Thursday, December 3, 2009

माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३

दहावीत चुकलो , बारावीत पुकलो .. आता कॉलेजात.

पोपट तिसरा


नाही म्हंटलं तरी ह्या राघू प्रकरणामुळे माझा मुलींच्या बाबतीत एकदमंच नकारात्मक दृष्टीकोण झाला होता. नको असल्या भानगडी!! कोणी फटाकडी दिसली की .. "व्वा" , "फिगर के व ळ अ प्र ति म " , "सुरेख " ,"केवळ एकच शब्द - खल्लास " , "शब्द संपले " किंवा गेला बाजार "मेलो , वारलो , खपलो , निवर्तलो , चचलो , पंचमहाभुतांत विलीन झालो" ह्यावर काही प्रतिक्रिया उमटत नसे. शीवा ने मार खाल्ल्यावर त्यांचा मॅटर थोडा थंडावला होता. मला हे सगळं बिंग फुटून तमाशा झाल्याचा नाही म्हंटलं तरी एक असुरी आनंद झालाच होता. वर कितीही नाकारलं तरी राघू मला आवडायची. बरेच दिवस तीचे विचार मनात येत. एक दिवस बाप्याने राघू आणि शिवा ला निगडी-मनपा बस मधे पाहिलं.सांगत होता, मस्त गुटुरगु चाल्लं होतं पब्लिकचं ! बाप्यासमोर फक्त "हॅहॅहॅ" केलं,पण आतून तिळपापड झाला होता. बरंच झालं च्यायला, नाही, ती आपली नव्हतीच. उगा स्वप्न पाहून टाईम घालवण्यात अर्थ नाही.
बारावीचा निकाल लागला ! अपेक्षेप्रमाणे पासंही झालो Smile बाप्या एम्बीबीएस ला गेला न मी आपला सुमडीत इंजिनियरींग चा फॉर्म भरला. त्यावेळी आय.टी. हॉट होतं. म्हणून प्रायॉरिटी लिस्ट मधे फक्त आय.टी.च ठेऊन वेगवेगळी कॉलेजं सिलेक्ट केली. ३०% त रकाणे भरलेल्या जागांत काही नंबर लागला नाही. पहिल्या राउंड ला संगमनेरच्या अमृतवाहिणी ला नंबर लागला. पुणे कसं सोडू ? दुसर्‍या राऊंड ला पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनियरींग कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली. महिनाभर कॉलेज झालं असेल. एक दिवस अ‍ॅप-साय -१ चं प्रॅक्टिकल चालू होतं, मॅडम जाम खडूस होती आणि स्ट्रिक्ट होती. सारखी टर्म ग्रँट करणार नाही म्हणून धमकी द्यायची. आणि मी पण येडचाप सारखं टेंशन घ्यायचो. त्या दिवशी नेमकी जरनल आणायला विसरलो. मॅडम ने पुन्हा लेक्चर प्लस धमक्या दिल्या. Smile त्याच दिवशी अ‍ॅडमिशन्स चा शेवटचा राऊंड होता. मॅडमने लॅब बाहेर काढल्यावर सीओईपी ला आलो आणि डि.वाय. मिळालं .. दुसर्‍या दिवशी कॉलेज चेंज Smile !!

इसवीसन २००२-२००६:
पुर्वी डि.वाय. चा कँपस पिंपरीतंच होता. मॅनेजमेंट, फार्मसी, इंजिनियरींग,ग्रॅज्युएशन सगळीच कॉलेजेस एकत्र आहेत तिथे Smile गर्ल्स कॉलेजही सेम कँपस मधे. इथे तर पोरींचा अगदी सुळसुळाटंच होता. नुसतं एखादा कॉर्नर पाहून बसलं की टाईमपास होत असायचा. दर दुसरी पोरगी आवडायची. दर तिसरीच्या प्रेमात पण पडायचो Smile मी लेट अ‍ॅडमिशन घेतल्यामुळे मला शेवटच्या डिव्हिजन मधे टाकलं होतं. चार पाच हुशार टाळकी सोडली तर सगळेच कॅटॅगरीच्या जोरावर किंवा डोनेशनच्या जोरावर आलेली ४०-४५% वाली पोरं होती. आर्रर. असो ! सगळेच मित्र होते. पण आमच्या वर्गात मोजून ३च पोरी. त्यातली बडे बाप की बेटी. ती आपली लेव्हलच्या पोरांबरोबरंच रहायची. तो गृप कधी माझा झालाच नाही. बाकी दोघींना मतिमंद मुलींच्या कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळाली असावी. Rolling On The Floor
तेंव्हा मी एकदम सुक्का बोंबील होतो. कपडे? फॅशन स्ट्रिट झिंदाबाद ! आपला उठला गबाळ्या की निघाला Smile बाकी नॉर्थ इंडियन पोरांची ष्टाईल ,बक्कळ पॉकेटमनी पाहिला की खट्टू ही व्हायचो. त्यांच्याकडे बुलेट काय न सिबीझी काय .. इथे आम्ही आमच्या "रेंजर स्विंग" वर येऊन गुपचूप पार्क करून आत पळायचो. ( "रेण्जर स्विंग" ची तुम्हाला ती अ‍ॅड आठवते का ? यॉर गर्ल .. नाऊ माय गर्ल .. तब्बल ४००० रुपयांची सायकल त्या काळात माझ्यासाठी फार फार फार मोठी गोष्ट होती. जेंव्हा ही सायकल घेतली तेंव्हा मला झोपही लागत नव्हती. रात्री लाईट चालू करून सायकल पहात बसायचो. फार जीव होता ह्या सायकल मधे. सस्पेंशन असल्यामुळे व्हिली वगैरे मारायला मजा यायची. माझ्या स्टंट्स ची सुरूवात म्हणजे रेंजर स्विंग Smile पण काळ पटकन् बदलला, रेंजरस्विंग मागे पडली. आणि सिबीझीची स्वप्न पडायला लागली Smile )

पहिलं वर्ष साजरे "डोंगर" दुरूनंच पहाण्यात गेलं. नको, पुन्हा पोपट नको म्हणून कधीच कोणात इनव्हॉल्व्ह झालो नाही. कॉलेजला नविन नविन अभ्यासाचा जाम मुड असे. कॉलेजाच्या रिडिंग रूम मधे भरपूर पोरी यायच्या. दोन तीन वेळा योगायोगाने एक सुंदर तरूणी शेजारी येऊन बसली.लग्गेच आवडली. तिसर्‍या दिवसापासून फॉलोअप सुरू. बळेच तिच्यासाठी एक दोनदा जागा वगैरे पकडून दिली. मादक स्माईल देऊन ती मला "थँक्स" पण म्हणाली . पण असाच एकदा कँपस मधून जाताना ती एकाच्या सीबीझी वर दिसली. जरा जास्तंच चिटकली होती. मागे तिसरं कोणीतरी बसायला येणार असल्याने जागा सोडली असेल, असा समजदारपणा दाखवून मी पॅडल मारलं.रिडिंग रूम मधे पुन्हा ती दिसली, मी रागातंच सिट चेंज केली. तर च्यायला.तीने फोन करून दुसर्‍याच कोणीतरी सोंड्याला बोलावलं. पुन्हा दोघेही रिडींग रूम मधे गुटरगु करत होते. जाऊ दे , अभ्यासाचीच चर्चा करत असतील , मी पुन्हा समजदारपणा दाखवला. आणि दुसर्‍या दिवसापासून रिडींग रूम ला जाणे बंद केलं. दुसर्‍याच सेमिस्टरला कॉलेज कँपस बदलला , आणि कॉलेज आकुर्डीला शीफ्ट झालं ! झकपक हॉल्स, नव्या कोर्‍या लॅब्स, एयरकंडिशन्ड् सभागृह इत्यादी आणि भलं मोठं ते कँपस पाहून मी एकदम खुष झालो. इकडे तेंव्हा पुर्ण ओसाड एरिया होता. बरीच डेव्हलपमेंट व्हायची बाकी होती. मी घरापासून कासारवाडी पर्यंत सायकल मारत जायचो Smile तिथून पुढे अकुर्डीपर्यंत कॉलेज.

इकडे तिकडे "व्यनी करून लंच ला इन्व्हाईट " करण्याचे ट्राय मी तेंव्हा करायचो.पण पत्ता कट व्हायचा. बहुतेक पैशावाला नसेन म्हणून. कारण जे पब्लिक अंमळ पैशावालं असायचं त्यांच्या गृपला पोरी चिटकलेल्या असायच्या. मग सहाजिकंच आपला "सर्वसामान्य मराठी" क्लासच्या पोरांचा गृप जमला ! निलेश गरुडकर ह्याच्या खांद्यावर नेहमी बॅग असायची.पहाताक्षणी एकच नाव समोर आलं "अशोक सराफ". बास!तो एक दिवस त्याला अजुनही पोरं फक्त "अशोक सराफ" म्हणूनच ओळखतात. निल्या म्हंटलं की कोण? असं होतं. विष्णूचं विषाणू वरून व्हायरस केलं होतं. दिव्येश मिंजरोला चं डिबीएमएस मोटोरोला केलं होतं. विशल्याचा रोलनंबर ५३ होता. प्रेझेंटीच्या वेळेस सगळ्यांनी आपला रोल नंबर सांगून प्रेझेंटी लावायची पद्धत होती.विशल्या ज्या टोन मधे "फपटी त्री " म्हणत असे त्यावरून त्याचं नामकरन "फपटी त्री"च पडलं! सुरजचे पप्पा मास्तर असल्याने त्याला मास्तर नाव पडलं. रोहित हा अगदीच अब्दुल रझाक दिसायचा म्हणून त्याला "रज्जाक" हे नाव पडलं! अजुनही बर्‍याच जणांची वाट लावली होती. असो. ही माझी मित्रमंडळी. विषयांतराबद्दल क्षमस्व , पण हा कॉलेजातला किस्सा म्हंटल्यावर हे सोडून लिहीनं अशक्यच !

सेकंड इयर ला आम्हाला डिबीएमएस वगैरे टेक्निकल पदार्थ नविन नविन होते. त्यामुळे पोरींवर कमेंट मारायच्या तर टेक्निकल लॅंग्वेज मधेच Smile कंप्युटर्स ब्रांचची एक पोरगी. चेहरापट्टी ठिकठाक पण फिगर भारी होती.
तिच्याविषयी चर्चा निघली की मी म्हणायचो... GUI एवढा खास नसला तरी Backend/Database तगडा आहे यार. एकदम ऑरॅकलंच! निम्म्या टाळक्यांना काही झेपायचं नाही. ती नुसती टेनिस कोर्टावर आडव्या सिट्स वर बसलेले लोक जसे बॉलच्या दिशेने लेफ्ट राईट माना वळवतात ना तशी इकडे तिकडे बघायची. कोणी वजनदार पोरगी दिसली की, "ए बघ रे .. तुझी मेनफ्रेम आली". बळेच एखाद्याच्या माथी असा मोठ्या कॅबिनेटचा पिसी मारल्यावर तो मोठा खट्टू होई. कोणी गावभवानी पोरगी, जी कोणत्याही कार्ट्याबरोबर फिरताना दिसे तीला USB नाव ठेवण्यात यायचं. "अर्रे वो तो USB है.. Plug & Play. उसके पिछे मत भाग .. कोई फायदा नही". तर ऑरॅकल मला आवडायची. पीएल्स मधे तसा मी कॉलेजात अभ्यासाला जायचो. ती हॉस्टेलाईड होती. एक दिवस गेलो न काही तरी अभ्यासाचं निमीत्त काढून बोललो. ह्यावेळेस डेयरींग चा ओव्हरडोसंच झाला. फटकन म्हणून गेलो. "मेरेको तुम्हे भोत दिन से ये बात बोलनी थी | तु मेरेको पसंद है ओर मै तेरेको बहोत प्यार करता हू||" . गरमागरम स्वादिष्ट पोहे समोर यावेत ,तोंडात लाळस्त्राव व्हावा आणि पहिल्याच घासाला खवट शेंगदाणा दाताखाली यावा असं तीचं तोंड झालं ..
तीला काय बोलावं ते सुचलंच नाही Smile माझं डी-ग्रेड हिंदी ऐकून तीला माझी किव करावी की राग ? हेच समजलं नसावं ! मला म्हणाली "फिलहाल पढाई करो ! एग्झाम्स हो जायेंगे तो हम इस बारेमे सोचेंगे, ओके?" एवढं म्हणून माझ्या उत्तराची वाट न पहाता निघून गेली. पोरींची थेट नाही न म्हणता हाकलायची कला लै भारी असते. मनात म्हंटलं, पुढं जाऊन नक्कीच एच.आर. होणार तू Smile

आणखीन एक पोरगी होती. तोंडावर सातताली मग्रुरी असायची. कोणत्या ब्रांचला होती कुणास ठाऊक. पण तीला ई&टीसी च्या पोरींबरोबर पाहिलेलं त्यामुळं ई&टीसी ला असावी असा समज ! इ&टीसी म्हंटलं की सगळे सुंदर पक्षी भरून भरून तिकडेच असायचे. आमच्या वर्गाला आम्ही "रिसायकल बीन" म्हणायचो. सगळीकडून डिलीट केलेला माल आमच्या वर्गात फेकला की काय म्हणून.ही तशी दिसायला ठिक होती. पण लाडला मधल्या श्रीदेवी सारखेच हावभाव.च्यामारी ? एवढा काय भाव खाते ? माझा एक मित्र सिव्हील ला होता. मी त्याच्या गृप मधे असायचो. झालं! एक प्लान बनवला. ती दिसली की आपापसात कुजबुजायचं आणि आपापसातंच खॅखॅखॅ करून हसायचं! नो व्हल्गर कमेंट्स, नो टिझिंग, नो स्टेरिंग, आंगलट करण्याचा तर प्रश्नच (डेरिंग) नाही. तीला काहीही एक्स्प्रेशन्स द्यायचे नाहीत. फक्त दिसली की कुजबुचायचं न हसायचं ! झालं!! रेल्वेस्टेशन ला दिसली की हसं.. कँटिन मधे दिसली की हस .. कँपस मधे दिसली की हस ! तीला ते नोटीस होईल असंच करत होतो. ती अजुन खुनशीने पाहून जायची. आणि आम्ही अजुन वेगवेगळ्या आवाजात हसायचो.शेवटी किती सहन करणार. आली एकदव टॉक्क टॉक्क हिल्स आपटत ..
"यू स्काऊंड्रल्स रास्कल्स स्टूप्प्प्पिड (हा 'प' कितीवेळा लावला होता ते माहित नाही) इडियट.. व्हाट इज धिस ? "
हे अपेक्षितंच होतं , ह्याचा ही प्लान तयारंच होता! एकेकजण "हसण्याचा" एकेक प्रकार दाखवत कटला.जणू ती तिथे नाहीच.शेवटी ती तिथे एकटीच राहीली न आम्ही दुसर्‍या टोकाला जमा होऊन पुन्हा कुजबुजून मोठ्ठ्याने हसलो. राग पार सातव्या आसमानात पोचला होता. दुसर्‍यांदाही सेम किस्सा झाला. येउन आम्हाला एकदम हायफाय विंग्रजीत शिव्यावगैरे द्यायची. शेवटी मला एकट्याला पाहून माझ्याकडे आली. ह्यावेळेस तोंडावर कसलीच घमंड नव्हती. एकदम रडवेली झालेली आली आणि चक्क मराठीत म्हणाली ..
"तुम्ही का मला त्रास देत आहात? तुम्हाला मी काही प्रॉब्लेम केलाय का ? "
मी म्हणालो ,, "नाही बॉ" ..
"मग का छळताय अस ? "
काय केलं बॉ आम्ही ? कमेंट पास केली तुझ्यानावाने ? कोणी टच केलाय ? की कोणी कुठं काही लिहून गेलाय? आम्हाला हसण्याची बंदी आहे का ?
आता ती अल्मोस्ट रडकुंडीला आली होती. तेवढ्यात तीला जा म्हणालो .. कोणी पुन्हा त्रास देणार नाही Smile

थर्ड इयर ला आलो. तोपर्यंत आमच्या कँपस मधे डिप्लोमा वाले पण आले होते. त्यामुळे वर्दळ वाढली होती. नवनवीन पक्षी दिसायला सुरू झाले होते.की कासारवाडीला चढायचो. लोकलची दुसरी बोगी आणि तिसरा दरवाजा अस्मादिकांसाठी रेल्वेने आंदण म्हणून् दिला होता. पुर्ण लोकल रिकामी असली तरी आम्ही दरवाज्यातच उभे रहायचो. कोणी उपटसुंभ्या तिथे उभा राहिला तर द्याला अलगद आत ढकलून दिले जायचे. ह्या जागेसाठी दोन-तीन वेळा युद्ध पण करावे लागले. पण ते अगदीच एकहाती जिंकण्यात आले होते.धक्का देऊन कोणी जागा सोडली नाही तर बुक्का वर वेळ येत असे. असो! सांगण्याचा मुद्दा असा की पिंपरीच्या स्टॉप वर ती दिसली.तीला एकदाच पाहून आमची विकेट गुल झाली होती. ती मधल्या डब्ब्यात बसायची ! ती मला रोजंच दिसायची. बेचैनी दिन ब दीन वाढत वाढत चाललीये ! एकदम "फिकर नॉट" अ‍ॅटिट्यूड वाला मी , एखाद दिवस ती दिसली नाही तर कासाविस व्हायला लागलो. पिंपरीचा प्लॅटफॉर्म आला की डोळे तिचाच शोध घेत असायचे. दिल एकदा पुन्हा फिदा झाले होते. हजारवेळा सांगुनही मन ऐकत नव्हते. पण कधी ती कोणत्या क्लास मधे आहे ? काय करते? कशाचाही पत्ता नव्हता.

कॉलेजात डेज चे वारे वाहू लागले होते. तो साडी-दिन (मराठीत सारी-डे) होता. आम्हाला तशा ही काकुबाया पहाण्यात इंटरेस्ट नव्हता. प्रॅक्टिकल बंक मारून घरी निघालो होतो. माझ्याबरोबर माझा दिल्लीचा मित्र इंद्रजीत होता. हा साला एकदम चालू. इतक्या मैत्रिणी होत्या त्याला. कोणत्यापण पोरीशी जाऊन बोलायचा साला. त्याच्यात नक्की काय स्किल आहे ? ह्याचं मला कुतुहल वाटे. त्यादिवशी ती सकाळी प्लॅटफॉर्म वर काही दिसलीच नव्हती. म्हणून इंद्रजीत च्या बाईकवर मी घरी चाललो होतो. तर ती डायरेक्ट समोर हजर ! Oh my gosh ! Couldn't believe !!!!
ती समोर ! ५'७- ५'८" एवढी उंच तर नक्कीच होती... एकदमच काडी नाही पण थोडीशी हेल्दी .. बॉबकट का काय म्हणतात तो .. माने पर्यंत केस ! अत्तिशय निरागस चेहरा ! मोठ्ठे डोळे .. रेखीव भुवया (हे आयब्रो वगैरे भानगड तेंव्हाच आम्हाला कळली Big Grin) लिप्स्टिक मुळे अजुनच मादक वाटणारे ओठ , हलकासाच मेकप तिचं सौंदर्य कैकपटींनी इंटिग्रेट करत होता. काळ्या रंगाची कसलीशी डिझायनर साडी न चक्क चक्क बॅकलेस ब्लाऊस !! मॅन्न !! काँफिडंटंच झालो मी. मला ती आवडते म्हणून मी इंद्रजीतला बोललो होतो.
तो म्हंटला "चल ना .. जाके बात करते है .. मुझे पता है तु नही जाएगा "
.. "अर्रे नही रे भै .. मेरेको डर लगता है .. साला गुस्सा वुस्सा आया तो ? " मी माझ्या डी-ग्रेड हिंदीत !
"साले कुछ भी कर लेकीन हिंदीमे मत बात कर ! "
मला अलमोस्ट खेचत खेचतंच तो घेऊन गेला... तीला सरळ म्हणाला " Excuse me miss !!"
तीने वळून पाहिलं "Yes !!" मला तीचा आवाज गोड वाटला (हसू नका आता,प्रेमात माणसाला सगळंच गोड वाटतं म्हणतात ..)
"You are looking absolutely fantastic and gorgeous , I think you look the most beautiful amongst all here " - इंद्रजीत साहेब चालू झाले ..
ती त्यावर अगदीव भाव खाऊन खुश वगैरे होऊन हसली " Oh ! Thanks "
मी आपला बॅकग्राऊंड मधे नाचणार्‍यांसारखा मागून नुसता हो नाही करत होतो .. बोलायचं बरंच होतं . पण जमतंच नव्हतं !
इंद्रजीत साला .. फिल्मी डायलॉग मारत होता .. "आप बहोत सुंदर हो .. लेकीन क्या है ना.. सुंदरता छुपाने मे होती है.. दिखाने मे नही " ... च्यामारी .. माझंच कधीकाळी त्याला ऐकवलेलं तत्वज्ञान (माझं नसलं तरी) तो तिच्यासमोर सरळ सरळ कॉपी पेस्ट करत होता. .. त्यावर ती "हां" इतकंच म्हणाली.. आणि मैत्रिणींबरोबर निघून गेली.. नाही म्हंटलं तरी इंद्रजीतनं आपलेच डायलॉग मारून दाद घ्यावी हे रुतलं होतं .. नेक्स्ट डेच !! लोकलला ती दिसली.
आज बोलायचंच !! अकुर्डीला उतरल्यावर तीच्यासाठी थांबलो. छातीत धडधडतंच होतं .. पण मनाचा पक्का हिय्या केला होता. थांबलो ! तीच्याबरोबर एक मैत्रिण होती ऑफकोर्स रिमोरा !!
मी हाय केलं ! त्यावर तीनं डोळ्यांनीच .. कोण ? म्हणून विचारलं ! हिंदी टाळत सरळ इंग्रजी वर आलो...
"Remember ? yesterday we spoke in da college ? About the SAREE ? remember ? "
"Oh ! ya ! I got it I got it !"
तीचं इंग्लिश माझ्यापेक्षाही फ्ल्युएंट आणि स्पष्ट होतं ! पण मी आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही.
" So ! How are you doing ?"
" 'm fine !! "
"May I know your name please ? "
" I'm Richa "
खल्लास !! तिच्या दिसण्यापेक्षाही मी तिच्या बोलण्यानेच प्रभावीत झालो Wink
मी आपसुकच "Me Tarzan" म्हणत शेकहँड साठी हात पुढे केला. तिनेही अगदी साहज शेकहँड केलं ! काय माहीत .. सर्र्कन अंगावर काटाच आला ! मी शहारलो ! तो हात सोडूच नये असं वाटत होतं Smile आपल्यात एवढी हिम्मत कुठून आली? ह्याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं ! मी तसाच हात पकडून होतो
"हॅलो..." -- तीने झटका देत म्हंटलं .. मी उगाचंच थोडं अपराध्यासारखं वाटल्यासारखं करत हात सोडला.
स्टेशन ते कॉलेज ह्या वाटेत मी तिची जनरल माहिती विचारून घेतली... ती ई&टीसी डिप्लोमा करत होती. दुसर्‍या वर्षाला होती. डिप्लोमा कॉलेज ह्या कँपसला शिफ्ट झाल्यामुळे ती इकडे. मधे मधे ती रिमोरा ला ही एंटरटेन करत होती. येतांना माझं ती सोडून कुठेही लक्ष नव्हतं ! पण वर्गात आल्यावर मात्र कळलं की सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं!! पोरांनी आल्याआल्या .. कल्ला केला .. टार्‍याआआआआआआआ .. एक जण केकाटला ! लेका काँग्रॅट्स .. पार्टी पाहिजे.. म्हंटलं, लेकानो ... "गांव अभी बसा भी नही .. और आ गये लुटौरे , कसली पार्टीबे ? "
"बास्स गा .. बास्स गा !! साल्या सगळ्यात भारी फटाका पटवलायेस " वाक्य तोडंत .. टोंणग्या ... आज कुठे बोललोय .. लगेच माझं बस्तान बसवून मोकळा ? बीसी... त्या दिवशी जो नाही तो येऊन माझ्याशी बोलत होता .. च्यायला .. माझी स्टार व्ह्याल्यूच वाढली होती.

आईस ब्रेक झाला होता. आता जास्त धास्ती वाटत नव्हती. पण ती उत्सुकता ते थ्रील .. काही वेगळंच.गेला आठवडा ती रोजंच भेटत होती. मधेच .. तीने एक दिवशी त्या रिमोरा ला जायला सांगितलं न .. मला किती आनंद झाला .. म्हंटलं टार्‍या .. भाड्या आज स्वत:लाच पार्टी दे... तुझी साडेसाती दुर झाली बघ ! ही हळूहळू चालायची ! सगळा लोंढा पुढे निघून जायचा न ती न मी मागे राहायचो ! दोन आठवड्यात मी एकदम स्टार झालो होतो. आमच्या गृपच्या बाहेरची पोरं पण येऊन हाय बाय करायला लागले. स्वतःहून बोलू लागले. एक दिवस तिला कँटीन ला घेऊन गेलो . आमचा गृप आलरेडी तिथेच होता. पण त्यांना एवढीशीही ओळख न दाखवता मी तीला कोपर्‍यातल्या टेबल वर घेऊन गेलो. एरव्ही पॅटिस साठी ही कधीतरीच पैसे काढणारा मी , तिच्यासाठी चिकू शेक काय , व्हेज सँडविच काय .. व्हेज बर्गर काय ? च्यायला ह्या उच्चभ्रु पदार्थांसाठी मी स्वतः खायचं असलं तरी पैसे खर्चं करेल असं वाटलं नव्हतं ! तब्बल ५५ रुपये म्हणजे आठवड्याचं नाष्ट्याचं बजट बोंबललं होतं ! पण ते पैसे पुर्ण वसूल वाटत होते. कारण पलिकडेच बसलेला "हलकटांचा समुदाय " इनो वर इनो पीत होता. त्यादिवशी मी स्वतःला एकदम "स्टड" "हंक" वगैरे बिरूदं लावून घेतली. कॉलेजात पोरगी बरोबर फिरलं की कशी कॉलर ताठ असते ब्यँडी..

एक दिवस मी तिला म्हणालो .. "Do you have some time ? may be an off lecture ?"
"Why is that for now , Don't kid me you want to draw my sketch " इंप्रेशन मारण्याच्या प्रयत्नांत मी तीला माझी चित्रकला दाखवली होती. त्यावर ती चांगलीच इंप्रेस झाली होती. आणि एकदा तिला स्केच काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
"Yeah ! I m in mood of kidding .. Are you free ? "
ती हो म्हंटल्याबरोबर उड्या मारतंच वर्गाकडे पळालो .. त्याघाईत गुढग्याला पिलरचा कोपरा लागला न गुढगा चांगलाच हर्ट झाला होता. लगडणे लपवण्याच्या नादात वर्गात आलो. दुपारी लंच ब्रेक नंतर रिडींग रूम मधे गेलो. ती समोर बसली. सरसर ड्रॉईंग करत होतो. ती मुद्दाम नखरे दाखवत कधी नाक मुरड कधी ओठांचा चंबू कर कधी अँगल चेंज कर . असली नाटकं करत होती. तिला म्हंटलं .. "Madam , will you please seat steady ? I don't use eraser, & it's last page! Please don't screw up !" लटकाच राग दाखवत मला तीने जीभ दाखवली ! या खुदा ! असंच .. अशीच ड्रॉ करायचं आहे .. ड्रॉईंग पुर्ण झालं !! अगदीच हुबेहुब ! ती खुष झाली ! हक्काने ते पान तीने फाडून घेतलं ! डोक्यावर एक टपली मारली .. आणि म्हणाली "I liked that " ...
"I loved that " म्हंटली असती तर काय बेंडबाजा आणला असता का लगेच ?

१४ फेब्रुवारी २००४ :
प्रत्येक होतकरू प्रेमवीराचा सर्वात आवडता दिवस. आज मी माझं लक्की शर्ट घातलं होतं .. कालंच कटिंग,शेव्ह वगैरे तयारी करून शक्य तितका स्मार्ट बनून लोकल पकडली !! पिंपरी स्टेशन वर ती दिसली. मी हात केल्यावर तिनंही हात केला, मी रोमांचित झालो. आकुर्डी स्टेशन आज जरा जास्तंच लांब वाटत होतं ! लोकल थांबण्याआधीच उडी मारली. तिला गाठले. ब्रिजच्या दुसर्‍या साईडने जाऊयात का ? रिमोरा ला म्हंटलो .. तु जा गं !! रिझल्ट लागला होता. २ सब्जेक्ट्स उडाले होते. एग्झाम फी चे १२०० रुपये खिशात होते. Smile म्हंटलं .. आज कॉलेजला नको जाऊयात !
ती म्हणाली "का ?" .. मनात म्हंटलं .. "नाऊ ऑर नेव्हर .." ..."आय ... लव्ह यू सो मच .. डू यू ? "
मला वाटलं जर हो असेल तर हो म्हणेल .. आणि नसलं तर रागाने निघून जाईन .. जास्तितजास्त काय ? कान लाल होतील. पण ह्यातलं काहीही झालं नाही .. ती त्यावर इतकं सहज हसली की .. तीला हे माहित होतं ! मी मुर्खासारखं पहातंच राहिलो.
"टारू , Look I like you , and you make me laugh a lot , you will get any girl you want ! you are a nice guy "तीच्या तोंडातून एक एक शब्द निघत होता.. आणि माझा पत्यांच्या बंगल्याचा एक एक पत्ता खाली पडत होता. ... मी म्हणालो "Any girl ? then why not u ?"
ती - " I'm engaged already ! I have a boyfriend!! Or else .. "
तीचं वाक्य तोडत म्हणालो .. इतके दिवस हे काय मग ? मी त्याला कधी पाहिला नाहीये .. तर कळलं की ते इयर डाऊन झालेत .. मी तिला "असो " म्हंटलो आणि त्यानंतर कधीच भेटलो वा बोललो नाही. दिसायची ... पण मी नजर नाही द्यायचो. एकदा तिनी ... कँट वी बी फ्रेंड्स अ‍ॅटलिस्ट ? म्हणून जखमेवरची धपली काढली. पण मी चक्क तीला इग्नोर करत निघून गेलो.

हे आमचे बाप्याच्या रूमवरचे दिवस होते. बाप्या न मी दोघेही दिवसरात्र "मेरे नैना .. सावन भादो.... "वगैरे टाईपची गाणी ऐकत घालवायचो. पीएल्स जवळ आल्या .. अभ्यातात डोकं खुपसलं .. सेमिस्टरही निघून गेली. त्यानंतर ती कधीच दिसली नाही. तिच्या वर्गातला एक जण माझ्या मित्राचा कझिन होता. त्याने अलिकडेच एक न्युज दिली की तिचं लग्न झालं , पण बॉयफ्रेंड बरोबर नाही !!


समाप्त

माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२

दहावीची परिक्षा झाल्यावर आमची बदली झाली. बाबांचं काम भोसरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीत असल्याने इकडे बदली झाली. सगळं काही कळायच्या आत बदलत होतं.
"आई .. मला नाही गं जायचं इथून .. बघ ना माझे सगळे मित्र इथे आहेत . ती इथेच आहे .. कसा गं येऊ मी ? मला नाही करमनार तिकडे !! नको ना जाऊया आपण कुठे!"
सगळा सामान टेंपोत भरला. माझी चित्रकलेची वही, त्यावर मी तिचं न् माझं काढलेलं चित्र मी उराशी घेऊन मागून सरसर जाणारं दृष्य पहात होतो. इकडे आता कधीच येणार नव्हतो. लांबूनच तिचं घर दिसलं ; डोळे पानवले , गळा भरून आला आणि मी हंबरडाच फोडला ! बाबांना वाटलं मित्र तुटल्याने मी रडतोय की काय ? ........
इकडच्या निमशहरी वातावरणात रुळायला वेळ लागला. तिकडे आम्हाला सकाळी लवकर उठून रहाटावरून पाणी आणायची सवय होती. आणि इकडे तर चोविस तास पाणी ? अंमळ मौज वाटली. पण तिकडच्या मोठ्या घराच्या तुलनेने हे घर अगदीच अंगावर येणारं होतं .. तिकडे तर मी घरात सायकल चालवायचो. भला मोठ्ठा हॉल होता. आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो ! इकडे काहीच नाही... ती सद्धा Sad
नकळत प्रत्येक बाबतीत मन तुलना करत होतं Smile
मी रिझल्ट आणायला गेलो तेंव्हा ती परत दिसेल ह्या आशेने! पण साला तिथे रिझल्ट घ्यायला तिचा राक्षस भाऊ हजर होता. मी आपला मुलांच्या घोळक्यात होतो. कोणत्याही रिझल्टला दोन प्रकारचे सिन्स हमखास पहायला भेटतात. पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा .. ह्या गॄपमधल्यांच्या प्रतिक्रिया एकदम टोकाच्या असतात. अनपेक्षित पास झाला तर आनंद गगनात मावत नाही,, अनपेक्षित नापास झाला तर रडू आवरत नाही. मी पहिल्या प्रकारातला ! बोर्डावर टॉप ५ विद्यार्थ्यांची नावं होती .. त्यात सर्वांत खाली "टारझन" लिहीलेलं दिसलं आणि सुखावलो. शिवज्या अनपेक्षित पणे पास झाला होता. ९वी पर्यंत गटांगळ्या खाल्लेला .. १०वीत एका दमात पास ! स्वारी खुष होती. मध्या मात्र इंग्रजीत आटकला होता. कोणाशीही काही न बोलता तो निघून गेला. वर्षा मराठीसकट ४ विषयांत नापास झाली होती. फक्त संस्कृत/हिंदी आणि इतिहास्/भुगोल क्लियर केला होता. पण तिला त्याचं सोयरसुतक नव्हतं .. अशीच फिदीफिदी हसत ती निघून गेली. "ती" मात्र आलीच नव्हती.
"फर्स्टक्लास मधे आली" एवढाच समाचार मिळाला.निराश होऊन घरी आलो.

इसवीसन २०००-२००१ :
आता ११वी अ‍ॅडमिशनचे वेध लागले होते. लोंढ्यात सर्वांत हुशार मुले सायन्स ला अ‍ॅडमिशन घेतात तशी मी ही घेऊन टाकली. ११वी चा पहिला दिवस अजुनही आठवतो. पावसाळ्याच्या दिवसांत ज्यु. कॉलेजातला पहिला दिवस. कॉलेजात जाणार म्हणून प्रचंड उत्साह ! तेंव्हा शाहिद कपूर असलेला एक कोणता तरी अल्बम रिलीज झाला होता "पहेला दिन है कॉलेज का .. डर लगता है " .. आता हे गाण किती ही बकवास असलं तरी ते त्यावेळी लै भारी वाटून गेलं! मी तर खेड्यातुन आलेल्या घाटी होतो एकदम. बाकी पोरं - पोरी एकदम मॉडर्न वाटणारे कपडे घालून आले होते. मी मात्र आमच्या "त्रिमुर्ती टेलर्स" ने शिवलेला फेंट पिवळा शर्ट आणि निळी पँट घालून बुजगावण्या सारखा वाटत होतो. प्रचंड काँप्लेक्स आला होता. वर्गात सगळे नविनच पोरं पाहुन भेदरलो होतो. पोरी तर काय जिन्स - टिशर्ट वाल्या !! आईईईल्ला ! मी नुसता आ वासून पहात होतो. इकडे पाहु की तिकडे ? असं झालं होतं. माझ्या क्लास मधे माझ्या पेक्षा ही उंच पोरं होती .. काही बुटलर होती .. काही स्मार्ट होती.. काही तर माझ्यापेक्षा १० पट रदाळही होती. ज्यु.कॉलेजला शाळा अटॅच असल्याने पुष्कळ मुलं इथलीच होती, पण माझ्या सारखे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ही बरेच नग होते. ह्या सगळ्या नविन वातावरणात मी बावरलो होतो पण असं होणारा मी एकटाच नव्हतो.
पहिल्याच दिवशी तीचं असं दर्शन होऊन मी असा तीच्या प्रेमात पडेल असं वाटलंच नव्हतं ! बर्‍याच पोरी सुंदर वाटल्या तरी कोणाकडे आकर्षित वगैरे झालो नव्हतो. तीनं मस्त आकाशी कलरचा पंजाबी घातला होता. तीच्या गोर्‍यापान त्वचेवर तो सुटही करत होता. लांबसरळ नाक , मंद डोळे आणि गालावर पडणारी खळी पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला नाही तर नवलंच.. तिचे दात तर अगदी पांढरेशुभ्र आणि एकसरळ होते.. इतके छान की पेप्सोडेंटच्या जाहिरातीत सहज काम मिळावं ! केस अगदीच लांब नसले तरी शॉर्ट ही नव्हते. त्यात तीचं ते चालताना माने ला झटका दिला की तालात केसांचं उजवी-डावीकडे उडनं अगदीच मनमोहक होतं! त्या दिवशी वर्गात एंट्री करताना ती मला धडकलीच! मागे पहात पुढे चालली होती आणि माझं लक्षं घड्याळात होतं ! नजरानजर झाली. ती स्वत:हूनच हसली. आणि मी एकदम बाजुला होऊन निर्विकार पणे सॉरी बोललो. पुन्हा अशीच नजरानजर व्हायची ! ती हलकेच हसून पुढे निघून जायची. पण थेट जाऊन बोलण्यात आम्ही अजुनही यथातथाच होतो. माझा आणि तिचा बेंच बरोबर लाईनीत होता. थोडी मान मागे वळवली की तिचा हसरा आणि टवटवीत चेहरा दिसत असे. तीच्या लांब नाकामुळे तिला पोरांनी "राघू" (पोपटाच्या चोचे सारखं नाक आहे म्हणून) चिडवायला सुरूवात केली होती. अर्थात मला त्या पोरांचा फार राग येत असे.
नविन वातावरणात सगळंच मागे पडलं ! इथे पुर्ण सेट झालो. माझी ष्टोरी अजुन नजरा-नजर करण्यापलिकडे काही जातंच नव्हती. काही दिवसांत तिच्या बरोबर एक काळपट (माझ्या पेक्षाही काळी हो) पोरगी तीची मैत्रिण झाली. त्या दोघी बरोबर राहू लागल्या ! ( ज्युनियर कॉलेज काय नी शाळा काय , एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते , ती म्हणजे एखाद्या चिकण्या पोरीबरोबर एखादी सर्वसामान्य जिच्यात कोण्णीही इंटरेस्टेड नसतो , अशी पोरगी चिकटलेली असते. ते शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा चिटकून राहात असतो .. तसा ! मी काढलेलं अनुमान असं की , चिकण्या दिसणार्‍या मुलींना आपल्या बरोबर एक सामान्य पोरगी असल्याने तुलनेत जास्त भाव भेटतो म्हणून तिच्याशी त्या सलगी करत असाव्यात. आणि सर्वसामान्य पोरीला एकटं राहिलं तर कोण कुत्रं ही भाव देणार नाही म्हणून ती चिकण्या पोरीबरोबर राहून खोटा खोटा का होईना भाव खाऊन घेत असते. असो) ! एक नंबरची थर्ड क्लास पोरगी ! त्यावेळी आम्ही "शक्तिमान" ह्या सिरियल चे फार मोठे फॅन होतो. त्यात एक
"शैतानी बिल्ली" नावाचं कॅरेक्टर होतं ! लागलीच हीचं नामकरन करून टाकलं! "शैतानी बिल्ली" म्हणून तिला प्रसिद्ध करायला काही कष्ट करावे लागलेच नाहीत. राघू आणि शैतानी बिल्लीची एकदम घट्ट मैत्री होती. शैतानी बिल्लीच फक्त एक काम असावं ! मी राघू कडे चोरून वगैरे पाहिलं .. की तीला रिपोर्ट करने .. Smile
अनलाईक आमची शाळा, इथे ज्यु.कॉलेजात माझ्यासारखी(/पेक्षा) दंगा करणारी पोरं फार होती. आमच्या कॉलेजाची ट्रिप काढायचं ठरलं होतं .. पाषाण जवळ कुठेसं कसलं वैज्ञानिक संमेलन भरलं होतं तिथे घेऊन जाणार होते. "प्रकाश जगताप" उर्फ "पक्या" हा महा कार्टून प्राणी माझ्या मागच्याच बेंच वर बसत असे. साला .. हा सुद्धा राघू वर लाईन मारत असे .. म्हणून माझ्या तो डोक्यात जायचा. तर झगडे सरांनी ट्रिप साठी नावं लिहायला सुरूवात केली. पक्या बोंबलला .. "सर.. मी येणार नाही !!" .. सगळीकडेच शांतता झाली ! झगडे सर म्हणारे " येस .. जगताप ? का येणार नाहीयेस ?" झगडे सर असले की वर्गात पिन ड्रॉप सायलेंस असे. पक्या बोलला ..." सर .. अडचण आहे ...." बोलून पुर्ण होत नाही तेवढ्यात मला एकदम मोठ्याने हसू आलं ! पक्या काय बोलून गेला हे पोरांना दुसर्‍या सेकंदाला कळालं ! एकंच मोठी हास्याची लाट पोरांच्या साईडने तयार झाली ! तिसर्‍या सेकंदाला पोरींनाही कळलं ! वर्गात हसण्याचा अगदी "रेझोनंस" तयार झाला ! नेहमीच खडूस दिसणार्‍या झगडे सरांनाही हसू फुटलं ! राघू अगदी मनमोकळं हसायची ! माझ्या प्रतिक्रियांना तीचा खाली +१, आणि हास्यपताका ठरलेलीच असायची. आजही ती इतकं मोकळ्ं हसत होती की पुर्ण वर्ग तसाच हसत रहावा.. न मी तीचं जाऊन एक चुंबण घ्यावं असं मनात आलं ! पण हे सगळंच मनात.. झगडे सरांनी "सायलेंस प्लिज !!" म्हंटल्यावर वर्ग क्षणभर शांत झाला ! पण पुन्हा एकसाथ सगळे हसले ! सरंही हसले! तो दिवस पुर्ण पणे हसण्यातंच गेला ! पुर्ण ११वी-१२वी पक्याला पोरं येता जाता विचारायचे .. "काय पका.. आज अडचण आहे का?" पक्या आपला ओशाळून जायचा ! माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या धाग्याचा खरडफळा झाल्या सारखा आनंद मला होत असे. Smile ती सहलीला येणार, पण साला ती शैतानी बिल्ली काय तिला एकटं सोडत नाही. आणि राघू कडे पाहिलं की ही माझ्याकडे अशी नजरेला नजर भिडवूनच पहात असे. ते मला फार अनकंफर्टेबल वाटायचं ! साला का ही आपल्याच राशीला आलीये ? म्हणून मी शैतानी बिल्लीला जाम शिव्या घालायचो ! सहलीच्या दिवशी मी एकदम रेक्सोना डिओड्रंट वगैरे मारून हजर होतो. तीने ब्लॅक पंजाबी घातला होता. ती इतकीही मोहक दिसू शकते ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.. कानात नव्या इयर रिंग्ज , मोकळे सोडलेले केस .. आणि नेहमी प्रमाणे ते इकडून तिकडे झुलवत ती जेंव्हा आली तेंव्हा एखाद्या हिरॉइनने एंट्री मारावी असा भास झाला. मी आ वासून नुसताच पहात होतो. माझ्यात कुठून बळ आलं .. आणि मी तिला डायरेक्ट जाऊन म्हणालो .. "ओह्ह!! तू ज्याम सुंदर दिसते आहेस आज !!" त्यावर तीने नुसत्याच भुवया हालवल्या... माझ्या मागून कुठून ती शैतानी बिल्ली आली आणि तीला घेऊन गेली ! मी बिल्लीचा पुन्हा एकदा मनभरून उद्धार केला ! विज्ञान प्रदर्शन पहाताना तीही डोळे वाकडे करून माझ्याकडे पहात्ये असं मला जाणवत होतं ! मग च्यायला मी का मागे राहिलोय ? "लढ बापू" म्हणून तिच्याकडे जायचो .. आणि ती बिल्ली समोरून अशी रोखून बघे की माझी हिम्मत निम्म्यापर्यंत खल्लास होत असे. न मी टर्न मारून दुसरीकडेच निघून जायचो. त्या दोघी मागे फिदीफिदी हसल्याचं मला कळायचंही ! पण काय करू शकत होतो मी?
हा हा म्हणता ११वी संपली .. आणि १२वी साठीचे एक्स्ट्रा लेक्चर्स सुरू झाले. रुपाली आमच्याच क्लास मधली. ह्याच शाळेतून कॉलेजात आलेली असल्यानं तीची सगळ्या मास्तरांशी चांगलीच ओळख होती. पोरं म्हणायची ,शाळेत अगदीच शेंबडी होती रे .. आता अचानक फॉर्म ला आलीये Smile आता फॉर्म ला येण्याचं काही वेगळं कारण सांगने जरूरी आहे का ? रुपाली जो पाहीन त्याला लाईन देत असे. आणि एवढी आव्हानात्मक पोरगी आपल्याला लाईन देते म्हंटल्यावर पोरं बाकी जाम खुश होत. टवाळ पोरी ती लंच ब्रेक मधे पाणी प्यायला टँक कडे जायला लागली की जिन्यातून "ए ...एएएए.. आली फॉर्म ला .. आली फॉर्म ला ! " असल्या कमेंट पास करत .. मला तीच्यासाठी फार वाईट वाटायचं ! पण च्यायला .. ही तर एकदमंच खुश व्हायची ! मला जाम आश्चर्य वाटायचं ! तर एकदा असंच कॉलेज संपल्यावर पोरांनी मला चढवायला सुरूवात केली. रुपाली आमच्या थोडी पुढेच चालली होती. पक्या म्हणाला .. तू तिला आवाज टाक .. उद्या तुला २ वडापाव देतो. (११वी-१२वी ला वडापाव ही आमची करंसी होती. आपल्या व्यवहारात जसा डॉलरला भाव असतो आणि तो कुठेही एक्सचेंज करून भेटतो तसं त्यावेळी वडापाव होता.) माझ्यात कुठून डेयरिंग आलं कुणास ठाउक.. मी जोर्रात आवाज टाकला .. "ए रूप्पाआआ .........!!" रुपा गिरकी घेऊन मागे पहाणार .. इतक्यात सगळी पोरं माझ्या पासून लांब .. एकटा पक्या मी , आब्या अन बोरक्या.. चौघेच सापडलो. दुसर्‍या दिवशी सकाळी वर्गात थोडा लेटंच पोचलो. झगडे सर आणि रुपाली काहीतरी बोलत होते. काळजात धस्स्स झालं ! मला चढवून देणार्‍यांमधे पक्या आणि आब्याच होते. सरांनी बाप्याला छडी आणायला सांगितली ! हा मुर्ख त्याऐवजी कसलासा मोठा लाकडी स्केवर बार घेऊन आला. ते सरांचा हातात अगदी गदा दिल्यासारखं दिसत होतं .. मला हसू आवरलं नाही .. न हे सरांच्या तावडीतून काही सुटलं नाही. "चला २६ नंबर मधे !' -सर ( २६ नंबर म्हणजे बायो लॅब , इथे डांबीस पोरांना नेऊन छान बडवण्यात येत असे अशी दंतकथा प्रचलीत होती) २६ नंबर म्हंटल्याबरोबर आमची तंतरली .. पक्या म्हणाला ... "सर मी काय नाय केलं ओ.. ह्या टार्‍यानेच आवाज टाकला होता.. विचारा .. रुपाला विचारा " पक्या ज्या टोन मधे बोलला त्यावर पुर्ण वर्ग हसला ! मी आपला निलाजर्‍या सारखा वर गेलो .. कसलं ही अर्ग्युमेंट केलं नाही. जेवढा मार भेटला तेवढा गुपचूप खाल्ला. बोरक्या ने विनाकारन मार खाल्ला होता. त्यामुळे बोरक्या मला पुढचा महिनाभर रोज शिव्या घालायचा. सगळे स्वतःला डिफेंड करत होते. पण सरांना २६ नंबरची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमची कणिक तिंबवणे जरूरीच होतं !
असो .. तर ह्या प्रकरणात माझं नाव आल्याने मी काही काळ राघू शी नजरानजरही टाळू लागलो.
पुन्हा सगळं नॉर्मल झालं ! माझा एक वर्गमित्र होता. तो न मी येतांना बर्‍याचदा बरोबर असायचो. गरब्याच्या वेळेस मी राघू च्या घराजवळ दांडिया पहायला जायचो. ती असायची! राघू फारंच सुंदर दांडिया खेळायची ! मी तिच्यासाठी गरब्याला येतो हे तिला न कळण्याइतकी ती मुर्ख नक्कीच नव्हती ! सुंदरसं स्मित देऊन मी जणू माझं स्वागत करायची ! ह्या सगळ्या मला विनाकारण पॉझिटिव्ह साईन्स वाटत होत्या! कॉलेज ३ किलोमिटर लांब होतं ! परताना आम्ही सगळे गृप- गृपने यायचो.
त्या दिवशी राघू आणि शैतानी बिल्लीचं काही तरी शिजत होतं .. दोघी माझ्याकडे पाहून काहीतरी हसत होत्या. मला काहीच उलगडा होत नव्हता ! पण मला तिच्याकडे एक गुलाबी कार्ड दिसलं होतं ! मी उगाच काहीतरी वेगळं असेल म्हणून इग्नोर केलं. त्या दिवशी कॉलेजातून परत येत होतो.राघू आणि शैतानी बिल्ली पुढेच होत्या. मी आणि तो एका अरुंद वाटेतून चाललो होतो. अचानक शैतानी बिल्ली थांबली. माझ्या रोखाने ती चालत आली. मला अगदीच कससं झालं ! मी घाबरलो होतो. तेवढ्यात तिनी माझ्या हातात एक पाकिट टेकवलं !! आणि म्हणाली , "हे त्याच्या साठी आहे .. तीने दिलंय !" कानाखाली प्रचंड जाळ निघाल्या सारखं झालं !! झांझेचे कर्णकर्कश्य सुरू ऐकू येत आहेत असं वाटलं ! डो़यासमोर क्षणभर अंधारी आली. तोंडातून शब्दंच फूटेना.. मला काही सुधरत नव्हतं ! मी फक्त एखाद्या रोबॉट ने आज्ञा पाळावी तसं ते पाकिट घेतलं ! त्या ने ते उघडलं , मला जे अपेक्षित ते तेच होतं ! तिने स्वत: ... हो .. तिने स्वतः त्या ला प्रपोज केलं होतं ! जिला मी इतके दिवस साधी-सरळ पोरगी समजत होतो.. तीने स्वत:हून दुसर्‍याच कोणाला प्रपोज करावं ... हे फारंच क्लेशदायक होतं ! डोळे ओलावले नसले तरी रडू मात्र येत होतं ! त्याला बहुतेक ह्याची कल्पना असावी ! त्याने ते लेटर घेऊन त्याचं एक चुंबन घेऊन तिच्याकडे हात केला. मी विखुरला गेलो होतो. आत कोणीतरी फटाक्यांनी माळ लावली होती काय ? माझी कानशीलं प्रचंड तापली होती. सगळं घडायला एक मिनीट ही लागला नव्हता ! पण माझ्या डोळ्यांसमोरून पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत .. सगळं एकामागून एक धावत गेलं ! मी बधीर सारखा उभाच होतो.
एका क्षणात प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. मला तिचं नाव काढलं तरी प्रचंड राग येत असे. आठवडा गेला .. मी ना तिच्याकडे पहायचो .. ना त्याच्याशी बोलायचो. जागा ही बदलून घेतली होती. सगळीच पोरं माझ्यावर हसायची . मला "दिलजले" हे नाव मिळालं होतं ... वर्गातलं छटाक पोरगं पण येऊन चिडवून जायचं .. मी दु:खी झालो होतो.
आणि एक दिवस,आमच्या बॅचचं फिजिक्स चं प्रॅक्टिकल चालू होतं !! लॅबच्या बाहेरून शैतानी बील्लीने मला आवाज दिला .. मागे राघू उभी होतीच. पुन्हा हातात काही तरी होतं ! माझा स्वाभिमान अचानक जागा झाला होता. जाऊन काही तरी बोलूच म्हंटलं ! सगळी पोरं खिडकी पाशी जमा झाली ! बिल्ली म्हणाली तीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी शहारलो. मला वाटलं तीला पश्चाताप झाला असेन.' चल तुला माफ केलं ' असं मनाशीच म्हणत तीच्याकडे गेलो. ती हसली ! हात पुढे कर म्हणाली ... मी हात पुढे केला. तीने तो बॉक्स ओपन केला .. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! लॅबमधून हसण्याचा मोठ्ठा आवाज आला .. प्रत्येक जण वेगवेगळ्या सुर-तालात हसत होता. कोणी तरी .. "एएएए दिलजले" ओरडला . मला मनात हिरण्यकश्यपुचा वध करणारा नरसिन्हाचा अवतार आठवला ! घ्यावी हीला आणि त्या बिल्ली ला आणि दोघींचे कोथळेच बाहेर काढावेत ! मग त्या पोरांचे ..सगळीकडे रक्तंच रक्त !
भानावर आल्यावर ती राखी तोडून टाकली आणि माझी बॅग उचलून घरी निघून गेलो. कोणाशीही बोलणे टाळतंच होतो.
त्या दिवशी फ्रेंडशीप डे होता. शैतानी बिल्ली एकटीच होती. मी वर्गात गेलो.. बॅग ठेऊन बाहेर येत होतो. मुलांचा घोळका कॉरिडोर मधे उभा होता. शैतानी बिल्ली आली आणि मला हाक मारली ! माझ्या भुवया उंच झाल्या ! .. मी तिच्याकडे वळलो .. तिने कुठूनसा रेड रोझ काढला .. आणि मला दिला ! एक डोळा ही मारला ! माझ्या नसा पुन्हा टाईट झाल्या ... सगळे जण माझा तमाशा पुन्हा पहात होते. मी स्मित करतंच तो गुलाब घेतला ! पोरांकडे पाहून हलकाच हसलो ! मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला ! आणि तीला मोठ्याने म्हणालो ! ... "तुझ्या आवशीचा घो............." एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही !
पण त्या अरुंद गल्लीत झालेला माझा पोपट .. केवळ अविस्मरनीय !!!
(त्याला राघू च्या भावांनी आणि त्याच्या गॅंगने मिळून एच.एस.सी. च्या एका पेपरला भरपूर तुडवला .. शिवाचे पुर्ण कपडे मळालेले होते. डोळे काळे निळे झाले होते. त्यादिवशी मी म्हणालो .. "च्यायला ! वाचलो !!!" )

Tuesday, December 1, 2009

माझ्या प्रेमाचे तीन पोपट -1

णमस्कार्स लोक्स ,


पोपट पहिला


इसविसन १९९९ :
दहावीत होतो. तेंव्हा समज नावाचा प्रकार नसतो ! चार पोरं ज्या पोरीवर लाईन मारतात , उरलेला वर्ग तिच्यामागे मेंढरासारखा.. Smile म्हणजे फक्त नावाला बरंका ! कोणात साधी बोलायची देखील हिम्मत नसे Smile मपलं काही वेगळंच होतं .. नववी पर्यंत जिच्यावर साधी कोणाची नजरंही नव्हती .. ती अचानक दिल की धडकन वगैरे झाली. त्याला कारणंही तसंच होतं म्हणा .. माझा आणि तिचा बेंच एकदम शेजारी शेजारी आला होता. अचानक नजरानजर व्हायला सुरूवात झाली. आणि "कुछ कुछ होता है" चं फिलींग यायला सुरूवात झाली. रोज शाळेत जायची ओढ लागलेली असायची. निघताना "हत्त .. उगाच सुटली राव शाळा" असं वाटे. तिच्याशी नजर भिडे ती अर्धा -एक सेकंदंच ... पण हे म्हणजे कॅमेर्‍याच्या फ्लॅश सारखा अंगातला करंट झटक्यात वाढवून जात असे. त्यानंतर हार्टबिट्स जरा जास्तंच वाढत. पोरांच्या चर्चांत नेहमी वेगळीच पोरगी असे .. न मी मात्र हिचाच विचार करायचो. विषेश म्हणजे पोरांच्या चर्चांमधे हिचा विषय आला देखील नव्हता .. आणि आम्ही आपले गुपचुप प्रेमात (नक्की प्रेम ?) गुरफटतंच चाललो होतो. तसा आमच्या वर्गात एक अलिखीत नियम होता. कोणत्याही पोरानं पोरीशी बोलायचं नाही. जो बोलेल त्याला "गद्दार" ठरवून त्यानंतर बरेच दिवस त्याचा "बकरा" करण्यात येत असे. मग प्रार्थना म्हणताना त्याच्या शर्ट ला मागुन शाई लावणे , माती टाकणे , जेवणाच्या सुट्टीत पाण्याच्या टाकीवर पोरं बसली की घोळक्यात घेऊन मागुन टपल्या मारणे .. पी.टी. च्या तासाला हटकून त्याच्यावर राज्य आणुन त्याला तंगवणे इत्यादी प्रकारची शिक्षा त्याला होत असे. मुळ कारण असायचं की हा साला तिच्याशी बोललाच कसा .. त्याच्यावर जळून हा कारभार व्हायचा. तेंव्हा इनो घ्यायलाही पोरांकडे पैसे नसायचे. Smile तर एकंदरीत अशा वातावरणात हमार लाईफ्वा मे प्यारवा का पेहला फुलवा खिल रहा था. समोरूनही रिस्पॉन्स भेटे. सुरूवातीला जे तोंड वाकडं व्ह्यायचं त्यावर आता थोडी शरमेची लाली दिसून नजर खाली जाऊ लागली ( शाळेत असतांना माझं एक निरिक्षण होतं .. ह्या पोरींची तोंडं म्हणजे असा ओठांचा जंबु करून इकडे तिकडे करून निषेध नोंदवणं (की अजुन काही?) जरा जास्तंच असे. एखादी शेंबडी पोरगी पण च्यायला आम्हाला पाहून असा चंबु इकडे तिकडे करून जायची... असो .. ज्याचं त्याचं तोंड ..त्याचं काय करावं त्याचा प्रश्न ) अ‍ॅक्चुअली मिसळपाव वर आम्ही जे गुण उधळतो ते आधीपासूनच शाळेतही उधळायचो . मास्तरांना नावं ठेवणे , नकला करणे कमेंट्स पास करणे ह्यात आमच्या आजुबाजुलाही कोणी नव्हतं ! कोपर्‍यात हशा पिकला की मास्तर विदाऊट इन्क्वायरी येऊन मला बदडत असे. आणि मास्तरनं पाठ वळवली की मी पुन्हा फिदीफिदी हसत असे. मास्तर बर्‍याचदा बाहेर उभा करायचा .. आणि बर्‍याचदा म्हणायचा "तुला वरच्या वर्गात जायचंय की इथंच रहायचंय ?" मी म्हंटलो की "मी तर वरच्या वर्गात जाण्यासाठीच अभ्यास करतोय Smile तुम्हाला नापास करायचं असलं तर करून दाखवा Smile " त्यावर मास्तर म्हणायचा ... "बस बाबा इथंच...! आणि वाट मिर्‍या माझ्या वर्गात.. "
असो ,सुंदर सुकन्येवरून विषय कसा त्या मळकट आणि मारकुट्या मास्तरवर वळला ना? ह्या अवांतरपणाचं काहीतरी केलं पाहिजे बुवा Smile

हं तर शाळेच्या गणपतीचं आयोजन दहावीचा वर्ग करत असे. त्यात मी पी.टी. मास्तरशी गोडगोड बोलून मुर्ती आणन्याचं टास्क मिळवलं Smile मग मुर्ती आणताना उगाचंच छाती भरून आली होती. ती माझ्याकडे बघत होती आणि माझं लक्ष केवळ तिच्याकडे होतं ... गणपतीच्या मुर्ती समोर रांगोळी काढण्याची जबाबदारी आमच्या वर्गातल्या मुलींकडे होती ! मी फटकन रांगोळीच्या पिशव्या घेऊन तिच्याकडे गेलो .. रांगोळी दिला देऊन म्हणाला "सुंदर रांगोळी काढ हो !" (ती रांगोळी देताना हलकाच तिच्या मऊ हाताचा स्पर्ष झाला ! आहाहा ! दिव्य अनुभवलं.) त्यावर ती "हो" म्हणाली आणि लाजुन पळून गेली. आणि मी उगाच भाव खात होतो Smile गणपती विसर्जना नंतर शाळेत पुर्ण बॅचचा फोटो काढण्याची पद्धत होती. ह्यात गेल्या वर्षीच्या बॅच ने अगदी आपल्या आवडीच्या मुली/मुलांसोबत शेप्रेट फोटो काढले होते. त्यामुळे मी ह्या दिवसाची फार अतुरतेने वाट पहात होतो. आणि त्याच दिवशी आई मला मावशीकडे घेऊन गेली होती. मावशीकडे विसर्जनाला उशीर झाल्याने मला शाळेत यायला उशीर झाला ..

(आमच्या क्लासचा शेक्रेटी होता शिवाजी होले उर्फ शिवज्या.. वर्गातला सगळ्यात थोराड पोरगा. बर्‍याचदा नापास होऊन आमच्या वर्गात आला होता. ह्याच्या नाकाचा पॉईंट लै मोठा असल्यामुळे मी त्याला दहावीच्या सुरूवातीलाच "शेंगदाण्या" हे नाव बहाल केले होते. आता त्याला कोणी शिवज्याम्हणून ओळखतंच नव्हते.. सगळेच "शेंगदाण्या" म्हणून हाक मारत. ह्या नावाच्या बदल्यात त्याने मला दोन तीन वेळा चांगलाच तिंबवला होता. पण अशाने ऐकेल तो मी कुठला ? तर हा शेंगदाण्या .. वर्गातली बॅकबेंचर वर्षा वर लाईन मारायचा. हा ही मठ्ठ आणि ती ही मठ्ठ .. पण वर्षा एकदम सुबक ठेंगणी... बुटली असली तरी सुंदर होती. ती ह्या शेंगदाण्याला काय भिक घालेन ? म्हणून आम्ही उगाच शेंगदाण्याची थट्टा करायचो. पण शेंगदाण्याची ही आवडती मुलगी होती. शेंगदाण्याचा ह्या वर्षावर फार जीव.)

फोटो काढण्याच्या दिवशी शेंगदाण्या स्वतःचा कॅमेरा घेऊन आला. मस्त डेयरिंग दाखवून वर्षाबरोबर एक आख्खा रोल रिकामा केला. दुसर्‍या रोल मधे बाकी पोरांनी आपापल्या आवडीच्या पोरींबरोबर फोटो काढून घेतले.ज्याची सोबत फोटो काढन्याची डेरिंग झाली नाही त्याने तिचा सोलो फोटो क्लिक करून घेतला. तोवर इकडे ह्यांचा फोटोसेशनचा कार्यक्रम उरकला होता. घरी येऊन आईवर प्रचंड चिडचिड केली. ती मात्र ह्या सगळ्यांमधून आलिप्त होती. कदाचित माझी वाट पहात होती. असं मला माझा जिगरी मित्र मध्या म्हणाला. त्याने अजुन काही माल मसाला लावूनही सांगितलं ! फक्त मध्याला मी हे प्रकरण सांगितलं होतं. असो .. पण यह गेम जास्त दिवसोंतक चुपचाप चल न सका .. पोरांना कुनकुन लागल्यावर मला चिडवायला सुरूवात झाली. तिचा भाऊ पैलवान होता.आणि वयाने बराच मोठाही होता. मला त्याची जाम भिती वाटायची. तो शाळेत आला की मला बडवायलाच आला की काय ? असंच वाटायचं ! आणि पोरंही जाम घाबरवून सोडायची ! थोडक्यात माझी फाटत असे. पुर्ण दहावी भर एकाच मुलीवर एकनिष्ठ पहिलं-वहिलं प्रेम केलं हो .. थोडी हिंम्मत असती तर आज चित्र वेगळंच असतं ..पण तिच्या भावाचा चेहरा समोर आला की मी आपला विचार सोडून द्यायचो. आणि जिथे केवळ बोलणे गुन्हा होता तिथे प्रपोज करण्याची काय बिशाद ?

पोरींशी बोलायची अजुन एक क्लुप्ती होती. शाळेत येतांना ओढ्याकाठी काही चिंचांची झाडं होती. मस्त गाभुळलेल्या चिंचा वर्गात आणल्या की लंच ब्रेक मधे पोरीसमोर अशा दाखवून दाखवून खायच्या .. एखादी तरी चिंचा मागायला येणारंच. एक दिवस मी चिंचा घेऊन आलो. ती लास्ट बेंच वर डब्बा खात होती. मी मुद्दाम तिकडे जाऊन चिंचा दाखवून दाखवून खायला लागलो. तर तिने बॅग मधून एक थैली काढली .. त्यात माझ्याकडच्या चिंचांपेक्षा भारी चिंचा होत्या .. त्या तीने सगळ्यां पोरींना वाटल्या. नव्हे .. वर भाजके चिंचोकीही आणले होते. मी आपला कडूमडू तोंड करत बाहेर निघून गेलो.

आमच्या अंगात अजुन एक किडा होता. तो म्हणजे बोर्ड वर मास्तर लोकांची कार्टून्स रंगवायचा ! ह्या मुळे भरपूर वेळा मास्तरांचा मार खाल्ला होता. Smile पण आभ्यासात हुशार असल्याने कितीही मार्क्स कट करण्याचा प्रयत्न केला तरी रॅंक ५ च्या खाली उतरला नव्हता ! एक दिवस "दरेकर मास्तर " आणि "भादेकर म्यडम" ह्यांच सर्वांग सुंदर कार्टून काढलं होतं .. आता दरेकर मास्तरच्या डोक्याचर मोजून दोन केस .. मी तीन दाखवले (वर कमेंट करून "ताजा उगवलेला केस" असं ही लिहीलेलं होतं ) भादेकर म्याडम चे डोळे भुतासारखे . मग ते गालांपर्यंत लांबवले तर काय बिघडलं होतं? हे चित्र पुसण्याआधी घंटा झाली .. आणि मास्तर नेमके आत आले. पुसण्याचा चान्स भेटलाच नाही ! मास्तर येई पर्यंत वर्ग धो धो हसत होता. अर्थात ती ही कौतुकाने हसत होती Wink ती हसली की मला बरं वाटे. असो ! विषयांतर नको. हं तर दरेकर मास्तर नेमके वर्गात आले. सगळे आपल्या जागा घेऊन बसले. मी बेंच खाली लपून बसलो होतो. मास्तर ने हा प्रकार कोणाचा ? हे माहित असून देखील .. कोण एम.एफ. हुसेन आहे हा ? असा प्रश्ण विचारल्याबरोब्बर सगळी पोरं एकसाथ माझं नाव घेऊन मोकळी झाली. मास्तर माझ्या बेंच पाशी आले .. बाकावर उभा केला... न दे खाकी चड्डी वर वेताच्या छडी हे हाणलाय .. बसायचे वांधे झाले .. सारखा ह्या साईड वरून त्या साईड वर होत होतो. पोरं हसत होती. आमचा वर्गंच महा गद्दार होता. कोणालाही प्रोटेक्ट करायचा नाही. एकसूरात एखाद्याची खोडी समोर आणायचा. दुसर्‍या दिवशी मी पुन्हा कार्टून काढलं .. मास्तरच्या टकलावर पाच केस काढले .. आणि कमेंट दिली .." मास्तरच्या तिसर्‍या केसाचा रात्रीत करिश्मा ,, दोन केसं एका रात्रीत " .. आणि वर्गातून मास्तर येण्या आधीच पळून गेलो. वर्ग पुन्हा वेड्यासारखा हसत होत.. मी मात्र राना राना ने फिरत होतो. काही कारणाने त्या दिवशी दरेकर मास्तर आले नाहीत ... आणि जे होणार होतं ते टळलं !

दिवसांमागुन दिवस गेले एस.एस.सी ची परिक्षा आली. अभ्यासात सगळे बिझी असल्यानं ह्या गोष्टीकडे तसंही थोडं दुर्लक्षंच झालं... पण ती रोज नविन नविन झकपक कपडे घालून पेपर्स ला येत असे .. अन तो तिचा राक्षस भाउ.. तिला सोडवायला यायचा ! शेवटच्या दिवशी ... सगळ्यांनी पिक्चरला जायचा प्लान केला .. Smile मी हर्षित झालो होतो. आज हिला सांगुनंच टाकू .. पिक्चर संपल्यावर परततांना सगळे एकाच बस मधे होतो. Smile मनाचा हिय्या करून मी तिच्या शेजारची जागा मिळवली .. ती खिडकीतून बाहेर पहात होती . मधेच हलकासा स्पर्ष होत होता न मी डोळे मिटून घेत होतो. सांगायची हिंमतंच होत नव्हती! मी तिचं नाव घेतलं .. तीने उगाच मान वलवून माझ्याकडे पाहिलं .. आणि मी येडपट पणा केला " कसे गेले गं पेपर्स ? " तिला तो प्रश्न अपेक्षित नसावा( काही वेगळंच अपेक्षित असावं) .. "पेपर आले आणि गेले ..." तिने एवढं कुचकट बोलण्यामुळे माझी होती नव्हती सगळी हिम्मत गळून पडली. माझी ही पहिलीच वेळ आहे ना? मला संभाळून घेता येत नाही का ? हसून बोलली असती तर नापास होणार होती का ? मी मनातंच चिडचिड करत होतो. विचार करता करता मला ती खुणावतेय हे जाणवलं .. मी दचकून वर पाहिलं तर .............. ती म्हणाली "जरा साईड दे .. उतरायचंय " ... मी येडपटा सारखी साईड दिली .. आणि तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे पाहात बसलो . ३ वर्षांपुर्वी पुन्हा गावाला गेलो होतो. एका मित्राबरोबर मुद्दाम तिच्या घरी गेलो. तिचं अजुनही लग्न झालेलं नव्हतं ! ह्यावेळेस मनात कसलीच भिती नव्हती. पण एक उत्सुकता होती. ती समोर दिसली नी पुर्ण दहावीचं वर्षं सरसर डोळ्यांसमोरून गेलं ! तशीच ... गोरीपान .. नुकतीच अंघोळ घेऊन आली असावी. आज केस धुतले असावेत. शँपुचा सुगंध पसरला होता. मित्राला (अचानक) फोन आल्यामुळे तो निवांत बाहेर निघून गेला. तीच्या समोरच बसलो होतो. दहावी नंतर माझ्यात भरपूर बदल झाला होता. माझ्या आधी तीच म्हणाली ... "ह्म्म्म गुड फिजीक .. काय करतोस ?" अचानक झालेल्या स्तुतीने मी माझं स्पिचंच विसरून गेलो... "मी ... मी कुठे काय ? .. आपला इंजिनियरींग " .... ती-"अर्रे वा !! छानंच की .. पण अजुनही तसाच बावळट आहेस " एका क्षणात आकाशातनं दान्नकन जमिनीवर आदळलो .. पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्‍या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं.. ह्यावर ती पुन्हा हसली ! "नाही .. तू खरंच खुप बावळट आहे " .. अरेच्च्या पुन्हा ? च्यायला गल्लीतली गुरं सुद्धा मी रोडने चाललो तर सैरावैरा पळत रोड मोकळा करून देतात ... ही मला दोन दोन वेळेस चक्क बावळत म्हणते ? च्यायचा घो........... "सीमा ... you know .. I've always loved you.. & still I do.. I still dream about you !!" एका दमात सगळा कफ बाहेर पडला .. मोठा पॉस ... मघाशी हसणारी ती .. अचानक उचकी लागल्या सारखी दचकलीच .. बहुतेक हे तिला अपेक्षित होतं .. पण एका बावळटा कडून अचानक असं काही येणं .. ती थबकलीच !!
मलाही काही सुचत नव्हतं !! मी कंटिन्यू केलं ... " Yea ! Its true .. I feel good now ! " (इंग्रजी लै भारी भाषा आहे .. का कुणास ठाऊक .. मी मराठीत जे बोलू शकत नाही .. ते इंग्रजीत पटकन बोलून मोकळा होतो.)
टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं ! च्यामायला .. आत्ता अंघोळ करून टवटवीत दिसणारी .. आत्ता माझी बौद्धिक घेणारी.. अचानक पाणी ? मला उगाच गिल्टी गिल्टी वाटायला लागलं ! पुन्हा आपलं इंग्लिश .. "Look .. Don't cry .. I m sorry .. I just wanted to tell you what i couldnt say when I should have !! .. Please forgive me if I ..........."
इतकी वर्ष वाट पाहिली .. का नाही आलास ? तेंव्हाही बोलू शकला असतास ! किमान बस मधून उतरताना तरी मला थांबवायचंस ?"
मी म्हणालो .. "तू किती रागाने बोलली होतीस !"
ती - "तू प्रश्नंच तसा केला होतास ! "
मी - "मग काय असं बोलायचं ? एकतर मी किती हिम्मत करून बोललो होतो !"
ती - "पण दुसरा प्रश्न विचारायचास ना ? पिक्चर पाहून आलो होतो .. किमान त्याबद्दल तरी ? "
मी - " जाऊ देत आता .. मी तुझ्यासाठीच आलोय ! "
खाली मान घालून ती म्हणाली .. काल ह्याच टायमाला आला असतास तर ? काल संध्याकाळीच मला पाहून गेलेत. आणि तिकडून होकार आलाय ! चाकणच्या जमिनदाराचा पोरगा आहे . दहावी नापास .. पण घरच्यांनी पैशावालं खानदान पाहून जमवलंय ! आता मी नकार देऊ शकत नाही !...
मी गुपचूप गॉगल लावला .. बाहेर आलो .. मित्राला कल्पना असूनही मला ही गोष्ट बोलला नव्हता. त्याने कार स्टार्ट केली. मी शेवटची नजर तिच्याकडे टाकली. गॉगल मधूनही पाणी आलंच होतं ! तिला ते दिसलं नसतं तर आश्चर्यंच !
एक हुंदका घेत ती घरात निघून गेली ! मी आवंढा गिळला आणि कार मधे बसलो !

प्रेमाचे दोन पोपट बाकी आहेत .. पण आम्हाला लेखांची संख्या वाढवायची आहे म्हणून इथेच (क्रमशः करतो)