होतो मी.

प्रत्येक भेटीत तुला भेटण्याचं आकर्षण असायचं. तो उत्साहं आजही टिकुन आहे !  भांडतेसही तू खुप . पण ते एक संजिवणी टॉणिक आहे . अशा फार कमी भेटी असतील की एकदा का होईना आपलं भांडण झालं नाही. छान आहे . समुद्राच्या  वाळुवरुन चालताना , आपल्या छोट्याश्या आयुष्याचा शेवटचा श्वास घ्यायला किणार्‍यावर येणार्‍या लाटांवर पाय ठेवत , पायाखालुन सरकणार्‍या वाळुचा अद्वितीय अनुभव घेत , हलकेच होणारा तुझा स्पर्ष , आणि त्यातुन मिळणारं ते सुख , अजुन कशात मिळेल असं वाटत नाही. तुझा आवाजही खुप  हळु झालेला असतो , निरंतन आवाज करणार्‍या लाटांच्या पार्श्वसंगितात ऐकु मात्र येतो . मला अजुन काही नको, नकोच ! अर्थ असा नव्हे की भावनिक सॅच्युरेशन ( च्यायला काय शब्द सुचतायत आज , नारळाचं पाणी जास्त झालं बहुदा) आलंय . पण तु समोर असलीस की अजुन काय सुचतंच नाही , तुझ्यात पुर्ण समरस झाल्यामुळेच आहे ते.

केस मोकळे सोडलेस की अजुन सुंदर दिसतेस. एकदा केस कापायचे म्हणुन मागे लागलेलीस. पण त्या छोट्या केसांतही खुप सुंदर दिसायचीस. वार्‍यालाही तुझ्या केसांशी खेळण्याचा मोह व्हावा , आपल्या तालावर त्यांना भुरभुर उडवणार्‍या त्या वार्‍याचाही मला हेवा वाटुन जातो ( त्या वेळी  मला आमच्या ऑफिसातल्या तेलगु तमीळ पोरी आठवतंही नाही ,ज्यांवर मी एक हिणकस कमेंट टाकुन विकट हास्य करतो , ज्यांच्या केसांत एकदा कंगवा घातला की बाहेर निघणे अगदी अशक्य ) 
तुझे केस मला फार आवडतात , तसं तुझ्यात काही आवडत नाही असं काहीच नाही म्हणा. रागावलीस की तोंडावर केस ओढुन बसतेस आणि हळुच चोरुन बघतेस .तुझ्या आवाजाप्रमाणेच ह्या केसांमुळेही मी बर्‍याचदा तुझ्या प्रेमात पुन्ह:पुन्हा पडतो . आजही पडलो .. आज सुंदर दिसत आहेस . तुझ्या केसांसाठी आजचे हे दोन शब्द . संस्थळांवर पडिक रहातोस पण माझ्यावर काही लिहीत नाही अशी तुझी कंप्लेंट असते ना  ?   जे आहे ते प्रांजळपणे लिहीलंय , घे गोड मानुन, आणि हो , एकदा ते केस असे समोर आणुन  अशी फुंकर मारुन उडव ना , प्लिज ..  :)

- टारझन