फेसबुक वर स्टेटस आणि पोस्ट्स च्या जिलब्या टाकणारे काही निवडक ग्रुप :
१. छीछोर ग्रुप : ह्या ग्रुप मधलं पब्लिक रोज काही ना काही पांचट ,
बाष्कळ आणि वायफळ स्टेटस टाकत असतात. जगात यांना वायू जरी सरला तरी तो फक्त
यांनाच सरला आहे अशा अविर्भावात प्रत्येक गोष्टीचे गुणगान करून स्टेटस
पाडले जातात. स्वत्ल्च्या दारू पिण्याचे कौतुक , किंवा शिवराळ शिव्या किंवा
ह्याला त्याला दुनियादारी शिकवणारे , स्वत: मात्र जगाला आदर्श असणारे
ह्यांचा ह्या ग्रुप मध्ये समावेश होतो . यांच्या स्टेटस ला शक्यतो "स्कोर
सेटल" वाले लाईक्स भेटतात.
२. दर्दी ग्रुप : हा ग्रुप गाण्यांचा
, सुगम - शास्त्रीय संगीताचा मोठा जाणकार असल्याचे भासवतो. मग बाबुजींचा
यमन कसा ब्येस , न किशोरीचा सिंगीताचा बेस कसा मजबूत किंवा एखाद्या मिया
मल्हार रागातली जगात कुणालाही न कळलेली पण केवळ आपल्यालाच माहित असलेली
एखादी गोष्ट किंवा इत्यादी मोठ्या जिवाभावाने रोजच्या रोज त्रिवार प्रसवलीच
पाहिजे असा यांचा दंडक असतो. स्वत:लाही सिंगीतात गती आहे किंवा समजावून
घेण्याची जेन्युअन इच्छा असलेले नखावर मोजके लाईक/कमेंट्स यांना मिळतात.
३. आंद्रे इस्तेवान ग्रुप : ह्या ग्रुप मधल्या लोकांनी मोठा महागडा
डीएसएलआर विकत घेतलेला असणे जरुरी नाही . आजकाल मोबाईल मध्ये कॅमेरे उपलब्ध
झाल्याने आणि मोबाईल डेटाप्लान स्वस्त असल्याने काढ फोटो की कर अपलोड ..
काढ फोटो की कर अपलोड ..नि वाढव सर्व्हर ची स्पेस .. आणि बऱ्यापैकी
डीएसएलआर असेल आणि फोटोशॉप (मध्ये गती असणे मस्ट नाही ) पिकासा एडिटर मध्ये
थोडाफार स्पेशल इफेक्ट देऊन कसल्याही फोटोला अपलोड करून त्यावर "आंद्रे
इस्तेवान फोटोग्राफी " किंवा "चमनगोटा आर्ट्स" वगैरे चे वॉटरमार्क्स लावून
फोटो फेकले जातात. आपल्याला लाईक मिळावेत म्हणून ह लोक सर्रास ए टू झेड
फ्रेंड्स ला टेग करत सुटतात. फोटो बरा असो नसो, लाईक बऱ्यापैकी मिळून
जातात.
४. कोकरी ग्रुप : हा ग्रुप कुठून कुठून पकडून पाककृती
वैग्रे जमा करून स्वत: च्या नावाने खपवत असतो. कोण ह्यांच्या फेसबुक स्टेटस
चे प्रिंटआउट काढून जेवण बनवत असेल माहित नाही पण हे फेसबुक वर मात्र जाम
पकावतात . लाईक संख्या १ ते ३ .
५. शेयरखाण ग्रुप : ह्या ग्रुप
ला फेसबुक मधल्या "शेयर" बटणाचे टेस्टिंग करण्याचे काम दिलेले असते.
दिसलेली प्रत्येक पोस्ट लाईक करो न करो , समजो न समजो ती शेयर केलीच पाहिजे
असा यांचा प्रोग्राम असतो. दिसलं की कर शेयर. यांना ९९% शून्य लाईक मिळतात
६. कोटधारी ग्रुप : सकाळी झोपेतून उठावं. ऑफिस ला जायची घाई.
डोळे उघडत नाही म्हणून बळेच फोन घेऊन फेसबुक बघावं. तोच यांचा स्टेटस
पहिल्याच ओळीवर तुमची झोप उडवायला तयार असतो. अत्यंत अगम्य भाषेतले आणि
घोटीव काम केलेली वाक्य आटवलेल्या आणि आयुष्यात कधीही दूरदूर वर न ऐकलेल्या
शक्यतो युरोपियन फिलोसॉफर चे कोट्स तुमची वाट बघत असतात. ते वाचून उडालेली
झोप परत लागते. यांचे स्टेटस शक्यतो फक्त हे स्वत: लाईक करत असतात.
७. अन्नू मलिक ग्रुप : हे दुसर्यांच्या वॉलवर भुतासारखे फिरतात. कुठलासा
स्टेटस आवडला की पटकन कॉपी करून आपल्या वॉल वर आपल्यालाच सुचला असल्याच्या
थाटात चिटकवतात. कधी कधी हा टेपूपणा इतका विकोपाला गेलेला असतो की आपल्या
सख्ख्या मित्रांचे स्टेटसही सर्रास चोरून वॉल वर टाकण्यास हा ग्रुप
मागेपुढे पाहत नाहीत. अर्थात लाईकचा कोरडा दुष्काळ इथेही असतो.कमेंट्स
मधेही यांचाच एखादा मित्र यांच्या वॉल वर यांची हमखास मारून जातो. लाईकचा
शक्यतो शुकशुकाटच असतो.
८. दर्द-ए-दिल ग्रुप : हा फेसबुक वरचा
सगळ्यात आटीव ग्रुप आहे.सर्व जगाच्या सेंटीमेंट यांच्यात सामावल्या आहेत.
सर्व जग यांच्या प्रेमाच्या लाटेवर स्वार आहे आणि आपल्या सेंटी ,
प्रेमाच्या ,कविता किंवा पोस्ट्स आणि क्युट मांजरींचे फोटो हे आपल्यासोबत
जगालाही फार फार आवडतात अशा गृहीतात रोज २०-३० सेंटी कविता आणि फोटोज चा
रतीब घालण्यात हा ग्रुप आघाडीवर असतो. ह्यांच्या पोस्ट्स ला लाईक / कमेंट
करणारेही त्याच प्रकारातले असतात. आणि गम्मत म्हणजे बऱ्यापैकी लाईक भेटून
जातात.
९. भिकारी ग्रुप : हा सगळ्यात उग्र आणि त्रास देणारा
ग्रुप असतो . ह्यांनी शेयर केलेल्या प्रत्येक पोस्ट मध्ये हे भावनिक आवाहन
करून लाईक/कमेंटची भिक मागतात. आपल्या आईवर प्रेम करत असाल तर , आपल्या
देशावर प्रेम करत असाल तर , राजे पुन्हा जन्माला यावे असते वाटत असेल तर ,
सचिनचे भक्त असाल तर पासून ते तुम्ही माणूस असाल तर वगैरे "तर" लाईक मागून
आतंक पसरवणारा हा ग्रुप सगळ्यात मोठी डोकेदुखी असतो. काही भावनिक लोकं
इमोशनल होऊन हमखास यांना लाईकस पुरवतात .
१० . भक्त प्रल्हाद
ग्रुप : ह्या ग्रुप मधल्या लोकांची देवावर स्वत:च्या अस्तित्वापलीकडेही
श्रद्धा असते. ह्यांचा तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये समावेश असेल तर तुमच्या
वॉल वर साईबाबा , शंकर , गणपती कृष्णापासून ते दुर्गा पार्वती सगळ्या देवी
देवताच रोज येणंजाणं चालू राहील . ह्यांच्या पोस्ट्सलाही फक्त आस्तिक लोक न
चुकता लाईक करतात .. ह्यांची स्वत:ची वॉल म्हणजे एक धार्मिक मॉल असतो. "
बाम भोले " किंवा "जय श्री कृष्णा" किंवा "ओम साई" सारख्या कमेंट्स
दिल्यामुळे आपली कामं घरबसल्या होतील ह्या भाबड्या आशेत बरंच पब्लिक लाईक /
कमेंट करत असतं.
११. हौशी ग्रुप : जगाच्या पाठीवर फक्त आपणच कुठे
फिरायला गेलो , आपण कसे अमेरिका-युरोपात गेलेले पहिलेच भारतीय आहोत किंवा
कुठल्या रीसॉर्ट मध्ये गेलो ह्यांचे फोटो रोजच्या रोज दर ३ तासाला टाकणं हे
आपले परम कर्तव्य समजणारा हा ग्रुप मोठा गजब असतो. काही अति हौशी ज्याचं
नुकतंच हनिमून वगैरे वरून परतणं झालं आहे असे ( किंवा काही गेल्या गेल्या
तिकडूनच ) आपल्या हनिमून कॉटेजचे फोटोज मग त्यात सुरुवात पाकळ्या
पसरवलेल्या किंग साईझ बेड पासून सुरुवात. २००-३०० फोटो सलग अपलोड करतात.
हौशी ग्रुपच्या हौसेला मोल नाही. ते प्रत्येक लाईक आणि कमेंट करणार्याचे
शेपरेट कमेंट देऊन धन्यवाद मानतात. ह्या प्रकारात म्हैलावर्ग शक्यतो
आघाडीवर असतो. इथे सो क्युट , चो च्वीट वगैरे कमेंट अन लाईकचा धो धो पाउस
पडतो .
१२. टेगकरी ग्रुप : ही लोकं कसल्याही निरर्थक पोस्ट मध्ये पूर्ण गावाला tag करत सुटतात. यांना tag हा प्रकार दिलाय म्हणजे तो कम्पलसरी वापरने जरुरी आहे अणि तो वापरला नाही तर आपण लोकांचा अपमान करू असे वाटत असावे . सध्या या ग्रुपने वात आणला आहे. ह्यापी होळी , ह्यापी दिवाळी , ह्यापी न्यू इयर पासून कसल्याही पोस्ट मध्ये हे सगळी फ्रेंडलिस्ट tag करत सुटतात.
१३ . महा बाराचा ग्रुप : हे शक्यतो पुण्याच्या अलीपलीकडे
आढळतात. ह्याला त्याला नावं ठेवणे , ह्याच्या त्याच्या स्टेटस वरून त्याची
खेचणे , मोठाले स्टेटस टाकून फेसबुक युजर्स च्या स्वभावाचे विश्लेषण करणे
ह्या ग्रुप ला छान जमते. आम्ही इथलेच असू कदाचित.
अजून बरेच ग्रुप बाकी आहेत. पण ते नंतर .
- टारझन
टीप : लेख ढापू नये. ढापल्यास किमान सौजन्य द्यावे ही अन्नू मलिक ग्रुप ला विशेष विनंती.
No comments:
Post a Comment