Friday, October 9, 2009

उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ

ढुस्क्लेमर्स : सदर लेखाचा कोणशीही वैयक्तिक संबंध नाही, संबंध वाटल्यास आपण स्वतःला जालिय हुच्चभ्रू म्हणून मिरवायला हरकत नाही. लेख पचायला अंमळ जड आहे , जमालगोटा जवळ ठेवल्यास वाचल्यानंतरचे त्रास टाळू शकता. जालावर फिरताना एक जड लेख वाचनी पडला , सहज विचार केला ... हे लोकं आपल्या घरी सुद्धा असंच बोलत असतील ? तर ? आणि कथा सुचली ! कथा काल्पनिक , पात्र वातावरणातली !! Smile

स्थान : अंतरजालावर जड जड प्रतिसाद देणार्‍या काकाचं घर
पात्र :
गृहस्थ : सदानंद लिमये , जिवनाची आख्खी २५ वर्षे शिक्षणात घालवली, सी.ए. जरी असले तरी मराठीचे सुद्धा डॉक्टर आहेत. शुद्धलेखन आणि अतिशय शुद्ध भाषा ह्याचे हटयोगी आहेत. एका सरकारी बँकेत मॅनेजर आहे , अर्थात कार्यालयात काही काम नसते , तेंव्हा पुर्ण वेळ मराठी जालावर लोकांच्या डोक्याला शॉट देण्यास सज्ज असतात.
गृहिणी : गंगाबाई लिमये, हाडाच्या गावठी , सदानंदाने ह्यांच्या भाषेला नागरी बनवता बनवता आपल्या (डोक्यावरच्या) केसांची कुर्बाणी दिली , पण फरक नाही , सदोबांचे प्रयत्न थांबले नाहीयेत.
मोठा पोरगा : जयकिशन लिमये उर्फ जॉकि , आपल्या बुद्धीमान पप्पांच्या एकदम विरुद्ध ! स्वकौशल्यावर शिक्षणात आपला निभाव लागणार नाही हे त्यानं जाणलं होतं , आता झोल करून एन्टी-३ चं कास्ट सर्टिफिकेट बापाच्या नकळत मिळवून घेतलं आहे, त्याच्यासारखीच पोरं भेटल्यानं त्याची विचारसरणी तशीच झालीये, ओपनवाल्यांना शिव्या घालणे हा त्याचा हल्लीचा उद्योग. वडिलांनी इंजिनियरींगला टाकला होता, तब्बल ८ वर्षे प्रचंड मेहनत करून सेकंडक्लास मिळवला आहे, सॉफ्टवेयर इंजिनियर झालाय , म्हणतो जॉब करेल तर अशा कंपनीत , जिथे मला आरक्षण मिळेल (आत्तापर्यंत एकही पहिल्या राऊंडची अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट सुद्धा क्लियर करता आली नाही असं त्याचा मित्र मध्या म्हणत होता)
छोटा पोरगा : विभाकर लिमये , लहान पोरानं वडीलांचं नाव अगदी उजळवलंय, लहानपणीच कोबी सारखा गोंडस होता म्हणून सगळेच लाडाने "कोबी" म्हणतात . बालवाडीत असल्यापासून त्याला लेखनाची प्रचंड आवड आहे , तो शाळेत असताना , त्यानेच लिहीलेले धडे आणि निबंध तिथल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले होते. जाईल तिथे पहिला नंबर मिळायचा , म्हणून लिमयांचं शेंडेफळ , पण कॉलनीतली टवाळ पोरं त्याच्या पुस्तकी बोलण्याला कंटाळून त्याची टर उडवतात म्हणून सारखा बाबांच्या कुशीत जाऊन रडे, बाबाही रडत.
थोरली पोरगी : शारदा लिमये , हिचं एम ए झालंय , कविता करण्याचा भलताच छंद , नेहमी तिच्याच भावविश्वात मग्न , तिकडे बाप काय बोलतोय आणि आई काय ओरडतेय , कश्शाकश्शाकडे लक्ष नाही , कानात आयपॉड घालून इंग्रजी , हिंदी मराठी कविता ऐकत बसते .

वेळ : लिमयांच्या घरातली सकाळची कार्यालय / महाविद्यालयात पळायची वेळ .

सदानंद लिमये : अगो, श्रवलीस काय? आज सुप्रभाती न्याहार्यर्थ काय आहे काय? आणि भोजनार्थ डब्बकामधे काय बरे ठेविले आहेस?
गंगाबाई लिमये : आवो , आंक्षी दम धरा की .. यक तं काय ब्वालता त्ये कळायला दोन दिस जात्यात..हानिमुनला शिमल्याला ग्येल्तो तवा काय काय बडवडच व्हता .. ते पार घरी आल्याव कळ्ळं .. आत्याबाई म्हणत व्हत्या ही आशी काय लाजंती इनाकारन मिर्च्या कुटताना .. कसल्ये समज व्हत्यात वो.. .. आंडी ठिवलीत उकडायला प्वारांसाठी , पुरीला म्यागी ... तुमास्नी काल राच्च्याला भिजत घातलेलं उडत आणि मुगडाळी हायत ! डब्यास्नी बी त्येच .

सदानंद : (स्वगतः हरे रामा, काय काशीनगरी कृतली आणि हा पाषाणखण्ड कण्ठीबन्धकृत करून घेतला कोणास ठावे, मम बुद्धी काही वैचारिक लेख लेखिण्यात मग्न जाहली असावी कदाचित्) अगो किती वर्षे ती जाहली, तव भाषा कधी गो सुधारितणार? ते 'आवो' नसते गो मम महामाये, "अहो" असते.. अ.. 'ह'स ओकार हो.. अ.. हो.. मराठीभाषावैद्य म्हणून माझी आंतरजालावरी काय ती कीर्ति.. (स्वगत : त्या दिनी 'शिवाली'नामक कन्यकेने माझ्या प्रतिसादाचे किती कौतूक केले.. कसा सर्रार्थ काटा आला होता तो प्रतिसाद पाहून, म्हणून सांगू) छे छे.. किं एतत अभद्रलक्षणं.. मजला न्याहारी मिळेल काय कामकाजार्थ कार्यालयी गमन करण्याआधी? कार्यालयाचा समय होत आलेला आहे. नपेक्षा किमान चहापेय उपलब्ध केले गेल्यास गिळंकृति करता येईल आणि शांतपणे गमन करता येईल. दे पाहू त्वरित अन्यथा मम समयपरिपालकव्यक्तिरेखेवर कार्यालयातील सर्व क्षुद्रजनांना ताशेर्य ओढावयास आयतीच संधी दौडून येईल. उणेपणा घ्यायला लागेल तो अन्यच..!

गंगाबाई : आत्तां !! मल्काय च्यार च्यार हात हाईत व्हय ? कुनाकुनाचं कराचं यकाचं येळेला .. ते मोठं दिवसभर क्वालनीच्या पोरात उनाडक्या करतंय .. शिकून म्हवटा विंजिनर क्येलाय न फिरतंय समद्या गावगुंडाबरबर .. त्यो कोण कांबळ्याचा हैबत हुबा रायलाय त्येच्या पार्टीची कामं करतंय ..जरा च्यार गुष्टी सांगा .. (मध्येच) आरं ए कोब्या .. आरं खाली यं .. किती आभ्यास करचिल ? साळंत जायचं नव्ह ? यं .. आंडी उकडल्याय पग माज्या सोन्या ..

