Tuesday, August 18, 2015

बाबासाहेब, महाराज आणि मी


निवेदन : मुद्दे अत्यंत खाजगी , माझ्या स्वत:च्या अनुभवातून आणि माझ्या असेल नसेल तेवढ्या वाचनातून आलेले आहेत. याचा कोणत्याही विचारसरणीशी, जातीशी, पक्षाशी किंवा कशाशीही संबंध जोडू नये. माझ्या प्रमाणे तोकडे वाचन आणि सदर वादापासून लांब असणाऱ्या लोकांचेही काहीतरी माझ्या प्रमाणेच असावे या समजुतीतून ४ गोष्टी लिहाव्याश्या वाटल्या.
१. माझे वाचन जास्त नाही. शिवाजी महाराजांबद्दलही मी जास्त वाचलेले नाही. पण मराठी म्हटल्यावर आपसूकच "शिवाजी महाराज की जय"ची भावना आहे. ती तीव्रही आहे पण कट्टर ( कट्टर हिंदू कट्टर मुस्लीम इत्यादी कट्टर प्रमाणे ) नक्कीच नाही. साहजिकच आहे पुरंदरे मी कधीच वाचले नाहीत.
२. पण बाबासाहेबांना मी चेहऱ्याने ओळखायचो. शिवशाहीर म्हणून. मला ते फुल टाईम शाहिरी करतात याचे अप्रूव वाटायचे. यांच्या पोटापाण्याचे काय ? असाही प्रश्न पडायचा.
३.शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊंबद्दल काहीतरी आपत्तीजनक आहे ते मला पुण्यातल्या बिग्रेडीनी जेम्स लेन प्रकरणाबद्दल केलेल्या तोडफोडी नंतर कळले. माझ्या सारख्या बऱ्याच जणांनाही असेच कळले असावे.जेम्स लेन तांबडा की गोरा हेही मला माहित नाही ,त्याला गुगल करण्याचीही कधी उत्सुकता वाटली नाही.
४. पण त्यामुळे माझ्यावर महाराज किंवा जिजाऊ यांच्याबद्दल काडीचाही फरक पडला नाही. माझा आहे तोच समज राहिला. इतर सर्वांचा राहिला असावा असे वाटते , कारण आजपर्यंत मी कोणालाही "त्या" विषयावर कुजबुज करून असुरी आनंद घेताना पाहिलेले नाही.
५. काही जण हटकून कुठल्याश्या बिग्रेडी पोष्ट मध्ये tag करतात किंवा ग्रुप मध्ये add करतात तेंव्हा मला तिथे अत्यंत गलिच्छ ( अत्यंत म्हणजे अत्यंत गलिच्छ , ज्याला सीमा नाही ) अशा प्रकारचे विचार / विखार वाचायला मिळतात. आता कोणत्या जातीचे कोणत्या जातीविषयी काय बोलतात हे मी तुमच्या अनुभवांवर सोडतो. त्याचा चवीने आस्वाद घेणारेही आहेत. कायम मारामारीची भाषा आणि अत्यंत व्हायलंट अशा वातावरणात "विचारांचा सामना विचारांनीच व्हायला हवा" असे काहीतरी पालुपद वाचल्यावर मला हसायला यायचे.
६. याच ग्रुप वर संत ज्ञानेश्वरांवरही अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिलेले वाचल्यानंतर माझी परत त्या ठिकाणी जाण्याची हिम्मत झाली नाही. त्यामागचा हेतू ज्याने त्याने आपल्याला समजानुसार ठरवावा
७. बदनामी झाली बदनामी झाली असे ओरडल्यामुळे खरे तर ज्यांना नाही त्यांनाही हा विषय समजला. आणि हा अजून पसरवला जातो यामागे जातीची राजकारण असल्याचे सरळसरळ दिसते. हे अखंड बल्क पोलरायझेशन आहे . यातून अस्मितेचे राजकारण पेटवून फक्त राजकीय पोळी भाजली जाताना दिसते .
८. महापुरुष हे समाज घडवतात. समाज घडवताना ते सगळ्या जातीधर्माला बरोबर घेतात. कालांतराने मात्र ते महापुरुष झाले की त्या त्या जातीचे लोक महापुरुषावर आपला कॉपीराईट सांगतात. हा एकप्रकारे त्या महापुरुषाला खुजेपणा आणण्याचा करंटेपणा आहे. हे प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत खरे आहे.
९. Whatsapp किंवा फेसबुकवर काही ऑडियो टेप ऐकायला मिळाल्या, त्यात स्वत:ला शिवप्रेमी म्हणवणाराच्या आवाजातला माज , भाषा, शिवीगाळ आणि वैचारिक कुवत पाहता शिवाजी महाराज किमान त्याला तरी समजले आहेत का अशी शंका उत्पन्न झाली. आणि हेच लोक महाराजांचा घनघोर अपमान करत आहेत असे वाटले. शिव्या देऊन मारधाड करून जर आपण महाराजांची महानता वाढवणार असू तर आपण महाराजांपेक्षाही महान आहात असे म्हणावे लागेल. नपेक्षा महाराजांचे नाव घ्यायचीही आपली लायकी नाही हे स्वत:च ठरवावे. एकाने दहा मिनिटाची क्लिप पाठवली होती , त्या दहा मिनिटात किमान ५०० आई बहिणीच्या सर्वांगाचा उद्धार करणाऱ्या शिव्या होत्या. कान मिटले.
१०. बाबासाहेबांना पुरस्कार मिळावा की न मिळावा यावर माझे मत खरेतर शून्य आहे. कारण पुरस्काराने फक्त एक recognition मिळते. बाबासाहेबांच्या समर्थकांना किंवा विरोधकांना आधीच त्यांच्याविषयी सगळी माहिती आहे त्यामुळे त्याना वेगळ्या रीक्ग्नीशनचे महत्व नाही/नसावे.
११. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, बाबासाहेबांविषयी तुमची मतं + किंवा - जशी आहेत ती तशीच राहणार आहेत .आय मीन , पुरस्कार मिळाला ( किंवा मिळाला नाही ) तरी त्यात किंचितसाही बदल होणार नाही. पुरस्कार ही फक्त कपाटात ठेवायची शोभेची गोष्ट आहे. त्यामुळे हा वाद निष्कारण आहे आणि त्याचा तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारात कसलाही फायदा किंवा तोटा नाही.
असे आणि बरेच . जमल्यास समाज जोडला जाईल अशा गोष्टी आपल्या हातून झाले तर बरे. तोडायला बरेच असतात . आपण त्यात भागीदार होऊ नका एवढीच विनंती . फेसबुक वर मी फक्त टवाळ्या करायला , टाईमपास करायला आणि मनोरंजन करून घ्यायला येतो.त्यामुळे ग्यान पाजण्याचा हेतू नाही. हे पटलंय तर ठीक आहे, नसेल पटलं तर सोडून द्या.आग्रह कसलाच नाही .

No comments: