Sunday, July 27, 2014

Minuscule: Valley of the Lost Ants - एक अति सुंदर अनुभव



काल स्त्रीहट्टापुढे गुढगे टेकवत  "मीनेस्क्युल - हरवलेल्या मुंग्यांची  दरी" ( शब्दश: भाषांतर )  पाहायला गेलो. तसा पूर्वी प्रोमो वगैरे पाहिलेला , पण चित्रपट लै भारी असेल असे काही वाटले नव्हते. किंवा त्याच्यावर  दोन शब्द खरडायची तसदी घेईल असेही नाही. अंमळ बादलीभर पॉपकॉर्ण आणि टिपाडभर सॉफ्टड्रिंकची सेटिंग लावून सीटवर बसलो. चित्रपटाच्या सुरुवातीला एक कपल एका अतिशय निसर्गरम्य अशा जागी  निवांतक्षण घालवत वोडकाचे दोन पेग घेत वेळ घालवत असतं. बाई प्रेग्नंट असते. अचानक तिला आतून काहीतरी जाणीव होते आणि तिचे यजमान तत्काळ तिला गाडीत बसवून रवाना होतात . जाताना पार्टीसाठी आणलेला बराचसा सामान मागे ठेवून जातात.  मी चित्रपट एनिमेशन प्रकारातला आहे हे समजून होतो आणि इथे अजून कसलाच एनिमेशनचा प्रकार दिसत नाही आणि दिसेल अशी कुठे अशाही नाही. पण तरीही ते मनमोहक दृश्य पाहून मी मात्र सुखावलेलो .

ते कपल गेल्या नंतर खरी मजा सुरु होते. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक माश्या वगैरे पार्टीच्या सामानावर तुटून पडतात. जो तो आपल्या वजनाच्या १००००० पट वजनी वस्तू उचलून पळवून नेण्याच्या मागे असतो. प्यारलली दुसरीकडे चित्रपटाच्या हिरोचा जन्म त्याच्या दोन भावांसोबत झालेला असतो . हा हिरो म्हणजे एक रंगीत आकाराचा किडा. आता हा किडा असल्याने त्याच्यात मुळातच किडे असतात , आणि त्या कारणाने तो त्याच्या फ्यामिली पासून दूर होतो आणि या पार्टी स्पॉट मधल्या एका डब्यात जाऊन लपतो.या डब्यात शुगरक्युब्ज असतात. या डब्याला ८-१० काळ्या मुग्या आपल्या वारुळाकडे घेऊन जातात .

वाटेत या किड्याची आणि मुंग्यांची दोस्ती होते. वाटेत लाल आणि क्रूर विलन मुंग्या दिसतात. काळ्या मुंग्यांचा सरदार त्याला एक शुगर क्यूब देतो पण त्यामुळे ते रागावतात.वाटेत पाठलाग करताना बरीच धमाल येते . काळ्या मुंग्यांचे कमालीचे टीमवर्क दाखवताना दिग्दर्शकाने इम्याजीनेषण आणि स्पेशल इफेक्टचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. नंतर हा हमला थेट काळ्या मुंग्यांची टीम विरुद्ध लाल मुंग्यांची टीम असा होतो . त्यात आपला किडा कशा प्रकारे त्यांना मदत करतो वगैरे पडद्यावर बघण्यात मजा आहे . हा चित्रपट चुकुनही टोरंट वर डाऊनलोड करून पाहू नये. हे चित्रपट मोठ्या स्क्रीन वर बघण्यात मजा आहे . शून्य संवाद आणि फक्त किड्यांचे गुंजन आणि भुणभुण यातूनही एखाद्या सुपर डायलॉग वाल्या चित्रपटाच्या कानाखाली मारेल असे मार्मिक चित्रीकरण यात आहे. शक्यतो मला चित्रपटात चुक्या आणि कमी काढायला आवडते पण यावेळी तसा काही स्कोप नाही .दिलखुश चित्रपट .

जमल्यास पहा :)

Monday, July 14, 2014

लाईकचे प्रकार


हुशार झुकरबर्गने "लाईक" च्या बटणाचे इंवेन्षण करून फेसबुक मध्ये ऑक्सिजन फुकला. लोकं येतात , फेसबुक वाचतात , कोणी आवडलं म्हणून लाईक करतो , कोणी पटलं म्हणून लाईक किंवा लाईक दाबण्याची बरीच कारणं असू शकतील . अस्मादिकांनी वातावरणाचा जायजा घेऊन टिपलेले हे लाईकचे काही खास प्रकार :-
१. बकरा लाईक : आपल्या लिष्ट मधला (किंवा पाहण्यातला) कोणी एखादी पोस्ट लाईक करतो म्हणजे आपणही ती केली पाहिजे या भावनेने आपसूक वाहिले गेलेले लाईक या प्रकारात येतात . येथे माणसाच्या मेंढरी वृत्तीचे दर्शन घडते.
२. सेटलमेंट लाईक : एखादा आपली पोष्ट लाईक करून गेला की कर्तव्यभावनेमुळे जे लाईक्स निघतात ते या प्रकारात. ज्याप्रमाणे स्वाभिमानी माणूस कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही , त्याप्रमाणे हे लोक कोणाचे लाईक्स उधार ठेवत नाहीत
३. जमालगोटा लाईक : अडल्यारात्री जमालगोटा घेतल्यावर दिसणाऱ्या परिणामांप्रमाणे हे लोक दिसतील ती प्रत्येक पोष्ट लाईक करत सुटतात , साईडबारवर बार बार हर बार यांचे नाव दिसत राहते. कर्ण लाजेल एवढा एवढे दानशूर या प्रकारात येतात
४. चाटे कोचिंग लाईक : या लाईक्स शक्यतो सुंदर मुली किंवा आव्हानात्मक दिसणाऱ्या महिलांच्या पोस्ट वर फोटो टाकल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून सुरु होतात. यांच्या लिष्ट मध्ये फिमेल आयडीज चा भरमार दिसतो आणि यांची टाईमलाईन एक्टीवीटी पाहिल्यास यांचे लाईक्स चाटे गिरी करण्यात वापरल्याचे दिसते .
५. परमपूज्य लाईक : शक्यतो आपल्या लिस्ट मध्ये असणारे आदरणीय किंवा सिनियर किंवा उच्च विचारवंत किंवा "सो कॉल्ड" फेमस व्यक्तीने काहीही पोस्ट केलं की ते कळो न कळो आपला आदरणीय लाईक तिथे पुरवलाच पाहिजे या हेतूने प्रेरित. कधी कधी पोस्ट वाचायला किमान ५ मिनिटे लागतात पण एका मिनिटात बक्कळ लाईक दिसल्या की आदरणीय लाईक ओळखू येतात
६. बाब्या लाईक्स : "आपला तो बाब्या" अर्थात आपल्या मताला पटणारी किंवा फेवरिंग पोस्ट असली की बाब्या लाईक ठोकला जातो. शक्यतो राजकारण , आवडता नेता किंवा पक्ष या विषयांत बाब्या लाईक्स ओळखता येतात. भले मोठे इंग्रजी लेख कधी कोण वाचत असेल अशी शंका आहे . उदाहरणार्थ : "PM Modi's extra ordinary visionary economic step" किंवा "Dr. Swami exposes himself " नुसतं हेडिंग वाचलं की भक्तांनी पोस्ट लाईक केलीच पाहिजे. आपभक्त किंवा कॉंग्रेसभक्त किंवा इत्यादी ... बाब्या लाईक्स डन !
७. आशावादी लाईक : आपण जर दुसऱ्यांच्या पोस्ट लाईक केल्या नाहीत तर उद्या न जाणो आपल्या पोस्ट वर लाईकचा सुका दुष्काळ पडेल अशा भीतीने या वृत्ती सगळीकडे आपली इन्व्हेस्टमेंट करत असतात
८. पप्पूबनो लाईक्स : लाईक करून जादू पहा , लाईक करा आणि ६९ टाईप करून गम्मत जम्मत पहा वगैरे प्रकारात स्वत:च्या अकलेचे दिवाळखोरी स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण शुद्धीत केले जातात.
९. हेल्पिंग लाईक : आपण अमकी पोस्ट लाईक केली तर तमक्याच्या अकाउंट मध्ये ऑटोमेटीक पैसे जमा होऊन त्याचे दु:ख किंवा गरज पूर्ण होईल या भाभड्या आशेपायी वाहिलेले लाईक
१०. इमोशनल लाईक : देशभक्त असाल तर , आईवर प्रेम करत असाल तर , राजे पुन्हा जन्माला यावे असे वाटत असेल तर , गणपतीने दुध प्यावे असे वाटले तर , एकाच बापाची औलाद असाल तर , वगैरे भावनिक च्यालेन्जेसला आपल्या ५६ इंची छातीने स्वीकारणारे शूरवीर या प्रकारचे लाईक देऊन आपण पाईक असल्याचे "कोणाला?" सिद्ध करतात
एवढेच सुचले , अजून सुचले तर परत कधी !

Friday, July 11, 2014

थोर संगीतकार अनु मलिक



आम्हाला अनु मलिक कळले ते असा संगीतकार म्हणून की ज्याचं संगीत इतकं महान आहे की कोणी महान संगीतकार ते आधीच चोरतो  म्हणूनच . लहानपणापासून जसं घरी इंटरनेट आलं तसा आम्हाला इंग्रजी गाण्यांचे लिरिक्स डाऊनलोड करून तोंडपाठ करण्याचा छंद जडला . याला कारण म्हणजे इंग्रजी गाण्यांचे विडीयो. तर ते असो. अनु मलिक आणि माझी ओळख तशी काही डायरेक्ट नाही . नाही म्हणजे मी त्याला ओळखतो, पण तो मला ओळखत नाही.

बाजीगर मधली त्याची कलाकृती "मै मिला तू मिली .. तू मिली मै मिला .. दुनिया जले तो जले ..."  यासारखा अफलातून प्रकार मी आजतागायत कोणत्या बडबडगीतात देखील कधी ऐकला नाही. "अरे बाबा अरे बाबा करे क्या दिवाना .. लडका जब भी लडकी देखे गाये यही गाना " या अन्नू मलिकच्या गाण्याला मकारेना वाल्यांनी आधीच चोरलं होतं . मला नक्की आठवत नाही , पण बर्याच स्पानिश , इंग्लिश आणि काही काही तर म्हणे जपानी संगीतकारांनी अनु मलिक च्या धून आणि कम्पोजीषण चोरी करून ग्र्यामी वगैरे जिंकलेल्या आहेत .

उंची है बिल्डींग .. लिफ्ट तेरी बंद है ... वगैरे गाण्यांनी अन्नू मलिक च्या संगीतज्ञानाची उंची कळते . तो चिरका भसाडा आवाज ऐकला की खुद्द ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्यामुखी वेद वदवले ती घटना पुराणातली वांगी नसून खरी आहेत हे मनोमन पटते .
अन्नू मलिक चा अजून एक वाखाणण्या सारखा गुण म्हणजे त्यांचे परम शिष्य मा.प.पु. नवज्योत सिंग सिद्धू जे आपल्या ताबडतोड शायरी साठी प्रसिद्ध आहेत , त्यांची खरी प्रेरणा अनु मलिकच.

अनु मलिक चा अजून एक बोनस गुण म्हणजे , तो एक उत्तम जज/ज्युरी आहे. 12 Angry Men (1957) , इंडियन आयडॉल , एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा ,India Got tallent , आप की अदालत वगैरे सारख्या मालिकांतून उत्तम जजमेंट दिल्याबद्दल त्यांची शिफारस खरं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून व्हायला हवी . पण अन्नू मलिकला कधी तो डिजर्व करतो ते मिळालंच नाही , ही त्याची नाही तर भारतीयांची शोकांतिका आहे .

बऱ्याच जणांना अनु मालिक विषयी अजुन एक गोष्ट माहिती नसेल. माझे एक दूरचे काका सान्ताक्रुजला राहतात, त्यांचं फिल्मसिटी मध्ये येणं-जाणं असतं. ते सेट वर दुधाच्या पिशव्या , केळ्याचे गड , ब्रेड-बुरून-बनपाव वगैरे पुरवायच काम करतात . त्या काकांनी सांगितलेला किस्सा . अनु मलिक ला ५ केळी , एक ब्रेड चा अख्खा पुडा , दुध आणि वरून अमूल बटरचं एक अख्ख पाकीट एकत्र काला करून खायला आवडतं. त्याच्या हाताची बोटं इतकी मोठी आहेत की महिला ज्या बांगड्या हातात घालतात त्या बांगड्या अनुच्या बोटात बसतील. अनु हार्मोनियमची २-३ बटनं एकसाथ दाबतो . तबल्याची कितीतरी पानं अनुच्या बोटांनी हाय खाऊन फाटलेली आहेत.

खरच , एवढं असूनही अनु खूप डाऊन टू अर्थ आहे असे माझ्या त्या दूरच्या काकांचे मत आहे . अनु मलिक ला शतश: प्रणाम .

Saturday, July 5, 2014

क्रिकेटचा ओवरडोस

हे MCC विरुद्ध ROW ची म्याच म्हणजे थोर क्रिकेटर्सची मंगळागौर वगैरे वाटू लागले आहे. गेला बाजार सगळे राजकारणी एखाद्या गैरराजकीय कार्यक्रमासाठी एकच मंचावर जमले आहेत , आणि ते एकमेकांची अत्यंत मुक्तकंठाने स्तुती करत आहेत , हे जेवढं गुळचट वाटतं तेवढी गुळचट मला ही म्याच वाटते. फक्त आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघावा इतकंच सार काय ते यात. पण ते म्याच स्पिरीट , ते टशन आणायचं कुठून ?
मला लेट ९०ज किंवा २००५-६ च्या आधीचं क्रिकेट आठवतं. भारंभार सेरीज नसायच्या. श्रीखंडपूरी रोज खायला दिली तर त्यातला आनंद निघून जातो. त्यावेळीची श्रीखंड पुरी म्हणजे भारत पाकिस्तान म्याच. दौरा फिक्स झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ग्रामपंचायतीत जाऊन एकूण एक पेपरचं शेवटचं पान वाचायचो. त्यावेळी २४x७ न्युज च्यानेल्स नसत. पेपरात कॉलम्स वाचायची ओढ असायची. म्याच पाहिलेली असली तरी दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचायला मजाच यायची.
सईद अन्वर , अमीर सोहेल , वकार , सक्लेन , इंझमाम , सलीम मलिक, वसीम चा भरणा असलेली टीम गांगुली , तेंडूलकर, द्रविड,कुंबळे , अझुरुद्दिन , प्रसाद श्रीनाथ, नयन मोंगिया , मांजरेकर वगैरे लोकं असलेल्या टीम बरोबर खेळायची . त्यावेळी बहुतेकदा भारत हरायचा. म्याचेस शारजा मध्ये व्हायच्या. त्यावेळी पहिल्या बॉलपासून जो थ्रील असायचा तो थ्रील किमान मला शेवटचा कधी मिळाला ते आठवत नाही. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियातल्या म्याचेस मी रात्री २-३ वाजता उठून पाहायचो. तेंडूलकर ओपनिंग करायचा आणि चामिंडा वास किंवा एलन डोनाल्ड किंवा मेग्रा जेंव्हा रन अप घ्यायचे तेंव्हा काळजाचे ठोके ऐकू येत. वर्ल्ड कप मधल्या पाकिस्तान विरुद्धच्या म्याच मध्ये सचिन ने टोलावलेला थर्ड म्यान वरचा सिक्सर किंवा कॅडीकच्या त्या शोर्ट बॉलवर एक पाय पुढे घेऊन मिड विकेट वर खेचलेला षटकार , कधी हेन्री ओलोंगाची काढलेली लक्तरं तो सचिन पुन्हा अनुभवावासा वाटतो. सौरव गांगुलीचा ऑफ ड्राईव ऑफकट किंवा डाऊन द विकेट येऊन मिड ऑन ला ग्राउंड बाहेर टोलवलेला षटकार , किंवा सेहवागने एकाच ओवर मध्ये ५ चौकार मारणे , किंवा कुंबळेने दिवसभर रडकुंडी आणलेल्या स्टीव वॉ ची विकेट घेणे , हरभजनची कोलकात्यातली हेट्रिक किंवा सेहवागची मुलतानी ट्रिपल सेंच्युरी .... यात जे थ्रील होतं ते गवसत नाही. भारत हरणे किंवा जिंकणे मोठी गोष्ट असायची.
आता त्या निघून गेलेल्या मेमरीज या पद्धतीने खेळवल्या गेलेल्या गुळचट म्याचेसमुळे परत येणे नाही. लय क्रिकेट झालं चांगलं झालं का वाईट झालं ?