Wednesday, December 25, 2013

राजकारण


"भाऊ ... भाऊ .. तुमी राजकारणात जावा" - इति चमचा

"आस्स म्हणतो .. ठीक हे .. तसंबी काय काम नाय आपल्याला. लोकशेवा करू" - हनमंत पाटील

"लोकशेवेच्या नावाव पैका छापाचा भाऊ. गल्लीत हवा आपलीच. "

"काय लागात बे मंत्री बनायला "

" काय नाय भाऊ , पैका वतायचा आणि नंतर उपसायचा. आता बगा तुमचा गुंठा इकला गेला त्यातनं पैका आलाय. कॉर्पियो तर घरचीच. धा टाळकी कायम जवळ ठीवायची. त्यांच्या खायचा प्यायचा खर्च कराचा. कायम पोरं बरोबर असल्याव कसा वट बसतो आपला.  एकदा का थोडं फेमस झालं की मग नेक्ष्ट ष्टेप. मग धयहांडी , गणपती , नवरात्र , ह्यपि न्यू यर .. जवा जे आसंल तवा  फुल ब्यानरबाकी करायची. फुल आंगभर सोनं घालाचं .. रेबनचं गांगल लावाच .. सौताचे धा यांगलनी फटू काढायचे, सौताच्याच कार्यकर्त्यांच्या नावानी शुबेच्चा द्यायच्या.  मग यकदाका पब्लिकच्या डोळ्याव आलं की मंग लोकांची लग्न मयती मुंजी किंवा दुकानाची उद्घाटन करायला जायचं. वट वाढवण्यासाठी बळच फेरीवाल्यापासून छाटछुट बिल्डर ला दम द्यायचा पैका मागायचा.  मग नेष्ट ष्टेप  पोशाक .मस्त कांजी केलेली खादी , मग नेता ष्टाईळ कुडता . मग या ड्रेसमदी परत पोष्टर लावायला सुरुवात करायची. मग वर्षभर परत याच पोशाकात ब्यानरवर यायचं भाऊ ,.. लग्ना-मयत  याच वेशात . परत धयहांडी-गणपती-नवरात्री .. जोरात खर्च करायचा भाऊ.  मग  सगळा उरलेला गुंठा इकायचा, आणिक पोरं गोळा करायची. अन निवडणुका जवळ आल्या की सगळ्या पार्ट्यांची इंटरव्यू होत्यात त्यात जायचं.

"आयला चमच्या .. तुला लय म्हाईत .. सांग सांग .. फूडं बोल "

"हा .. मग तवा  राष्ट्रवादी .. कांग्रेस .. शिवशेना .. मनशे .. बीजेपी .. काय बोलू नका .. सगळीकड ट्राय मारायचा .. तुमी पैशाला कमी पडू नका भाऊ .. पैसा असला की यापैकी कुठल्याबी पार्टीत लंबर लागतोय बगा.. पार्टीत आसल की बर आसतय .. "
"आरं पण त्या पार्ट्यांच्या इचारधारा का काय त्ये आसतय का नाय "
"त्याचा इचार नाय करायचा भाव .. जीकणारा उमेदवार हा येकच क्रायटेऱ्या असतोय .. पार्टी कंची का आसंना .. कोनला काय पडल्याल नाय .. इचारधारा बिचारधारा कुठ आयकलय का ? ते टीव्ही वर बडबड करायला अन घोषणापत्रात ल्यायला पूर असतंय .. "

"बरं बरं .. पैशे जमले .. पार्टीला धिले .. मग पुढं ? "

"मग काय ..  आधी नगरशेवक ..मग म्हानगरपालिका भाऊ .. पुढल्या टर्मला मंग आमदारकी .. मग खाजादारकी ..  मग आमदार्कीसाठी पैका जमवायचा.
लय लंबी लढाई हाय भाऊ. नगरशेवक झालं की सगळा पैका उपसायचा. मग परत जी पार्टी तिकीट दिल तिच्यात घुसायच .. नाय दिलं तर आपक्ष हुबं रायचं. जिकल्याव याच सगळ्या पार्ट्या पेट्या घेऊन मागं यत्यात. जीकड पैका किंवा पद भेटल तिकड जायचं . आजून मोठ्या बिल्डरला , दुकानवाल्याला पैका मागायचा . पोरांची कमी नाय .. ती स्वस्तात येत्यात. फुल माज.
आमदार झाल्याव इदानसभा ... मग आमदार झाल्यव तर ख्येळखंडोबाच . फुल खोऱ्यान वाढणार भाऊ .. मग सगळ्या येरीयातली कारखानं म्हणू नका बांधकामं म्हणू नका ..हास्पीटलं म्हणू नका सगळीकडनं पैसा . कोण अडवा आला की त्याला आडवा करायचा. पार्टी सांभाळून घिती. "

"आरं पण चमच्या येळ न पैका किती जाईल र हिच्यात. त्ये केजरीवाल पघ तिकडं , च्यायला दिसतंय टीनपाट पण २० करोड ते बी भिक मागून मिळवलेलं ..नाय कोणाच्या हाता पाया पडलं तिकीटासाठी .. स्वत:चंच दुकान उघडलंय .. ७० विधानसबा लढलंय. कुठ भाईगिरी बी करना. अन कोण मरतुकड कुत्र बी घाबरत आसंल असं वाटत नाय त्याला.  अंगाव सोनं नाय का डोळ्याव गागल नाय .. नगरशेवक आमदार बिमदार काय नाय .. डायरेक शिएम .. च्यायला वरनं न्यूजच्यानल वर त्याच्याच चर्चा. भलं शिव्या खातंय .. खाईना का जयना .. शिव्या तर मोदी न रावल्या पण खात्यात पण नाव झालं. ... च्यायला २० करोड तर नगरशेवकाच एकट्याच बजेट. ते तिकड वर्षात २८ लोकं घेऊन शियेम. आपल्याला केजरीवाल ष्टाईल नी जायचं .. त्याची ट्रिक सांग बे .  "

" भाऊ .. चड्डीत र्हा .. आपल्या बापाच्यान म्हापौर व्हायची सोडा .. तिकीट मिळायची मारामारी ..  कुटं केजरीवालचा नाद करताय ..  दुसऱ्या दिवशी कुठं गायब व्हाळ पत्त्या लागणार नाय .. राजकारण है ते .. तुमी आपलं भाईगिरी करा .. पैसा वता .. आणि हाय त्या पार्ट्याची तिकिटं मागा .. आपलं काम नाय ते .. अन उघडली पार्टी .. तरी मतं कोण देतंय आपल्याला ? .. गुमान चड्डीत र्हा !"

Friday, November 22, 2013

बाराशे डॉलरचा शॉक

सारांश : ५ दिवसांपूर्वी घेतलेल्या कार्डवर SMS नोटिफिकेशन आलं की १२०० डॉलर खर्च झालेत. थोडावेळ चमकलो पण ब्यांक जरी सेम असली कार्डचे डीजीट वेगळे होते त्यामुळे आधी नंबर वापरणाराचे अलर्ट आपल्याला आल्याचे उमगले.

हा अत्यंत साधा प्रकार "मुक्तपीठ" स्टाईल मध्ये पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत. ज्यांना मुक्तपीठ काय पीठ आहे ते माहित नसलेल्यांसाठी काही प्री-रिक्विझीट :
  • * - जाहिरात 
  • ** - लै मोठी जाहिरात 
  • *** - लैलै मोठी जाहिरात 

||श्री. श्री. लुनावले ब्रम्हे प्रसन्न ||                                                                                     || सौ.सौ. पावसकर-पोतदार म्याडम कृपा ||


गेल्याच आठवड्यात प्रोजेक्टच्या कामासाठी हॉंगकॉंग* वरून सिंगापूरला* ट्रान्सफर झाली. मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघेही सिंगापूर एयरलाईन्स च्या विमानात** बसून इकडे येणार होतो. हॉंगकॉंग* ला आता मस्त पैकी थंडी पडू लागली होती. म्हणून माझ्या पत्नीने माझ्यासाठी मस्त सेटिंग लावून गरम कपडे दिले होते. सवयीप्रमाणे मी माझं ऑफिसच्या कम्प्युटरला लॉगइन करायचं स्मार्ट कार्ड हॉंगकॉंग*च्या ऑफिस मध्येच विसरलो. निघायच्या दिवशी अगदी निघायच्या वेळी म्हणजे सुमारे ८:०० वाजता आठवल्याने मला घाम फुटला. आता काय करायचं म्हणून बायकोने गणपतीची मूर्ती पाण्यात ठेवली. आणि मी योग्य वेळात परत यावा म्हणून गणरायाकडे धावा करू लागली. मी घाई घाईत कॅब करून ऑफिसला गेलो. पोचतात मला माझ्या स्मार्टकार्डचे दर्शन झाले आणि माझा जीव भांड्यात पडला. मी लगेच माझ्या पत्नीला फोन करून खुशखबरी दिली. तिने देवाचे आभार मानून त्याला पाण्यातून काढले , गणपतीचाही जीव भांड्यात पडला.

आम्ही ९ ला निघायला हवे होतो. पण या गडबडीत मला घरी यायलाच ९:१० झाले. मी घरी आल्यावर सगळा पत्नीने सगळ समान प्याक करूनच ठेवलं होतं. हा सगळा लवाजमा घेऊन आम्ही एयरपोर्टवर** गेलो. तब्बल १० मिनिटे उशीर झाल्यामुळे मला त्या कारच्या एसीतही घाम फुटत होता . फ्लाईट भेटेल की नाही म्हणून पत्नीची काळजी-कम-बडबड सुरु होती. मी तिला धीर देत म्हणालो , भेटेल ग अजून ३ तास आहेत. अर्ध्या तासात एयरपोर्ट येईल. तिकडे जाऊन चेक इन केल्यावर कळले की फ्लाईट ४० मिनिटे उशीर आहे.
"अरे देवा ! आता काय करायचं आपण ४० मिनिटे ? "
" या एयरपोर्टच्या गर्दीत ४० मिनिटे कशी काढणार आपण ?"
"इथे फक्त १००-१ फूड कोर्ट आणि कॉफी शॉप आहेत , कसं होणार आपलं ? "
माझी पत्नी या अवघड परिस्थितीत काय करावं म्हणून पुन्हा एकदा किरकिर करू लागली. पण ती ४० मिनिटे आम्ही दोघांनी कॅन्डी-क्रशची गेम खेळत कशी घालवली ते आमचं आम्हाला माहित. आजही ६ दिवस झाले तरी ते ४० मिन्टे आठवले की अंगाला काटा येतो.

सारसबागेतल्या गणपतीची श्रद्धा थोर म्हणून ४० मिनिटांनी का होईना आमचं विमान सिंगापूरकडे** निघालं. घाई घाई मध्ये आम्ही सिंगापूरचे* हवामान आमच्या सेम्संग ग्यालेक्सी नोट३ *** च्या एंड्रोईड एप मध्ये बघायलाच विसरलो. गरम कपडे घातलेले , सिंगापूरला** आल्यावर ती भयंकर गर्मी , आम्ही दोघेही प्रचंड घामाघूम झालो. सिंगापूर सारख्या देशात आता आपले कसे होणार म्हणून पत्नीची पुन्हा ओरड सुरु झाली. कॅब करून पटकन कंपनीच्या व्यवस्था केलेल्या अपार्टमेंटमध्ये जावे म्हणून आम्ही मर्सिडीज*** ची कॅब केली. पत्नी गालातल्या गालात हसत म्हणाली .. "होऊ दे खर्च " !

अपार्टमेंटमध्ये आल्यावर सेट वगैरे झालो. आता प्रश्न होता सिमकार्ड कोणतं घ्यावं. लागलीच एकदोघांना ल्यांडलाईन वरून फोन करून विचारल तर सिंगटेल कंपनीचे कार्ड घ्या म्हणाले. त्यानुसार आम्ही सिंगटेलची २ कार्ड खरेदी केली. त्यावर इन्टरनेटही सुरु करून घेतलं. ४ दिवस मोठे मजेत गेले . पण अचानक फोनवर एसेमेस आला ,
DBS Alert : You've made a VISA transaction of $1,190.00 with your DBS/PSOB card on 22 Nov 19:21 . If Txn not made by you Please call back.
माझ्याकडे DBSचंच कार्ड आहे. दोन मिंट शॉक लागला. डोळ्यासमोर अंधारी आली. पत्नीने एसेमेस वाचला आणि तिला रडू येणे बाकी होते. तिने कुलदेवतापासून पुर्वाजांपर्यंत सगळ्यांना दूषण लावायला सुरुवात केली. मी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मी माझ्या मनातून जरी प्रचंड घाबरलेलो असलो तरी माझ्या पत्नीला मी ते दाखवू शकत नव्हतो. त्यामुळे ती अजूनच घाबरली असती. मी घामाघूम होत e-Banking ला लॉगइन केलं. पाहिलं तर ब्यालंस आहे तसाच. ऑन होल्ड ब्यालंस पण शून्य नंतर ट्यूब पेटली ,ब्यांकेचं नाव जरी सेम असलं तरी एसएमएस मध्ये कार्डचे शेवटचे चार डिजीट वेगळे आहेत. आणि मी हा नंबर ब्यान्किंग साठी सेट केलेलाच नाही. ५ दिवसांपूर्वीच नवीन कार्ड घेतलंय .असो , १२०० डॉलर दोन मिनिटे हवा करून गेले . त्या नंतर पत्नी आणि मी आमच्या खुळचटपानावर खूप हसलो. या घटनेला आता जवळ जवळ ३०-४० मिनिटांचा काळ लोटला , पण आजही जेंव्हा आमच्या फोनवर आर्थिक व्यवहारांचे अलर्ट येतात तेंव्हा पत्नी आणि मी एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसतो.

- मुक्तपीठ चरणी अर्पण.

Monday, October 21, 2013

खोजागिरी पेशल


"आई आपल्याला पाच्रुपै दे.. आमच्या मंडळाची पोरं माळराणावर जाऊन खोजागीरी साजरी करणार हौत "
"अरे घरी करणार आहोत.. सगळे जण आहेत.. आणि तसंही तु दुध कुठं पितोस ? पैसे ऊगाच! "
" तेकायनाय.. पाच्रुपै पायजेम्हण्जेपायजे.. दुधाची पार घट्ट बासुंदी बनवणार आहे.. आणि भेळपण आहे.. पैशे दे"
हो नाही करत पाचचा डॉलर हातात पडतो ना पडतो तोच ग्लास आणि प्लेट घेऊन धुम ठोकत मंडळात हजर. अजुन एकेकाची यायची सुरूवात असते. कोणी स्वेटरमध्ये ,कोणी माकडटोपीत कोणी मफलर गुंडाळुन..
पाच्रुपै वसुल करण्यासाठी सगळे जेवण स्किप करुनच आलेले असतात. कोणी मोठं पातेलं आणतो.. कोणी स्टोव्ह... बरोबर ते बर्नर साफ करायची पिन अनुभवांमुळे न चुकता आणली जाते. एक टीम फरसाण मुरमुरे आणायला जाते.. ज्याच्या घरी म्हशी त्याच्याघरनं निम्म्या भावाने चांगलं विसेक लिटर दुध आणलं जातं.. धिंगाणा करायला एक बॅटरीवर चालणारा टेपरेकॉर्डर.
ऐन टायमाला कोणाला घरनं पाच्रुपै न मिळाल्याने न आल्याचे कळताच त्याला घरनं ऊचलले जाते.
आणि मग गॅंग माळराणावर !
किर्र अंधार.. पण गावापासुन लांब आल्यावर चंद्राच्या प्रकाशात हळु हळु स्पष्ट दिसायला लागतं. बोचरी थंडी.. पायाला टोचणारे खडे.. स्वच्छ आकाश.. आणि दुरदुरवर पसरलेलं माळराण.. चुकून एखादं झाड. हौशी शेफ स्टोव्ह पेटवायला घेतात.. दुसरा गाणी लावुन माहौल तयार करतो.. मी भेळचं पोतं ऊघडायचो. सगळे तुटुन पडत.. हळु हळु दुध तापुन त्यातल्या केशरमसाल्याचा सुगंध पसरतो. कोणीतरी 'दुधात चंद्र दिसल्याशिवाय पिता येणार नाही' म्हणुन वटहुकूम काढी. सगळे चुळबुळत वाट पहातात. नंतर कधी एकदा चंद्र दिसायचा अवकाश की सगळे दुधावर तुटून पडतात. डेरगं भरलं की परत डँन्स वगैरे करत जो तो आपापल्या घरी!
आताही करतात काही हौशी सोसायटीत टेरेसवर .. पण त्यात तो ल्हानपणीचा चस्का नाही किंवा मग माझी टेस्ट बदलीये. असो..

उपखजिनदार, भैरवनाथ बालमित्रमंडळ

आजचे फेसबुक अंडे

काही लोक लॉगइन केलं की दिसणारी प्रत्येक पोस्ट लाईक करत सुटतात.

काही लोक आपल्या पोस्ट ला कोण लाईक करतो त्याची ऋण फेडण्यासाठी ( आणि चढवण्यासाठी ) लाईक करतात

काही लोक फक्त स्वत:चे लाईक बघतात ... ते शक्यतो कोणाला लाईक देत नाहीत.

काही लोक आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट मधल्या पोस्ट विनावाचता लगेच लाईक करतात. उदा. मोदीसपोर्टर वा विरोधक

काही लोक हक्काने लाईक मागून घेतात जसे एखादा सावकार आपले पैसे मागतो. चावरे-चिकट लोक.

काही लोक पोस्ट कोणाची आहे हे बघून लाईक करतात .गुडबुकात राहण्यासाठी , मैत्रिणीशी लगट करण्यासाठी हे लोक पोस्टची लेंडी पडल्याच्या दुसऱ्या सेकंदाला लाईक ठोकतात .

काही लोक तर पोस्ट आवडली तरीही "कोणाची आहे" हे पाहून लाईक करत नाही. यामागे वैयक्तिक करणे असू शकतात. उदा. याने माझी मागची पोस्ट लाईक केली नव्हती. किंवा याने मला मागे कधी पैसे दिले नव्हते. एक्च्यूअल-व्हर्चूअल जसे असेल तसे ..

काही लोक लाईक करून कोणता फोटो थ्रीडी कसा दिसतो / लहान कॅन्सरग्रस्त मुलाचे प्राण वाचवण्यासाठी / शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येण्यासाठी / आईवरचे प्रेम वेरीफाईड करण्यासाठी / साईबाबा-हनुमान-शनीची कृपादृष्टी मिलावाण्यासाठी आणि १ लाईक = एक रिस्पेक्ट दाखवण्यासाठीही लाईक करतात .

ओम लाईकायनम: | ओम कमेंटायनम: ||
ओम शेयर करून कृपा मिळावायनम: ||

Sunday, October 6, 2013

अंत्यविधी

ठिकाण - स्मशानभूमी
वेळ - शक्यतो अर्ली इन द मोर्निंग सकाळची
काळ - मयतीला जनसमुदाय जमला आहे , कुठे मुंडनाचा कार्यक्रम सुरु आहे , कुठे भट मंत्र म्हणतो आहे, कुठे कोणी अंघोळी करतो आहे . आणि जमावा मध्ये कुजुबुज सुरु आहे. त्यातला हा एक सीन.

भारी फ्याशन आहे. पुण्यात गुंठ्याला भाव आला आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे अमाप पैसा आला. पैश्यातून कॉर्पियो आणि पावर आली. गल्ली-बोळातले पुढारी बोलावलं नसलं तरी उदाहरणार्थ बळेच मयतीला हजेरी लावतात. त्यांच्या सोबत काळ्या काचेचा आणि सोनेरी दांडीचा रेब्यान एव्हिएटर ट्रेड मार्क गॉगल घातलेले ४-५ चमचे असतात. पुढारी एकदम खादित असतात ,कांजी केलेली असेलच असे नाही . फुल झाब्बेदार झब्बा , काळे-कुळकुळीत , तोंडावर फुल मगरूरी. चमच्यांतले २-३ तंबाखू-गुटखा बहादूर .. आणि त्यांच्या लोकांना चुकवत बरोबर आजूबाजूला पडणाऱ्या लाल पिंका .. त्यांच्या निवडणुकीच्या चर्चा ...

या येळीला नगरशेवक "भाऊ"च बनणार ,
भाउंनी फुल फिल्डिंग लावल्याली आहे.
भाऊ यंदा धयहांडीला "सुनिती चवान" ( हे असेच वाचावे ) ला बोलावणार हाये.
भाउंनी ५० पोरं यमायडीशीत कामाला लावली.
देवळामागचा प्लॉट विकून पैसा आला की भाऊ पोर्ट फौंडेशन , रुग्णवाहिका अन युवा मंच आणि युवा प्रतिष्ठान ( हे सगळं एकसाथ बरंका ) स्थापन करणार हायेत.

मंत्रपठन वगैरे होतं. मयताचा पोऱ्या मुंडण करून , खांद्यावर घागर घेऊन उभा , अग्नी द्यायचा कालावधी आणि त्यावेळी पुढारी समोर येतात .मयताची माहिती देताना , त्याची ओळख नव्याने करून देतात .मयताराम येक महान गांधीवादी होते ... त्यांनी अख्ख्या आयुष्यात कशे गांधीची तत्व पाळली ( भले मयत रोडवर पिऊन पडायचा ) , त्यांला आमी लहानपणापासून बघायचो. शिस्तीचे अत्यंत कडक आणि अख्या येरियातल्या पोरान्ला शाळेत धाडण्यासाठी ते कायम आग्रही होते. आयुष्यात पैसा कसा वापरावा , देव कसा जाणावा . संसार आणि परमार्थ कसा साधावा याचे धडे कोणाकडून घ्यावे तर मयतारामाकडून ! त्यांच्या जाण्याने आपल्यात येक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली हाये. इत्यादी .
ईश्वराची आज्ञा , देवापुढे कोणाच काय चालत नाही , वैकुंठवाशी , कैलासवाशी , त्यांच्या आत्म्याला शांती , आणि त्यांच्या घरच्यांना आबाळाएवडे दुख सहन करायची ताकद इत्यादी वाक्यात सुरुवातीला आणि शेवटी "याठिकाणी" हेडर-फुटर लावून फुल बोलबच्चन घिसेपिटे डायलॉग हाणतात. मयतीला हजेरी लावून भाऊ रिकाम्या वेळात (कायमच रिकामे असले तरी ) स्वत:ची पब्लिकशिटी करून मग "कॉर्पियो" मध्ये बसून धूळ सोडत कुठे लग्न अटेंड करायला निघून जातात.

Wednesday, October 2, 2013

*** गांधीजयंती ***

*** गांधीजयंती ***

आज गांधींचा दिवस, त्यांच्या मार्गावर चालावे म्हणून च्यासाठी दुध आणायला शेळी शोधायला बाहेर पडलो. खूप खूप चाललो पण शेळी काही दिसली नाही. एक शेळी मटणशॉपवर उलटी विनम्रपणे लटकवली होती. मी मटण शॉपवाल्याला अहिंसेचे पालन करून शेळीपालन कर पण शेळीमटण करू नकोस म्हणून एक विनम्रपणे अनाहूत सल्ला दिला. त्याला इंग्लिश येत नव्हती मला चायनीज येत नव्हती. तरीही गांधीजयंतीच्या निमित्ताने विनम्रपणे सल्ला देणे अपरिहार्य होते. नंतर कुठे दोन मुलींची सोय होते का ते पाहायला गेलो पण तोच अस्मादिकांना घरी विनम्रपणे काठी घेऊन बसलेल्या कस्तूरबेची आठवण झाली. म्हणून सोसेल आणि झेपेल तितकाच गांधीवाद करावा असे ठरवले. शेळी काय भेटली नाही आणि शेळीचे दुधही भेटले नाही. शेवटी 'होमोजिनाइज्ड' आणि 'पाश्चराइज्ड' म्हशीचं दुध घेऊन आलो, कस्तूरबेने चहा बनवली. विनम्रपणे च्या ढोसून ऑफिसला निघालो. इकडे रोजच सौजन्य सप्ताह असतो त्यामुळे मी विनम्रपणे गुड मोर्निंग करण्याआधी वॉचमननेच मला ग्रीट केलं. रोज रोज त्याच्या अश्या ग्रीट करण्यामुळे मला सौजन्याचे काही वाटेनासे झाले आहे. तडक पुढे निघालो. बसच्या रांगेतही सगळे एकलाईन मध्ये होते. कोणीही विनम्रपणे मध्ये घुसत नाही किंवा कोणी बस आली म्हणून विनम्रपणे धावपळ करत नाही. पण तरीही आज गांधीजयंतीच्या निमित्ताने त्यांची अशी शिस्त पाहून दोन मिनिटे दुसऱ्या देशातही आपल्या देशातल्या महापुरुषाचा लोक आदर करतात हे पाहून विनम्रपणे उर भरून आला. पुढे ऑफिसला गेलो. ऑफिसात ढीगभर कामाच्या मेल पाहूनही आलेला राग विनम्रपणे गिळला. आज गांधीजयंती, काहीही झाले तरी संयम सोडायचा नाही. अहिंसेच्या मार्गाने एकेका मेलला रिप्लाय केला. आलेलं काम स्वावलंबन हा गुण अमलात आणून स्वत:ची कामं स्वत:च केली. इतर दिवशीही पर्याय नसल्याने स्वत:च करत असलो तरी आज गांधीजयंती असल्याने ह्याला विशेष महत्व आहे. नंतर दुसऱ्याकडे टीममध्ये विनम्रपणे फाळणी करावी म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून आलो. नंतर विनम्रपणे घरी आलो.
अशा रीतीने आज मी गांधीजयंती साजरी केली. खिशात आपण नेहमीच गांधीजी बाळगतो. पण आर्थिक व्यवहारातले गांधीजी आपण आचरणात आणि विचारांत आणताना कुठेतरी कमी पडतो. गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधी बाबांना विनम्र अभिवादन.

आज महात्मा गांधीची जयंती , म्हणून इतर दिवशी त्यांचे वंशज अर्थात राजकारणी गांधी घराणे, यांच्या विषयी काहीही वाईट बोलणार नाही, ऐकणार नाही, लिहिणार नाही म्हणून चंग बांधला होता. मोठ्या शर्थीने तो पाळला. गांधी परिवार की जय .. गांधी परिवार की जय .. गांधी परिवार की जय .. असा त्रिवार जयघोष केला. गांधीकट करावा म्हणून न्हाव्याकडे जाणार होतो पण वेळेअभावी जमले नाही, त्याचीच कुणकुण मनाला बोचत आहे.

जाता जाता : अजून एक कोणीतरी लालबहादूर शास्त्री वगैरे कोणीतरी होते, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.

- (शुभेच्छुक) महात्मा मोहनदास गोडसे, अहिंसावादी कोन्ग्रेस

Thursday, July 11, 2013

फेसबुक वर स्टेटस आणि पोस्ट्स च्या जिलब्या टाकणारे काही निवडक ग्रुप

फेसबुक वर स्टेटस आणि पोस्ट्स च्या जिलब्या टाकणारे काही निवडक ग्रुप :

१. छीछोर ग्रुप : ह्या ग्रुप मधलं पब्लिक रोज काही ना काही पांचट , बाष्कळ आणि वायफळ स्टेटस टाकत असतात. जगात यांना वायू जरी सरला तरी तो फक्त यांनाच सरला आहे अशा अविर्भावात प्रत्येक गोष्टीचे गुणगान करून स्टेटस पाडले जातात. स्वत्ल्च्या दारू पिण्याचे कौतुक , किंवा शिवराळ शिव्या किंवा ह्याला त्याला दुनियादारी शिकवणारे , स्वत: मात्र जगाला आदर्श असणारे ह्यांचा ह्या ग्रुप मध्ये समावेश होतो . यांच्या स्टेटस ला शक्यतो "स्कोर सेटल" वाले लाईक्स भेटतात.

२. दर्दी ग्रुप : हा ग्रुप गाण्यांचा , सुगम - शास्त्रीय संगीताचा मोठा जाणकार असल्याचे भासवतो. मग बाबुजींचा यमन कसा ब्येस , न किशोरीचा सिंगीताचा बेस कसा मजबूत किंवा एखाद्या मिया मल्हार रागातली जगात कुणालाही न कळलेली पण केवळ आपल्यालाच माहित असलेली एखादी गोष्ट किंवा इत्यादी मोठ्या जिवाभावाने रोजच्या रोज त्रिवार प्रसवलीच पाहिजे असा यांचा दंडक असतो. स्वत:लाही सिंगीतात गती आहे किंवा समजावून घेण्याची जेन्युअन इच्छा असलेले नखावर मोजके लाईक/कमेंट्स यांना मिळतात.

३. आंद्रे इस्तेवान ग्रुप : ह्या ग्रुप मधल्या लोकांनी मोठा महागडा डीएसएलआर विकत घेतलेला असणे जरुरी नाही . आजकाल मोबाईल मध्ये कॅमेरे उपलब्ध झाल्याने आणि मोबाईल डेटाप्लान स्वस्त असल्याने काढ फोटो की कर अपलोड .. काढ फोटो की कर अपलोड ..नि वाढव सर्व्हर ची स्पेस .. आणि बऱ्यापैकी डीएसएलआर असेल आणि फोटोशॉप (मध्ये गती असणे मस्ट नाही ) पिकासा एडिटर मध्ये थोडाफार स्पेशल इफेक्ट देऊन कसल्याही फोटोला अपलोड करून त्यावर "आंद्रे इस्तेवान फोटोग्राफी " किंवा "चमनगोटा आर्ट्स" वगैरे चे वॉटरमार्क्स लावून फोटो फेकले जातात. आपल्याला लाईक मिळावेत म्हणून ह लोक सर्रास ए टू झेड फ्रेंड्स ला टेग करत सुटतात. फोटो बरा असो नसो, लाईक बऱ्यापैकी मिळून जातात.

४. कोकरी ग्रुप : हा ग्रुप कुठून कुठून पकडून पाककृती वैग्रे जमा करून स्वत: च्या नावाने खपवत असतो. कोण ह्यांच्या फेसबुक स्टेटस चे प्रिंटआउट काढून जेवण बनवत असेल माहित नाही पण हे फेसबुक वर मात्र जाम पकावतात . लाईक संख्या १ ते ३ .

५. शेयरखाण ग्रुप : ह्या ग्रुप ला फेसबुक मधल्या "शेयर" बटणाचे टेस्टिंग करण्याचे काम दिलेले असते. दिसलेली प्रत्येक पोस्ट लाईक करो न करो , समजो न समजो ती शेयर केलीच पाहिजे असा यांचा प्रोग्राम असतो. दिसलं की कर शेयर. यांना ९९% शून्य लाईक मिळतात

६. कोटधारी ग्रुप : सकाळी झोपेतून उठावं. ऑफिस ला जायची घाई. डोळे उघडत नाही म्हणून बळेच फोन घेऊन फेसबुक बघावं. तोच यांचा स्टेटस पहिल्याच ओळीवर तुमची झोप उडवायला तयार असतो. अत्यंत अगम्य भाषेतले आणि घोटीव काम केलेली वाक्य आटवलेल्या आणि आयुष्यात कधीही दूरदूर वर न ऐकलेल्या शक्यतो युरोपियन फिलोसॉफर चे कोट्स तुमची वाट बघत असतात. ते वाचून उडालेली झोप परत लागते. यांचे स्टेटस शक्यतो फक्त हे स्वत: लाईक करत असतात.

७. अन्नू मलिक ग्रुप : हे दुसर्यांच्या वॉलवर भुतासारखे फिरतात. कुठलासा स्टेटस आवडला की पटकन कॉपी करून आपल्या वॉल वर आपल्यालाच सुचला असल्याच्या थाटात चिटकवतात. कधी कधी हा टेपूपणा इतका विकोपाला गेलेला असतो की आपल्या सख्ख्या मित्रांचे स्टेटसही सर्रास चोरून वॉल वर टाकण्यास हा ग्रुप मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात लाईकचा कोरडा दुष्काळ इथेही असतो.कमेंट्स मधेही यांचाच एखादा मित्र यांच्या वॉल वर यांची हमखास मारून जातो. लाईकचा शक्यतो शुकशुकाटच असतो.

८. दर्द-ए-दिल ग्रुप : हा फेसबुक वरचा सगळ्यात आटीव ग्रुप आहे.सर्व जगाच्या सेंटीमेंट यांच्यात सामावल्या आहेत. सर्व जग यांच्या प्रेमाच्या लाटेवर स्वार आहे आणि आपल्या सेंटी , प्रेमाच्या ,कविता किंवा पोस्ट्स आणि क्युट मांजरींचे फोटो हे आपल्यासोबत जगालाही फार फार आवडतात अशा गृहीतात रोज २०-३० सेंटी कविता आणि फोटोज चा रतीब घालण्यात हा ग्रुप आघाडीवर असतो. ह्यांच्या पोस्ट्स ला लाईक / कमेंट करणारेही त्याच प्रकारातले असतात. आणि गम्मत म्हणजे बऱ्यापैकी लाईक भेटून जातात.

९. भिकारी ग्रुप : हा सगळ्यात उग्र आणि त्रास देणारा ग्रुप असतो . ह्यांनी शेयर केलेल्या प्रत्येक पोस्ट मध्ये हे भावनिक आवाहन करून लाईक/कमेंटची भिक मागतात. आपल्या आईवर प्रेम करत असाल तर , आपल्या देशावर प्रेम करत असाल तर , राजे पुन्हा जन्माला यावे असते वाटत असेल तर , सचिनचे भक्त असाल तर पासून ते तुम्ही माणूस असाल तर वगैरे "तर" लाईक मागून आतंक पसरवणारा हा ग्रुप सगळ्यात मोठी डोकेदुखी असतो. काही भावनिक लोकं इमोशनल होऊन हमखास यांना लाईकस पुरवतात .

१० . भक्त प्रल्हाद ग्रुप : ह्या ग्रुप मधल्या लोकांची देवावर स्वत:च्या अस्तित्वापलीकडेही श्रद्धा असते. ह्यांचा तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये समावेश असेल तर तुमच्या वॉल वर साईबाबा , शंकर , गणपती कृष्णापासून ते दुर्गा पार्वती सगळ्या देवी देवताच रोज येणंजाणं चालू राहील . ह्यांच्या पोस्ट्सलाही फक्त आस्तिक लोक न चुकता लाईक करतात .. ह्यांची स्वत:ची वॉल म्हणजे एक धार्मिक मॉल असतो. " बाम भोले " किंवा "जय श्री कृष्णा" किंवा "ओम साई" सारख्या कमेंट्स दिल्यामुळे आपली कामं घरबसल्या होतील ह्या भाबड्या आशेत बरंच पब्लिक लाईक / कमेंट करत असतं.

११. हौशी ग्रुप : जगाच्या पाठीवर फक्त आपणच कुठे फिरायला गेलो , आपण कसे अमेरिका-युरोपात गेलेले पहिलेच भारतीय आहोत किंवा कुठल्या रीसॉर्ट मध्ये गेलो ह्यांचे फोटो रोजच्या रोज दर ३ तासाला टाकणं हे आपले परम कर्तव्य समजणारा हा ग्रुप मोठा गजब असतो. काही अति हौशी ज्याचं नुकतंच हनिमून वगैरे वरून परतणं झालं आहे असे ( किंवा काही गेल्या गेल्या तिकडूनच ) आपल्या हनिमून कॉटेजचे फोटोज मग त्यात सुरुवात पाकळ्या पसरवलेल्या किंग साईझ बेड पासून सुरुवात. २००-३०० फोटो सलग अपलोड करतात. हौशी ग्रुपच्या हौसेला मोल नाही. ते प्रत्येक लाईक आणि कमेंट करणार्याचे शेपरेट कमेंट देऊन धन्यवाद मानतात. ह्या प्रकारात म्हैलावर्ग शक्यतो आघाडीवर असतो. इथे सो क्युट , चो च्वीट वगैरे कमेंट अन लाईकचा धो धो पाउस पडतो .

१२. टेगकरी ग्रुप :  ही लोकं कसल्याही निरर्थक पोस्ट मध्ये पूर्ण गावाला tag करत सुटतात. यांना tag हा प्रकार दिलाय म्हणजे तो कम्पलसरी वापरने जरुरी आहे अणि तो वापरला नाही तर आपण लोकांचा अपमान करू असे वाटत असावे . सध्या या ग्रुपने वात आणला आहे.  ह्यापी होळी , ह्यापी दिवाळी , ह्यापी न्यू इयर पासून कसल्याही पोस्ट मध्ये हे सगळी फ्रेंडलिस्ट tag करत सुटतात.

१३ . महा बाराचा ग्रुप : हे शक्यतो पुण्याच्या अलीपलीकडे आढळतात. ह्याला त्याला नावं ठेवणे , ह्याच्या त्याच्या स्टेटस वरून त्याची खेचणे , मोठाले स्टेटस टाकून फेसबुक युजर्स च्या स्वभावाचे विश्लेषण करणे ह्या ग्रुप ला छान जमते. आम्ही इथलेच असू कदाचित.

अजून बरेच ग्रुप बाकी आहेत. पण ते नंतर .

- टारझन

टीप : लेख ढापू नये. ढापल्यास किमान सौजन्य द्यावे ही अन्नू मलिक ग्रुप ला विशेष विनंती.

Monday, May 13, 2013

जीमेल बंद पडले , राज्यात हाहाकार !!


जी-मेल पुन्हा बंद पडले ! भारतात पुन्हा अंध:कार , चारही महानगरांत कामकाज ठप्प !!

न्यूयॉर्क - जगभरातील 'गुगल'च्या युझर्सला आजकाल सकाळ-दुपार-संध्याकाळ "जी-मेल'ला लॉगिन करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 'जी-मेल'ला लॉगिन करताना '502 एरर' दाखवत आहे. ह्या प्रकारामुळे अरबो भारतीय त्रस्त झाले आहेत. बऱ्याच जणांना अन्न गोड लागत नाही, काहींनी जलपान त्याग केले आहे, असे फेसबुक आणि ट्विटर च्या अहवालावरून दिसते. काहींनी रामलीला मैदानावर गुगल विरोधात बेमुदत उपोषण कम आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. कॉंग्रेसचे प्रकुत्ते आय मीन प्रवक्ते डॉगविजय सिंह ह्यांनी ह्या प्रकारामागे RSS चा हात असल्याचे जाहीर पत्रकार सभेत सांगितले. तर अलीकडेच फेम प्राप्त झालेले मनीष तिवारी यांनी आमच्या पत्रकाराला हा प्रश्न विचारल्यावर " तुम कीस मुह से गुगल बंद पडणे की बात करते हो ? तुम्हारा न्यूज च्यानेल तो चालू होके भी बंदके बराबर है." असा उलटा डाव टाकला . अंबिका सोनी यांनी ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होई पर्यंत ह्या मुद्द्याला जास्त हवा देऊ नये असे सांगितले. कपिल सिब्बल यांच्याकडे गुगल मेल बंद बद्दल प्रश्न विचारताच त्यांनी पळ काढला. मायावतींनी गुगल जोवर नोकर्यांत दलितांना ३०% आरक्षण देत नाही तोवर उत्तर प्रदेशात जीमेल बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर मुलायम सिंग यांनी जीमेल बंद पडल्याचे खापर सरकार वर फोडले आहे. बीजेपी ने लोकसभा आणि राज्यसभेत जीमेल-एरर ५०२ चा बुद्द उचलून धरत गोंधळ घातल्यामुळे आज दोन्ही सभागृहे तहकूब करण्यात आली . 
शिवसेनेचे अध्यक्ष मा.उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्राला दिलेल्या २३ पाणी मुलाखती मध्ये "गुगल चे डोके ठिकाणावर आहे काय ? " अशा शब्दांत गुगलवर हल्लाबोल केला आहे. संजय राउत ह्यांनी उद्धवजींच्या ह्या मुलाखतीमुळे गुगलवाल्यांच्या तोंडाला घाम फुटला असल्याचे बोलून दाखवले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुगलच्या मराठी भाषांतर सुविधेबद्दल संतोष व्यक्त करतानाच गुगल बंद पडण्यामागे बिहारी लोकांच्या अमर्याद लोंढ्यांना कारणीभूत ठरवले. शरद पवारांनी येत्या मोसमात मान्सून नंतर जीमेल सुरळीत होण्याचे भाकीत वेधशाळेच्या संदर्भावरून सांगितले. तर त्यांचे सोज्वळ पुतणे म्हणाले की गुगल च्या सर्व्हर्स मध्ये जागेचा अभाव आहे ,तिथे मुतायला देखील जागा नाही. दादांनी असे वक्तव्य करताच त्यांच्या चमच्यांनी त्यांना भरभरून हसून दाद दिली. पण चूक लक्षात आल्याबरोबर दादांनी परत २ मिनिटांचे उपोषण आणि मौनव्रत करून प्रायश्चित्त करून घेतले. आर आर पाटलांनी "बडे बडे सर्व्हर्सपे ऐसी छोटी मोटी घटनाये होती रेहती है" म्हणत प्रश्नाला बगल दिली . 
लालकृष्ण अडवाणींनी जीमेल बंद पडण्याच्या कारणमीमांसा आपल्या ब्लॉगवर स्पष्ट करताना म्हटले आहे की, "भाजप सत्तेवर आल्यास आणि मी प्रधानमंत्री बनल्यास  राममंदिरासोबत जी-मेल सर्व्हरची उभारणी आपण नव्याने करू! " तर मोदींनी सद्भावना उपास करून गुजरातेत जीमेल अखंडित चालू असल्याचा दावा केला. राहुल गांधींच्या मतानुसार जी-मेल सर्व्हर  ह्यांगण्यामागे काहीतरी टेक्निकल कारण असून, त्यांच्या कोड मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. आपल्याला गुगलने चान्स दिल्यास ते २ मिनिटात जी-मेल सर्व्हर अप करू शकतात असा विश्वास राहुल गांधींना वाटतो. मागे एकदा राहुल गांधींचा लेपटॉप बंद पडलेला तेंव्हा त्यांनी तो तब्बल २ दिवसांत सुरु केला होता. राहुल गांधीनी  MH-CIT ही प्रतिष्ठेची संगणक परीक्षा ६व्या खेपेत पास केली आहे. ममता ब्यानर्जीनी ह्यावर काम्युनिसमचा आरोप लावला आहे. जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मात्र जीमेल ला भारतरत्न देण्यात यावे ही मागणी परत पत्राद्वारे राष्ट्रपतींना कळवली आहे.  
एलबीटी विरोधात आंदोलन करत असलेले अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे सहचिटणीस आबासाहेब कानगोळे यांनी सांगितले की गूगलने जी-मेल बंद ठेवून  आम्हाला  पाठींबा दिलेला आहे.  सदाशिव पेठेतल्या आप्पा कुलकर्ण्यांनी गणपती पाण्यात बुडवून ठेवला आहे  तर त्यांच्या पत्नी सौ. निर्मला कुलकर्णी सारसबागेतल्या गणपतीला अर्धी प्रदक्षिणा घालून बाप्पा कडे साकडे घातले आहे . जी मेल बंद असल्याने कुलकर्णी कुटुंबीय त्यांच्या अमेरिकेत पाओ अल्टो मध्ये याहू! नामक नामांकित कंपनी मध्ये ज्युनियर सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या मुलाशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांची पुरती अडचण झाली आहे.  आसाराम बाप्पुंनी मेल ची होळी खेळत रेडीफ मेल या एकूण १३ युजर संख्या असलेल्या मेल सर्व्हर वरून १००१ मेल्सचा स्पॅम कम पाउस पाडला. अनिरुद्ध बाप्पुंनी आपल्या भक्तांकडून आजच्या सत्संगात  " ओम गुगलमेल प्राप्ती | जीमेलाय नम: || " ह्या मंत्राचे ५१,००० वेळा नामस्मरण करून घेतले. ढोकळा मोहरी ऐवजी जिर्याची फोडणी देऊन तो शेजवान चटणी सोबत खावा, जीमेल सर्वर वर कृपा होईल , असे निर्मल बाबा म्हणाले .  मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा गुगल ला बसल्या आहेत असे एका महिलेने डोक्यावर २ हांडे पाणी आणता आणता आमच्या पत्रकारास सांगितले.  
दरम्यान रॉयल च्यालेंजरच्या फ्यांसच्या मतानुसार क्रिस गेल च्या धडाकेबाज फलंदाची मुळे जीमेल सर्व्हर गंडल्याचे सांगितले तर पुणे वॉरियरचे चाहते श्रीरंग गोखले म्हणाले की अशोक डिंडाने  बोलिंग रणप घेताना जेंव्हा उडी मारली तेंव्हा तो गुगल सर्व्हर जिथे रन होतो त्या क्लाउडला धडकला आणि जीमेल बंद पडले. तर बहुतांश लोकांचे असे मानने आहे की सर जडेजांनी एक वन लाइनर मेल पाठवल्याने जीमेल बंद पडले आहे, पण सरांविरुद्ध बोलून अवलक्षण ओढावून घेण्याची कोणाची हिम्मत होत नाही.

मनमोहन सिंघ यांनी जीमेल बंद पडल्याबद्दल २ मिनिटे मौन पाळून आपला शोक व्यक्त केला. आणि लवकरच जीमेल सुरळीत करावे असा आदेश CBI ला दिला.

- कॅमेराम्यान आरती छडबडिया सोबत मी टारझन , जंगलन्यूज .

Tuesday, March 5, 2013

*** भारत , भारतीय आणि लोकशाही ***




इंग्रज म्हणायचे , भारतीय लोकं शासन करण्यास नालायक आहेत. पूर्वी मला त्याची खूप चीड यायची. पण आता पटतंय ! स्वातंत्र्य उपभोगण्याची आपली लायकी नाही, भारतीय मानसिकताच गुलामगिरीची आहे. पूर्वी इंग्रज होते, आणि आता दादा , भाई , मामा , तात्या , इत्यादी.  ही लोकं पैसा - पॉवर साठी राजकारणात येणार. जनतेला वाकवणार . जो आडवा येईल त्याला आडवे करणार. आणि निवडणुकीच्या वेळी आपण पुन्हा त्यांनाच निवडून देणार. पक्ष कोणताही असो , पक्षातले पक्षी फक्त गिधाडं . झेंडा बदलला म्हणजे वृत्ती बदलत नाहीत . आणि ह्या उपरही आपल्याकडे लोकशाही ( आणि तीही जगात श्रेष्ठ ) आहे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक दादा/भाई/नाना/काका चा प्रदेश आहे , जिथे त्याच्याशिवाय कसलीच पानं हलत नाहीत , मोठे आर्थिक व्यवहार होत नाहीत. जागांची हस्तांतरण होत नाहीत . "मला नाही जाणवलं बॉ हे कधी , मी तर किती सुखवस्तू जगतोय " असे म्हणणारे निद्रिस्त गणले जावेत.

राज ठाकरे आत्ता आत्ता पर्यंत थोडे वेगळे वाटायचे. पण आता वाटचाल पाहून थोडं दचकायला होतं, अर्थात इतक्यात अजून काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. माझी सामाजिक बांधिलकी शून्य आहे . मला माझ्याच व्यापातून उरकेनासे झाले आहे , मी काय कोणाला मदत करू. पण जरी माझे उरकून उरत असेल तर मी ते पुढच्या पिढीसाठी ठेवेन , अजून उरले तर त्या पुढच्या .. सो ओंन . ही टिपिकल भारतीय मानसिकता आहे . रोडवर कोणी पडलेला जरी दिसला तरी त्याला थांबून मदत करायला आपल्याकडे ना वेळ  ना इच्छाशक्ती. जास्तीत जास्त शेजारी उभं राहून कसं आणि किती झालंय त्याचा अंदाज बांधत आम्ही उभे मात्र राहू .

जसं मतदान करू लागलो तसा अनुभव एकच आहे , ज्यालाही मतदान करतो तो पडतो. नंतर कळतं दादा / भाइ / डॉन वगैरेच निवडून येतात . दर वेळी येतात . पुन्हापुन्हा येतात . आणि कितीही काहीही घाण केली , उघड उघड राडे केले तरी यांचे काही वाकडे होत नाही. प्रत्येक एरियात हे तिथल्या "तरुणांचे आशास्थान , समाजाचे आधारस्तंभ , धडाडीचे नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते असतात . आमच्या इथे प्राधिकरणात एकदम चकाचक रोड बनले जातात . विमानची धावपट्टी काय असेल एवढे मस्त रोड , पण त्याचा आनंद आम्ही आठवडाभरही घेऊ शकत नाही . कारण रोड खोदण्याचे काम लगेच निघते. सरकारी कामं नाही निघाली तर आमचीच लोकं सटरफटर कामं काढून रोड ला बरोबर आडवा छेद देतात . एक वेळ स्पीडब्रेकर परवडतो पण ते खड्डे नाही . थोडक्यात काय ? पुन्हा कंत्राट काढायला रिकामे. माझ्या घरामागाचा रोड गेल्या ३ महिन्यात ६ वेळा करून झाला आहे , आणि आता पुन्हा कोणीतरी खड्डा पाडला आहे. हे तर एक साधं उदाहरण झालं, अशी चिक्कार उदाहरणं तुम्हालाही माहित आहेत.

जागांचे व्यवहार असोत , कंपनी सुरु करायची असो , किंवा फुटपाथ वर  साधी हातगाडी लावायची असो , लोकल माफिया ( उर्फ दादा/भाई ) किंवा आमदार/खासदार यांचे खिसे भरावेच लागतात. पासपोर्ट काढताय ? व्हेरिफिकेशन साठी पोलीस घरी येत नाहीत , आपल्याला स्तेशनच्या १० चकरा मारायला लागतात , त्यातही चिरीमिरी शिवाय फाईल पुढे सरकत नाही . वरून त्यांची मग्रुरी ऐकून घ्या , नव्हे आपण ती ऐकून घेण्यात धन्य मानतो. आपल्याला चीड येत नाही , आली तरी "हे असंच असतं" म्हणून आपण आपली समजूत घालून घेतो. ह्या उलट जिथे आपली कामं सरळ मार्गाने होत नाही , तिथे आपण सुमडीत पैसे सारून कामे करवून घेतो .  शहर नियोजन नियमानुसार आपल्याला किती जागेवर बांधकाम करण्याची परवानगी आहे, आणि आपण किती करतो ? काही ठिकाणी घराचं फ्लोरिंग थोडं वर असेल तर घरापुढच्या पायऱ्या थेट रोड वर काढतात , तेवढीच फुट दीड फुट जागा मारता येते .  नेत्यांना भ्रष्ट कामाबद्दल शिव्या देत आपण आपल्या अडकलेली काम मागच्या दराने करून घेतच असतो.

बेशिस्त ही भारतीयांच्या रक्तात असते. मला नेहमी ह्या गोष्टीची जास्त चीड येते कारण ही गोष्ट घराबाहेर पडलं की १००% "भोगावी"  लागते. विनाकारण हॉर्न वाजवणे , सिग्नल हा रोडवर मनोरंजक लाईट शो असल्यासारखे ट्रीट करणे , ८ तासांच्या ड्युटी मध्ये ४ तास टाईमपास करणे आणि तरीही वाढीव पगाराची अपेक्षा करणे , असंख्य गोष्टी आहेत . आम्ही जर्मन कार वापरतो , पण ती चालवताना जर्मन शिस्त आमच्या अंगी येत नाही . आमच्याच वाढदिवसाचे हार्दिक अभिनंदन आम्ही चौकाचैकात करून स्वत:चेच कुल्ले बडवून घेतो.  शुभेच्चुकांना जर एवढाच वाढदिवसाचा पुळका आला असेल तर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन त्याला मिठ्या मारा , केक कापा किंवा अजून काही करा , चौकात घाण करण्याचे कारण समजत नाही . बरं यांना बघून गार वाटतं असही नाही. रेड्यासारखे राकट चेहरे , मैदा फुगाल्यासारखे शरीर अंगावर सरळ(?) मार्गाने किंवा कष्टाने(?) मिळवलेलं सोनं आणि खाली  काडी पैलवानांची पंगत  ह्यांचे पोस्टर हेच पन्नास वेळा बघतात.

राजकारणाचा आणि समाजकारणाचा तिळमात्र संबंध राहिलेला नाही.  समाजकारण करणारास मूर्ख समजले जाते. ह्याचा अर्थ समाजकारण करणारे शून्य आहेत असे नाहीत. ते त्यांचं कार्य वर्षानुवर्षे विना कोणत्या चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावल्याविना करत आहेत . बाबा आमटेचे  वाढदिवसाचे अभिनंदन करणारा फ्लेस्क एकही नाही. न्यूज च्यानेल वर त्यांना शुभेच्छा देणारी जाहिरातही कोणी देत नाही . किंवा ते स्वत: देखील त्यांचे वाढदिवस १००-१०० केक कापून किंवा जंगी दारू-मटणाच्या पार्ट्या देऊन साजरे करत नाहीत.  बाबा आमटे करोडोमध्ये एकच .. दादा / मामा / भाई मात्र चौकाचौकात २०-१ असे सापडतात.

नाना पाटेकर म्हणतो ते खरेच, भारताची जी प्रांतवार रचना झाली तीच मुळात चुकीची आहे. देशात आम्ही प्रांतवार भांडतो . राष्ट्रात आम्ही गाववाले आणि उपरे म्हणून भांडतो. तर समाजात जातीधर्मावर भेदभाव आहेच . थोडक्यात "भारतीय" वगैरे अस्म काही नसतं , असतं ते "मी" आणि "माझे".  व्हिसा घेऊन कल्टी मारायची आणि तिकडे जाऊन भारतप्रेम जागे करायचे . आपण अतिसर्वसामान्य आहोत. जगाला शून्य दिला म्हणून लाल करतो अरे पण त्यानंतर तुम्ही केवळ शून्यात आहात. तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या की राग येतो.  माझ्या भारतावर माझे भरपूर जीवापाड वगैरे प्रेम आहे असे म्हणणारे माझ्या आजूबाजूला खूप आहेत. त्यांना आपल्या भारताविषयी ( किंवा भारतीय बाण्याविषयी ) छेदल्यास खूप राग येतो . पण तो राग फुसका असतो ,त्या रागाला काही मजबूत बेस नाही. बाहेरच्या देशात काय चांगलं आहे हे त्यांना सांगितल्यास ते मला त्या देशातले नकारात्मक गुण ऐकवतात. पण "आपण आपली ग्रोथ करून घेण्यासाठी दुसरीकडून चांगलं का उचलू नये ?  " ह्या प्रश्नांचे उत्तर मला अद्याप भेटलेले नाही .

असो , फार फ्रस्ट्रेषण काढलं . भारत, भारतीय आणि लोकशाही  आहे ही अशी आहे , ती भविष्यात  बदलेल ह्याची चिन्ह नाहीत आणि इच्छाशक्ती अत्यंत कमजोर आहे. मान्य करा / करू नका ( काय फरक पडतो ? )


- टारझन


Thursday, January 3, 2013

सोशल सेन्स


( सगळे विचार वैयक्तिक आहेत , त्याच्याशी कोणीही सहमत असले पाहिजे असा  आमचा काही आग्रह नाही. )

" टाऱ्या साल्या तुला काही सोशल सेन्स नाही . अरे एवढा क्रूर ग्यांगरेप झाला दिल्लीत .. एक मुलगी जिवानिशी गेली. अरे तिच्या कहाण्या सांगणाऱ्या स्टेटसेस णे बघ कश्या भिंती च्या भिंती भरल्या आणि कोरड्या भिंतींनाही रडू आवरेनासे झाले. प्रत्येकजण हळहळला आहे . तुला रे कसं काही वाटत नाही ? एवढा निर्दयी ?   "  तो अखंडित पणे माझ्यावर माझ्या संवेदनहीनतेचे आरोप करत होता. त्याला कारणही तसेच होते . त्याने टाकलेल्या  एका भावनिक स्टेटस वर मी  " ह्या दु:खात आपण किती दिवस जेवण सोडलंत"  म्हणून एक नेहमीप्रमाणे कुत्सित कमेंट टाकून आलो होतो . तो दुखावला होता. त्याच्या सोशल अवेयरनेस वर असा " पब्लिक " वार तो खाऊ शकत नव्हता. 
असे बरेच जन मला फेसबुक वर दिसतात . हल्ली फेसबुक म्हणजे भावनांना मोकळीक देण्याचं फुकाचं आणि सिम्पली उपलब्ध असणारं साधन. अर्थात इथे भावनाच काय बाकी गोष्टीही शेयर होतात . त्याला आमची ना नाही . आम्ही पण कळत नकळत शोबाजी करतोच. पण अतिरंजित , ओव्हरएक्टिंग , आणि मनापासून नसलेली पण बळेच आव आणून दाखवलेली कळकळ किंवा मळमळ पहिली की हसायला येतं .

काय असतो हा सोशल सेन्स ?
सोशल सेन्स म्हणजे आपल्या आजूबाजूला जे चालू आहे त्याला जास्तीत जास्त प्रखरपणे आणि उत्स्पुर्फ पणे भावना प्रकट करने.  बॉम्बस्फोट झाला , रेप झाला , कुठे घोटाळा झाला , कुठे फोलीस लाच खाताना सापडला , कुठे कोणता मंत्री कोणत्या स्केंडल मध्ये अडकला , किंवा कुठे काहीही झालं आणि आपल्या मिडीयाने तो  विषय तापवला की फेसबुक ( होय , आजचा सोशल कट्टा फक्त फेसबुक आहे ) वर आपले भारीतले स्टेटस आले पाहिजेत किंवा आपली लिहिण्याची कुवत नसेल तर दुसऱ्याचे टेपुन ( किंवा सभ्यता असेल तर ) शेयर करून आपली त्या विषयातली कळकळ अत्यंत वैयक्तिक पणे दाखवणे म्हणजे सोशल सेन्स.

हल्लीचाच विषय घ्यायचा झाला तर , दिल्ली सामुहिक बलात्कार. ह्या विषयावर एकाने मला विचारले. तू बाकी वेळ लै स्टेटसच्या जिलेब्या टाकतो , ह्या विषयावर कसं काही नाही ? तुला कसं काही वाटत नाही? किंवा तुला ही गोष्ट कॅजूअल वाटते की तिच्यावर कमेंट करणंही जरुरी वाटत नाही ? अर्थात ह्याला उत्तर हो आणि नाहीही.  नाही ह्या साठी की, जे झालं ते वाईट झालं. त्या मुलीसाठी वाईट वाटणे साहजिक आहे . आणि  हो ह्यासाठी की ही खरोखर कॅजूअल गोष्ट आहे कारण ह्या घटनेपेक्षा निर्घृण घटना मी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे. हल्ली मिडियाकडे दुसरा विषय नसल्याने ४-५ सांडोऱ्या-गंडोऱ्यांना तिथे चर्चेला बोलावून गुऱ्हाळ चालवतात. वातावरण एकदम ग्यांगरेपमय करून टाकले आहे. प्रश्न असा आहे की जर मीडियात हा विषय इतका पेटला नसता तर एवढे सगळे कळवळ करणारे जागे झाले असते का ? इंडियागेटवर मोठा हंगामा झाला.  तिकडे पार पोलीस वगैरे बोलवावी लागली . तरुण पिढी जागी झाली , समाज जागा झाला ह्या मथळ्याच्या बातम्या न्यूजवाल्यांनी टाकल्यामुळे आजूबाजूचे युवक युवती जागे झाले ,२ चालले म्हणून ५ जन अजून गेले , तेवढंच न्यूज च्यानेल वर आलो तर एयर टाईम मिळेल ह्या भावनेने गेलेले नमुने आपल्याकडे खूप !  अर्थात बरेच जन खऱ्या आसेपोटी गेलेही  असतील. पण बाकीचे  तिकडे जाऊन तिथे फोटो क्लिक करतात आणि आपला सोशल सेन्स फेसबुक वर अगदी टयाग करून शेयर वगैरे करतात तेंव्हा तो ढोंगीपणा आपलाला काही रुचत नाही बुवा. त्यापेक्षा आपलं मौन बरं .

हल्ली झालेली घटना वाईट, निंदनीय  इत्यादी नक्कीच आहे , पण त्यावर कमेंट न करणं म्हणजे सोशल सेन्स नसनं कसं?  किंवा त्यावर मस्त मजा घेऊन चर्चा करणं ह्यात कसला आलाय सोशल सेन्स ? न्यूज च्यानेल बघणेही आता इरिटेट होते. जिकडे बघावं तिकडे तो विषय. कोर्ट आपले काम करेल, अपराधी लोकं गजाआड जातील विषय मिटेल. परत नवीन बलात्कार होतील. मी लेख लिहेपर्यंत झालेही असतील. ते व्हावेत असं मला वाटत नाही. पण "आपल्या सोशल सेन्स"  मुळे असे प्रकार बंद होतील असे समजणे हास्यास्पद आहे. माझ्या आजूबाजूला कुठे छेडछाड दिसली की मी मोक्याच्या ठिकाणी नक्की मध्ये पडतो. त्यानिमित्ताने मलाही हात मोकळे करायला वाव मिळतात हा दुय्यम फायदा.

मजा तेंव्हा आली जेंव्हा हा सोशल सेन्स जागे असलेले लोकं  भरभरून दर्दभरे स्टेटस लिहितात . दु:ख व्यक्त करतात ,हळहळतात  आणि नेमकं एक जानेवारीला त्यांचे पार्टी करतानाचे फोटो येतात. रात्री ११:५५ वाजता स्टेटस पडतो ,   " एन्जॉईंग न्यू इयर इव्ह  with आमकी , टमकी , ढमक्या & ४ ऑदर्स @ धिंगाणा लाउंज ."  मी आधी बुचकळ्यात पडायचो अरे  , मागे कुठे त्सुनामी की वादळ आलं तेंव्हाही हा खूप दु:खी होता. आपण त्या लोकांचे फेसबुक वर सांत्वन करून त्यांना मानसिक पाठिंबा देण्याविषयी बोलत होता. त्या दु:खाचा ह्यांगओव्हर काढण्यासाठी मग गोव्याला ४ दिवस वैचारिक आराम करून आला होता .

असो जो जे वांछील तो ते लाहो .  सांगणे फक्त एकच ,  आपल्या घरात जर अशा अप्रिय घटना घडल्यातर आपण त्याचे स्टेटस फेसबुक वर टाकूत काय ? त्याच्या चर्चा तेवढ्याच पानभर प्रतिक्रिया देऊन करू काय ? त्यावर पोल-पोल खेळू काय ? असली -नकली फोटो शेयर करूत काय ?