आमच्या मातोश्री म्हणजे कडक ! बाहेरचे खाणे , फुकटचे लाड , बाहेर गेल्यावर वचवच करणे , नातेवाईकांकडे गेल्यावर कोणाच्याही वस्तूला हात लावणे किंवा वस्तू घेणे इत्यादी गोष्टींची आम्हाला जबरदस्त जरब होती. आईने डोळे मोठे केले की आम्ही दबकून गप्प बसत असू. कधी मधी पाहुणे घरी आले आणि त्यांनी रुपया जरी हातावर ठेवला तरी आम्ही तो आज्ञाधारकपणे आईच्या हाती देत असू. पन्नास वेळा विनवण्या केल्यावर कधी चाराणे मिळत. त्यातून मग पेरू खावा की बर्फाचा गोळा खावा की पेप्सीकोला घ्यावा की गुलाबजाम ( त्यावेळी सुक्के गुलाबजाम गोळ्याबिस्किटांच्या दुकानात मिळत ,नेहमीच्या गुलाबजामशी त्याचा संबंध नाही ) यात माझे कन्फ्युजन होत असे. आईने पॉन्डस च्या मोठ्या डब्याला एक आडवा छेद देऊन त्याचा गल्ला बनवला होता. त्यात आई तिच्या शिवणकामातले पैसे काढून थोडेफार त्यात टाकत असे. मी काहीतरी आयडिया करून त्यातल्या कॉइन्स काढण्याची शक्कल काढली होती. एकदा हे भांडे फुटल्यावर चंपी झाली आणि नंतर आईने प्रोपर गल्ला आणला.
थोडासा मोठा झाल्यावर म्हणजे हायस्कूलला गेल्यावर कधी मधी आई हातावर पाच दहा रुपये टेकवत असे. वडील तसे दिलदार , त्यांना पैसे मागितले की "घे खिशातून" म्हणत . "घे खिशातून" हा त्यांचा पेटंट डायलॉग. पैशाचं कधी काय केलं काय नाही असले प्रश्न त्यांनी कधी विचारले नाहीत. आम्ही मात्र आईच्या धाकाने पैसे मागायला कचरत असू. कधी एकठ्ठे सहा रुपये मिळत तर कधी एक दोन रुपये जमवून मी सहाचा आकडा जमवत असे. सहा रुपयांचा हिशेब १ सुक्की भेळ किंवा २ वडापाव किंवा २ सामोसे किंवा पाणीपुरी असा हिशेब होता. त्यातही त्या पैशाचे काय खाऊ काय नको असे होत असे.
कॉलेजात गेल्यावर डेली वीस रुपये पॉकेटमनी मिळू लागला. याचाही हिषेब पक्का होता. १० रुपये बसचे रिटर्न आणि ६ रुपये रेल्वेचे रिटर्न तिकीट. ४ रुपये खाऊसाठी. त्यात मी बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट काढत नसे. एक दोनदा टीसीने पकडलेही होते, पण तोवर मी इतका मोठा झालो होतो की एकट्या टीसीला पकडणे शक्य झाले नाही. एके दिवशी दोन टीसीनी पकडले तेंव्हा तब्बल ८५ रुपये द्यावे लागले होते. सुदैवाने खिशात एक शंभराची नोट आडीनडीला वडिलांनी देऊन ठेवली होती. असो, तर कॉलेजातही आम्हाला काही पैशाची फार चंगळ भेटली असे नाही.फायनल इयर ला येई पर्यंत विसाचे पन्नास झाले होते. इयत्ता पहिली ते इंजिनियरिंगचे फायनल इयर हा प्रवास माझ्या पैशाने चाराण्यापासून सुरु केला तो पन्नास पर्यंत.
आता पर्यंत प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी मी आई वडिलांकडे पैसे मागायचो. ट्रीपला जायचंय, बाईक हवी , पेट्रोल भरायचंय , कपडे हवेत , जीन्सच घ्यायची , सायकल हवी , पार्टीला जायचंय, मित्राकडे फिरायला चाललोय , लग्नाला चाललोय, इथपासून सायबर कॅफेमध्ये जायचंय , मोबाईल घ्यायचाय , रिचार्ज करायचंय ... इंटरव्यूला चाललोय , सीवी च्या प्रिंट काढायच्यात , भाड्याला पैसे ... सगळीकडे मी डीमांडिंग होतो. त्यांनी कधी सढळ हाताने पैसे दिले नाहीत , पण कधी मनही मारू दिलं नाही. हवं ते कधी ना कधी मिळायचंच. आतापर्यंत मी केवळ परावलंबी होतो. तेंव्हा स्वत: पैसा कमवला तर किती मजा येईल , कोणालाही मागावे लागणार नाहीत , खिशात नुसती खुळखुळ. पाकीट फुगलेलं तेंव्हा असे , पण त्यात नोटा दोनेक आणि बाकीची फालतू रद्दी जास्त असे. त्यात आता नुसत्या नोटा येतील , मग मी आई वडिलांना पैसे देत जाईल . ते माझ्याकडे पैसे मागतील.. नक्की आठवत नाही , पण याच काहीतरी प्रकारचा विचार मी तेंव्हा करत असायचो .
नोकरी लागल्यावर मला कंपनीतच ICICI च्या एजंटने अकाउंट ओपन करून दिलं , कार्ड देऊन गेला. ते भारी वाटलं. ICICI च्या ATM मधून तेंव्हा नेहमी १००च्या करकरीत नोटा निघायच्या. मी कायम पाकीट भरलेलं ठेवायचो. खाण्या-पिण्यात आपण कधीही हातचा राखला नाही स्वत:चे सगळे लाड पुरvवले . असो .
आज आईचं फोन बिल भरताना अचानक आठवण आली. किती दिवस झाले पैशाचा ओघ उलटा सुरु झाला . चारणे आठाणे तर आता चलनातही नाहीत... पण आईला कुठे जायचं असलं की , कपडे घ्यायचे , दागिना हवा ... म्हणेल ते .. आपसूक पैसा जातो. अगदी नकळत. त्या पैशाची फिगर आता हजार पटींनी वाढली . पण तेंव्हाचाच पैसा मोठा होता .
पैसा छोटाच झाला .
No comments:
Post a Comment