णमस्कार्स लोक्स ,
इसविसन १९९९ :
दहावीत होतो. तेंव्हा समज नावाचा प्रकार नसतो ! चार पोरं ज्या पोरीवर लाईन मारतात , उरलेला वर्ग तिच्यामागे मेंढरासारखा.. म्हणजे फक्त नावाला बरंका ! कोणात साधी बोलायची देखील हिम्मत नसे मपलं काही वेगळंच होतं .. नववी पर्यंत जिच्यावर साधी कोणाची नजरंही नव्हती .. ती अचानक दिल की धडकन वगैरे झाली. त्याला कारणंही तसंच होतं म्हणा .. माझा आणि तिचा बेंच एकदम शेजारी शेजारी आला होता. अचानक नजरानजर व्हायला सुरूवात झाली. आणि "कुछ कुछ होता है" चं फिलींग यायला सुरूवात झाली. रोज शाळेत जायची ओढ लागलेली असायची. निघताना "हत्त .. उगाच सुटली राव शाळा" असं वाटे. तिच्याशी नजर भिडे ती अर्धा -एक सेकंदंच ... पण हे म्हणजे कॅमेर्याच्या फ्लॅश सारखा अंगातला करंट झटक्यात वाढवून जात असे. त्यानंतर हार्टबिट्स जरा जास्तंच वाढत. पोरांच्या चर्चांत नेहमी वेगळीच पोरगी असे .. न मी मात्र हिचाच विचार करायचो. विषेश म्हणजे पोरांच्या चर्चांमधे हिचा विषय आला देखील नव्हता .. आणि आम्ही आपले गुपचुप प्रेमात (नक्की प्रेम ?) गुरफटतंच चाललो होतो. तसा आमच्या वर्गात एक अलिखीत नियम होता. कोणत्याही पोरानं पोरीशी बोलायचं नाही. जो बोलेल त्याला "गद्दार" ठरवून त्यानंतर बरेच दिवस त्याचा "बकरा" करण्यात येत असे. मग प्रार्थना म्हणताना त्याच्या शर्ट ला मागुन शाई लावणे , माती टाकणे , जेवणाच्या सुट्टीत पाण्याच्या टाकीवर पोरं बसली की घोळक्यात घेऊन मागुन टपल्या मारणे .. पी.टी. च्या तासाला हटकून त्याच्यावर राज्य आणुन त्याला तंगवणे इत्यादी प्रकारची शिक्षा त्याला होत असे. मुळ कारण असायचं की हा साला तिच्याशी बोललाच कसा .. त्याच्यावर जळून हा कारभार व्हायचा. तेंव्हा इनो घ्यायलाही पोरांकडे पैसे नसायचे. तर एकंदरीत अशा वातावरणात हमार लाईफ्वा मे प्यारवा का पेहला फुलवा खिल रहा था. समोरूनही रिस्पॉन्स भेटे. सुरूवातीला जे तोंड वाकडं व्ह्यायचं त्यावर आता थोडी शरमेची लाली दिसून नजर खाली जाऊ लागली ( शाळेत असतांना माझं एक निरिक्षण होतं .. ह्या पोरींची तोंडं म्हणजे असा ओठांचा जंबु करून इकडे तिकडे करून निषेध नोंदवणं (की अजुन काही?) जरा जास्तंच असे. एखादी शेंबडी पोरगी पण च्यायला आम्हाला पाहून असा चंबु इकडे तिकडे करून जायची... असो .. ज्याचं त्याचं तोंड ..त्याचं काय करावं त्याचा प्रश्न ) अॅक्चुअली मिसळपाव वर आम्ही जे गुण उधळतो ते आधीपासूनच शाळेतही उधळायचो . मास्तरांना नावं ठेवणे , नकला करणे कमेंट्स पास करणे ह्यात आमच्या आजुबाजुलाही कोणी नव्हतं ! कोपर्यात हशा पिकला की मास्तर विदाऊट इन्क्वायरी येऊन मला बदडत असे. आणि मास्तरनं पाठ वळवली की मी पुन्हा फिदीफिदी हसत असे. मास्तर बर्याचदा बाहेर उभा करायचा .. आणि बर्याचदा म्हणायचा "तुला वरच्या वर्गात जायचंय की इथंच रहायचंय ?" मी म्हंटलो की "मी तर वरच्या वर्गात जाण्यासाठीच अभ्यास करतोय तुम्हाला नापास करायचं असलं तर करून दाखवा " त्यावर मास्तर म्हणायचा ... "बस बाबा इथंच...! आणि वाट मिर्या माझ्या वर्गात.. "
असो ,सुंदर सुकन्येवरून विषय कसा त्या मळकट आणि मारकुट्या मास्तरवर वळला ना? ह्या अवांतरपणाचं काहीतरी केलं पाहिजे बुवा
हं तर शाळेच्या गणपतीचं आयोजन दहावीचा वर्ग करत असे. त्यात मी पी.टी. मास्तरशी गोडगोड बोलून मुर्ती आणन्याचं टास्क मिळवलं मग मुर्ती आणताना उगाचंच छाती भरून आली होती. ती माझ्याकडे बघत होती आणि माझं लक्ष केवळ तिच्याकडे होतं ... गणपतीच्या मुर्ती समोर रांगोळी काढण्याची जबाबदारी आमच्या वर्गातल्या मुलींकडे होती ! मी फटकन रांगोळीच्या पिशव्या घेऊन तिच्याकडे गेलो .. रांगोळी दिला देऊन म्हणाला "सुंदर रांगोळी काढ हो !" (ती रांगोळी देताना हलकाच तिच्या मऊ हाताचा स्पर्ष झाला ! आहाहा ! दिव्य अनुभवलं.) त्यावर ती "हो" म्हणाली आणि लाजुन पळून गेली. आणि मी उगाच भाव खात होतो गणपती विसर्जना नंतर शाळेत पुर्ण बॅचचा फोटो काढण्याची पद्धत होती. ह्यात गेल्या वर्षीच्या बॅच ने अगदी आपल्या आवडीच्या मुली/मुलांसोबत शेप्रेट फोटो काढले होते. त्यामुळे मी ह्या दिवसाची फार अतुरतेने वाट पहात होतो. आणि त्याच दिवशी आई मला मावशीकडे घेऊन गेली होती. मावशीकडे विसर्जनाला उशीर झाल्याने मला शाळेत यायला उशीर झाला ..
(आमच्या क्लासचा शेक्रेटी होता शिवाजी होले उर्फ शिवज्या.. वर्गातला सगळ्यात थोराड पोरगा. बर्याचदा नापास होऊन आमच्या वर्गात आला होता. ह्याच्या नाकाचा पॉईंट लै मोठा असल्यामुळे मी त्याला दहावीच्या सुरूवातीलाच "शेंगदाण्या" हे नाव बहाल केले होते. आता त्याला कोणी शिवज्याम्हणून ओळखतंच नव्हते.. सगळेच "शेंगदाण्या" म्हणून हाक मारत. ह्या नावाच्या बदल्यात त्याने मला दोन तीन वेळा चांगलाच तिंबवला होता. पण अशाने ऐकेल तो मी कुठला ? तर हा शेंगदाण्या .. वर्गातली बॅकबेंचर वर्षा वर लाईन मारायचा. हा ही मठ्ठ आणि ती ही मठ्ठ .. पण वर्षा एकदम सुबक ठेंगणी... बुटली असली तरी सुंदर होती. ती ह्या शेंगदाण्याला काय भिक घालेन ? म्हणून आम्ही उगाच शेंगदाण्याची थट्टा करायचो. पण शेंगदाण्याची ही आवडती मुलगी होती. शेंगदाण्याचा ह्या वर्षावर फार जीव.)
फोटो काढण्याच्या दिवशी शेंगदाण्या स्वतःचा कॅमेरा घेऊन आला. मस्त डेयरिंग दाखवून वर्षाबरोबर एक आख्खा रोल रिकामा केला. दुसर्या रोल मधे बाकी पोरांनी आपापल्या आवडीच्या पोरींबरोबर फोटो काढून घेतले.ज्याची सोबत फोटो काढन्याची डेरिंग झाली नाही त्याने तिचा सोलो फोटो क्लिक करून घेतला. तोवर इकडे ह्यांचा फोटोसेशनचा कार्यक्रम उरकला होता. घरी येऊन आईवर प्रचंड चिडचिड केली. ती मात्र ह्या सगळ्यांमधून आलिप्त होती. कदाचित माझी वाट पहात होती. असं मला माझा जिगरी मित्र मध्या म्हणाला. त्याने अजुन काही माल मसाला लावूनही सांगितलं ! फक्त मध्याला मी हे प्रकरण सांगितलं होतं. असो .. पण यह गेम जास्त दिवसोंतक चुपचाप चल न सका .. पोरांना कुनकुन लागल्यावर मला चिडवायला सुरूवात झाली. तिचा भाऊ पैलवान होता.आणि वयाने बराच मोठाही होता. मला त्याची जाम भिती वाटायची. तो शाळेत आला की मला बडवायलाच आला की काय ? असंच वाटायचं ! आणि पोरंही जाम घाबरवून सोडायची ! थोडक्यात माझी फाटत असे. पुर्ण दहावी भर एकाच मुलीवर एकनिष्ठ पहिलं-वहिलं प्रेम केलं हो .. थोडी हिंम्मत असती तर आज चित्र वेगळंच असतं ..पण तिच्या भावाचा चेहरा समोर आला की मी आपला विचार सोडून द्यायचो. आणि जिथे केवळ बोलणे गुन्हा होता तिथे प्रपोज करण्याची काय बिशाद ?
पोरींशी बोलायची अजुन एक क्लुप्ती होती. शाळेत येतांना ओढ्याकाठी काही चिंचांची झाडं होती. मस्त गाभुळलेल्या चिंचा वर्गात आणल्या की लंच ब्रेक मधे पोरीसमोर अशा दाखवून दाखवून खायच्या .. एखादी तरी चिंचा मागायला येणारंच. एक दिवस मी चिंचा घेऊन आलो. ती लास्ट बेंच वर डब्बा खात होती. मी मुद्दाम तिकडे जाऊन चिंचा दाखवून दाखवून खायला लागलो. तर तिने बॅग मधून एक थैली काढली .. त्यात माझ्याकडच्या चिंचांपेक्षा भारी चिंचा होत्या .. त्या तीने सगळ्यां पोरींना वाटल्या. नव्हे .. वर भाजके चिंचोकीही आणले होते. मी आपला कडूमडू तोंड करत बाहेर निघून गेलो.
आमच्या अंगात अजुन एक किडा होता. तो म्हणजे बोर्ड वर मास्तर लोकांची कार्टून्स रंगवायचा ! ह्या मुळे भरपूर वेळा मास्तरांचा मार खाल्ला होता. पण आभ्यासात हुशार असल्याने कितीही मार्क्स कट करण्याचा प्रयत्न केला तरी रॅंक ५ च्या खाली उतरला नव्हता ! एक दिवस "दरेकर मास्तर " आणि "भादेकर म्यडम" ह्यांच सर्वांग सुंदर कार्टून काढलं होतं .. आता दरेकर मास्तरच्या डोक्याचर मोजून दोन केस .. मी तीन दाखवले (वर कमेंट करून "ताजा उगवलेला केस" असं ही लिहीलेलं होतं ) भादेकर म्याडम चे डोळे भुतासारखे . मग ते गालांपर्यंत लांबवले तर काय बिघडलं होतं? हे चित्र पुसण्याआधी घंटा झाली .. आणि मास्तर नेमके आत आले. पुसण्याचा चान्स भेटलाच नाही ! मास्तर येई पर्यंत वर्ग धो धो हसत होता. अर्थात ती ही कौतुकाने हसत होती ती हसली की मला बरं वाटे. असो ! विषयांतर नको. हं तर दरेकर मास्तर नेमके वर्गात आले. सगळे आपल्या जागा घेऊन बसले. मी बेंच खाली लपून बसलो होतो. मास्तर ने हा प्रकार कोणाचा ? हे माहित असून देखील .. कोण एम.एफ. हुसेन आहे हा ? असा प्रश्ण विचारल्याबरोब्बर सगळी पोरं एकसाथ माझं नाव घेऊन मोकळी झाली. मास्तर माझ्या बेंच पाशी आले .. बाकावर उभा केला... न दे खाकी चड्डी वर वेताच्या छडी हे हाणलाय .. बसायचे वांधे झाले .. सारखा ह्या साईड वरून त्या साईड वर होत होतो. पोरं हसत होती. आमचा वर्गंच महा गद्दार होता. कोणालाही प्रोटेक्ट करायचा नाही. एकसूरात एखाद्याची खोडी समोर आणायचा. दुसर्या दिवशी मी पुन्हा कार्टून काढलं .. मास्तरच्या टकलावर पाच केस काढले .. आणि कमेंट दिली .." मास्तरच्या तिसर्या केसाचा रात्रीत करिश्मा ,, दोन केसं एका रात्रीत " .. आणि वर्गातून मास्तर येण्या आधीच पळून गेलो. वर्ग पुन्हा वेड्यासारखा हसत होत.. मी मात्र राना राना ने फिरत होतो. काही कारणाने त्या दिवशी दरेकर मास्तर आले नाहीत ... आणि जे होणार होतं ते टळलं !
