Monday, October 21, 2013

खोजागिरी पेशल


"आई आपल्याला पाच्रुपै दे.. आमच्या मंडळाची पोरं माळराणावर जाऊन खोजागीरी साजरी करणार हौत "
"अरे घरी करणार आहोत.. सगळे जण आहेत.. आणि तसंही तु दुध कुठं पितोस ? पैसे ऊगाच! "
" तेकायनाय.. पाच्रुपै पायजेम्हण्जेपायजे.. दुधाची पार घट्ट बासुंदी बनवणार आहे.. आणि भेळपण आहे.. पैशे दे"
हो नाही करत पाचचा डॉलर हातात पडतो ना पडतो तोच ग्लास आणि प्लेट घेऊन धुम ठोकत मंडळात हजर. अजुन एकेकाची यायची सुरूवात असते. कोणी स्वेटरमध्ये ,कोणी माकडटोपीत कोणी मफलर गुंडाळुन..
पाच्रुपै वसुल करण्यासाठी सगळे जेवण स्किप करुनच आलेले असतात. कोणी मोठं पातेलं आणतो.. कोणी स्टोव्ह... बरोबर ते बर्नर साफ करायची पिन अनुभवांमुळे न चुकता आणली जाते. एक टीम फरसाण मुरमुरे आणायला जाते.. ज्याच्या घरी म्हशी त्याच्याघरनं निम्म्या भावाने चांगलं विसेक लिटर दुध आणलं जातं.. धिंगाणा करायला एक बॅटरीवर चालणारा टेपरेकॉर्डर.
ऐन टायमाला कोणाला घरनं पाच्रुपै न मिळाल्याने न आल्याचे कळताच त्याला घरनं ऊचलले जाते.
आणि मग गॅंग माळराणावर !
किर्र अंधार.. पण गावापासुन लांब आल्यावर चंद्राच्या प्रकाशात हळु हळु स्पष्ट दिसायला लागतं. बोचरी थंडी.. पायाला टोचणारे खडे.. स्वच्छ आकाश.. आणि दुरदुरवर पसरलेलं माळराण.. चुकून एखादं झाड. हौशी शेफ स्टोव्ह पेटवायला घेतात.. दुसरा गाणी लावुन माहौल तयार करतो.. मी भेळचं पोतं ऊघडायचो. सगळे तुटुन पडत.. हळु हळु दुध तापुन त्यातल्या केशरमसाल्याचा सुगंध पसरतो. कोणीतरी 'दुधात चंद्र दिसल्याशिवाय पिता येणार नाही' म्हणुन वटहुकूम काढी. सगळे चुळबुळत वाट पहातात. नंतर कधी एकदा चंद्र दिसायचा अवकाश की सगळे दुधावर तुटून पडतात. डेरगं भरलं की परत डँन्स वगैरे करत जो तो आपापल्या घरी!
आताही करतात काही हौशी सोसायटीत टेरेसवर .. पण त्यात तो ल्हानपणीचा चस्का नाही किंवा मग माझी टेस्ट बदलीये. असो..

उपखजिनदार, भैरवनाथ बालमित्रमंडळ

No comments: