Tuesday, August 18, 2015

बाबासाहेब, महाराज आणि मी


निवेदन : मुद्दे अत्यंत खाजगी , माझ्या स्वत:च्या अनुभवातून आणि माझ्या असेल नसेल तेवढ्या वाचनातून आलेले आहेत. याचा कोणत्याही विचारसरणीशी, जातीशी, पक्षाशी किंवा कशाशीही संबंध जोडू नये. माझ्या प्रमाणे तोकडे वाचन आणि सदर वादापासून लांब असणाऱ्या लोकांचेही काहीतरी माझ्या प्रमाणेच असावे या समजुतीतून ४ गोष्टी लिहाव्याश्या वाटल्या.
१. माझे वाचन जास्त नाही. शिवाजी महाराजांबद्दलही मी जास्त वाचलेले नाही. पण मराठी म्हटल्यावर आपसूकच "शिवाजी महाराज की जय"ची भावना आहे. ती तीव्रही आहे पण कट्टर ( कट्टर हिंदू कट्टर मुस्लीम इत्यादी कट्टर प्रमाणे ) नक्कीच नाही. साहजिकच आहे पुरंदरे मी कधीच वाचले नाहीत.
२. पण बाबासाहेबांना मी चेहऱ्याने ओळखायचो. शिवशाहीर म्हणून. मला ते फुल टाईम शाहिरी करतात याचे अप्रूव वाटायचे. यांच्या पोटापाण्याचे काय ? असाही प्रश्न पडायचा.
३.शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊंबद्दल काहीतरी आपत्तीजनक आहे ते मला पुण्यातल्या बिग्रेडीनी जेम्स लेन प्रकरणाबद्दल केलेल्या तोडफोडी नंतर कळले. माझ्या सारख्या बऱ्याच जणांनाही असेच कळले असावे.जेम्स लेन तांबडा की गोरा हेही मला माहित नाही ,त्याला गुगल करण्याचीही कधी उत्सुकता वाटली नाही.
४. पण त्यामुळे माझ्यावर महाराज किंवा जिजाऊ यांच्याबद्दल काडीचाही फरक पडला नाही. माझा आहे तोच समज राहिला. इतर सर्वांचा राहिला असावा असे वाटते , कारण आजपर्यंत मी कोणालाही "त्या" विषयावर कुजबुज करून असुरी आनंद घेताना पाहिलेले नाही.
५. काही जण हटकून कुठल्याश्या बिग्रेडी पोष्ट मध्ये tag करतात किंवा ग्रुप मध्ये add करतात तेंव्हा मला तिथे अत्यंत गलिच्छ ( अत्यंत म्हणजे अत्यंत गलिच्छ , ज्याला सीमा नाही ) अशा प्रकारचे विचार / विखार वाचायला मिळतात. आता कोणत्या जातीचे कोणत्या जातीविषयी काय बोलतात हे मी तुमच्या अनुभवांवर सोडतो. त्याचा चवीने आस्वाद घेणारेही आहेत. कायम मारामारीची भाषा आणि अत्यंत व्हायलंट अशा वातावरणात "विचारांचा सामना विचारांनीच व्हायला हवा" असे काहीतरी पालुपद वाचल्यावर मला हसायला यायचे.
६. याच ग्रुप वर संत ज्ञानेश्वरांवरही अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलेले वाचल्यानंतर माझी परत त्या ठिकाणी जाण्याची हिम्मत झाली नाही. त्यामागचा हेतू ज्याने त्याने आपल्याला समजानुसार ठरवावा
७. बदनामी झाली बदनामी झाली असे ओरडल्यामुळे खरे तर ज्यांना नाही त्यांनाही हा विषय समजला. आणि हा अजून पसरवला जातो यामागे जातीची राजकारण असल्याचे सरळसरळ दिसते. हे अखंड बल्क पोलरायझेशन आहे . यातून अस्मितेचे राजकारण पेटवून फक्त राजकीय पोळी भाजली जाताना दिसते .
८. महापुरुष हे समाज घडवतात. समाज घडवताना ते सगळ्या जातीधर्माला बरोबर घेतात. कालांतराने मात्र ते महापुरुष झाले की त्या त्या जातीचे लोक महापुरुषावर आपला कॉपीराईट सांगतात. हा एकप्रकारे त्या महापुरुषाला खुजेपणा आणण्याचा करंटेपणा आहे. हे प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत खरे आहे.
९. Whatsapp किंवा फेसबुकवर काही ऑडियो टेप ऐकायला मिळाल्या, त्यात स्वत:ला शिवप्रेमी म्हणवणाराच्या आवाजातला माज , भाषा, शिवीगाळ आणि वैचारिक कुवत पाहता शिवाजी महाराज किमान त्याला तरी समजले आहेत का अशी शंका उत्पन्न झाली. आणि हेच लोक महाराजांचा घनघोर अपमान करत आहेत असे वाटले. शिव्या देऊन मारधाड करून जर आपण महाराजांची महानता वाढवणार असू तर आपण महाराजांपेक्षाही महान आहात असे म्हणावे लागेल. नपेक्षा महाराजांचे नाव घ्यायचीही आपली लायकी नाही हे स्वत:च ठरवावे. एकाने दहा मिनिटाची क्लिप पाठवली होती , त्या दहा मिनिटात किमान ५०० आई बहिणीच्या सर्वांगाचा उद्धार करणाऱ्या शिव्या होत्या. कान मिटले.
१०. बाबासाहेबांना पुरस्कार मिळावा की न मिळावा यावर माझे मत खरेतर शून्य आहे. कारण पुरस्काराने फक्त एक recognition मिळते. बाबासाहेबांच्या समर्थकांना किंवा विरोधकांना आधीच त्यांच्याविषयी सगळी माहिती आहे त्यामुळे त्याना वेगळ्या रीक्ग्नीशनचे महत्व नाही/नसावे.
११. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, बाबासाहेबांविषयी तुमची मतं + किंवा - जशी आहेत ती तशीच राहणार आहेत .आय मीन , पुरस्कार मिळाला ( किंवा मिळाला नाही ) तरी त्यात किंचितसाही बदल होणार नाही. पुरस्कार ही फक्त कपाटात ठेवायची शोभेची गोष्ट आहे. त्यामुळे हा वाद निष्कारण आहे आणि त्याचा तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारात कसलाही फायदा किंवा तोटा नाही.
असे आणि बरेच . जमल्यास समाज जोडला जाईल अशा गोष्टी आपल्या हातून झाले तर बरे. तोडायला बरेच असतात . आपण त्यात भागीदार होऊ नका एवढीच विनंती . फेसबुक वर मी फक्त टवाळ्या करायला , टाईमपास करायला आणि मनोरंजन करून घ्यायला येतो.त्यामुळे ग्यान पाजण्याचा हेतू नाही. हे पटलंय तर ठीक आहे, नसेल पटलं तर सोडून द्या.आग्रह कसलाच नाही .

Saturday, July 25, 2015

रियलिटी शोज आणि मी

"इन्डियन आयडल" हा भारतातला पहिला रियलिटी शो असावा. २००४ साली हे रियलिटी शो चं लोणचं भारतात आलं. "अमेरिकन आयडल"च्या थीमचं देसी व्हर्जन. त्यावेळी हे आपल्याला नविन होतं , मलाही होतं. आपण फुल्टू सेंटी.

सुरुवातीच्या ऑडीशन , त्यातले ते गाण्यातला ग देखील माहिती नसताना गायला आलेले स्पर्धक , एक से बढकर एक विचित्र विभूती यामुळे ऑडीशनचा भाग तसा मनोरंजकच ! ते पाहून क्षणभर हसूही येतं. काही नग एवढे हिमनग असतात की ते कायमचे लक्षात राहतात. मधेच एकेकाच्या घरची गरिबी , ट्रेजीडी ,आई वडिलांची कहाणी सांगून एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न. कोणी गरीब , कोणी चहावाला, पेंटर , दर्जी किंवा कोणी लहानपणापासून संगीत शिकणारी. कोणी पैदा होताच  "मै इंडियन आयडॉल बनुंगा " म्हणणारा.

एक किंवा २ एन्कर. हे शक्यतो इंडस्ट्रीतले स्ट्रगलर असतात. विनोदाचा तडका , हजरजवाबीपणा आणि नॉनस्टोप टेम्पो कमी होऊ न देता शो सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांची.   तीन जजेसचं प्यानेल. ज्यांना काही काम नसतं ते रियालिटी शोज करतात ( आणि ज्यांना काही येत नाही ते डेलीसोपचे संवाद लिहितात, असो ) नंतर राउंड वन .. राउंड टू .. ड्यूएल राउंड , अमका राउंड तमका राउंड करत करत एलिमिनेशन सुरु होत जातात. देशभरातले दर्शक आपल्या फेवरेट सिंगर बद्दल सेंटी होत जातात. हा सेंटीयापा वाढवण्यासाठी जज पण आपल्या अभिनयाचा कस लावतात. हे सगळं नवीन असतं त्यामुळे मला पटत असतं. वाढीव दराचे SMS पाठवून वोट करण्याचे आवाहन केले जाते. मी देखील एलिमिनेशन च्या वेळी नखं चावत बसतो. आपला भिडू वाचला की जीव भांड्यात पडतो. परत मग नवीन च्यालेंज. मग क्वार्टर फिनाले , सेमी फिनले आणि मग ग्र्यांड फिनाले .. मग ते पॉज घेऊन ३-४ वेळा गुगली करून विजेत्यांची नावे झुलवत ठेवणे. आपले देव पाण्यात असतात. आपण ना जिंकणार ना हरणार तरीही आपला रक्तदाब कमी जास्त होत राहतो. मग एक भिडू जिंकणार, महिनाभर त्याचंच कौतुक चालणार. त्याला कार, एक करोड आणि एक वर्षाचे कॉन्ट्रेक्ट. हरणाराला ठेंगा. जो जिता वही सिकंदर , हारा वो बंदर.

नंतर कळतं , केवळ SMS मधून करोडोचा नफा कमावला गेला. विजेता कोण होणार हे आधीच ठरलेलं असतं. मालिकेच्या TRP साठी जे जे काही करता येईल ते केलं जातं. शो मधला सेंटीयापा आठवून माथ्यावरची नस तडकते. आपण चुत्त्या बनलेलो असतो. जजेस चा त्यावेळचा चुतीयापा आठवतो . सगळं डोळ्यासमोरून जातं. नंतर परत रियालिटी शो न बघणे , फिक्स ! डन !

मात्र TRPची उपजाऊ जमीन सापडलेली असते. सगळ्या प्रकारचे शेतकरी सगळ्या प्रकारच्या रियालिटी शो ची शेती करायला लागतात. मग गाणे , नाचणे , पकवणे , कॉमेडी करणे इथपासून तर स्टंट करणे,  एकाच घरात २०-१ नमुन्यांना कोंबून त्यांना रोज तासभर दाखवणे , वगैरे वगैरे. त्यात व्हेरीयेषण म्हणून मुलांचे रियालिटी शोज , सेलेब्रेटीचे रियालिटी शोज. सेंटीयापा अपने चरम तक पाहूच जाता है. सगळ्या पडीक लोकांची जजेस म्हणून नियुक्ती होते. शोज एवढे होतात की अचानक आलेल्या मागणीला त्या क्षेत्रातून मुबलक पुरवठा होत नाही. मग कोणत्याही सोम्यागोम्याला उचलून जज बनवले जाते. जसे नाचण्यात पाय कुठे ठेवावा हेही माहित नसलेला चेतन भगत किंवा करन जोहर आता लोकांना डान्सवर जज करतो. फराह खान गाणे कसे गावे यावर एक्पर्ट ओपिनियन देते. सगळीकडेच एसेमेस मागवण्याची प्रथा असते. दर्शक सगळ्यांनाच मिळत असतात. सेंटीयापाच्या नव्या नव्या क्लुप्त्या काढल्या जातात. एंकर सडेगले जोक मारतो. हसू येत नाही. कोण हरले जिंकले याने फरक पडत नाही. आता जिंकणाराचे २ दिवसही कौतुक होत नाही. सावळा गोंधळ अविरत सुरु राहतो.

रियालिटी शोज ला मात्र मी २००४ च्या इंडियन आयडॉल नंतरच रामराम केला होता. आता मी फक्त ते पाहणारांवर लांबून हसतो . 

Friday, May 1, 2015

उन्हाळा : कुल्फ्या, पेप्सी, पोहणे वगैरे वगैरे


रणरणती ऊन्हाळ्याची दुपार , घराबाहेर संपूर्ण शांतता. सगळेजन घरात चिडीचूप दडी मारून झोपलेले. पोराटोरांना घराबाहेर निघायला बंदी घातलेली असायची. जास्तीत जास्त गेटच्या आतून बाहेरची मजा बघायची अनुमती मिळायची. रोड वरून एखाददुसरा माणूस किंवा एखादी भाकड गाय कोणी काही खायला देतंय का म्हणून दारोदार भटकताना दिसायची. गवत वाळून पिवळं पडलेलं असायचं. एवढ्यात तो दिसला की सगळीकडे एकच गलका व्हायचा. एक्च्युली तो दिसाय्चन आही , घंटीचा आवाज ऐकू यायचा. मग समजून जायचं , कुल्फीवाला कही आसपासही है! गारेगार चौकोनी पेटीत बर्फ आणि त्यावर त्या ट्यूबमध्ये भरून खुपसून ठेवलेल्या कुल्फ्या. वेगवेगळ्या साईझच्या आणि वेगवेगळ्या फ्लेवरच्या. इलायची फ्लेवर सस्ता , म्यान्गो फ्लेवर मेहेंगा.. लक चांगले असेल तर म्यान्गो कुल्फीसाठी पैसे मिळत. कुल्फीवाला कोणती कुल्फी कडक झाली हे कड्या हलवून पहायचा , जी झाली असेल ती बाहेर काढून पाण्यात ढवळायचा मग कुल्फी त्या कंटेनर मधून बाहेर निघे, मग त्या कुल्फीच्याच लिक्विड मध्ये बुडवून आपल्याला द्यायचा. मजा यायची .
अजुन एक कुल्फीवाला असायचा. त्याच्याकडे अंड्याच्या आकाराचे कंटेनर असत. एक बाहेर काढून त्यात ती बांबूची काडी खुपसायची , आणि रबरलॉक काढलं की ते अंड्यासारखी कुल्फी तयार. मटका कुल्फीवालाही असे. तो एका सिलेंडरीकल ग्लासात मटका कुल्फी बनवायचा. त्याचे चार भाग करून चतकोर आकारच्या चार कुल्फ्या तयार करायचा. कुल्फीवाल्यापेक्षा जरा हटके बिजनेस म्हणजे पेप्सीकोला. चाराणे-आठाणे-रुपया नुसार पेप्सीकोल्याची लांबी असायची. वेगळ्या रंगाचे वेगळ्या फ्लेवरचे पेप्सी ! विटकरी हिरवा लाल नारंगी . दुधाचा पेप्सी दुप्पट किमतीला . पण पेप्सीकोला हातगाडीवरच नाही तर दुकानांतही मिळायचा त्यामुळे त्याचे खास आकर्षण नसायचे. दाताने एका कॉर्नरचा प्लास्टिक कुरतडून पेप्सी चोखायची. शेवटी फक्त बर्फ उरला की फेकून द्यायची !

उसाचा रसही असा फिरत्या गाडीवर विकणारे असत. तो आपल्या बायको किंवा पोरासह आपला एक बैल , तो चरखा आणि उस घेऊन गल्लीगल्लीतून भटकायचा. मोठा ग्रुप तयार झाला की तिथेच गाडी लावून बैलाला गोल गोल फिरवून रस काढायचा. लिंबू आलं मारके उसाचा रस रेडी टू ड्रिंक.

असतात एकेक दिवस. उन्हाळ्यातल्या दुपारची शांतता सर्वात शांत असावी. लिंबाच्या किंवा वडाच्या झाडाखाली मस्त खेळत तिथेच दडी मारून द्यायला मजा यायची. उन्हाळ्यात आम्ही रानात पोहायला जायचो. दर वेळी नव्या नव्या विहिरी शोधायचो. विहिरीवर पोहून झालं की विहिरीच्या काठावर उताणे पडायचो. तो गरम चटका अंगावर घ्यायला मजा यायची. गरम झालो की तिथूनच परत पाण्यात सूर मारायचा. पोहून झालं की मग तिथेच डबा खोलून खायचा आणि वावरातून टमाटे हरबरे तोडून खायचे.

उन्हाळा म्हटला की मला हे आठवतं. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. असो.

Monday, April 6, 2015

काळ


काळ, वेळ , समय , टाइम , इत्यादि इत्यादि. महाभारतातला तो नरेशन करणारा "समय" आठवतो. रोज रविवारी सकाळी ९ वाजले की , "मै समय हु .. मै अनंत हु मै निरंतन हु मै अमर हु , मै ये हु मै वो हु " वगैरे सारखी गर्विष्ठ वाक्य फेकत तो आपल्याला पकवत असे. काळ बदलत राहतो. तो आपल्यासोबत सगळ्या गोष्टी बदलतो. गोष्टी बदलत असतात तेंव्हा आपल्याला त्या खास जाणवत नाही, मात्र कालांतराने मागे वळून पाहिल्यावर कळतं, "अरेच्चा, खूप पुढे आलोय आपण.. खूप काही बदललंय "

आज फार सेंटी मारण्याचा इरादा बिलकुल नाही. कधीमधी वेळ मिळाला की मी जुने पुराणे फोटोज बघतो. ज्यावेळी फोटो काढणे हे एक पर्व असायचे , एके काळी फोटो काढायचा म्हणून लोक स्टुडियोमध्ये जायचे किंवा खास नट्टा पट्टा करायचे किंवा मग काहीतरी प्रसंग असेल तेंव्हाच तो फोटो काढला जायचा. तेंव्हाच्या प्रत्येक फोटो बरोबर बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. घघरातली सर्व कामं धामं आटोपली आणि दुपारच्या निवांत क्षणी कधी कोणी अल्बम घेऊन बसलं की मग गप्पांचा आणि आठवणींचा सुकाळ जमतो तो आता जवळपास दुर्लभ आहे. नपेक्षा कोणाला त्याचे सुखदुख नाही . उचलला कॅमेरा , केले बदकासारखे ओठ की काढला सेल्फी. आता च्या फोटो बरोबर काही आठवणी जोडल्या जात असतील आणि भविष्यात त्या आपण आठवू असे मला बिलकुल वाटत नाही. तर ते असो . काळ सर्व बदलत असतो

शाळेतला पहिला दिवस. पहिल्या दिवशी झालेला आपला पहिला मित्र , मग पहिली ते दहावी त्याच्याच बरोबर शेयर केलेला बाक , भांडणं , एकसाथ केलेल्या मारामाऱ्या , शेतातून चोरलेल्या कैऱ्या. कधीकाळी त्या मित्राशिवाय आपले जगणे फारच आळणी किंवा अशक्य वाटतं . पण ते मागे पडलं. नंतर त्या मित्राचं नावही कधीतरी आठवतं. काळ बदलतो, तो नवीन पात्र घेऊन येतो. वेगळ्या प्रकारचे मित्र , वेगळ्या प्रकारची नाती , वेगळ्या आठवणी , परत एकदा वाटतं , हे नसेल तर आयुष्यात काही चार्म नाही. काळ आपल्या वेगाने दौडत असतो. कॉलेजातल्या आठवणी , मित्र , किस्से , वेडेपणा .. सगळं सगळं तिथेच ठेवून काळ आपल्याला पुढे घेऊन जातो. पहिला पगार , पहिली नोकरी , पहिले चुंबन , पहिले प्रेम आणिक बरंच काही .. हे फक्त एकदाच , काळ वन्स मोर देत नाही. प्रत्येक वळणावर आपला एक रोल असतो. आपण त्यात गुरफटलेलो असतो याची त्यावेळी जाणीव होत नाही. पण मग मागचं काही आठवलं आणि आता परत त्या रोल मध्ये राहावंसं वाटलं की ते अशक्य आहे आणि आपण आता नव्या भूमिकेत अडकलो आहोत याची जाणीव होते.

काळ हा प्रकार आधी जवळपास प्रत्येक लेखकाने उष्टा करून ठेवलेला आहे. बऱ्याचदा त्यांच्या काळातल्या घटना वाचून त्याचा आपण आपल्या काळाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो . बरं वाटतं. सुखद. बघता बघता जाणवलं उत्तरायण सुरु झालेलं आहे.

काहीतरी करायला हवं.. काळाच्या ओघात बरंच काही सुटलंय , बघू पकडता येतंय का ते. काळ कधी कोणाला सगळं एकसाथ देत नाही , काहीतरी बाकी ठेवतोच.
घीसापिटा परंतु जरुरी शेवट , कालाय तस्मै नम: !

अरे हो , आणि एक राहिलंच , इथे रीकॅपच बटणही नाही .