Monday, October 21, 2013

खोजागिरी पेशल


"आई आपल्याला पाच्रुपै दे.. आमच्या मंडळाची पोरं माळराणावर जाऊन खोजागीरी साजरी करणार हौत "
"अरे घरी करणार आहोत.. सगळे जण आहेत.. आणि तसंही तु दुध कुठं पितोस ? पैसे ऊगाच! "
" तेकायनाय.. पाच्रुपै पायजेम्हण्जेपायजे.. दुधाची पार घट्ट बासुंदी बनवणार आहे.. आणि भेळपण आहे.. पैशे दे"
हो नाही करत पाचचा डॉलर हातात पडतो ना पडतो तोच ग्लास आणि प्लेट घेऊन धुम ठोकत मंडळात हजर. अजुन एकेकाची यायची सुरूवात असते. कोणी स्वेटरमध्ये ,कोणी माकडटोपीत कोणी मफलर गुंडाळुन..
पाच्रुपै वसुल करण्यासाठी सगळे जेवण स्किप करुनच आलेले असतात. कोणी मोठं पातेलं आणतो.. कोणी स्टोव्ह... बरोबर ते बर्नर साफ करायची पिन अनुभवांमुळे न चुकता आणली जाते. एक टीम फरसाण मुरमुरे आणायला जाते.. ज्याच्या घरी म्हशी त्याच्याघरनं निम्म्या भावाने चांगलं विसेक लिटर दुध आणलं जातं.. धिंगाणा करायला एक बॅटरीवर चालणारा टेपरेकॉर्डर.
ऐन टायमाला कोणाला घरनं पाच्रुपै न मिळाल्याने न आल्याचे कळताच त्याला घरनं ऊचलले जाते.
आणि मग गॅंग माळराणावर !
किर्र अंधार.. पण गावापासुन लांब आल्यावर चंद्राच्या प्रकाशात हळु हळु स्पष्ट दिसायला लागतं. बोचरी थंडी.. पायाला टोचणारे खडे.. स्वच्छ आकाश.. आणि दुरदुरवर पसरलेलं माळराण.. चुकून एखादं झाड. हौशी शेफ स्टोव्ह पेटवायला घेतात.. दुसरा गाणी लावुन माहौल तयार करतो.. मी भेळचं पोतं ऊघडायचो. सगळे तुटुन पडत.. हळु हळु दुध तापुन त्यातल्या केशरमसाल्याचा सुगंध पसरतो. कोणीतरी 'दुधात चंद्र दिसल्याशिवाय पिता येणार नाही' म्हणुन वटहुकूम काढी. सगळे चुळबुळत वाट पहातात. नंतर कधी एकदा चंद्र दिसायचा अवकाश की सगळे दुधावर तुटून पडतात. डेरगं भरलं की परत डँन्स वगैरे करत जो तो आपापल्या घरी!
आताही करतात काही हौशी सोसायटीत टेरेसवर .. पण त्यात तो ल्हानपणीचा चस्का नाही किंवा मग माझी टेस्ट बदलीये. असो..

उपखजिनदार, भैरवनाथ बालमित्रमंडळ

आजचे फेसबुक अंडे

काही लोक लॉगइन केलं की दिसणारी प्रत्येक पोस्ट लाईक करत सुटतात.

काही लोक आपल्या पोस्ट ला कोण लाईक करतो त्याची ऋण फेडण्यासाठी ( आणि चढवण्यासाठी ) लाईक करतात

काही लोक फक्त स्वत:चे लाईक बघतात ... ते शक्यतो कोणाला लाईक देत नाहीत.

काही लोक आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट मधल्या पोस्ट विनावाचता लगेच लाईक करतात. उदा. मोदीसपोर्टर वा विरोधक

काही लोक हक्काने लाईक मागून घेतात जसे एखादा सावकार आपले पैसे मागतो. चावरे-चिकट लोक.

काही लोक पोस्ट कोणाची आहे हे बघून लाईक करतात .गुडबुकात राहण्यासाठी , मैत्रिणीशी लगट करण्यासाठी हे लोक पोस्टची लेंडी पडल्याच्या दुसऱ्या सेकंदाला लाईक ठोकतात .

काही लोक तर पोस्ट आवडली तरीही "कोणाची आहे" हे पाहून लाईक करत नाही. यामागे वैयक्तिक करणे असू शकतात. उदा. याने माझी मागची पोस्ट लाईक केली नव्हती. किंवा याने मला मागे कधी पैसे दिले नव्हते. एक्च्यूअल-व्हर्चूअल जसे असेल तसे ..

काही लोक लाईक करून कोणता फोटो थ्रीडी कसा दिसतो / लहान कॅन्सरग्रस्त मुलाचे प्राण वाचवण्यासाठी / शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येण्यासाठी / आईवरचे प्रेम वेरीफाईड करण्यासाठी / साईबाबा-हनुमान-शनीची कृपादृष्टी मिलावाण्यासाठी आणि १ लाईक = एक रिस्पेक्ट दाखवण्यासाठीही लाईक करतात .

ओम लाईकायनम: | ओम कमेंटायनम: ||
ओम शेयर करून कृपा मिळावायनम: ||

Sunday, October 6, 2013

अंत्यविधी

ठिकाण - स्मशानभूमी
वेळ - शक्यतो अर्ली इन द मोर्निंग सकाळची
काळ - मयतीला जनसमुदाय जमला आहे , कुठे मुंडनाचा कार्यक्रम सुरु आहे , कुठे भट मंत्र म्हणतो आहे, कुठे कोणी अंघोळी करतो आहे . आणि जमावा मध्ये कुजुबुज सुरु आहे. त्यातला हा एक सीन.

भारी फ्याशन आहे. पुण्यात गुंठ्याला भाव आला आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे अमाप पैसा आला. पैश्यातून कॉर्पियो आणि पावर आली. गल्ली-बोळातले पुढारी बोलावलं नसलं तरी उदाहरणार्थ बळेच मयतीला हजेरी लावतात. त्यांच्या सोबत काळ्या काचेचा आणि सोनेरी दांडीचा रेब्यान एव्हिएटर ट्रेड मार्क गॉगल घातलेले ४-५ चमचे असतात. पुढारी एकदम खादित असतात ,कांजी केलेली असेलच असे नाही . फुल झाब्बेदार झब्बा , काळे-कुळकुळीत , तोंडावर फुल मगरूरी. चमच्यांतले २-३ तंबाखू-गुटखा बहादूर .. आणि त्यांच्या लोकांना चुकवत बरोबर आजूबाजूला पडणाऱ्या लाल पिंका .. त्यांच्या निवडणुकीच्या चर्चा ...

या येळीला नगरशेवक "भाऊ"च बनणार ,
भाउंनी फुल फिल्डिंग लावल्याली आहे.
भाऊ यंदा धयहांडीला "सुनिती चवान" ( हे असेच वाचावे ) ला बोलावणार हाये.
भाउंनी ५० पोरं यमायडीशीत कामाला लावली.
देवळामागचा प्लॉट विकून पैसा आला की भाऊ पोर्ट फौंडेशन , रुग्णवाहिका अन युवा मंच आणि युवा प्रतिष्ठान ( हे सगळं एकसाथ बरंका ) स्थापन करणार हायेत.

मंत्रपठन वगैरे होतं. मयताचा पोऱ्या मुंडण करून , खांद्यावर घागर घेऊन उभा , अग्नी द्यायचा कालावधी आणि त्यावेळी पुढारी समोर येतात .मयताची माहिती देताना , त्याची ओळख नव्याने करून देतात .मयताराम येक महान गांधीवादी होते ... त्यांनी अख्ख्या आयुष्यात कशे गांधीची तत्व पाळली ( भले मयत रोडवर पिऊन पडायचा ) , त्यांला आमी लहानपणापासून बघायचो. शिस्तीचे अत्यंत कडक आणि अख्या येरियातल्या पोरान्ला शाळेत धाडण्यासाठी ते कायम आग्रही होते. आयुष्यात पैसा कसा वापरावा , देव कसा जाणावा . संसार आणि परमार्थ कसा साधावा याचे धडे कोणाकडून घ्यावे तर मयतारामाकडून ! त्यांच्या जाण्याने आपल्यात येक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली हाये. इत्यादी .
ईश्वराची आज्ञा , देवापुढे कोणाच काय चालत नाही , वैकुंठवाशी , कैलासवाशी , त्यांच्या आत्म्याला शांती , आणि त्यांच्या घरच्यांना आबाळाएवडे दुख सहन करायची ताकद इत्यादी वाक्यात सुरुवातीला आणि शेवटी "याठिकाणी" हेडर-फुटर लावून फुल बोलबच्चन घिसेपिटे डायलॉग हाणतात. मयतीला हजेरी लावून भाऊ रिकाम्या वेळात (कायमच रिकामे असले तरी ) स्वत:ची पब्लिकशिटी करून मग "कॉर्पियो" मध्ये बसून धूळ सोडत कुठे लग्न अटेंड करायला निघून जातात.

Wednesday, October 2, 2013

*** गांधीजयंती ***

*** गांधीजयंती ***

आज गांधींचा दिवस, त्यांच्या मार्गावर चालावे म्हणून च्यासाठी दुध आणायला शेळी शोधायला बाहेर पडलो. खूप खूप चाललो पण शेळी काही दिसली नाही. एक शेळी मटणशॉपवर उलटी विनम्रपणे लटकवली होती. मी मटण शॉपवाल्याला अहिंसेचे पालन करून शेळीपालन कर पण शेळीमटण करू नकोस म्हणून एक विनम्रपणे अनाहूत सल्ला दिला. त्याला इंग्लिश येत नव्हती मला चायनीज येत नव्हती. तरीही गांधीजयंतीच्या निमित्ताने विनम्रपणे सल्ला देणे अपरिहार्य होते. नंतर कुठे दोन मुलींची सोय होते का ते पाहायला गेलो पण तोच अस्मादिकांना घरी विनम्रपणे काठी घेऊन बसलेल्या कस्तूरबेची आठवण झाली. म्हणून सोसेल आणि झेपेल तितकाच गांधीवाद करावा असे ठरवले. शेळी काय भेटली नाही आणि शेळीचे दुधही भेटले नाही. शेवटी 'होमोजिनाइज्ड' आणि 'पाश्चराइज्ड' म्हशीचं दुध घेऊन आलो, कस्तूरबेने चहा बनवली. विनम्रपणे च्या ढोसून ऑफिसला निघालो. इकडे रोजच सौजन्य सप्ताह असतो त्यामुळे मी विनम्रपणे गुड मोर्निंग करण्याआधी वॉचमननेच मला ग्रीट केलं. रोज रोज त्याच्या अश्या ग्रीट करण्यामुळे मला सौजन्याचे काही वाटेनासे झाले आहे. तडक पुढे निघालो. बसच्या रांगेतही सगळे एकलाईन मध्ये होते. कोणीही विनम्रपणे मध्ये घुसत नाही किंवा कोणी बस आली म्हणून विनम्रपणे धावपळ करत नाही. पण तरीही आज गांधीजयंतीच्या निमित्ताने त्यांची अशी शिस्त पाहून दोन मिनिटे दुसऱ्या देशातही आपल्या देशातल्या महापुरुषाचा लोक आदर करतात हे पाहून विनम्रपणे उर भरून आला. पुढे ऑफिसला गेलो. ऑफिसात ढीगभर कामाच्या मेल पाहूनही आलेला राग विनम्रपणे गिळला. आज गांधीजयंती, काहीही झाले तरी संयम सोडायचा नाही. अहिंसेच्या मार्गाने एकेका मेलला रिप्लाय केला. आलेलं काम स्वावलंबन हा गुण अमलात आणून स्वत:ची कामं स्वत:च केली. इतर दिवशीही पर्याय नसल्याने स्वत:च करत असलो तरी आज गांधीजयंती असल्याने ह्याला विशेष महत्व आहे. नंतर दुसऱ्याकडे टीममध्ये विनम्रपणे फाळणी करावी म्हणून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून आलो. नंतर विनम्रपणे घरी आलो.
अशा रीतीने आज मी गांधीजयंती साजरी केली. खिशात आपण नेहमीच गांधीजी बाळगतो. पण आर्थिक व्यवहारातले गांधीजी आपण आचरणात आणि विचारांत आणताना कुठेतरी कमी पडतो. गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधी बाबांना विनम्र अभिवादन.

आज महात्मा गांधीची जयंती , म्हणून इतर दिवशी त्यांचे वंशज अर्थात राजकारणी गांधी घराणे, यांच्या विषयी काहीही वाईट बोलणार नाही, ऐकणार नाही, लिहिणार नाही म्हणून चंग बांधला होता. मोठ्या शर्थीने तो पाळला. गांधी परिवार की जय .. गांधी परिवार की जय .. गांधी परिवार की जय .. असा त्रिवार जयघोष केला. गांधीकट करावा म्हणून न्हाव्याकडे जाणार होतो पण वेळेअभावी जमले नाही, त्याचीच कुणकुण मनाला बोचत आहे.

जाता जाता : अजून एक कोणीतरी लालबहादूर शास्त्री वगैरे कोणीतरी होते, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.

- (शुभेच्छुक) महात्मा मोहनदास गोडसे, अहिंसावादी कोन्ग्रेस