Tuesday, September 16, 2014

पैसा झाला छोटा


आमच्या मातोश्री म्हणजे कडक ! बाहेरचे खाणे , फुकटचे लाड , बाहेर गेल्यावर वचवच करणे , नातेवाईकांकडे गेल्यावर कोणाच्याही वस्तूला हात लावणे किंवा वस्तू घेणे इत्यादी गोष्टींची आम्हाला जबरदस्त जरब होती. आईने डोळे मोठे केले की आम्ही दबकून गप्प बसत असू. कधी मधी पाहुणे घरी आले आणि त्यांनी रुपया जरी हातावर ठेवला तरी आम्ही तो आज्ञाधारकपणे आईच्या हाती देत असू. पन्नास वेळा विनवण्या केल्यावर कधी चाराणे मिळत. त्यातून मग पेरू खावा की बर्फाचा गोळा खावा की पेप्सीकोला घ्यावा की गुलाबजाम ( त्यावेळी सुक्के गुलाबजाम गोळ्याबिस्किटांच्या दुकानात मिळत ,नेहमीच्या गुलाबजामशी त्याचा संबंध नाही ) यात माझे कन्फ्युजन होत असे. आईने पॉन्डस च्या मोठ्या डब्याला एक आडवा छेद देऊन त्याचा गल्ला बनवला होता. त्यात आई तिच्या शिवणकामातले पैसे काढून थोडेफार त्यात टाकत असे. मी काहीतरी आयडिया करून त्यातल्या कॉइन्स काढण्याची शक्कल काढली होती. एकदा हे भांडे फुटल्यावर चंपी झाली आणि नंतर आईने प्रोपर गल्ला आणला.

थोडासा मोठा झाल्यावर म्हणजे हायस्कूलला गेल्यावर कधी मधी आई हातावर पाच दहा रुपये टेकवत असे. वडील तसे दिलदार , त्यांना पैसे मागितले की "घे खिशातून" म्हणत . "घे खिशातून" हा त्यांचा पेटंट डायलॉग. पैशाचं कधी काय केलं काय नाही असले प्रश्न त्यांनी कधी विचारले नाहीत. आम्ही मात्र आईच्या धाकाने पैसे मागायला कचरत असू. कधी एकठ्ठे सहा रुपये मिळत तर कधी एक दोन रुपये जमवून मी सहाचा आकडा जमवत असे. सहा रुपयांचा हिशेब १ सुक्की भेळ किंवा २ वडापाव किंवा २ सामोसे किंवा पाणीपुरी असा हिशेब होता. त्यातही त्या पैशाचे काय खाऊ काय नको असे होत असे.

कॉलेजात गेल्यावर डेली वीस रुपये पॉकेटमनी मिळू लागला. याचाही हिषेब पक्का होता. १० रुपये बसचे रिटर्न आणि ६ रुपये रेल्वेचे रिटर्न तिकीट. ४ रुपये खाऊसाठी. त्यात मी बऱ्याचदा रेल्वेचं तिकीट काढत नसे. एक दोनदा टीसीने पकडलेही होते, पण तोवर मी इतका मोठा झालो होतो की एकट्या टीसीला पकडणे शक्य झाले नाही. एके दिवशी दोन टीसीनी पकडले तेंव्हा तब्बल ८५ रुपये द्यावे लागले होते. सुदैवाने खिशात एक शंभराची नोट आडीनडीला वडिलांनी देऊन ठेवली होती. असो, तर कॉलेजातही आम्हाला काही पैशाची फार चंगळ भेटली असे नाही.फायनल इयर ला येई पर्यंत विसाचे पन्नास झाले होते. इयत्ता पहिली ते इंजिनियरिंगचे फायनल इयर हा प्रवास माझ्या पैशाने चाराण्यापासून सुरु केला तो पन्नास पर्यंत.

आता पर्यंत प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी मी आई वडिलांकडे पैसे मागायचो. ट्रीपला जायचंय, बाईक हवी , पेट्रोल भरायचंय , कपडे हवेत , जीन्सच घ्यायची , सायकल हवी , पार्टीला जायचंय, मित्राकडे फिरायला चाललोय , लग्नाला चाललोय, इथपासून सायबर कॅफेमध्ये जायचंय , मोबाईल घ्यायचाय , रिचार्ज करायचंय ... इंटरव्यूला चाललोय , सीवी च्या प्रिंट काढायच्यात , भाड्याला पैसे ... सगळीकडे मी डीमांडिंग होतो. त्यांनी कधी सढळ हाताने पैसे दिले नाहीत , पण कधी मनही मारू दिलं नाही. हवं ते कधी ना कधी मिळायचंच. आतापर्यंत मी केवळ परावलंबी होतो. तेंव्हा स्वत: पैसा कमवला तर किती मजा येईल , कोणालाही मागावे लागणार नाहीत , खिशात नुसती खुळखुळ. पाकीट फुगलेलं तेंव्हा असे , पण त्यात नोटा दोनेक आणि बाकीची फालतू रद्दी जास्त असे. त्यात आता नुसत्या नोटा येतील , मग मी आई वडिलांना पैसे देत जाईल . ते माझ्याकडे पैसे मागतील.. नक्की आठवत नाही , पण याच काहीतरी प्रकारचा विचार मी तेंव्हा करत असायचो .
नोकरी लागल्यावर मला कंपनीतच ICICI च्या एजंटने अकाउंट ओपन करून दिलं , कार्ड देऊन गेला. ते भारी वाटलं. ICICI च्या ATM मधून तेंव्हा नेहमी १००च्या करकरीत नोटा निघायच्या. मी कायम पाकीट भरलेलं ठेवायचो. खाण्या-पिण्यात आपण कधीही हातचा राखला नाही स्वत:चे सगळे लाड पुरvवले . असो .

आज आईचं फोन बिल भरताना अचानक आठवण आली. किती दिवस झाले पैशाचा ओघ उलटा सुरु झाला . चारणे आठाणे तर आता चलनातही नाहीत... पण आईला कुठे जायचं असलं की , कपडे घ्यायचे , दागिना हवा ... म्हणेल ते .. आपसूक पैसा जातो. अगदी नकळत. त्या पैशाची फिगर आता हजार पटींनी वाढली . पण तेंव्हाचाच पैसा मोठा होता .
पैसा छोटाच झाला .

Sunday, September 14, 2014

गुंठामंत्र्यांची ग्रोथ


फार्फार वर्षांपुर्वी..(म्हंजे २००० च्या पुर्वी) पुण्यात गुंठ्याला जास्त भाव नव्हता.. आणि जास्त भारीभारी गाड्याही आपल्या मार्केट मधे नव्हत्या. तेंव्हा गुंठामंत्री जीबडं (कमांडर वगैरै) घेत.
मधल्या काळात गुंठ्याला भाव येऊ लागला. महींद्रा अपग्रेड झाला. आणि गुंठामंत्री 'कॉर्पियो' ऊडवू लागले.
पवार सायबांच्या धोरणाने गुंठामंत्र्यांना अजुन भाव आला.. मग आली फॉर्चुनर.
आणि गेल्या २-३ वर्षांतला धिंगाणा तर विचारूच नका. गुंठ्याचे भाव गगणाला आणि पायलीच्या ५० पॉश गाड्या दिमतीला.
आता गुंठामंत्री आवडी (ऑडी) ए४, क्युशेवन, बीयमडब्लु, जाग्वार... रेंज रोवर उडवायला लागले.
या गतीने आगामी ५ वर्षांत पुण्यात फेरारी, मक्लरेन, लँबोर्गीनी बुगाटी, क्याडील्याक वगैरे गाड्या पुण्याच्या रोडवर दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
पांढरी शुभ्र लँबो किंवा फेरारी हिंजवडीच्या 'शिग्नल'ला ऊभी आहे. आत मिररला ते राष्ट्रवादीचं मानचिन्ह लटकत आहे, गाडीच्या विंडशील्ड वर "आबांची कृपा" "..."फक्त भाईच्" वगैरेचा रेडीयम आर्ट केला आहे, मागच्या काचेवर शिवशेना किंवा कमळ किंवा पंजा किंवा घड्याळाचा वॉटरमार्क काढला आहे. आतमधे १० रेड्यांची गुर्मी असलेलं काळा रेब्यान विथ गोल्डन फ्रेम घातलेलं व्यक्तिमत्व बसलेलं आहे .. काच खाली करून भाई लिटरभर पान खाऊन पिंक टाकत आहे ... आहाहा विंहंगंमंगं दृश्य
मग आपण हळूच म्हणायचं .. "जिमीन विकली बापाची ... गाडी घेतली फेरारीची ",  "बघतोस काय रागानी ... गाडी घेतलीय ल्याम्बोर्गिनी "

Sunday, September 7, 2014

Untitled

स्टेटसला नक्की काय टायटल देऊ सुचत नाही !

फार्फार वर्षांपूर्वी कॉलेजात असताना इ-स्क्वेयर (गणेश खिंड)  लै भारी वाटायचं. मुव्ही पहायची म्हटलं की ई-स्क्वेयर ठरलेला असायचा. नेहमीच पैशाचा जुगाड होणे अवघड , त्यामुळे सकाळी ८ चा शो फारच स्वस्तात पडतो म्हणून अर्धी झोप टाकून पिक्चर पाहायला अस्मादिक सकाळी ७लाच  निघत. तेंव्हा मल्टीप्लेक्सचं अप्रूप फार. सिंगल स्क्रीन थेटरातल्या अत्यंत हलक्या क्वालिटीच्या तिकीटासमोर ते प्रिंट केलेलं तिकीटही भाव खाऊन जायचं. नुसत्या सिनेम्यासोबत खायची प्यायची सोय , थोडासा शॉपिंगचा ऑप्शन आणि फुकटात एसी खात पुस्तके चाळायची सोय क्रॉसवर्डात व्हायची.  म्हणून इस्क्वेयर नेहमीच फेवरिट. हिरवळ वगैरे बोनस. त्यावेळी  कॅम्पातले आयनॉक्स म्हणजे माज वाटे. :) तिथे मी अग्नीवर्षा सोडला तर आयुष्यात दुसरा पिक्चर पाहिला नाही. नंतर नंतर सिंगलस्क्रीन थेटर  फारच बोगस वाटू लागली. ते थेटरात पिक्चर पाहणे डाऊनमार्केट वाटे.  अलका, अलंकार , राहुल , डेक्कन , वेस्टएंड , लक्ष्मीनारायण , विशाल वगैरे सिंगलस्क्रीन मल्टीप्लेक्सच्या झपाट्यात पारच कोमेजली.  मराठी सिनेमाला चोइस नसल्याने तो आपला प्रभातात दिसायचा. जायचो तिथेही. त्यात काही काळाच्या ओघात मल्टीप्लेक्स झाली ती तरली. बाल्कनी आणि स्टोल असायचा. बाल्कनीचं तिकीट काढलं की भारी वाटे. आता रो-वाईज तिकिटं घ्यायची :) लग्नापूर्वी कोपऱ्यातली जागा शोधत असू. आता काय सेंटर हवे ,व्यवस्थित चित्रपट दिसायला हवा.
काळाच्या ओघात मॉल वाढले, मॉल सोबतच स्क्रीन्स आल्या. चिक्कार ऑप्शन. आता इ-स्क्वेयर अगदीच सामान्य वाटते. पण तरीही , इ-स्क्वेयरच्या बऱ्याच आठवणी आहेत. नोकरीला लागल्यावर लेटनाईट मुव्ही पाहून बाईकवर कुडकुडत रात्री स्टेशनला बेकरीतला प्याटीस खाणे , किंवा मग ऑप्शनच नाही म्हणून कमसम ला कोंबडी तुडवणे...  कधीही कुठेही खाण्यापिण्याची आणि घुमणेफिरणे , मनाला येईल तेंव्हा ब्याकटूब्याक ३-३ सिनेमे पाहणे ... यातच अच्छे दिन होते.

भांचोत लाईफस्टाईल सुखवस्तू झाली पण ते शेंशेषण हरवलंय !  फार लांबची गोष्ट नाही हो.. आत्ताआत्ता साताठ दहा वर्षापूर्वीपर्यंत होतं .. सगळं इथेच तर होतं !