Thursday, December 23, 2010

आला थंडीचा महिना

णमस्कार्स लोक्स ,
पार नोव्हेंबर उजाडला तरी ह्या वाह्यात पावसाने नुसता उच्छाद मांडला होता. दसर्‍याला पाउस ? हाईट म्हणजे दिवाळीतही पाऊस झाला. त्यामुळे बर्‍याच लोकांचे फटाके वाकस होऊन फुसके निघाले. त्याचा वचपा त्यांनी थोडा जास्त फराळ करुन मानवी फटाक्यांद्वारे काढला. ह्यामुळे वायुप्रदुशणास मदत झाली नसेल तर नवल .
अरे नोव्हेंबरात काय पाऊस पडायचा असतो का? प्रत्येक ऋतुला चार-चार महिने वाटुन दिलेले असताना असं एकाने दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करुन वातावरणिक अवांतरगिरी करणं मला खरोखर न रुचणारं वाटलं. त्यातही पावसाळा म्हणजे आमचा णावडता ऋतु ( काही विशेष प्रसंग सोडले तर ) किचकिच , चिकचिक , कपडे सुकत नाहीत , कोंदट वास येतो , न मी फेड अप झालेलो !
जुन मधे सुरु झालेला पाऊस साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निरोप घेतो , आणि त्याने तो घ्यावा अशी आमची इच्छा असते. कारण त्याणंतर जो ऋतु येतो तो आमच्या मनाला फार गुदगुल्या करणारा आणि अंगावर शहारे उभे करणारा असतो. ती गुलाबी थंडी अनुभवावी ती आमच्या पुण्यातंच. लखणौची थंडी मजे ऐवजी सजा असते. तर फॉरिन ची थंडी आम्ही अनुभवली नसल्याने त्यावर भाष्य नाही. आमच्या अफ्रिकेत फक्त ड्राय आणि वेट हे दोन च ऋतु असत तर वातावरण नेहमी थंडगार आणि पोषक असलं तरी त्यात पुण्यातल्या थंडीचा गोडवा नाही , असे आमचे वैयक्तिक मत आहे .
त्याला कारणही तसंच असावं , अवघं जिवन ( लगेच "जिवन" वगैरे वर गप्पा मारायला ह्याची काय पण्णाशी उलटलीये काय ? अशा फालतु कमेंटला आम्ही फाट्यावर मारतो ) पुण्यात गेलं. त्यातही बालपणी रहायचो ते एका खेडेगावात. तेंव्हा काय कॉलन्या आणि फ्लॅटचं लोण तिकडेतरी पसरलेलं नव्हतं. तुळस लावायला देखील ओढ्याकडेच जाणे ओघाने आलेच. मग ते सकाळी सकाळी पडलेलं दव , गवतावर जमा होत असे आणि मस्त गार गार गुदगुल्या करत असे ( कुठे ? असे प्रश्न विचारू नयेत ) सगळी कडे धुकं पसतलेलं असायचं. १० -१५ फर्लांगावरचंही काही दिसायचं नाही एवढं दाट धुकं हो ! हल्ली फक्त दिल्लीतंच पडतं ( हे काँग्रेसवाले काय काय हिरावणार आहेत अजुन आमच्याकडुन ? ) डबड्यात पाणी देखील थंडगार असायचे. एक दिव्य पार पडल्यावर दुसरं दिव्य पार पाडताना बोटं अगदी गारठुन जायची. पण खुप मज्जा यायची. घराजवळचा सगळा बालचमु जमुन बाभळीच्या शेंगा ,नारळाचे सोललेले सोलपटं , कागदं -कपटे , फेकलेले कापडं पासुन ते कोणत्यश्या टायर पासुन जे काही जळाऊ वाटेल ते भंगारवाल्या सारखं गोळा करुन आणुन आम्ही शेकोटी पेटवायचो . त्यावर हात धरताना जी गर्मी लागायची त्यातलं सुख हल्ली कुठे भेटत नाही , कुणास ठाऊक कुठे हरवलंय. बाबा घराच्या अंगणातंच बंब पेटवायचे. हो , तो आमचा खाणदाणी बंब . त्यासाठी लाकडं गोळा करायला परवाणगीने मस्त रानात उंडरायला भेटायचं. बंबातुन ते वाफाळतं गरम पाणी घेत, तिथेच भिंती नसलेल्या फक्त एक आडवा दगड ठेवुन तयार केलेल्या स्नानगृहात अंघोळ घ्यायची. त्यातही केवढा आनंद ? मधेच थंडी वाटावी आणि लगेच गरम गरम पाण्याचा तांब्या डोक्यावर उलटा करावा. आणि अंघोळ झाली की कुडकुडत दातांचा आवाज करत .. "ए$$$$$$$$$ आई$$$$$$$$ , टावेल दे$$$$$$$ " म्हणुन गावगर्जणा करावी. मग बराच वेळ ते कुडकुडनं चालुच असायचं. पॅराशुट हा एकंच ब्रांड माहिती होता. तो हिवाळ्यात गोठुन जायचा. मग तो बाटलीतुन निघत नाही म्हणुन बाटली उन्हात ठेवणे किंवा बंबाच्या पाण्यात बुडवुन ठेवणे इत्यादी न्युटनपेक्षाही मोठे शोध लावल्याच्या अविर्भावात नुस्तं केसांन्नाच नाही तर हातापायाला भरपुर तेल चोपडायचो. लाईफबॉय ह्या साबणात एकाच युज नंतर काळ्या माणसाला देखील पांढरा शुभ्र करण्याची क्षमता असुनही हे फेयर अँड लव्हली वाले का आपला कॉपीराईट घेऊन बसलेत असं कुतुहल त्या काळी वाटायचं. शनिवारी सकाळची लवकर शाळा असायची. शणिवार आम्हाला खास प्रिय होता कारण ११ वाजताच शाळा सुटली की गावभर उंडरायला मोकळे होत असु . मग आठवड्याच्या इतर दिवशी जशी प्रार्थणेच्या वेळी सावलीतली जागा मिळवण्यासाठी झटपट असायची ती शनिवारी उन्हातली जागा मिळवण्यासाठी व्हायची . कधी काळी एम्.सी.सी. (महाराष्ट्र कॅडेट्स कोर्स का काय ) चं काय तरी फॅड आलं होतं. सकाळी सकाळी आमचे पि.टी. मास्तर डकवॉक, मार्चिंग वगैरे काय काय प्रकार करायला लावतसे. चुक झाली की नायलॉन ची दोरी चप्प्प्प्कन अंगावर वळ उमटवत असे, थंडीत तो अचुन बोचायचा न बराच वेळ दुखायचा.
काळ बदलला , मोठे झालो कधी काळी इंजिनियरिंगला असतांना रात्र थोडी सोंगे फार असंत.परिक्षा जवळ आल्या की पी.एल. च्या काळात मित्राला बोलवुन भर हिवाळ्याच्या कुडकुडत्या रात्री टेरेस वर अभ्यासाचा घाट घातला जायचा. त्यासाठी मग तात्पुररा तंबु तयार करणे , शेकोटीची व्यवस्था करणे ( मग त्या शेकोटीत नुकत्याच संपलेल्या सबमिशनच्या फाईलींची होळी करणे) एकदा तर आमच्या टेरेस चा दरवाजा रिपेयर करण्यासाठी काढुन ठेवलेला , त्याच्या फळ्या वेगळ्या झालेल्या. तो बाद झालाय आणि एक नविन दरवाजा बसवला जाईल ह्या समजुती खाली आम्ही तो दरवाजा हळु हळु करुन आख्खा जाळुन टाकला होता ( नंतर काय झालं हे सांगायला नको ) . रात्री च्या थंडीत फक्त कपाळापासुन हनुवटीपर्यंत शरीर बाहेर ठेउन बाकी दुलई मधे गुंडाळुन अभ्यासाची नाट़कं केली. एम-१ एम-२ च्या तयारीला हातात हातमोजे घालुन गणितं सोडवली. हळुच शेजारच्या पोरी काय करतात हे चोरुन पाहिलं . परिक्षेला बाईक वर जाताना हात गोठले की ते गाडीच्या इंजिनाजवळ नेऊन उब घ्यायचो न असंच बरंच काही.
हल्ली शेकोटी करत नाही. गिझर वर तापलेल्या पाण्यात अंघोळ करतो . पांढरा करणारा लाईफबॉय पाहुनही वर्ष लोटली. पॅराशुट ची जागा हेयर जेल ने घेतली तर मॉइश्चरायझींग क्रिम्स वगैरेंचे लोण आले , उकललेल्या ओठांसाठी लिपकेयर आले.  जिवणशैली बदलली , राहिल्या त्या आठवणी .
ऋतु तर बाकी २ पण आहेत. पण आमचा लोभ फक्त हिवाळ्यावर. रडत खडत का होईना पुन्हा एकदा हिवाळा सुरु झालाय. लेख टंकताना बोटं कशी गारठलीत , वरचं सगळं डोळ्यांसमोर तरळुन गेलं तर !!
हॅपी हिवाळा दोस्तांनो !!