दिवसांमागुन दिवस गेले एस.एस.सी ची परिक्षा आली. अभ्यासात सगळे बिझी असल्यानं ह्या गोष्टीकडे तसंही थोडं दुर्लक्षंच झालं... पण ती रोज नविन नविन झकपक कपडे घालून पेपर्स ला येत असे .. अन तो तिचा राक्षस भाउ.. तिला सोडवायला यायचा ! शेवटच्या दिवशी ... सगळ्यांनी पिक्चरला जायचा प्लान केला .. मी हर्षित झालो होतो. आज हिला सांगुनंच टाकू .. पिक्चर संपल्यावर परततांना सगळे एकाच बस मधे होतो. मनाचा हिय्या करून मी तिच्या शेजारची जागा मिळवली .. ती खिडकीतून बाहेर पहात होती . मधेच हलकासा स्पर्ष होत होता न मी डोळे मिटून घेत होतो. सांगायची हिंमतंच होत नव्हती! मी तिचं नाव घेतलं .. तीने उगाच मान वलवून माझ्याकडे पाहिलं .. आणि मी येडपट पणा केला " कसे गेले गं पेपर्स ? " तिला तो प्रश्न अपेक्षित नसावा( काही वेगळंच अपेक्षित असावं) .. "पेपर आले आणि गेले ..." तिने एवढं कुचकट बोलण्यामुळे माझी होती नव्हती सगळी हिम्मत गळून पडली. माझी ही पहिलीच वेळ आहे ना? मला संभाळून घेता येत नाही का ? हसून बोलली असती तर नापास होणार होती का ? मी मनातंच चिडचिड करत होतो. विचार करता करता मला ती खुणावतेय हे जाणवलं .. मी दचकून वर पाहिलं तर .............. ती म्हणाली "जरा साईड दे .. उतरायचंय " ... मी येडपटा सारखी साईड दिली .. आणि तिच्या पाठमोर्या शरीराकडे पाहात बसलो . ३ वर्षांपुर्वी पुन्हा गावाला गेलो होतो. एका मित्राबरोबर मुद्दाम तिच्या घरी गेलो. तिचं अजुनही लग्न झालेलं नव्हतं ! ह्यावेळेस मनात कसलीच भिती नव्हती. पण एक उत्सुकता होती. ती समोर दिसली नी पुर्ण दहावीचं वर्षं सरसर डोळ्यांसमोरून गेलं ! तशीच ... गोरीपान .. नुकतीच अंघोळ घेऊन आली असावी. आज केस धुतले असावेत. शँपुचा सुगंध पसरला होता. मित्राला (अचानक) फोन आल्यामुळे तो निवांत बाहेर निघून गेला. तीच्या समोरच बसलो होतो. दहावी नंतर माझ्यात भरपूर बदल झाला होता. माझ्या आधी तीच म्हणाली ... "ह्म्म्म गुड फिजीक .. काय करतोस ?" अचानक झालेल्या स्तुतीने मी माझं स्पिचंच विसरून गेलो... "मी ... मी कुठे काय ? .. आपला इंजिनियरींग " .... ती-"अर्रे वा !! छानंच की .. पण अजुनही तसाच बावळट आहेस " एका क्षणात आकाशातनं दान्नकन जमिनीवर आदळलो .. पहिली प्रतिक्रिया गोङ गोड कौतूक करणार्या देव काकांची आणि दुसरीच प्रतिक्रिया मिसळभोक्त्याची पडल्यावर जसा लेखीकेचा मुड जातो तसं माझं तोंड झालं.. ह्यावर ती पुन्हा हसली ! "नाही .. तू खरंच खुप बावळट आहे " .. अरेच्च्या पुन्हा ? च्यायला गल्लीतली गुरं सुद्धा मी रोडने चाललो तर सैरावैरा पळत रोड मोकळा करून देतात ... ही मला दोन दोन वेळेस चक्क बावळत म्हणते ? च्यायचा घो........... "सीमा ... you know .. I've always loved you.. & still I do.. I still dream about you !!" एका दमात सगळा कफ बाहेर पडला .. मोठा पॉस ... मघाशी हसणारी ती .. अचानक उचकी लागल्या सारखी दचकलीच .. बहुतेक हे तिला अपेक्षित होतं .. पण एका बावळटा कडून अचानक असं काही येणं .. ती थबकलीच !!
मलाही काही सुचत नव्हतं !! मी कंटिन्यू केलं ... " Yea ! Its true .. I feel good now ! " (इंग्रजी लै भारी भाषा आहे .. का कुणास ठाऊक .. मी मराठीत जे बोलू शकत नाही .. ते इंग्रजीत पटकन बोलून मोकळा होतो.)
टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं ! च्यामायला .. आत्ता अंघोळ करून टवटवीत दिसणारी .. आत्ता माझी बौद्धिक घेणारी.. अचानक पाणी ? मला उगाच गिल्टी गिल्टी वाटायला लागलं ! पुन्हा आपलं इंग्लिश .. "Look .. Don't cry .. I m sorry .. I just wanted to tell you what i couldnt say when I should have !! .. Please forgive me if I ..........."
इतकी वर्ष वाट पाहिली .. का नाही आलास ? तेंव्हाही बोलू शकला असतास ! किमान बस मधून उतरताना तरी मला थांबवायचंस ?"
मी म्हणालो .. "तू किती रागाने बोलली होतीस !"
ती - "तू प्रश्नंच तसा केला होतास ! "
मी - "मग काय असं बोलायचं ? एकतर मी किती हिम्मत करून बोललो होतो !"
ती - "पण दुसरा प्रश्न विचारायचास ना ? पिक्चर पाहून आलो होतो .. किमान त्याबद्दल तरी ? "
मी - " जाऊ देत आता .. मी तुझ्यासाठीच आलोय ! "
खाली मान घालून ती म्हणाली .. काल ह्याच टायमाला आला असतास तर ? काल संध्याकाळीच मला पाहून गेलेत. आणि तिकडून होकार आलाय ! चाकणच्या जमिनदाराचा पोरगा आहे . दहावी नापास .. पण घरच्यांनी पैशावालं खानदान पाहून जमवलंय ! आता मी नकार देऊ शकत नाही !...
मी गुपचूप गॉगल लावला .. बाहेर आलो .. मित्राला कल्पना असूनही मला ही गोष्ट बोलला नव्हता. त्याने कार स्टार्ट केली. मी शेवटची नजर तिच्याकडे टाकली. गॉगल मधूनही पाणी आलंच होतं ! तिला ते दिसलं नसतं तर आश्चर्यंच !
एक हुंदका घेत ती घरात निघून गेली ! मी आवंढा गिळला आणि कार मधे बसलो !
प्रेमाचे दोन पोपट बाकी आहेत .. पण आम्हाला लेखांची संख्या वाढवायची आहे म्हणून इथेच (क्रमशः करतो)
2 comments:
"As you write more and more personal, it becomes more and more universal".
व. पु.काळे (पुस्तक parter)
bhawa nad khula re tuzaaaaaaaaaa
Post a Comment