Saturday, August 23, 2014

लई भारी - एक लई भंगार अनुभव

लई भारी - एक लई भंगार अनुभव
एके दिवशी काय जाहाले ..
एके दिवशी काय जाहले ..
मी बसलो होतो टोरंट शोधात आणि लई भारी चा टोरंट सापडला
आणि माझ्याच हाताने माझ्या पायावर धोंडा पडला
असो, तर चित्रपटाचं संगीत महाराष्ट्राच्या ढोल-ताशाने (अजय अतुल) दिलेलं असल्यामुळे सुरुवातीपासून धात्ताड-तत्त्ताड वाजायला सुरुवात होते आणि पुढच्या दोन तास आता फक्त नाशिक ढोल ऐकायचा आहे अशी पाल चुकचुकते. फेटा घातलेले एक लोकल बडी असामी म्हणजे प्रतापसिंह निंबाळकर , आणि त्यांच्या सौ सुमित्रादेवी आपल्या कुलदैवताच्या मंदिराच्या रिनोवेशनसाठी एखादा नेता आपल्या समर्थकांना अभिवादन करावे तसे येत असतात. तोच , एक शमनछाप भटजी मध्ये शिंकतो, आणि या निपुत्रिक बाई ला मंदिरात प्रवेश नको म्हणून ढूस्की सोडतो. यावरून कळते की यांना मुल नाही. तोच त्याला कोणी "२ रुपयाचा भटजी" म्हणून जागा दाखवतो पण प्रतापसिंह हा निर्णय "रिवाज" म्हणून मान्य करतो. (आता मंदिराचा जीर्णोद्धार होण्या आधी हा रिवाज होता का ? या आधी मंदिरात वांझ बाई चालत नाही म्हणून माहित होतं तर एवढं शॉक होण्याचं कारण काय ? वगैरे मनाला पडू नयेत) ब्याक ग्राउंड ला अजय अतुल वाजत राहतो. हा प्रसंग झाल्यामुळे मासाहेब दुखी होतात , घरकाम करणाऱ्या बाई त्यांना वारी ला जाण्याचे सुचवतात. पण थोड्यावेळापूर्वी कसलीतरी फालतू रीत मानणारे प्रतापसिंह रागावतील म्हणून बाई मी कशी येऊ म्हणून प्रश्न उपस्थित करतात. त्यावर मोलकरीण मासाहेबांना "वाक" ला येण्याचे निमित्त करायला सांगतात. मा साहेब वारीत घुसतात. अजय अतुल वाजत असतो. थोड्यावेळाने पंढरपूरच्या पोचून विठोबा मंदिरात मासाहेब बच्चनस्टाईलमध्ये विठोबाला दोष देतात, दोष देऊन शांत झाल्या की पदरात मुल घालण्याची याचना करतात , त्या एवढ्या हतबल झालेल्या असतात की म्हणतात "मला फक्त एकदाच आई कर आणि पाहिलं मुल मी तुला अर्पण करीन". म्हणजे त्यांना पुत्र तसा नकोच असतो , फक्त तो वांझ वाला कलंक नको असतो. वारीवरून घरी आल्यावर मासाहेबांना तत्काळ कोरड्या उलट्या सुरु होतात. त्यावरून त्यांना कळते की आपल्याला मुल होणार आहे. प्रतापसिंह जाम खुश होतात. मोलकरीण मासाहेबांना आपल्या नवसाची आठवण करून देतात. मासाहेब हे प्रतापसिंहाला सांगतात. प्रतापसिंह संतापतात पण त्यांचा संताप सात्विक असतो. ते समजावतात की मुल नवसामुळे नाही तर डॉक्टरने ( की ज्योतिषी? ) संगीलेलं असतं की "तुम्हाला मुल लेट होणार" त्यामुळे झालेलं आहे. ते त्यांचा सगळा बिजनेस आणि गाव सोडून लंडनला निघून जातात. ( येथे उल्लेख करावा लागेल तो प्रतापसिंहाच्या घराचा. घर एकविसाव्या शतकातल्या लेटेस्ट डिजाईनचं असतं , पण त्यांची कार जुना काळ दाखवायचा म्हणून देवानंदच्या पिक्चर मधली असते )