सदानंद : अहो, जरा श्रवण करा, त्रागा उणा करत चला, आपली बालके वर्धितली आहेत, आपला कोबुकुमार देखिलास का ? मी त्याचे नाम अखिलभारतीय निबंधस्पर्ध्यर्थ नोंदविले आहे. मजला तर अगदी १००% खात्री आहे , आपल्या तातश्रींच्या नामाभिधानाचे अधःपतन तो खचितच होऊ देणार नाही असे, बालपणापासून त्यास माझी शिक्षा आहे! मी ३० वर्षाचा जाहलो त्यासमयीदेखील त्याच्यासम भाषासंपदा माझी नव्हती, माझीच दृष्ट लागते की काय त्यास, न कळे!

कोब्या : (जिन्यातुन खाली येत) काय बाबा , गुड मॉर्निंग , आई , कशी आहेस काय म्हणतेस ? आज काय विषेश चाललंय तुझं ? माझा नविन निबंध वाचलास का ? आधी वर जा वाच आणि हो, खाली येउन मला पटकन प्रतिक्रिया दे (कोब्याची रोजच्या दिवसाची सुरूवात अशी होते , गंगाबाईनी ही नेहमीप्रमाणे इग्नोर केलं) बाबा बाबा , मला एक नविन संकेतस्थळ चालू करावं असं मनात आहे , आणि हो, बर्‍याच जणांना शब्द टाकलाय पण ते काय म्हणतात ना "फाट्यावर मारणे" का काय ते, तसा काहीसा त्यांचा रिस्पाँस आहे . काय करू ?

सदानंद : भो कोबु, ह्या गोष्टी तू उत्तेजनार्थ घे, लोक कितीही उपहासात्मक बोलली तरी आपण आपली विचारसरणी सकारात्मक राखावी. तू गांधीजी देख, संत एकनाथ देख; तुका-ज्ञानोबां ह्यांची उदाहरणे तर अगदी गेल्या दोन किंवा चार शतकांतली आहेत, त्यांचे मुळीच विस्मरण होऊ देऊ नयेस. त्यांची आणिक पुस्तके मी तुज आणून देईन, ती केवळ तुझ्या संग्रही ठेवूं नकोस तर पाणन् पान स्मृतित ठेव. हेच सत्य जीवनमूल्य होय रे मम बालका!.

कोब्या : होय बाबा , मी ही सगळी पुस्तकं वाचली आहेत, आणि हो लक्षातही ठेवली आहेत !

सदानंद : पुनःश्च वाचन करावे , ज्ञानार्जनात कदापि कामचुक्री करू नये, लक्षात ठेव लघुरथ्या हा कधीच यशशिखरी नेत नाही!

(वरच्या रूम मधून जॉकि भाई डोळे चोळत खाली येतात , फक्त जॉकीवरंच असतात , केस कसे चुरगळलेले, डोळे रात्री उशीरा झोपल्यानं सुजलेले , आमावस्या किंवा पौर्णिमेलाच दाढीवर वस्तारा फिरवण्याचा चंग बांधल्याने, खुटले नेहमी प्रमाने वाढलेले, तेच खाजवत खाली उतरतो तोच.. सदानंदराव नेहमी प्रमाणे खेकसतात)

सदानंद : अरे गर्दभकुमारा, झाली का तुझी प्रभात? मग? आजच्या दिनाच्या २४ कला घालवण्याची काय योजना बनविलीत? कालच नवे टौपाझ्य घेऊन आलो आहे आपल्यासाठी, ते शिवधनुष्य उचला आणि अंमंळ गाल खाजवा त्याने! , नव्हे, मनुष्यात आल्यासारखे वाटाल!! आणि हे काय? फक्त लंगोट घालून काय फिरताय? ह्या अवनीतलावर आपण केवल एवटेच उरले आहात काय ? कमरेभवती काहीतरी गुण्डालन करा हे सांगणे का लगे? आमचे उपदेश जर स्विकारार्ह वाटले तर योग्य ती उपाययोजना करा!

