Saturday, August 23, 2014

भारतातली "चायनिस" खाद्यसंस्कृती

 मला आठवतं त्यानुसार जवळपास २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात 'चायनीस' खाद्यसंस्कृतीचा उदय झाला. या "चायनिस" खाद्यपदार्थांचा खरोखर चायना मध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांशी काडीचाही संबंध नाही हे आधीच नमूद करावे लागेल. असला तर तो फक्त "राईस" आणि "नुडल्स" चा .एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चायनीसच्या टपऱ्या लागायला सुरुवात झाली. एकीकडे म्याकडोनाल्ड डॉमिनोज पिझ्झा हट सारखे अमेरिकन युरोपियन मल्टीन्याशनल ब्रांडस् उच्चभ्रू संस्कृतीत पॉप्युलर होत असताना "चायनिस" ब्रांड मध्यमवर्ग आणि खालच्या वर्गात रुजत होता.
चायनिस ची गाडी टाकण्यासाठी काय लागते ?
१. एक टिपिकल डार्क लाल रंगाची ६x4 फुटाची टपरी.
२. त्यावर एक ड्रागन पेंट केलेला .(या ड्रागनचे वैशिष्ठ्य असे की एकवेळ दोन फिंगरप्रिंट्स म्याच होतील पण एका टपरीवरचा ड्रागन दुसऱ्या टपरीवरच्या ड्रागन शी कधीही म्याच होत नाही ) काही टपर्यांवर तर मगरी ,पाली सुसरी, डायनासोर, गॉडजीला , एनाकोंडा ही काढलेले मी पहिल्या आहेत.
३. एक चीनी दिसणारा नेपाळी/ मणिपुरी /ओरिसी/हिमाचलपरदेशी किंवा कुठलाही पूर्वेकडील कुक. असा कुक नसेल तर ते चायनिस चालत नाही असा अनुभव आहे.
४. नाव : हॉंगकॉंग , शांगाय , बीजिंग/बेजिंग , ब्ल्याक ड्रागन , सोल्टी. घुमुन फिरून १० प्रकारची नावच मी पहिली आहेत. आमच्या इथे एक चम्पा चायनिस पण होतं. पण ती फारच एक्सेप्शनल केस होती. नाव जर चायनीज नसेल तर चायनिस चा फील येत नाही .
५. २ मोठ्या कढया , एक लांब दांडा असलेली मेगा पळी भला मोठा ग्यास बर्नर एवढ्या सामुग्रीत कोणताही चायनिस पदार्थ बनतो
६. नीलकमल प्लास्टिक फर्निचर. या नीलकमलवाल्याचा बिजनेस वाढला तो चायनिस टपरीमुलेच .
६. ल्यामिनेट केलेलं मेनुकार्ड. हे जास्तीत जास्त १ पानाचे असते. मराठी आणि इंग्रजी ऑप्शन दिल्यास ते २ पानी होते. त्यातल्या मराठी आणि इंग्रजी स्पेलिंग घटकाभर मनोरंजन व्हावे म्हणून मुद्दाम तशा छापलेल्या असतात
हा सगळा हार्डवेयर सेटअप झाला की चायनिसची हातगाडी धंद्याला तयार असते. दुपारचे चार वाजले की कुठल्याही रोडसाईडला गाडी लावून द्यायची. चायनिसवर जे ट्रेनी किंवा नवीन रुजू होतात त्यांना कोबी कापायचे काम दिले जाते. धंद्याला सुरुवात होण्यापूर्वी ट्रेनी पोरगं पोतंभर कोबी कापून रेडी करतं. सिनियर चायनिस कुक दुसरीकडे चिकनचे पीस साफ करणे, लॉलीपॉपच्या कांड्या तयार करणे , नुडल्स आणि चिकन लाल रंगाच्या मसाल्यात डीपफ्राय करणे वगैरे कामं करत असतो. आणिक एक पोऱ्या प्लास्टिकचे टेबल आणि खुर्च्या लावत असतो. प्रत्येक टेबल वर तीन वाट्या असतात. यात टोमेटो-चिली -सोया सॉस असतो. डेली रुटीन सेम असते. पब्लिक यायला सुरुवात झाली की चायनिस कुक ग्यासचा जाळ मोठा करून त्यावर ती कढई ठेवतो. त्यात पाणी मारून एका छोट्या खराट्याने ती साफ करून कढई उलटी करतो. मग ऑर्डर असेल त्या प्रमाणे त्याच कढाई मध्ये पदार्थ बनवले जातात. एका हाताने ती कढाई आणि एका हाताने तो लांब दांड्याची मेगापळी यांना एकमेकांवर आपटत अल्मोस्ट सगळे पदार्थ तयार होतात.
आपल्याकडे चायनिस फार थोड्या काळात फार लवकर पॉप्युलर झालं. स्वस्त आणि कमी भांडवलात चालू कमाईचा बिजनेस म्हणून चायनिस टपरीचा उदय झाला. गावातल्या छोट्यामोठ्या भाई लोकांनी या उद्योगात भलताच इंटरेस्ट घेतल्याने गल्ली बोळात चायनिस खाद्यसंस्कृती पसरली. बेवड्या लोकांना विदाउट सर्विसचार्ज दारू पिण्याची सोय या निमित्ताने झाली. पोलीस लोक हप्तावसुलीच्या निमित्ताने येतात तेंव्हा जेवणाचीही फुकट ऑर्डर देतात त्यांच्यासाठी खास उरलेल्या खरकट्या अन्नातून एक "पोलीस राईस" बनवला जातो. जे बेवडे पिऊन टाईट असतात त्यांना चिकनच्या नावावर डाळीचे लॉलीपॉप खाऊ घातले जातात. हायजीन वगैरे गोष्टीची चिंता करू नये. चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राईड राईस , ट्रिपल राईस , लंग फंग सुप, मंचाव सूप , इत्यादी ऑर्डर द्यावी. मनसोक्त हाणावे.
मोठ्या हॉटेलांत पण चायनीज पदार्थ मिळतात. मेनल्यांड चायना सारखी ऑथेंटिक चायनीज रेस्तरा आपल्या कडे आहेत. पण मी जेंव्हा हॉंगकॉंग मध्ये गेलो आणि तिथले ओरिजिनल चायनीज पदार्थ पाहिले तेंव्हा मी चाट पडलो. आपल्या इथल्या चायनीस चा आणि ओरिजिनल चायनीजचा काहीही संबंध नाही . इव्हन लंगफंग सूप , मंचाव सूप , शेजवान राईस /नुडल्स असले कुठलेही पदार्थ मला तिकडे सापडले नाहीत . लॉलीपॉप नावाचा पदार्थ तिकडे अस्तित्वातच नाही. हॉंगकॉंगमध्ये त्याला चिकन विंग्स किंवा ड्रमस्टिक्स म्हणतात आणि ते बनवायची स्टाईल ही लॉलीपॉपच्या जवळपासही नाही.नाही म्हणायला सोया , विनेगर , चिली सॉस वगैरे वापरतात. नुडल्स आणि राईसही पूर्ण वेगळे असतात. आपल्याला ते चायनीज आवडणारही नाही.. त्याच हेतूने इंडियामेड फेक चायनीजची (ज्याला वर "चायनिस" म्हटले आहे.) निर्मिती झाली असावी .
कॉलेजात असताना चायनिसचा चस्का लागला होता. अल्मोस्ट रोज चिकन तोडायला मी चायनिसच्या टपरीवर पळायचो. बरेच दिवस लिहिणे मनात होते. हा नोस्तेल्जीया आहे.आता चायनिस तितकेसे रुचत नाही. टपरीवर खायला संकोच वाटतो. चायनिस चा बिजनेस आता आपल्याकडे सेट आहे .

No comments: