*** गांधीजयंती ***
*** गांधीजयंती ***
आज गांधींचा दिवस, त्यांच्या मार्गावर चालावे म्हणून च्यासाठी दुध आणायला
शेळी शोधायला बाहेर पडलो. खूप खूप चाललो पण शेळी काही दिसली नाही. एक शेळी
मटणशॉपवर उलटी विनम्रपणे लटकवली होती. मी मटण शॉपवाल्याला अहिंसेचे पालन
करून शेळीपालन कर पण शेळीमटण करू नकोस म्हणून एक विनम्रपणे अनाहूत सल्ला
दिला. त्याला इंग्लिश येत नव्हती मला चायनीज येत नव्हती. तरीही
गांधीजयंतीच्या निमित्ताने विनम्रपणे सल्ला देणे अपरिहार्य होते. नंतर कुठे
दोन मुलींची सोय होते का ते पाहायला गेलो पण तोच अस्मादिकांना घरी
विनम्रपणे काठी घेऊन बसलेल्या कस्तूरबेची आठवण झाली. म्हणून सोसेल आणि
झेपेल तितकाच गांधीवाद करावा असे ठरवले. शेळी काय भेटली नाही आणि शेळीचे
दुधही भेटले नाही. शेवटी 'होमोजिनाइज्ड' आणि 'पाश्चराइज्ड' म्हशीचं दुध
घेऊन आलो, कस्तूरबेने चहा बनवली. विनम्रपणे च्या ढोसून ऑफिसला निघालो. इकडे
रोजच सौजन्य सप्ताह असतो त्यामुळे मी विनम्रपणे गुड मोर्निंग करण्याआधी
वॉचमननेच मला ग्रीट केलं. रोज रोज त्याच्या अश्या ग्रीट करण्यामुळे मला
सौजन्याचे काही वाटेनासे झाले आहे. तडक पुढे
निघालो. बसच्या रांगेतही सगळे एकलाईन मध्ये होते. कोणीही विनम्रपणे मध्ये
घुसत नाही किंवा कोणी बस आली म्हणून विनम्रपणे धावपळ करत नाही. पण तरीही आज
गांधीजयंतीच्या निमित्ताने त्यांची अशी शिस्त पाहून दोन मिनिटे दुसऱ्या
देशातही आपल्या देशातल्या महापुरुषाचा लोक आदर करतात हे पाहून विनम्रपणे उर
भरून आला. पुढे ऑफिसला गेलो. ऑफिसात ढीगभर कामाच्या मेल पाहूनही आलेला राग
विनम्रपणे गिळला. आज गांधीजयंती, काहीही झाले तरी संयम सोडायचा नाही.
अहिंसेच्या मार्गाने एकेका मेलला रिप्लाय केला. आलेलं काम स्वावलंबन हा गुण
अमलात आणून स्वत:ची कामं स्वत:च केली. इतर दिवशीही पर्याय नसल्याने स्वत:च
करत असलो तरी आज गांधीजयंती असल्याने ह्याला विशेष महत्व आहे. नंतर
दुसऱ्याकडे टीममध्ये विनम्रपणे फाळणी करावी म्हणून या बोटावरची थुंकी त्या
बोटावर करून आलो. नंतर विनम्रपणे घरी आलो.
अशा रीतीने आज मी
गांधीजयंती साजरी केली. खिशात आपण नेहमीच गांधीजी बाळगतो. पण आर्थिक
व्यवहारातले गांधीजी आपण आचरणात आणि विचारांत आणताना कुठेतरी कमी पडतो.
गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधी बाबांना विनम्र अभिवादन.
आज
महात्मा गांधीची जयंती , म्हणून इतर दिवशी त्यांचे वंशज अर्थात राजकारणी
गांधी घराणे, यांच्या विषयी काहीही वाईट बोलणार नाही, ऐकणार नाही, लिहिणार
नाही म्हणून चंग बांधला होता. मोठ्या शर्थीने तो पाळला. गांधी परिवार की जय
.. गांधी परिवार की जय .. गांधी परिवार की जय .. असा त्रिवार जयघोष केला.
गांधीकट करावा म्हणून न्हाव्याकडे जाणार होतो पण वेळेअभावी जमले नाही,
त्याचीच कुणकुण मनाला बोचत आहे.
जाता जाता : अजून एक कोणीतरी लालबहादूर शास्त्री वगैरे कोणीतरी होते, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- (शुभेच्छुक) महात्मा मोहनदास गोडसे, अहिंसावादी कोन्ग्रेस
No comments:
Post a Comment