जॉकि : ओ बाबा, जास्त बोलायचे काम नाही , समजले काय ? त्या आईने डोक्यावर तांब्या उलटा केला म्हणून ऊठलोय अजुन झोपेतच आहे ,समजले काय ? म्हणून सुचलं नाही , समजले काय ? .. ............
(समजले काय ? हा जॉकि साहेबांचा तकिया कलाम आहे , कसाही कुठेही वापरतात)

सदानंद : (जॉकिला तोडत) तसेही आपण गेली २५ वर्षे निद्रितावस्थेतच आहात बरे! दिनकर तव शिरोपरि आगमून विराजमान झालेत .......
जॉकि : (दचकत्) कोण ?
कोब्या : अरे दादा , दिनकर म्हणजे सुर्य रे , जसा बोर करणारा बोरकर तसा , रात्रीतून दिवस करणारा दिनकर , हो की नाही हो बाबा ?
सदानंद : हो हो , अतिशय सुयोग्य उकल केलीस बघ , मम पुत्र शोभतोस तू..
जॉकि : असं होय ? मग "सुकर" म्हणजे 'सू' करणारा का ? (जिन्यातून खाली येता येता)

जॉक्या जोरात हसायला लागला पण सफानंदाच्या चेहर्‍यावरच्या ३ रेषा पाहून तो गप्प झाला. आणि गुमान नाष्ता रचू लागला. तेवढ्यात पुर्वेकडून एक सुर्यकिरणांची रेघ घरातला मंद उजेड दिरत कोब्या खात असलेल्या अंड्यांच्या प्लेट वर पडली. पुर्वेकडची रूम म्हणजे आपल्या शारदा दिदि ची , दिदि आल्या त्या त्यांच्या कविता मोड मधे.

शारदा :

असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!

कोब्या : टाळ्या !!!! शारदा दिदि , तसा मी कोणाच्याही कवितेवर किंवा लेखावर असा प्रतिसाद देत नाही, पण तुझा तसा गैरसमज होऊ नये म्हणून बोललो ! तसा मी आज सकाळी उठून एक निबंध लिहीलाय , तो वाच आणि प्रतिक्रिया दे मला !!

शारदा : (हिला ही कोब्याला इग्नोर करण्यात धन्यता आहे हे कळते) सोड रे अजुन एक सुचतंय

अर्धबावरी कालपहाडी कलिंगड सडता बैगनवेली
घालफोडणी तुरडहाळी अलगद कुकर विझलबोली

घुसतादुस्तर पेटिकोटास्तर जोडलावणी दुष्टकापणी
समुच नगरी बालक समरी चपखल बाला मूर्तहरिणी

(तोडत )
कोब्या : वा वा शारदा दिदि वा !! काय सुचतंय तुला , बाबा संध्याकाळी आलात की हिच्या कवितेचं रसग्रहण करा हो , आणि हो , बँकेत जाऊन माझा निबंध नक्की वाचा , मी तुम्हाला लिंक दिलेली आहे , माझा धागा खाली गेला असेल त्याला कृपया वर आणा

सदानंद : असा चिंतित तू होऊ नयेस, तू निश्चिंत मनाने जावे महाविद्यालयात, मी तुझ्या लेखणार्थ एक पुर्ण वैचारिक प्रोत्साहनात्मक प्रतिसाद तुला लिहेनच , उपहासात्मक प्रतिसादांचे ते काय मनावर घेऊ नकोस

जॉकि : बाबा ,तुम्ही फक्त त्याच्या त्या रटाळ निबंधांना प्रतिसाद देतात , मी लिहीलेल्या " भारताचा विकास : जातिय आरक्षण " ह्यावर तुम्ही अजुन प्रतिसाद देताहात! तो धागा आता बारा पानं मागे गेला !

सदानंद : हे देख जयकिशना, तुझ्या लेखणार्थ प्रतिसाद लिहीण्यास काहीच कष्ट नाहीत, परंतु त्या लेखाचे वाचन करिताना माझ्या अतिसंवेदनशील मनास ज्या सहस्रावधी यातना होतात त्या मी सहन करु इच्छित नव्हे. तुझी भाषासंपदा केवल एखाद्या क्षुद्र लेखकासम आहे. अरे कोबुकडून शिक काहीतरी... मनुष्य जीवनांतापर्यंत ज्ञानाभिलाषी असलाच पाहिजे !

जॉकि : राहू द्या तुमचं तत्वज्ञान .. मला नको काही तुमचा प्रतिसाद ... मी त्यात जातीविषयक काहीतरी लिहीतो .. माझे १०० प्रतिसाद अस्से (चुटकी वाचवत) होतील.

कोब्या : चला हो बाबा , उशिर होतोय , रुपेश माझी वाट पहातोय आम्ही एकांकीका बसवणार आहोत !

सदानंद : उतलास, मातलास.. बालका एकांकीका नव्हे, एकांकिका, कि हा र्‍हस्व आहे दीइइइर्घ नव्हे! तुझी एकांकिका आहे, नाही काय? चल चल मी सोडतो तुला, ११ क्रमांकाने गमनावे का आज?
(सदानंद आणि कोब्या निघून जातात)

गंगाबाई : आगं ए भवाने , त्ये म्यागी गार व्हतंय की ... हादड पट्टदिशी .. मला ब्लावजं शिवायची पडल्यात अजुन खंडीभर !!

शारदा :

आली आली चाबुकवाली , शब्द कापिले माझे अमुलबटर वानी,
गेले मन माझे घायाळूनी , चला घ्या पटकन म्यागी खाऊनी

जॉकि : ए आई , मी चाल्लोय मंडळात , आपला आबा उभा राहिलाय "रिडालोस" चं टिकीट मिळालंय त्याला , निवडून आला तर आय.टी. कंपन्यात सुद्धा आरक्षण आणू असं म्हंटलाय मला ! त्यालाच मत द्यायचं बरका !! ये तायडे .. कळ्लं का ?

शारदा :

रिडालोस रिडालोस ... लोस लोस रिडालोस ..
घडलोस बिघडलोस .. रिडालोस रिडालोस ..
पडलोस उठलोस ..भरघोस भरघोस ..रिडालोस रिडालोस

गंगाबाई : आत्तां ? आता ह्यो कोन नविन ? मागल्या येळेला लोकसभेत आपटला ना रं त्यो ? आन मग आता इदानसभंला कसा काय निवडून यील ? काय करत्यात त्येंच त्येंन्ला म्हाईत ..

जॉकि : त्याची काळजी करायची नाही आं आई ,,, मी परवाच एक नवा कौल काढलाय , त्यात आम्ही मित्र मिळूनच सगळी मतं रिडालोस ला दितीयेत .. म्हणजे किमान अशी हवा तरी केलीये , ह्या वेळेस ... येउन येउन येणार कोण ? "रिडालोस " शिवाय आहे कोण ?

शारदा :

घोषणा मोठ्या करती,
नेहमी तोंडावर पडती,
तरी न अक्कल सुचती,
भारत माता की जय

जॉकि काही नं ऐकल्या सारखं करत निघून गेला.

(बस स्टॉप वर : नाना खवट ही तिथेच उभा होता. अजुन चार पाच टाळकी होती )

सदानंद : काय हो महाशय, ही ११ अंकाची यात्रीवाहिका गच्छली का हो?
नाना : नाही , कल्पना नाही , एक शववाहिका गेली , माझ्याकडे नंबर आहे , बोलावू का परत ?
सदानंदांना झक मारली नी काशी केली असं झालं , ते पुन्हा बसची वाट पाहू लागले.
कोब्या : बाबा , मला ह्याच्या भाषेवरून संशय येतोय , ह्यानेच माझ्या एका लेखाची निबंध म्हणून वाट लावलेली तिकडे !

तेवढ्यात बस येते , बाबा नेहमीप्रमाणे कोब्याला उत्तेजनार्थ घेण्याचा सल्ला देऊन चढतात !

(सदानंदराव बँकेत पोचतात , अगदी १०च्या ठोक्याला)
सदानंदराव :(घर्मबिन्दु टिपत) हा हन्त हन्त! अलिकडे ह्या भूतापामुळे उष्मा काय प्रचंड वर्धितला आहे म्हणून सांगू तुम्हास कुलकर्णी भगिनी, लाजाहोम होतो आहे जिवाचा!१२ जुलै २००१ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे कोलकाता शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, महाराष्ट्राच्याच्या दुष्काळी क्षेत्रांत, अंमळनेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती. अलीकडील सहा वर्षांत काढलेल्या पश्चिम पाँडेचेरी आणि ब्रह्मदेशाच्या उपग्रह प्रकाशचित्रांत असे लक्षात आलेले आहे की पूर्वी दिसणार्‍या २११ बेटांपैकी फक्त १२ बेटेच हल्ली दिसून येत आहेत. माझ्या मते, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे बाकी बेटे पाण्याखाली बुडाली आहेत व म्हणून दिसेनाशी झालेली आहेत. अनेक वर्षांपूर्वीही, या बेटांवर सुंदरी तरूणी आढळत असत आणि कॅलिफोर्नियाचे (पिवळे) डांबिस लोक लाईनी मारत फिरत असत. २००८ दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, ब्रम्हदेश आणि उत्तर-पूर्व भारतात पावसाळा जवळपास एक महिना पुढे सरकला आहे...................................
(कुलकर्णी मॅडम आपलं काम करत २० वेळा गेल्या २० वेळा आल्या तरी सदानंद रावांची बडबड असख्खलितपणे चालू होती. ) इकडे तिकडे पाहिल्यावर कोणी आपल्याकडे पहात नाही हे पाहून लिमये शांत झाले.

कारकुन : सायेब , जरा त्या अभ्यंकराच्या फायलीचं काय झालं ? ते लै दिवसांपासून चकरा टाकून र्‍हायलेत.

सदानंद : शी शी! अरे काय ही तव भाषा ? तव चुक्री ती काय म्हणा! तू आलाचेस त्या अभ्यंकराच्या कर्मार्थ ! तो ही तसाच न तु ही! अरे सभ्य देशाचे सभ्य नागरिक रे आपण!! त्या देशार्थ काही तरी उपकारार्थ करा रे ! ह्याच देशाचे पदार्थ खातो आपणे हे सांगणे लगे?

(कारकून केंव्हाच निघून गेला होता)

(जमल्यास क्रमशः)
आगामी आकर्षक पात्र :
मित्र १ : शिवाजी सावंत, लिमयांचे खास दोस्त , दोघांची मैत्री जालावरच झाली , अत्यंत वैचारील सातव्या मजल्यावरून जाणारे उच्च लेख लिहीण्यासाठी सावंत काकांचा हातखंडा आहे , लिमये आणि सावंत रोज जॉगिंगला जातात. दोघे आहारार्थ काय खावे ह्यावर भरपुर चर्चा रटवतात. बाकी म्हातार्‍यांनी त्यामुळे आपला वेगळा गृप बनवला, वेळ आणि स्थळ दोन्ही बदलले.
मित्र २ : व्हि'नायक शंभू , कॉलनीत हिरवट म्हातारा म्हणून प्रसिद्ध ! Sigmund Freud चं एक पुस्तक वाचून हे एवढे प्रेरित झाले की त्यांना जगंच हिरवं हिरवं दिसायला लागलं ! लिमयांचा हा बालपणचा एकुलता एक मित्र.
शेजारी : गोविंद भांडणकर , ह्याची आणि लिमयांची नेहमीची कडाक्कड कडाक्कड भांडणं ठरलेली ! कॉलनीतल्या पोरांना पार्ट्या देऊन ह्यानं आपलंस केल्यानं लिमये ह्याच्याशी जरा दबकून आहेत