Sunday, October 6, 2013

अंत्यविधी

ठिकाण - स्मशानभूमी
वेळ - शक्यतो अर्ली इन द मोर्निंग सकाळची
काळ - मयतीला जनसमुदाय जमला आहे , कुठे मुंडनाचा कार्यक्रम सुरु आहे , कुठे भट मंत्र म्हणतो आहे, कुठे कोणी अंघोळी करतो आहे . आणि जमावा मध्ये कुजुबुज सुरु आहे. त्यातला हा एक सीन.

भारी फ्याशन आहे. पुण्यात गुंठ्याला भाव आला आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे अमाप पैसा आला. पैश्यातून कॉर्पियो आणि पावर आली. गल्ली-बोळातले पुढारी बोलावलं नसलं तरी उदाहरणार्थ बळेच मयतीला हजेरी लावतात. त्यांच्या सोबत काळ्या काचेचा आणि सोनेरी दांडीचा रेब्यान एव्हिएटर ट्रेड मार्क गॉगल घातलेले ४-५ चमचे असतात. पुढारी एकदम खादित असतात ,कांजी केलेली असेलच असे नाही . फुल झाब्बेदार झब्बा , काळे-कुळकुळीत , तोंडावर फुल मगरूरी. चमच्यांतले २-३ तंबाखू-गुटखा बहादूर .. आणि त्यांच्या लोकांना चुकवत बरोबर आजूबाजूला पडणाऱ्या लाल पिंका .. त्यांच्या निवडणुकीच्या चर्चा ...

या येळीला नगरशेवक "भाऊ"च बनणार ,
भाउंनी फुल फिल्डिंग लावल्याली आहे.
भाऊ यंदा धयहांडीला "सुनिती चवान" ( हे असेच वाचावे ) ला बोलावणार हाये.
भाउंनी ५० पोरं यमायडीशीत कामाला लावली.
देवळामागचा प्लॉट विकून पैसा आला की भाऊ पोर्ट फौंडेशन , रुग्णवाहिका अन युवा मंच आणि युवा प्रतिष्ठान ( हे सगळं एकसाथ बरंका ) स्थापन करणार हायेत.

मंत्रपठन वगैरे होतं. मयताचा पोऱ्या मुंडण करून , खांद्यावर घागर घेऊन उभा , अग्नी द्यायचा कालावधी आणि त्यावेळी पुढारी समोर येतात .मयताची माहिती देताना , त्याची ओळख नव्याने करून देतात .मयताराम येक महान गांधीवादी होते ... त्यांनी अख्ख्या आयुष्यात कशे गांधीची तत्व पाळली ( भले मयत रोडवर पिऊन पडायचा ) , त्यांला आमी लहानपणापासून बघायचो. शिस्तीचे अत्यंत कडक आणि अख्या येरियातल्या पोरान्ला शाळेत धाडण्यासाठी ते कायम आग्रही होते. आयुष्यात पैसा कसा वापरावा , देव कसा जाणावा . संसार आणि परमार्थ कसा साधावा याचे धडे कोणाकडून घ्यावे तर मयतारामाकडून ! त्यांच्या जाण्याने आपल्यात येक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली हाये. इत्यादी .
ईश्वराची आज्ञा , देवापुढे कोणाच काय चालत नाही , वैकुंठवाशी , कैलासवाशी , त्यांच्या आत्म्याला शांती , आणि त्यांच्या घरच्यांना आबाळाएवडे दुख सहन करायची ताकद इत्यादी वाक्यात सुरुवातीला आणि शेवटी "याठिकाणी" हेडर-फुटर लावून फुल बोलबच्चन घिसेपिटे डायलॉग हाणतात. मयतीला हजेरी लावून भाऊ रिकाम्या वेळात (कायमच रिकामे असले तरी ) स्वत:ची पब्लिकशिटी करून मग "कॉर्पियो" मध्ये बसून धूळ सोडत कुठे लग्न अटेंड करायला निघून जातात.

No comments: