Monday, May 13, 2013

जीमेल बंद पडले , राज्यात हाहाकार !!


जी-मेल पुन्हा बंद पडले ! भारतात पुन्हा अंध:कार , चारही महानगरांत कामकाज ठप्प !!

न्यूयॉर्क - जगभरातील 'गुगल'च्या युझर्सला आजकाल सकाळ-दुपार-संध्याकाळ "जी-मेल'ला लॉगिन करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 'जी-मेल'ला लॉगिन करताना '502 एरर' दाखवत आहे. ह्या प्रकारामुळे अरबो भारतीय त्रस्त झाले आहेत. बऱ्याच जणांना अन्न गोड लागत नाही, काहींनी जलपान त्याग केले आहे, असे फेसबुक आणि ट्विटर च्या अहवालावरून दिसते. काहींनी रामलीला मैदानावर गुगल विरोधात बेमुदत उपोषण कम आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. कॉंग्रेसचे प्रकुत्ते आय मीन प्रवक्ते डॉगविजय सिंह ह्यांनी ह्या प्रकारामागे RSS चा हात असल्याचे जाहीर पत्रकार सभेत सांगितले. तर अलीकडेच फेम प्राप्त झालेले मनीष तिवारी यांनी आमच्या पत्रकाराला हा प्रश्न विचारल्यावर " तुम कीस मुह से गुगल बंद पडणे की बात करते हो ? तुम्हारा न्यूज च्यानेल तो चालू होके भी बंदके बराबर है." असा उलटा डाव टाकला . अंबिका सोनी यांनी ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होई पर्यंत ह्या मुद्द्याला जास्त हवा देऊ नये असे सांगितले. कपिल सिब्बल यांच्याकडे गुगल मेल बंद बद्दल प्रश्न विचारताच त्यांनी पळ काढला. मायावतींनी गुगल जोवर नोकर्यांत दलितांना ३०% आरक्षण देत नाही तोवर उत्तर प्रदेशात जीमेल बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर मुलायम सिंग यांनी जीमेल बंद पडल्याचे खापर सरकार वर फोडले आहे. बीजेपी ने लोकसभा आणि राज्यसभेत जीमेल-एरर ५०२ चा बुद्द उचलून धरत गोंधळ घातल्यामुळे आज दोन्ही सभागृहे तहकूब करण्यात आली . 
शिवसेनेचे अध्यक्ष मा.उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्राला दिलेल्या २३ पाणी मुलाखती मध्ये "गुगल चे डोके ठिकाणावर आहे काय ? " अशा शब्दांत गुगलवर हल्लाबोल केला आहे. संजय राउत ह्यांनी उद्धवजींच्या ह्या मुलाखतीमुळे गुगलवाल्यांच्या तोंडाला घाम फुटला असल्याचे बोलून दाखवले. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुगलच्या मराठी भाषांतर सुविधेबद्दल संतोष व्यक्त करतानाच गुगल बंद पडण्यामागे बिहारी लोकांच्या अमर्याद लोंढ्यांना कारणीभूत ठरवले. शरद पवारांनी येत्या मोसमात मान्सून नंतर जीमेल सुरळीत होण्याचे भाकीत वेधशाळेच्या संदर्भावरून सांगितले. तर त्यांचे सोज्वळ पुतणे म्हणाले की गुगल च्या सर्व्हर्स मध्ये जागेचा अभाव आहे ,तिथे मुतायला देखील जागा नाही. दादांनी असे वक्तव्य करताच त्यांच्या चमच्यांनी त्यांना भरभरून हसून दाद दिली. पण चूक लक्षात आल्याबरोबर दादांनी परत २ मिनिटांचे उपोषण आणि मौनव्रत करून प्रायश्चित्त करून घेतले. आर आर पाटलांनी "बडे बडे सर्व्हर्सपे ऐसी छोटी मोटी घटनाये होती रेहती है" म्हणत प्रश्नाला बगल दिली . 
लालकृष्ण अडवाणींनी जीमेल बंद पडण्याच्या कारणमीमांसा आपल्या ब्लॉगवर स्पष्ट करताना म्हटले आहे की, "भाजप सत्तेवर आल्यास आणि मी प्रधानमंत्री बनल्यास  राममंदिरासोबत जी-मेल सर्व्हरची उभारणी आपण नव्याने करू! " तर मोदींनी सद्भावना उपास करून गुजरातेत जीमेल अखंडित चालू असल्याचा दावा केला. राहुल गांधींच्या मतानुसार जी-मेल सर्व्हर  ह्यांगण्यामागे काहीतरी टेक्निकल कारण असून, त्यांच्या कोड मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. आपल्याला गुगलने चान्स दिल्यास ते २ मिनिटात जी-मेल सर्व्हर अप करू शकतात असा विश्वास राहुल गांधींना वाटतो. मागे एकदा राहुल गांधींचा लेपटॉप बंद पडलेला तेंव्हा त्यांनी तो तब्बल २ दिवसांत सुरु केला होता. राहुल गांधीनी  MH-CIT ही प्रतिष्ठेची संगणक परीक्षा ६व्या खेपेत पास केली आहे. ममता ब्यानर्जीनी ह्यावर काम्युनिसमचा आरोप लावला आहे. जस्टीस मार्कंडेय काटजू यांनी मात्र जीमेल ला भारतरत्न देण्यात यावे ही मागणी परत पत्राद्वारे राष्ट्रपतींना कळवली आहे.  
एलबीटी विरोधात आंदोलन करत असलेले अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे सहचिटणीस आबासाहेब कानगोळे यांनी सांगितले की गूगलने जी-मेल बंद ठेवून  आम्हाला  पाठींबा दिलेला आहे.  सदाशिव पेठेतल्या आप्पा कुलकर्ण्यांनी गणपती पाण्यात बुडवून ठेवला आहे  तर त्यांच्या पत्नी सौ. निर्मला कुलकर्णी सारसबागेतल्या गणपतीला अर्धी प्रदक्षिणा घालून बाप्पा कडे साकडे घातले आहे . जी मेल बंद असल्याने कुलकर्णी कुटुंबीय त्यांच्या अमेरिकेत पाओ अल्टो मध्ये याहू! नामक नामांकित कंपनी मध्ये ज्युनियर सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या मुलाशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांची पुरती अडचण झाली आहे.  आसाराम बाप्पुंनी मेल ची होळी खेळत रेडीफ मेल या एकूण १३ युजर संख्या असलेल्या मेल सर्व्हर वरून १००१ मेल्सचा स्पॅम कम पाउस पाडला. अनिरुद्ध बाप्पुंनी आपल्या भक्तांकडून आजच्या सत्संगात  " ओम गुगलमेल प्राप्ती | जीमेलाय नम: || " ह्या मंत्राचे ५१,००० वेळा नामस्मरण करून घेतले. ढोकळा मोहरी ऐवजी जिर्याची फोडणी देऊन तो शेजवान चटणी सोबत खावा, जीमेल सर्वर वर कृपा होईल , असे निर्मल बाबा म्हणाले .  मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा गुगल ला बसल्या आहेत असे एका महिलेने डोक्यावर २ हांडे पाणी आणता आणता आमच्या पत्रकारास सांगितले.  
दरम्यान रॉयल च्यालेंजरच्या फ्यांसच्या मतानुसार क्रिस गेल च्या धडाकेबाज फलंदाची मुळे जीमेल सर्व्हर गंडल्याचे सांगितले तर पुणे वॉरियरचे चाहते श्रीरंग गोखले म्हणाले की अशोक डिंडाने  बोलिंग रणप घेताना जेंव्हा उडी मारली तेंव्हा तो गुगल सर्व्हर जिथे रन होतो त्या क्लाउडला धडकला आणि जीमेल बंद पडले. तर बहुतांश लोकांचे असे मानने आहे की सर जडेजांनी एक वन लाइनर मेल पाठवल्याने जीमेल बंद पडले आहे, पण सरांविरुद्ध बोलून अवलक्षण ओढावून घेण्याची कोणाची हिम्मत होत नाही.

मनमोहन सिंघ यांनी जीमेल बंद पडल्याबद्दल २ मिनिटे मौन पाळून आपला शोक व्यक्त केला. आणि लवकरच जीमेल सुरळीत करावे असा आदेश CBI ला दिला.

- कॅमेराम्यान आरती छडबडिया सोबत मी टारझन , जंगलन्यूज .

1 comment:

.. .. said...

lai bhari mitra... jikalyas