मासाहेबांना जुळी मुलं होणार आहे हे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टरांना डीलेवरी होईपर्यंत कळत नाही. मुल झाल्यावर दुसऱ्याच एकामुलाची रवानगी पंढरपूरला होते. डॉक्टर कडून गोपनीयतेची शपथ घेऊन ही बातमी लपवली जाते. एक मुलगा ( प्रिन्स ) आपणच ठेवून घेतात आणि आपल्याला पुत्र झाला आहे हे मासाहेब लंडनला फोन करून कळवतात, प्रतापसिंह लगेच झालं गेलं विसरून परत येतात. अजय अतुल वाजत राहतो. मुल मोठं होतं. मधल्या काळात प्रतापसिंहाचा भाऊ आणि त्याचा मुलगा संग्राम साउथ स्टाईल आतंक माजवत असतात. मनाला येईल तेंव्हा हवे त्याला आडवे करत असतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असतात. प्रतापसिंह वैतागून यांना धडा शिकवायचा ठरवतो तेंव्हा काका-पुतण्या त्याला कायमचे आडवे करतात. परदेशातून शिकून आलेला प्रिन्स अगदीच झाम्या असतो. नाकावरची माशी उठत नसते. तो एका आयटमच्या प्रेमात पडतो. ती आयटम संग्रामने प्लेस केलेला सापळा असतो. प्रिन्सकडून ती सगळ्या जायदादच्या कागदावर सह्या घेते आणि मग संग्राम एका ट्रक ने प्रिन्स चा खेळ खल्लास करतो
आता मा साहेब एकट्याच असतात. संग्राम त्यांना बेइज्जत करून हाकलतो तेंव्हा त्या फारच डाऊन होतात. पंढरपूरला जातात. तिथे "तंटा नाय तर घंटा नाय" म्हणत घंट्यासाठी फायटिंग करणारा माउली उर्फ 'विठ्ठलाला अर्पण केलेला पुत्र' भेटतो.विठ्ठलाच्या पायाखाली वीट असते म्हणून माउलीने वीटभट्टी टाकलेली असते. दिवसा वीटभट्टी आणि रात्री हातभट्टी असा त्याचा रुटीन असतो . त्याला थोडे हेड्सअप देऊन या सुमित्रादेवी म्हणजे मासाहेब आहेत असे कळते. तो जाम शिव्या-शाप देऊन मदत करण्यास नकार देतो. पण मावलीची डाव त्याला विठ्ठल का वास्ता देके मदत करायला पाठवते . माउली लगेच इकडे येऊन संग्राम बरोबर ढिशुम ढिशुम करतो. अजय अतुल वाजतच असतो. एकदिवस हातभट्टी घेऊन घरी येताना माउलीला भाऊ ( म्हणजे भाई ( म्हणजे सल्लू) ) भेटतो . भाऊ पण हातभट्टी लावून टाईट असतो. या टाईट सिच्युएशन मध्ये दोघेही आपल्या एवन संवादफेकी ने डोक्यात वीट मारून घ्यायला भाग पाडतात. पुलं म्हणतात त्या प्रमाणे एखाद्या गोष्टीचा वीट येणे म्हणजे काय ते कळते. थोड्या वेळाने निंबाळकर घराण्याचे मीठ कललेला नोकर माउलीला पूर्ण केटी देतो. संग्रामच्या बारला आग लावणे , लोकांच्या जमिनीचे कागदपत्र अगदी पाकीट मारावे या शिताफीने माउली आपली कामं करत असतो. संग्रामने सुरुवातीला हाकलले तेंव्हा थुंकही चाटायची तयारी दाखवणाऱ्या मासाहेब माउलीच्या जीवावर "हे निंबाळकरांचे रक्त आहे ... शत्रूच्या रक्ताने टिळा लावतो पण तुझे रक्त लावून मी कपाळ खराब करणार नाही " म्हणत पंचतारांकित संवाद फेकतात. मागे अजय अतुल कंटिन्यू वाजतच असतो. मग क्लायम्याक्स मध्ये संग्राम-माउली तुंबळ युद्ध होते. संग्राम आणि त्याचा बा मरतो. मग माउलीला त्याच्या आई विषयी प्रेम वगैरे येते. मला लहानपणी चित्रपटात गाणी ही कोणाचे ब्ल्याडर फुल झाले असेल तर ब्रेक म्हणून असतात असे वाटे. लय भारी पाहताना याचा प्रत्यय येतो. थोडक्यात कोणत्यातरी टिपिकल साउथच्या सिनेमाची स्टोरी उचलेली आहे.
परीक्षण बरंच लेट आलंय , त्यामुळे थेटरात जाऊन कोणी पाहणार नाही , पण कुठे डाउनलोड करून किंवा फुकट टीव्हीवर पाहताना वेळ जाऊ नये म्हणून प्रपंच .

No comments: