Sunday, August 31, 2014

बॉलीवूड फंडा : ( इंडायरेक्ट रेफरन्स वाली गाणी )



बॉलीवूड चित्रपटांत बरेच फंडे फारच ठरलेले असतात.पूर्वीच्या काळी व्हिलन हिरोच्या लहानपणी त्याच्या मात्या-पित्याचा खून करणार मग हिरो मोठा होऊन त्याचा बदला घेणार. त्यातही कहाणी में ट्वीस्ट म्हणून हिरोईन कधी विलन च्या बाजूने होणार तर तिला अचानक काहीतरी गुपित माहिती होणार ज्यात व्हिलनच तिचा खरा व्हिलन आहे हे कळणार , मग ती हिरोला मदत करणार. त्यातही हे परत व्हिलन ला कळणार मग तो हिरोईनच्या आईला किडन्याप करून एका खांबाला बांधून ठेवणार.  ८०-९० चे दशक हे बॉलीवूड मध्ये "बदला दशक" म्हणायला हरकत नाही. यात गुंडा सारखा अप्रतिम बदलापट आपण पाहिला. चित्रपटात जर "पाप रणजीत" सारखे महानुभाव असतील तर हिरोच्या बहिणीवर एखादा अतिप्रसंग फिक्स. किंवा मग एक फ्यामिली मेलोड्रामा. बिंदू, कादर खान , बाबूजी अलोक नाथ , अजित वाच्छानी , रीमा लागू , मोहनीश बैल , अर्चना पुरणमासी , अनुपमखेर वगैरे मंडळींनी त्याकाळी हे रोल करून खूप छपाई केली. पण अलीकडे हे फंडे आउटडेटेड झाले. कालानुरूप त्यात बरेच बदल होत गेले.  पण एक फंडा अजूनही चालूच आहे आणि तो अनंतापर्यंत चालूच राहील...

गाणी बॉलीवूडचा आत्मा. ज्या चित्रपटांत प्रेमाचा त्रिकोण असतो , त्या चित्रपटांत एखाद दुसरं गानं इंडायरेक्ट रेफरन्स वालं असतंच असतं. यात १ हिरो २ हिर्विन्स किंवा २ हिरो एक हिर्विंस  किंवा २ हिरो २ हिर्विन्स इन क्रॉसलिंक  या प्रकारात बऱ्याचदा  हिरो हिर्वीनचे जुणे किंवा छुपे संबंध असतात, पण काही ट्रेजीडी मुळे कनेक्शन व्यवस्थित बसलेलं नसतं. वायरमनच्या भाषेत  अर्थिगला पाझीटिव्ह वायर लावल्यासारखं काहीतरी. तर हे सांगायचे कसे ? त्यांची कुचंबना सांगायची कशी ? मग त्यासाठी गाणी अल्टीमेट प्ल्याटफॉर्म असतो.  कृष्णधवल जमान्यापासून चालत आलेला हा फंडा अलीकडेच आलेल्या स्टुडेंट ऑफ द इयर सारख्या चित्रपटातही पाहायला मिळतो.  अगदीच निवडक काजू वेचायचे म्हटले तर काही गाणी चटकन समोर येतात ..
दिल के झरोके
क्या हुवा तेरा वादा .. वो कसम वो इरादा  ( हम किसी से कम नही )
तू प्यार  है किसी और का तुझे चाहता कोई और है ( दिल है के मानता नही )
मेहँदी लगा के रखना डोली सजा के रखना ( DDLJ )
सांवलीसी एक लड़की ... ( मुझसे दोस्ती करोगे )
..
चिक्कार गाणी आहेत. सांगायचा मुद्दा असा , या गाण्यांच्या वेळी सगळी सच्चाई  ओरीगिनल हिरो , हिर्वीन आणि प्रेक्षक यांनाच माहित असते , तो कबाबमें हड्डी या प्रकरणापासून अंजान असतो. आणि एवढी स्पष्ट रेफरन्स देऊन केलेली गाणी , हातवारे , या दोघांचे एक्स्प्रेशन इत्यादी पाहून त्यात आता लपवण्यासारखे काही नाही असे होते. हा सूर्य हा जयंद्रथ इतकी परिस्थिती झाल्यावर प्रेक्षकांचा मानसिक चोळामोळा होतो . आता हे भांडे फुटल्यावर पुढे काय होणार म्हणून बऱ्याच प्रेक्षकांच्या ब्ल्याडर वर ताण येतो... थोडेसे  बेचैन होते , पण या सगळ्यात ते "कबाब में हड्डी" क्यारेक्टरला याचा थांग पत्ताही लागत नाही ..  किडन्यापिंग , रेप , खून , बदला , अदलाबदली वाले फंडे कालबाह्य झाले .. पण  गाण्यांचा हा फंडा अनंतापर्यंत चालणार ..

खास हे फंडू गाणे :

http://www.youtube.com/watch?v=7GS5QXBHsfU

Saturday, August 23, 2014

भारतातली "चायनिस" खाद्यसंस्कृती

 मला आठवतं त्यानुसार जवळपास २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात 'चायनीस' खाद्यसंस्कृतीचा उदय झाला. या "चायनिस" खाद्यपदार्थांचा खरोखर चायना मध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांशी काडीचाही संबंध नाही हे आधीच नमूद करावे लागेल. असला तर तो फक्त "राईस" आणि "नुडल्स" चा .एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला चायनीसच्या टपऱ्या लागायला सुरुवात झाली. एकीकडे म्याकडोनाल्ड डॉमिनोज पिझ्झा हट सारखे अमेरिकन युरोपियन मल्टीन्याशनल ब्रांडस् उच्चभ्रू संस्कृतीत पॉप्युलर होत असताना "चायनिस" ब्रांड मध्यमवर्ग आणि खालच्या वर्गात रुजत होता.
चायनिस ची गाडी टाकण्यासाठी काय लागते ?
१. एक टिपिकल डार्क लाल रंगाची ६x4 फुटाची टपरी.
२. त्यावर एक ड्रागन पेंट केलेला .(या ड्रागनचे वैशिष्ठ्य असे की एकवेळ दोन फिंगरप्रिंट्स म्याच होतील पण एका टपरीवरचा ड्रागन दुसऱ्या टपरीवरच्या ड्रागन शी कधीही म्याच होत नाही ) काही टपर्यांवर तर मगरी ,पाली सुसरी, डायनासोर, गॉडजीला , एनाकोंडा ही काढलेले मी पहिल्या आहेत.
३. एक चीनी दिसणारा नेपाळी/ मणिपुरी /ओरिसी/हिमाचलपरदेशी किंवा कुठलाही पूर्वेकडील कुक. असा कुक नसेल तर ते चायनिस चालत नाही असा अनुभव आहे.
४. नाव : हॉंगकॉंग , शांगाय , बीजिंग/बेजिंग , ब्ल्याक ड्रागन , सोल्टी. घुमुन फिरून १० प्रकारची नावच मी पहिली आहेत. आमच्या इथे एक चम्पा चायनिस पण होतं. पण ती फारच एक्सेप्शनल केस होती. नाव जर चायनीज नसेल तर चायनिस चा फील येत नाही .
५. २ मोठ्या कढया , एक लांब दांडा असलेली मेगा पळी भला मोठा ग्यास बर्नर एवढ्या सामुग्रीत कोणताही चायनिस पदार्थ बनतो
६. नीलकमल प्लास्टिक फर्निचर. या नीलकमलवाल्याचा बिजनेस वाढला तो चायनिस टपरीमुलेच .
६. ल्यामिनेट केलेलं मेनुकार्ड. हे जास्तीत जास्त १ पानाचे असते. मराठी आणि इंग्रजी ऑप्शन दिल्यास ते २ पानी होते. त्यातल्या मराठी आणि इंग्रजी स्पेलिंग घटकाभर मनोरंजन व्हावे म्हणून मुद्दाम तशा छापलेल्या असतात
हा सगळा हार्डवेयर सेटअप झाला की चायनिसची हातगाडी धंद्याला तयार असते. दुपारचे चार वाजले की कुठल्याही रोडसाईडला गाडी लावून द्यायची. चायनिसवर जे ट्रेनी किंवा नवीन रुजू होतात त्यांना कोबी कापायचे काम दिले जाते. धंद्याला सुरुवात होण्यापूर्वी ट्रेनी पोरगं पोतंभर कोबी कापून रेडी करतं. सिनियर चायनिस कुक दुसरीकडे चिकनचे पीस साफ करणे, लॉलीपॉपच्या कांड्या तयार करणे , नुडल्स आणि चिकन लाल रंगाच्या मसाल्यात डीपफ्राय करणे वगैरे कामं करत असतो. आणिक एक पोऱ्या प्लास्टिकचे टेबल आणि खुर्च्या लावत असतो. प्रत्येक टेबल वर तीन वाट्या असतात. यात टोमेटो-चिली -सोया सॉस असतो. डेली रुटीन सेम असते. पब्लिक यायला सुरुवात झाली की चायनिस कुक ग्यासचा जाळ मोठा करून त्यावर ती कढई ठेवतो. त्यात पाणी मारून एका छोट्या खराट्याने ती साफ करून कढई उलटी करतो. मग ऑर्डर असेल त्या प्रमाणे त्याच कढाई मध्ये पदार्थ बनवले जातात. एका हाताने ती कढाई आणि एका हाताने तो लांब दांड्याची मेगापळी यांना एकमेकांवर आपटत अल्मोस्ट सगळे पदार्थ तयार होतात.
आपल्याकडे चायनिस फार थोड्या काळात फार लवकर पॉप्युलर झालं. स्वस्त आणि कमी भांडवलात चालू कमाईचा बिजनेस म्हणून चायनिस टपरीचा उदय झाला. गावातल्या छोट्यामोठ्या भाई लोकांनी या उद्योगात भलताच इंटरेस्ट घेतल्याने गल्ली बोळात चायनिस खाद्यसंस्कृती पसरली. बेवड्या लोकांना विदाउट सर्विसचार्ज दारू पिण्याची सोय या निमित्ताने झाली. पोलीस लोक हप्तावसुलीच्या निमित्ताने येतात तेंव्हा जेवणाचीही फुकट ऑर्डर देतात त्यांच्यासाठी खास उरलेल्या खरकट्या अन्नातून एक "पोलीस राईस" बनवला जातो. जे बेवडे पिऊन टाईट असतात त्यांना चिकनच्या नावावर डाळीचे लॉलीपॉप खाऊ घातले जातात. हायजीन वगैरे गोष्टीची चिंता करू नये. चिकन लॉलीपॉप, चिकन फ्राईड राईस , ट्रिपल राईस , लंग फंग सुप, मंचाव सूप , इत्यादी ऑर्डर द्यावी. मनसोक्त हाणावे.
मोठ्या हॉटेलांत पण चायनीज पदार्थ मिळतात. मेनल्यांड चायना सारखी ऑथेंटिक चायनीज रेस्तरा आपल्या कडे आहेत. पण मी जेंव्हा हॉंगकॉंग मध्ये गेलो आणि तिथले ओरिजिनल चायनीज पदार्थ पाहिले तेंव्हा मी चाट पडलो. आपल्या इथल्या चायनीस चा आणि ओरिजिनल चायनीजचा काहीही संबंध नाही . इव्हन लंगफंग सूप , मंचाव सूप , शेजवान राईस /नुडल्स असले कुठलेही पदार्थ मला तिकडे सापडले नाहीत . लॉलीपॉप नावाचा पदार्थ तिकडे अस्तित्वातच नाही. हॉंगकॉंगमध्ये त्याला चिकन विंग्स किंवा ड्रमस्टिक्स म्हणतात आणि ते बनवायची स्टाईल ही लॉलीपॉपच्या जवळपासही नाही.नाही म्हणायला सोया , विनेगर , चिली सॉस वगैरे वापरतात. नुडल्स आणि राईसही पूर्ण वेगळे असतात. आपल्याला ते चायनीज आवडणारही नाही.. त्याच हेतूने इंडियामेड फेक चायनीजची (ज्याला वर "चायनिस" म्हटले आहे.) निर्मिती झाली असावी .
कॉलेजात असताना चायनिसचा चस्का लागला होता. अल्मोस्ट रोज चिकन तोडायला मी चायनिसच्या टपरीवर पळायचो. बरेच दिवस लिहिणे मनात होते. हा नोस्तेल्जीया आहे.आता चायनिस तितकेसे रुचत नाही. टपरीवर खायला संकोच वाटतो. चायनिस चा बिजनेस आता आपल्याकडे सेट आहे .

लई भारी - एक लई भंगार अनुभव

लई भारी - एक लई भंगार अनुभव
एके दिवशी काय जाहाले ..
एके दिवशी काय जाहले ..
मी बसलो होतो टोरंट शोधात आणि लई भारी चा टोरंट सापडला
आणि माझ्याच हाताने माझ्या पायावर धोंडा पडला
असो, तर चित्रपटाचं संगीत महाराष्ट्राच्या ढोल-ताशाने (अजय अतुल) दिलेलं असल्यामुळे सुरुवातीपासून धात्ताड-तत्त्ताड वाजायला सुरुवात होते आणि पुढच्या दोन तास आता फक्त नाशिक ढोल ऐकायचा आहे अशी पाल चुकचुकते. फेटा घातलेले एक लोकल बडी असामी म्हणजे प्रतापसिंह निंबाळकर , आणि त्यांच्या सौ सुमित्रादेवी आपल्या कुलदैवताच्या मंदिराच्या रिनोवेशनसाठी एखादा नेता आपल्या समर्थकांना अभिवादन करावे तसे येत असतात. तोच , एक शमनछाप भटजी मध्ये शिंकतो, आणि या निपुत्रिक बाई ला मंदिरात प्रवेश नको म्हणून ढूस्की सोडतो. यावरून कळते की यांना मुल नाही. तोच त्याला कोणी "२ रुपयाचा भटजी" म्हणून जागा दाखवतो पण प्रतापसिंह हा निर्णय "रिवाज" म्हणून मान्य करतो. (आता मंदिराचा जीर्णोद्धार होण्या आधी हा रिवाज होता का ? या आधी मंदिरात वांझ बाई चालत नाही म्हणून माहित होतं तर एवढं शॉक होण्याचं कारण काय ? वगैरे मनाला पडू नयेत) ब्याक ग्राउंड ला अजय अतुल वाजत राहतो. हा प्रसंग झाल्यामुळे मासाहेब दुखी होतात , घरकाम करणाऱ्या बाई त्यांना वारी ला जाण्याचे सुचवतात. पण थोड्यावेळापूर्वी कसलीतरी फालतू रीत मानणारे प्रतापसिंह रागावतील म्हणून बाई मी कशी येऊ म्हणून प्रश्न उपस्थित करतात. त्यावर मोलकरीण मासाहेबांना "वाक" ला येण्याचे निमित्त करायला सांगतात. मा साहेब वारीत घुसतात. अजय अतुल वाजत असतो. थोड्यावेळाने पंढरपूरच्या पोचून विठोबा मंदिरात मासाहेब बच्चनस्टाईलमध्ये विठोबाला दोष देतात, दोष देऊन शांत झाल्या की पदरात मुल घालण्याची याचना करतात , त्या एवढ्या हतबल झालेल्या असतात की म्हणतात "मला फक्त एकदाच आई कर आणि पाहिलं मुल मी तुला अर्पण करीन". म्हणजे त्यांना पुत्र तसा नकोच असतो , फक्त तो वांझ वाला कलंक नको असतो. वारीवरून घरी आल्यावर मासाहेबांना तत्काळ कोरड्या उलट्या सुरु होतात. त्यावरून त्यांना कळते की आपल्याला मुल होणार आहे. प्रतापसिंह जाम खुश होतात. मोलकरीण मासाहेबांना आपल्या नवसाची आठवण करून देतात. मासाहेब हे प्रतापसिंहाला सांगतात. प्रतापसिंह संतापतात पण त्यांचा संताप सात्विक असतो. ते समजावतात की मुल नवसामुळे नाही तर डॉक्टरने ( की ज्योतिषी? ) संगीलेलं असतं की "तुम्हाला मुल लेट होणार" त्यामुळे झालेलं आहे. ते त्यांचा सगळा बिजनेस आणि गाव सोडून लंडनला निघून जातात. ( येथे उल्लेख करावा लागेल तो प्रतापसिंहाच्या घराचा. घर एकविसाव्या शतकातल्या लेटेस्ट डिजाईनचं असतं , पण त्यांची कार जुना काळ दाखवायचा म्हणून देवानंदच्या पिक्चर मधली असते )
मासाहेबांना जुळी मुलं होणार आहे हे त्यांना आणि त्यांच्या डॉक्टरांना डीलेवरी होईपर्यंत कळत नाही. मुल झाल्यावर दुसऱ्याच एकामुलाची रवानगी पंढरपूरला होते. डॉक्टर कडून गोपनीयतेची शपथ घेऊन ही बातमी लपवली जाते. एक मुलगा ( प्रिन्स ) आपणच ठेवून घेतात आणि आपल्याला पुत्र झाला आहे हे मासाहेब लंडनला फोन करून कळवतात, प्रतापसिंह लगेच झालं गेलं विसरून परत येतात. अजय अतुल वाजत राहतो. मुल मोठं होतं. मधल्या काळात प्रतापसिंहाचा भाऊ आणि त्याचा मुलगा संग्राम साउथ स्टाईल आतंक माजवत असतात. मनाला येईल तेंव्हा हवे त्याला आडवे करत असतात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असतात. प्रतापसिंह वैतागून यांना धडा शिकवायचा ठरवतो तेंव्हा काका-पुतण्या त्याला कायमचे आडवे करतात. परदेशातून शिकून आलेला प्रिन्स अगदीच झाम्या असतो. नाकावरची माशी उठत नसते. तो एका आयटमच्या प्रेमात पडतो. ती आयटम संग्रामने प्लेस केलेला सापळा असतो. प्रिन्सकडून ती सगळ्या जायदादच्या कागदावर सह्या घेते आणि मग संग्राम एका ट्रक ने प्रिन्स चा खेळ खल्लास करतो
आता मा साहेब एकट्याच असतात. संग्राम त्यांना बेइज्जत करून हाकलतो तेंव्हा त्या फारच डाऊन होतात. पंढरपूरला जातात. तिथे "तंटा नाय तर घंटा नाय" म्हणत घंट्यासाठी फायटिंग करणारा माउली उर्फ 'विठ्ठलाला अर्पण केलेला पुत्र' भेटतो.विठ्ठलाच्या पायाखाली वीट असते म्हणून माउलीने वीटभट्टी टाकलेली असते. दिवसा वीटभट्टी आणि रात्री हातभट्टी असा त्याचा रुटीन असतो . त्याला थोडे हेड्सअप देऊन या सुमित्रादेवी म्हणजे मासाहेब आहेत असे कळते. तो जाम शिव्या-शाप देऊन मदत करण्यास नकार देतो. पण मावलीची डाव त्याला विठ्ठल का वास्ता देके मदत करायला पाठवते . माउली लगेच इकडे येऊन संग्राम बरोबर ढिशुम ढिशुम करतो. अजय अतुल वाजतच असतो. एकदिवस हातभट्टी घेऊन घरी येताना माउलीला भाऊ ( म्हणजे भाई ( म्हणजे सल्लू) ) भेटतो . भाऊ पण हातभट्टी लावून टाईट असतो. या टाईट सिच्युएशन मध्ये दोघेही आपल्या एवन संवादफेकी ने डोक्यात वीट मारून घ्यायला भाग पाडतात. पुलं म्हणतात त्या प्रमाणे एखाद्या गोष्टीचा वीट येणे म्हणजे काय ते कळते. थोड्या वेळाने निंबाळकर घराण्याचे मीठ कललेला नोकर माउलीला पूर्ण केटी देतो. संग्रामच्या बारला आग लावणे , लोकांच्या जमिनीचे कागदपत्र अगदी पाकीट मारावे या शिताफीने माउली आपली कामं करत असतो. संग्रामने सुरुवातीला हाकलले तेंव्हा थुंकही चाटायची तयारी दाखवणाऱ्या मासाहेब माउलीच्या जीवावर "हे निंबाळकरांचे रक्त आहे ... शत्रूच्या रक्ताने टिळा लावतो पण तुझे रक्त लावून मी कपाळ खराब करणार नाही " म्हणत पंचतारांकित संवाद फेकतात. मागे अजय अतुल कंटिन्यू वाजतच असतो. मग क्लायम्याक्स मध्ये संग्राम-माउली तुंबळ युद्ध होते. संग्राम आणि त्याचा बा मरतो. मग माउलीला त्याच्या आई विषयी प्रेम वगैरे येते. मला लहानपणी चित्रपटात गाणी ही कोणाचे ब्ल्याडर फुल झाले असेल तर ब्रेक म्हणून असतात असे वाटे. लय भारी पाहताना याचा प्रत्यय येतो. थोडक्यात कोणत्यातरी टिपिकल साउथच्या सिनेमाची स्टोरी उचलेली आहे.
परीक्षण बरंच लेट आलंय , त्यामुळे थेटरात जाऊन कोणी पाहणार नाही , पण कुठे डाउनलोड करून किंवा फुकट टीव्हीवर पाहताना वेळ जाऊ नये म्हणून प्रपंच .

Sunday, August 3, 2014

दवणीय :नातं त्याचं आणि तिचं



वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला पोलियो झालेला. वडील कर्मठ आणि सनातनी होते . त्यांचा आदेश होता , कोणीही कसल्याही एलियोपथीची औषधं घ्यायची नाहीत. त्यांच्या या हट्टापायी तिचे आधीची तीन भावंड गमावली होती , परंतु "देवाची इच्छा" , "गेल्या जन्मीचे भोग" अशी वडिलांची ठाम समजूत. वडिलांच्या शब्दापुढे घरात कोणाचं काही चालायचं नाही. हिचा पोलियो दिवसेंदिवस वाढत गेला. नियतीचे दुर्दैव असे की ती १८वर्षाची होई पर्यंत वडील वारले.  जास्त काही मागे ठेवलं नव्हतं. थोडंसं सोनं , राहतं घर आणि कोकणात थोडीफार शेती , त्यातूनही काही उत्पन्न होत नसे. कोणालातरी कसायला दिली तो वर्षाला २०हजार टेकवी.

आईने खानावळ सुरु केली. इन मीन ५ मुलं जेवायला येत. त्याची तिची भेट घडली जेंव्हा तो खानावळीत आला आणि तिने त्याला वांग्याची भाजी वाढली. तो खानदेशातला ,  पुण्यात कॉलेजात शिकायला आलेला. रात्री कुठेतरी कामावर जाऊन पैसे कमवायचा. घरचं खानं हवं म्हणून खानावळ लावली.  वांग्याची भाजीच्या वासाने तो टर्न अप झाला.  "अजून वाढता का ? " त्याने ताटात बघतच तिला अजून भाजी वाढण्याची विनंती केली . ती लंगडतच वळली , भाजी वाढली आत गेली.  "अजून भाजी मिळेल काय ? " तो पुंन्हा खाली बघूनच बोलला. तिने जवळपास ५-६ वेळा त्याला काहीही तक्रार न करता भाजी वाढली . तिचे लंगडने तो बघत होता.

वेळ गेला तसा दोघांचा संवाद वाढला. लोकं येत जात राहिली , हा मात्र खानावळीशी प्रामाणिक राहिला. नाही म्हणायला त्याची तिची नजरानजर होत असे. तशी ती दिसायला सुंदर होती , गोरीपान काया , लांब नाक , काळेभोर केस , वक्राकार शरीरयष्टी... तिच्या पायाचा प्रोब्लेम नसता तर कोणत्याही युवराजने तिला मागणी घातली असती.जेवणात वांग्याची भाजी असली त्याचा चेहरा फुललेला असे. आणि त्याचा तो फुललेला चेहरा पाहायला तीही आतुर असे. बऱ्याचदा त्याच्यासाठी ती पेशल वांग्याची भाजी बनवे

एक दिवस तो तिच्या आईला बोललाच ! तिच्या आईला मुलीच्या भावना समजत नव्हत्या असं नाही. पण या संसाराचं पुढे कसे होणार ? ही अशी.. ट्रेक्टरची दोन चाकं जर एकाच त्रिज्येची नसतील तर तो चालेल कसा ? पण त्याने तिच्या आईला कन्विन्स केलं.  त्याचे आई-वडील नव्हते त्यामुळे बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता.
यथावकाश लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले. तो तिला फिरायला नेई. बऱ्याचदा उचलून घेई. त्याचे शिक्षण वगैरे पूर्ण होऊन त्याला नोकरीही मोठ्या पगाराची लागली होती. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याने बरीच प्रगती केली. कोणाची नजर लागावी असा त्याचा तिचा संसार चालू होता. पण नजर लागलीच.

लग्नानंतर ती जास्त काम करत नव्हती. आठवड्यातून ५ दिवस डॉमिनोज , म्याकडोनल्ड , वगैरे होत असे  , कधी वैशाली तर कधी गंधर्व .. पुण्यात हॉटेलांचा तुटवडा का आहे ? तिचे खाणे वाढत होते. आता फिरायला नेताना त्याला तिला उचलणे अशक्य होते. तिने वजनाची सत्तरी पार केली होती. तिचे काळेभोर केस तिने कापून बॉबकट केला होता , तिच्या गोऱ्यापान त्वचेवर मेकअप च्या सामने एलर्जी उठली होती. कमनीय अंतर्वक्र फिगर आता बहिर्वक्र झाली होती. दोघांची आता वरचेवर भांडण होऊ लागली . तो ऑफिसातून आता अजूनच उशिरा येऊ लागला. रात्री १२-१ ला भांडणाच्या आवाजाने शेजार्यांची झोपमोड होऊ लागली. व्हायचं तेच झालं. त्याने तिला माहेरी पाठवायचा निर्णय घेतला , तिनेही आता परत न येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच रात्री ती घरी निघून गेली .

तिची आई आता आजारपणाने खंगली होती. काय बोलणार बिचारी. फोनवरच त्याने तिला घटस्फोटाची बातमी दिली. पण त्या पेपर्स वर सही घेण्यासाठी त्याला तिच्या घरी जावे लागले. तो घरी गेला.  जेवायची वेळ होती . तोच ... तोच त्याला तो ओळखीचा वास आला , आज वांग्याची भाजी होती. तिने त्याला वांग्याची भाजी वाढली , तेंव्हा त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो दवणीय झाला होता . त्याने सात-आठ वेळा वाण्याची भाजी मागितली . मागचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून जात होता. ती जेंव्हा जेवत होती तेंव्हा तिच्या लक्षात आलं , अरे आज भाजीत मीठ नाही .. आणि हा काही बोललाही नाही. एक वेळ भाजीत केस झुरळ पाल पडली तरी त्याला चालायचं , पण मिठ कमी पडलेलं त्याला चालायचं नाही , आणि आज त्याने चक्क निमूटपणे खाल्लं ? दोघांचे ही डोळे पाणावले होते. वातावरण दवानीय झालं होतं. त्याने घटस्फोटाचे पेपर फाडले आणि तिला घट्ट मिठी मारली होती. वांग्याच्या भाजीमुळे ते परत एकदा एक झाले होते.  .

 नाही , खरंतर त्याचे अश्रू भाजीत पडल्यामुळे भाजीला चव आली होती.