दहावीची परिक्षा झाल्यावर आमची बदली झाली. बाबांचं काम भोसरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीत असल्याने इकडे बदली झाली. सगळं काही कळायच्या आत बदलत होतं.
"आई .. मला नाही गं जायचं इथून .. बघ ना माझे सगळे मित्र इथे आहेत . ती इथेच आहे .. कसा गं येऊ मी ? मला नाही करमनार तिकडे !! नको ना जाऊया आपण कुठे!"
सगळा सामान टेंपोत भरला. माझी चित्रकलेची वही, त्यावर मी तिचं न् माझं काढलेलं चित्र मी उराशी घेऊन मागून सरसर जाणारं दृष्य पहात होतो. इकडे आता कधीच येणार नव्हतो. लांबूनच तिचं घर दिसलं ; डोळे पानवले , गळा भरून आला आणि मी हंबरडाच फोडला ! बाबांना वाटलं मित्र तुटल्याने मी रडतोय की काय ? ........
इकडच्या निमशहरी वातावरणात रुळायला वेळ लागला. तिकडे आम्हाला सकाळी लवकर उठून रहाटावरून पाणी आणायची सवय होती. आणि इकडे तर चोविस तास पाणी ? अंमळ मौज वाटली. पण तिकडच्या मोठ्या घराच्या तुलनेने हे घर अगदीच अंगावर येणारं होतं .. तिकडे तर मी घरात सायकल चालवायचो. भला मोठ्ठा हॉल होता. आई घरी नसली की पुर्ण फरशीवर पाँड्स सांडून गुढग्यांवर स्केट करायचो ! इकडे काहीच नाही... ती सद्धा
नकळत प्रत्येक बाबतीत मन तुलना करत होतं मी रिझल्ट आणायला गेलो तेंव्हा ती परत दिसेल ह्या आशेने! पण साला तिथे रिझल्ट घ्यायला तिचा राक्षस भाऊ हजर होता. मी आपला मुलांच्या घोळक्यात होतो. कोणत्याही रिझल्टला दोन प्रकारचे सिन्स हमखास पहायला भेटतात. पहिला म्हणजे टॉप रँकने पास होणारे किंवा शुवरशॉट दणकून नापास होणारे .. ह्यांना रिझल्टचं काडीमात्र टेंशन नसतं! आधीच माहित असतो ना ? दुसरा गृप म्हनजे अनपेक्षित निकाल वाल्यांचा .. ह्या गॄपमधल्यांच्या प्रतिक्रिया एकदम टोकाच्या असतात. अनपेक्षित पास झाला तर आनंद गगनात मावत नाही,, अनपेक्षित नापास झाला तर रडू आवरत नाही. मी पहिल्या प्रकारातला ! बोर्डावर टॉप ५ विद्यार्थ्यांची नावं होती .. त्यात सर्वांत खाली "टारझन" लिहीलेलं दिसलं आणि सुखावलो. शिवज्या अनपेक्षित पणे पास झाला होता. ९वी पर्यंत गटांगळ्या खाल्लेला .. १०वीत एका दमात पास ! स्वारी खुष होती. मध्या मात्र इंग्रजीत आटकला होता. कोणाशीही काही न बोलता तो निघून गेला. वर्षा मराठीसकट ४ विषयांत नापास झाली होती. फक्त संस्कृत/हिंदी आणि इतिहास्/भुगोल क्लियर केला होता. पण तिला त्याचं सोयरसुतक नव्हतं .. अशीच फिदीफिदी हसत ती निघून गेली. "ती" मात्र आलीच नव्हती.
"फर्स्टक्लास मधे आली" एवढाच समाचार मिळाला.निराश होऊन घरी आलो.
इसवीसन २०००-२००१ :
आता ११वी अॅडमिशनचे वेध लागले होते. लोंढ्यात सर्वांत हुशार मुले सायन्स ला अॅडमिशन घेतात तशी मी ही घेऊन टाकली. ११वी चा पहिला दिवस अजुनही आठवतो. पावसाळ्याच्या दिवसांत ज्यु. कॉलेजातला पहिला दिवस. कॉलेजात जाणार म्हणून प्रचंड उत्साह ! तेंव्हा शाहिद कपूर असलेला एक कोणता तरी अल्बम रिलीज झाला होता "पहेला दिन है कॉलेज का .. डर लगता है " .. आता हे गाण किती ही बकवास असलं तरी ते त्यावेळी लै भारी वाटून गेलं! मी तर खेड्यातुन आलेल्या घाटी होतो एकदम. बाकी पोरं - पोरी एकदम मॉडर्न वाटणारे कपडे घालून आले होते. मी मात्र आमच्या "त्रिमुर्ती टेलर्स" ने शिवलेला फेंट पिवळा शर्ट आणि निळी पँट घालून बुजगावण्या सारखा वाटत होतो. प्रचंड काँप्लेक्स आला होता. वर्गात सगळे नविनच पोरं पाहुन भेदरलो होतो. पोरी तर काय जिन्स - टिशर्ट वाल्या !! आईईईल्ला ! मी नुसता आ वासून पहात होतो. इकडे पाहु की तिकडे ? असं झालं होतं. माझ्या क्लास मधे माझ्या पेक्षा ही उंच पोरं होती .. काही बुटलर होती .. काही स्मार्ट होती.. काही तर माझ्यापेक्षा १० पट रदाळही होती. ज्यु.कॉलेजला शाळा अटॅच असल्याने पुष्कळ मुलं इथलीच होती, पण माझ्या सारखे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ही बरेच नग होते. ह्या सगळ्या नविन वातावरणात मी बावरलो होतो पण असं होणारा मी एकटाच नव्हतो.
पहिल्याच दिवशी तीचं असं दर्शन होऊन मी असा तीच्या प्रेमात पडेल असं वाटलंच नव्हतं ! बर्याच पोरी सुंदर वाटल्या तरी कोणाकडे आकर्षित वगैरे झालो नव्हतो. तीनं मस्त आकाशी कलरचा पंजाबी घातला होता. तीच्या गोर्यापान त्वचेवर तो सुटही करत होता. लांबसरळ नाक , मंद डोळे आणि गालावर पडणारी खळी पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडला नाही तर नवलंच.. तिचे दात तर अगदी पांढरेशुभ्र आणि एकसरळ होते.. इतके छान की पेप्सोडेंटच्या जाहिरातीत सहज काम मिळावं ! केस अगदीच लांब नसले तरी शॉर्ट ही नव्हते. त्यात तीचं ते चालताना माने ला झटका दिला की तालात केसांचं उजवी-डावीकडे उडनं अगदीच मनमोहक होतं! त्या दिवशी वर्गात एंट्री करताना ती मला धडकलीच! मागे पहात पुढे चालली होती आणि माझं लक्षं घड्याळात होतं ! नजरानजर झाली. ती स्वत:हूनच हसली. आणि मी एकदम बाजुला होऊन निर्विकार पणे सॉरी बोललो. पुन्हा अशीच नजरानजर व्हायची ! ती हलकेच हसून पुढे निघून जायची. पण थेट जाऊन बोलण्यात आम्ही अजुनही यथातथाच होतो. माझा आणि तिचा बेंच बरोबर लाईनीत होता. थोडी मान मागे वळवली की तिचा हसरा आणि टवटवीत चेहरा दिसत असे. तीच्या लांब नाकामुळे तिला पोरांनी "राघू" (पोपटाच्या चोचे सारखं नाक आहे म्हणून) चिडवायला सुरूवात केली होती. अर्थात मला त्या पोरांचा फार राग येत असे.
नविन वातावरणात सगळंच मागे पडलं ! इथे पुर्ण सेट झालो. माझी ष्टोरी अजुन नजरा-नजर करण्यापलिकडे काही जातंच नव्हती. काही दिवसांत तिच्या बरोबर एक काळपट (माझ्या पेक्षाही काळी हो) पोरगी तीची मैत्रिण झाली. त्या दोघी बरोबर राहू लागल्या ! ( ज्युनियर कॉलेज काय नी शाळा काय , एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते , ती म्हणजे एखाद्या चिकण्या पोरीबरोबर एखादी सर्वसामान्य जिच्यात कोण्णीही इंटरेस्टेड नसतो , अशी पोरगी चिकटलेली असते. ते शार्क माशाच्या फिन्स च्या बाजु ला नाही का एक छोटा परजीवी मासा चिटकून राहात असतो .. तसा ! मी काढलेलं अनुमान असं की , चिकण्या दिसणार्या मुलींना आपल्या बरोबर एक सामान्य पोरगी असल्याने तुलनेत जास्त भाव भेटतो म्हणून तिच्याशी त्या सलगी करत असाव्यात. आणि सर्वसामान्य पोरीला एकटं राहिलं तर कोण कुत्रं ही भाव देणार नाही म्हणून ती चिकण्या पोरीबरोबर राहून खोटा खोटा का होईना भाव खाऊन घेत असते. असो) ! एक नंबरची थर्ड क्लास पोरगी ! त्यावेळी आम्ही "शक्तिमान" ह्या सिरियल चे फार मोठे फॅन होतो. त्यात एक
"शैतानी बिल्ली" नावाचं कॅरेक्टर होतं ! लागलीच हीचं नामकरन करून टाकलं! "शैतानी बिल्ली" म्हणून तिला प्रसिद्ध करायला काही कष्ट करावे लागलेच नाहीत. राघू आणि शैतानी बिल्लीची एकदम घट्ट मैत्री होती. शैतानी बिल्लीच फक्त एक काम असावं ! मी राघू कडे चोरून वगैरे पाहिलं .. की तीला रिपोर्ट करने ..
अनलाईक आमची शाळा, इथे ज्यु.कॉलेजात माझ्यासारखी(/पेक्षा) दंगा करणारी पोरं फार होती. आमच्या कॉलेजाची ट्रिप काढायचं ठरलं होतं .. पाषाण जवळ कुठेसं कसलं वैज्ञानिक संमेलन भरलं होतं तिथे घेऊन जाणार होते. "प्रकाश जगताप" उर्फ "पक्या" हा महा कार्टून प्राणी माझ्या मागच्याच बेंच वर बसत असे. साला .. हा सुद्धा राघू वर लाईन मारत असे .. म्हणून माझ्या तो डोक्यात जायचा. तर झगडे सरांनी ट्रिप साठी नावं लिहायला सुरूवात केली. पक्या बोंबलला .. "सर.. मी येणार नाही !!" .. सगळीकडेच शांतता झाली ! झगडे सर म्हणारे " येस .. जगताप ? का येणार नाहीयेस ?" झगडे सर असले की वर्गात पिन ड्रॉप सायलेंस असे. पक्या बोलला ..." सर .. अडचण आहे ...." बोलून पुर्ण होत नाही तेवढ्यात मला एकदम मोठ्याने हसू आलं ! पक्या काय बोलून गेला हे पोरांना दुसर्या सेकंदाला कळालं ! एकंच मोठी हास्याची लाट पोरांच्या साईडने तयार झाली ! तिसर्या सेकंदाला पोरींनाही कळलं ! वर्गात हसण्याचा अगदी "रेझोनंस" तयार झाला ! नेहमीच खडूस दिसणार्या झगडे सरांनाही हसू फुटलं ! राघू अगदी मनमोकळं हसायची ! माझ्या प्रतिक्रियांना तीचा खाली +१, आणि हास्यपताका ठरलेलीच असायची. आजही ती इतकं मोकळ्ं हसत होती की पुर्ण वर्ग तसाच हसत रहावा.. न मी तीचं जाऊन एक चुंबण घ्यावं असं मनात आलं ! पण हे सगळंच मनात.. झगडे सरांनी "सायलेंस प्लिज !!" म्हंटल्यावर वर्ग क्षणभर शांत झाला ! पण पुन्हा एकसाथ सगळे हसले ! सरंही हसले! तो दिवस पुर्ण पणे हसण्यातंच गेला ! पुर्ण ११वी-१२वी पक्याला पोरं येता जाता विचारायचे .. "काय पका.. आज अडचण आहे का?" पक्या आपला ओशाळून जायचा ! माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या धाग्याचा खरडफळा झाल्या सारखा आनंद मला होत असे. ती सहलीला येणार, पण साला ती शैतानी बिल्ली काय तिला एकटं सोडत नाही. आणि राघू कडे पाहिलं की ही माझ्याकडे अशी नजरेला नजर भिडवूनच पहात असे. ते मला फार अनकंफर्टेबल वाटायचं ! साला का ही आपल्याच राशीला आलीये ? म्हणून मी शैतानी बिल्लीला जाम शिव्या घालायचो ! सहलीच्या दिवशी मी एकदम रेक्सोना डिओड्रंट वगैरे मारून हजर होतो. तीने ब्लॅक पंजाबी घातला होता. ती इतकीही मोहक दिसू शकते ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.. कानात नव्या इयर रिंग्ज , मोकळे सोडलेले केस .. आणि नेहमी प्रमाणे ते इकडून तिकडे झुलवत ती जेंव्हा आली तेंव्हा एखाद्या हिरॉइनने एंट्री मारावी असा भास झाला. मी आ वासून नुसताच पहात होतो. माझ्यात कुठून बळ आलं .. आणि मी तिला डायरेक्ट जाऊन म्हणालो .. "ओह्ह!! तू ज्याम सुंदर दिसते आहेस आज !!" त्यावर तीने नुसत्याच भुवया हालवल्या... माझ्या मागून कुठून ती शैतानी बिल्ली आली आणि तीला घेऊन गेली ! मी बिल्लीचा पुन्हा एकदा मनभरून उद्धार केला ! विज्ञान प्रदर्शन पहाताना तीही डोळे वाकडे करून माझ्याकडे पहात्ये असं मला जाणवत होतं ! मग च्यायला मी का मागे राहिलोय ? "लढ बापू" म्हणून तिच्याकडे जायचो .. आणि ती बिल्ली समोरून अशी रोखून बघे की माझी हिम्मत निम्म्यापर्यंत खल्लास होत असे. न मी टर्न मारून दुसरीकडेच निघून जायचो. त्या दोघी मागे फिदीफिदी हसल्याचं मला कळायचंही ! पण काय करू शकत होतो मी?
हा हा म्हणता ११वी संपली .. आणि १२वी साठीचे एक्स्ट्रा लेक्चर्स सुरू झाले. रुपाली आमच्याच क्लास मधली. ह्याच शाळेतून कॉलेजात आलेली असल्यानं तीची सगळ्या मास्तरांशी चांगलीच ओळख होती. पोरं म्हणायची ,शाळेत अगदीच शेंबडी होती रे .. आता अचानक फॉर्म ला आलीये आता फॉर्म ला येण्याचं काही वेगळं कारण सांगने जरूरी आहे का ? रुपाली जो पाहीन त्याला लाईन देत असे. आणि एवढी आव्हानात्मक पोरगी आपल्याला लाईन देते म्हंटल्यावर पोरं बाकी जाम खुश होत. टवाळ पोरी ती लंच ब्रेक मधे पाणी प्यायला टँक कडे जायला लागली की जिन्यातून "ए ...एएएए.. आली फॉर्म ला .. आली फॉर्म ला ! " असल्या कमेंट पास करत .. मला तीच्यासाठी फार वाईट वाटायचं ! पण च्यायला .. ही तर एकदमंच खुश व्हायची ! मला जाम आश्चर्य वाटायचं ! तर एकदा असंच कॉलेज संपल्यावर पोरांनी मला चढवायला सुरूवात केली. रुपाली आमच्या थोडी पुढेच चालली होती. पक्या म्हणाला .. तू तिला आवाज टाक .. उद्या तुला २ वडापाव देतो. (११वी-१२वी ला वडापाव ही आमची करंसी होती. आपल्या व्यवहारात जसा डॉलरला भाव असतो आणि तो कुठेही एक्सचेंज करून भेटतो तसं त्यावेळी वडापाव होता.) माझ्यात कुठून डेयरिंग आलं कुणास ठाउक.. मी जोर्रात आवाज टाकला .. "ए रूप्पाआआ .........!!" रुपा गिरकी घेऊन मागे पहाणार .. इतक्यात सगळी पोरं माझ्या पासून लांब .. एकटा पक्या मी , आब्या अन बोरक्या.. चौघेच सापडलो. दुसर्या दिवशी सकाळी वर्गात थोडा लेटंच पोचलो. झगडे सर आणि रुपाली काहीतरी बोलत होते. काळजात धस्स्स झालं ! मला चढवून देणार्यांमधे पक्या आणि आब्याच होते. सरांनी बाप्याला छडी आणायला सांगितली ! हा मुर्ख त्याऐवजी कसलासा मोठा लाकडी स्केवर बार घेऊन आला. ते सरांचा हातात अगदी गदा दिल्यासारखं दिसत होतं .. मला हसू आवरलं नाही .. न हे सरांच्या तावडीतून काही सुटलं नाही. "चला २६ नंबर मधे !' -सर ( २६ नंबर म्हणजे बायो लॅब , इथे डांबीस पोरांना नेऊन छान बडवण्यात येत असे अशी दंतकथा प्रचलीत होती) २६ नंबर म्हंटल्याबरोबर आमची तंतरली .. पक्या म्हणाला ... "सर मी काय नाय केलं ओ.. ह्या टार्यानेच आवाज टाकला होता.. विचारा .. रुपाला विचारा " पक्या ज्या टोन मधे बोलला त्यावर पुर्ण वर्ग हसला ! मी आपला निलाजर्या सारखा वर गेलो .. कसलं ही अर्ग्युमेंट केलं नाही. जेवढा मार भेटला तेवढा गुपचूप खाल्ला. बोरक्या ने विनाकारन मार खाल्ला होता. त्यामुळे बोरक्या मला पुढचा महिनाभर रोज शिव्या घालायचा. सगळे स्वतःला डिफेंड करत होते. पण सरांना २६ नंबरची प्रतिष्ठा राखण्यासाठी आमची कणिक तिंबवणे जरूरीच होतं !
असो .. तर ह्या प्रकरणात माझं नाव आल्याने मी काही काळ राघू शी नजरानजरही टाळू लागलो.
पुन्हा सगळं नॉर्मल झालं ! माझा एक वर्गमित्र होता. तो न मी येतांना बर्याचदा बरोबर असायचो. गरब्याच्या वेळेस मी राघू च्या घराजवळ दांडिया पहायला जायचो. ती असायची! राघू फारंच सुंदर दांडिया खेळायची ! मी तिच्यासाठी गरब्याला येतो हे तिला न कळण्याइतकी ती मुर्ख नक्कीच नव्हती ! सुंदरसं स्मित देऊन मी जणू माझं स्वागत करायची ! ह्या सगळ्या मला विनाकारण पॉझिटिव्ह साईन्स वाटत होत्या! कॉलेज ३ किलोमिटर लांब होतं ! परताना आम्ही सगळे गृप- गृपने यायचो.
त्या दिवशी राघू आणि शैतानी बिल्लीचं काही तरी शिजत होतं .. दोघी माझ्याकडे पाहून काहीतरी हसत होत्या. मला काहीच उलगडा होत नव्हता ! पण मला तिच्याकडे एक गुलाबी कार्ड दिसलं होतं ! मी उगाच काहीतरी वेगळं असेल म्हणून इग्नोर केलं. त्या दिवशी कॉलेजातून परत येत होतो.राघू आणि शैतानी बिल्ली पुढेच होत्या. मी आणि तो एका अरुंद वाटेतून चाललो होतो. अचानक शैतानी बिल्ली थांबली. माझ्या रोखाने ती चालत आली. मला अगदीच कससं झालं ! मी घाबरलो होतो. तेवढ्यात तिनी माझ्या हातात एक पाकिट टेकवलं !! आणि म्हणाली , "हे त्याच्या साठी आहे .. तीने दिलंय !" कानाखाली प्रचंड जाळ निघाल्या सारखं झालं !! झांझेचे कर्णकर्कश्य सुरू ऐकू येत आहेत असं वाटलं ! डो़यासमोर क्षणभर अंधारी आली. तोंडातून शब्दंच फूटेना.. मला काही सुधरत नव्हतं ! मी फक्त एखाद्या रोबॉट ने आज्ञा पाळावी तसं ते पाकिट घेतलं ! त्या ने ते उघडलं , मला जे अपेक्षित ते तेच होतं ! तिने स्वत: ... हो .. तिने स्वतः त्या ला प्रपोज केलं होतं ! जिला मी इतके दिवस साधी-सरळ पोरगी समजत होतो.. तीने स्वत:हून दुसर्याच कोणाला प्रपोज करावं ... हे फारंच क्लेशदायक होतं ! डोळे ओलावले नसले तरी रडू मात्र येत होतं ! त्याला बहुतेक ह्याची कल्पना असावी ! त्याने ते लेटर घेऊन त्याचं एक चुंबन घेऊन तिच्याकडे हात केला. मी विखुरला गेलो होतो. आत कोणीतरी फटाक्यांनी माळ लावली होती काय ? माझी कानशीलं प्रचंड तापली होती. सगळं घडायला एक मिनीट ही लागला नव्हता ! पण माझ्या डोळ्यांसमोरून पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत .. सगळं एकामागून एक धावत गेलं ! मी बधीर सारखा उभाच होतो.
एका क्षणात प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. मला तिचं नाव काढलं तरी प्रचंड राग येत असे. आठवडा गेला .. मी ना तिच्याकडे पहायचो .. ना त्याच्याशी बोलायचो. जागा ही बदलून घेतली होती. सगळीच पोरं माझ्यावर हसायची . मला "दिलजले" हे नाव मिळालं होतं ... वर्गातलं छटाक पोरगं पण येऊन चिडवून जायचं .. मी दु:खी झालो होतो.
आणि एक दिवस,आमच्या बॅचचं फिजिक्स चं प्रॅक्टिकल चालू होतं !! लॅबच्या बाहेरून शैतानी बील्लीने मला आवाज दिला .. मागे राघू उभी होतीच. पुन्हा हातात काही तरी होतं ! माझा स्वाभिमान अचानक जागा झाला होता. जाऊन काही तरी बोलूच म्हंटलं ! सगळी पोरं खिडकी पाशी जमा झाली ! बिल्ली म्हणाली तीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मी शहारलो. मला वाटलं तीला पश्चाताप झाला असेन.' चल तुला माफ केलं ' असं मनाशीच म्हणत तीच्याकडे गेलो. ती हसली ! हात पुढे कर म्हणाली ... मी हात पुढे केला. तीने तो बॉक्स ओपन केला .. आणि माझ्या हातावर एक सुंदरशी राखी बांधली ! लॅबमधून हसण्याचा मोठ्ठा आवाज आला .. प्रत्येक जण वेगवेगळ्या सुर-तालात हसत होता. कोणी तरी .. "एएएए दिलजले" ओरडला . मला मनात हिरण्यकश्यपुचा वध करणारा नरसिन्हाचा अवतार आठवला ! घ्यावी हीला आणि त्या बिल्ली ला आणि दोघींचे कोथळेच बाहेर काढावेत ! मग त्या पोरांचे ..सगळीकडे रक्तंच रक्त !
भानावर आल्यावर ती राखी तोडून टाकली आणि माझी बॅग उचलून घरी निघून गेलो. कोणाशीही बोलणे टाळतंच होतो.
त्या दिवशी फ्रेंडशीप डे होता. शैतानी बिल्ली एकटीच होती. मी वर्गात गेलो.. बॅग ठेऊन बाहेर येत होतो. मुलांचा घोळका कॉरिडोर मधे उभा होता. शैतानी बिल्ली आली आणि मला हाक मारली ! माझ्या भुवया उंच झाल्या ! .. मी तिच्याकडे वळलो .. तिने कुठूनसा रेड रोझ काढला .. आणि मला दिला ! एक डोळा ही मारला ! माझ्या नसा पुन्हा टाईट झाल्या ... सगळे जण माझा तमाशा पुन्हा पहात होते. मी स्मित करतंच तो गुलाब घेतला ! पोरांकडे पाहून हलकाच हसलो ! मग तो गुलाब असा फट्टकन जमिनीवर आदळला ! त्याला बुटाने पार कुचकारला ! आणि तीला मोठ्याने म्हणालो ! ... "तुझ्या आवशीचा घो............." एखाद्या पोरीला आयुष्यात पहिल्यांदाच असा अपशब्द वापरला होता, पण त्यचं गिल्ट कुठेही नव्हतं ना पश्चाताप होता. पोरांनी एकंच हुर्रेर्रेर्रे केला ! त्यानंतर मला कोणी चिडवलं नाही !
पण त्या अरुंद गल्लीत झालेला माझा पोपट .. केवळ अविस्मरनीय !!!
(त्याला राघू च्या भावांनी आणि त्याच्या गॅंगने मिळून एच.एस.सी. च्या एका पेपरला भरपूर तुडवला .. शिवाचे पुर्ण कपडे मळालेले होते. डोळे काळे निळे झाले होते. त्यादिवशी मी म्हणालो .. "च्यायला ! वाचलो !!!" )
No comments:
Post a Comment