Wednesday, July 14, 2010

काही तरी आठवतंय ...

आपला मेंदु किती विचित्र असतो नाही ? बरंच काही साठवलेलं असतं त्यात. पण बर्रंचसं चक्क विस्मृतीत गेलेलं असतं, अगदी धुळीने मख्ख मळलेल्या पि.एम.टी. बस सारखं. आणि कधीतरी १५ ऑगस्ट २६ जानेवारीला बस धुवावी आणि त्यावर लिहीलेली "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" ची जाहिरात दिसावी तशा आपल्या स्मृती जाग्या होतात. काही गोष्टींचं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. "अरेच्च्या, आपल्या आयुष्यात हे ही घडुन गेलं होतं ? " , "असे होतो आपण ? " , "काय बावळटपणा केला मी  ? "

असंच काहीसं काल घडलं. आज नवी कंपनी जॉइन करायची म्हणुन काल जरा माझ्या फायलीवरची धुळ झटकली. काय काय डॉक्युमेंट्स लागणार म्हणुन सॉर्टींग करण्यासाठी फाईल चाळत होतो. आणि एकेक कागद पाहुन मला काय काय आठवत होतं.

एक सर्टीफिकेट होतं ऑरेंज बेल्ट चं. साल १९९५. मी कधीकाळी कराटे शिकलो होतो ? माझंच मला कौतुक वाटलं. तेंव्हा मी सहावीत होतो. अगदीच पाप्याचा पितर. तशी आमच्या गावात तालिम होती. तालीम म्हणजे संत सावतामाळ्याची एक मुर्ती, शेजारीच एक १० बाय १५ चा लाल मातीचा आखाडा. एक बेंच , २-३ बार्स , आणि ३-४ डंबबेल्स चे सेट्स. मित्रांबरोबर असाच हौस म्हणुन एका दिवशी गेलो. माझी ज्याच्याशी खुण्णस होती तो जगतापाचा बाळ्याही आमच्यात होता. मोठ्या पोरांना व्यायाम करताना पाहुन मी सुद्धा डंबेलं हातात घेतली, एका हाताने एक काही उचलला गेला नाही म्हणुन दोन हातांनी एकंच डंबेल उचलुन वाकडा तिकडा होऊन कवायत केली. लगेच बार वर आलो. बार काही उचलला गेला नाही. त्याच्या प्लेट्स काढताना त्या फरशीवर पडल्या, आधीच फुटलेल्या फरशीचा तुकडा निघाला, मग गुपचुप तो चिटकवला. आणि विना वजनाचे बार मारला. चार रिपीटेशन्स झाली नाही तो लगेच , आखाड्यात गेलो. बाळ्याने मुद्दाम माझ्या डोक्यात टपली मारली. तोच हौशीनं आणलेल्या लक्स आंड्रेड (हो आमची आंड्रेड चं होती) वर आखाड्यात उडी मारली. लाल मातीत लिंबु टाकलेले. कोंदलेल्या वातावरणात तो मातीचा लिंबाचा आणि घामाचा असा मिक्स्ड फ्लेवर आला होता, पण त्याची आम्हाला कसलीच फिकर नव्हती. बाळ्याबरोबर कुस्ती खेळताना त्याने मला फिरवुन त्याने जमिनीत दाबलं, मला श्वासही घेता येत नव्हता. दम लागला होता. नाकातोंडात माती गेली होती. आवाज फुटत नव्हता. शेवटी मी बाळ्या जोरात चावलो. त्यानं माझ्या हांड्रेड ला जोरात ओढलं आणि णको व्हायचं तेच झालं. बाकीचा "सिन" तर झालाच त्यात माझी आवडीची आंड्रेड फाटल्याचं दु:ख अधिक. मी रडायला सुरुवात केली तशी बाळ्यासगळ्या पोरांनी धुम्म ठोकली. कपडे घालुन घरी आलो.

"आंड्रेड" प्रकरणामुळं आईचे फटके खाल्लेच आणि तालमीत पुन्हा जायचा प्रसंगंच आला नाही. दुसर्‍या दिवशी हात-पाय हलवनं जड झालं होतं, चालताही येत नव्हतं पोरं खुप चिडवत होती. तेंव्हा मनात बाळ्याला एक दिवस लै रेमटायचा म्हणुन खुन्नस धरली. पण तो वयानं आणि अंगानं थोडा मोठा असल्यानं मी त्याला टरकुन होतो.

आमच्या गावात कराट्याचे क्लासेस सुरु झाले तेंव्हा मोठ्या उत्साहानं क्लासला अ‍ॅडमिशन घेतली. तब्बल ३०० रुपये देऊन मी कराटेचा ड्रेस विकत आणला. त्याबरोबर व्हाईट बेल्ट मिळाला होता. मी घरुनंच ड्रेस परिधान करुन ऐटित कराटे क्लासला मिरवत जात असे.  आमचा "सर" जाम डेंजर होता. त्याची कराट्याची कौशल्य पहाताना माझ्या मुठी आपोआप आवळल्या जात. जगतापाच्या बाळ्याला मी असाच धुवुन काढणार म्हणुन मी मनोमन सुखावत असे. कराट्याचा "सर" आमच्याकडुन खुप मेहेनत करुन घ्यायचा.प्राथमिक फेरीत मुठि आवळुन डिप्स मारणे,क्रंचेस,स्टमक्स ,साईडसिटप्स आणि भरपुर रनिंग. ह्या राक्षसी प्रकार केल्यानंतर माझ्यात चालायची देखील शक्ती उरत नसे.त्यातही जर थकलो किंवा बाकीच्यांबरोबर रिपिटेशन करताना मागे पडलो की आमचा राक्षस सर पोटात खौन पंच हाणायचा की मला देव दिसायचे. बैलासारखी भुक लागत असे. हा सर अजुन मला फायटींग का शिकवत नाही ? मला त्याचा लै राग यायचा.
माझा पेशन्स संपत होता. मला माझ्यावर हसणार्‍या क्लासमेट्सना , आणि माझी "हांड्रेड" फाडणार्‍याला बाळ्याला फाडायचा होता. पहिला महिना भर केवळ अवघड व्यायाम करुन घेतल्यावर मला थोडा आशेचा किरण दिसला. आम्हाला पंच, किक्स आणि ब्लॉक्स शिकवायला सुरुवात केली. पंच मारताना "ह्यूऊऊऊउईईई " करतांना अंमळ मौज वाटत असे. ह्या आवाजामुळे पंचला अधिक पॉवर मिळते असे सर सांगायचा.आणि ह्या "ह्युंऊऊऊउईईई" मुळे पंचची प्रॅक्टिस करण्याला उत्साह मात्र येत असे. फेस पंच, चेस्ट पंच आणि स्टमक पंच ह्या १-२-३ च्या क्रमाने आणि नंतर ३-२-१ च्या क्रमाने अगदी कसुन सराव करत होतो. नंतर आम्हाला ब्लॉक्स शिकवले, सिमिलर टु पंच , ब्लॉक सुद्धा फेस ब्लॉक चेस्ट ब्लॉक आणि स्टमक ब्लॉक ची उजळणी जशी जशी होत होती तसा मी अधिक काँन्फिडेंट होत होतो. मधेच कधी चुक झाली की सर कधी बरोब्बर स्टमक मधे एक जोरदार पंच मारायचा तर कधी कानाला सन्नकन एक किक घासुन जायची. मला कराटेचं व्यसन लागलं होतं. मी घरी सुद्धा पंच आणि ब्लॉक्स ची प्रॅक्टिस करायचो. रिकाम्या वेळात ह्यूऊऊऊईईई ह्यूऊऊऊईईई करायचो. नंतर मुहासी किक, साईड किक आणि स्पिनिंग किक्स चे धडे गिरवायला सुरुवात झाली. मी कराटे वेडाने पछाढलो होतो.

मला पोरं हसायची. " कराटे काय कामाचा नसतो , आपली गावठी पावर मजी पावर आस्ती." म्हणुन मला डिसकरेज करायची. पण मी लक्ष दिलं नाही. मला समोर फक्त बाळ्याला मारायचाय , ही एकंच गोष्ट दिसत होती.

पंच, ब्लॉक्स आणि किक्स मधे बेसिक्स शिकल्यावर आमची "यल्लो बेल्ट"ची परिक्षा वाघोली गावात होती. तिथे आमच्या क्लास ची मुख्य अकासमी होती. व्हाईट टू ब्लॅक सगळ्या बेल्ट ची पोरं आम्हाला पहायला मिळणार म्हणुन मी उत्साहीत होतो. आमच्या गावात पहिलीच बॅच असल्यानं आम्ही सगळेच यलो बेल्ट साठी चाललो होतो. ही अगदीच प्रायमरी परिक्षा असली तरी आमच्या बॅचचे त्यातही ४ जण फेल झाले होते. आता मी व्हाईट बेल्टचा यलो बेल्ट झालो होतो. तो यलो बेल्ट आमच्या सर कडुन स्विकारताना मी ज्याम फुलुन गेलो होतो. आर्ध जग जिंकलो होतो जणु. आमच्या परिक्षे नंतर ऑरेज बेल्ट , रेड बेल्ट , ग्रीन बेल्ट , ब्राऊन बेल्ट , यलो ब्राऊन बेल्ट च्या  परिक्षा बेल्ट च्या चढत्या क्रमाने झाल्या. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. त्यांच्या परिक्षांमधे वेगळ्यावेगळ्या प्रात्यक्षिकांचा समावेश तर होता. अजुन एक अनोखा प्रकार मी पाहिला तो म्हणजे कटास. कटास ह्या प्रकारात कराटे फायटर ला एका चौकोणात प्रिडिफाईन्ड मुव्हज परफेक्टली करुन दाखवायच्या असतात. प्रत्येक कटास ला नाव असतं. बेल्टची लेव्हल जशी वाढत जाते तसा कटास किचकट आणि अवघड होत जातो. क्लियर मुव्हज , वेळ , आणि बॅलंस इत्यादी गोष्टींवरुन कटास चे मार्क्स दिले जातात. त्यानंतर माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे फाईट्स झाल्या. फाईट पहाताना माझ्यात इतका जोश चढला होता की मी अगदी नकळत समोरच्याला एक पंच लगावला(नंतर १० पंच खाल्ले हा भाग अलहिदा). सर्वांत शेवटी ब्लॅकबेल्ट्स साठीच्या सर्वांत अवघड परिक्षा झाल्या. त्यांन्ना फाईट्स,कटास शिवाय वेगवेगळी शस्त्र चालवण्याचीही प्रात्यक्षिकं सादर करायची होती.नंतर आमच्या सर लोकांनी हवेत उडी मारुन मडकी फोडणे , फोरआर्म्स ने फरशा, विटा , कौलं फोडणे इत्यादी फाईव्हस्टार आयटम पेश केले .त्या दिवशी मी खुप खुश होतो. मी आता लवकरंच बाळ्याच्या डोक्याची विट करणार होतो.

आता आमची ऑरेंज बेल्टसाठीची ट्रेणिंग सुरु झाली. सर आम्हाला फाईट्स चं एकेक तंत्र अगदी बारकाईनं समजुन सांगायचा. ह्यात त्याचा भर ब्लॉक टेक्निक सुधरवण्याबरोबर अटॅक कसा करावा ? ह्यावरही होता. मी मन लाऊन प्रॅक्टिस करत होतो. अ‍ॅब्ज,हात अगदी निबर झाले होते.सराचा पंच झेलण्याची क्षमता माझ्यात आली होती. आमची मॉक फायटिंग होत असे. फायटींग ची सुरुवात "बो" ने होते. बो म्हणजे वाकुन नमस्कार करणे. मुहासी किक मधे पायाचा तळवा समोरच्याच्या छातीवर असा पंच सारखा मारायचा असतो. ही किक जोरात मारायची नसते, तर जोरदार ताकद लाऊन समोरच्याला मागे ढकलुन मिसबॅलंस करण्यासाठी असते. साईड किक मधे डोक्यापासुन कमरेपर्यंत कोणत्या टेक्निक ने लाथ मारावी ? हे शिकवले गेले. तर सर्वांत अवघड स्पिनींग किक अशी वेगात मारायची असते.

फाईट्स शिकल्यावर आम्हाला पहिला कटास शिकवला गेला. त्या कटासचं नाव होतं "तायकीसिदा". कटास सुरु करण्याआधी कटासचं नाव आदराने घ्यायचं असतं , मग सर ला "बो" करायचा असतो. आणि मुव्हज सुरु करायच्या असतात. १२ स्टेप्सचा तो कटास होता. दिसायला सोप्पा दिसला तरी करताना अंमळ गल्लत होत असे आणि सर ची किक बसत असे. शेवटी एकदाचे आम्ही कटास आणि बेसिक फाईट्स मधे निपुण झालो. पुन्हा परिक्षा जवळ आल्या.

आम्ही ७ जण परिक्षेसाठी क्वालिफाय झालो होतो. माझा नंबर आला तेंव्हा मी फार घाबरलेलो होतो. मी "तायकीसिदा$$$$$$"  म्हणुन कटास सादर करण्यास सुरुवात केली. बावरल्याने मी ३ स्टेप्स मिस केल्या आणि मार्क्स गमावले. ह्यावेळी बेल्ट हुकणार म्हणुन खात्री पटली. पंच आणि किक्स मधे काही चुक झाली नाही. शेवटच्या फाईट राऊंडला माझ्या समोर थोडासा थुलथुल्या पण माझ्या दिडपट पोरगा उभा होता. त्याला पाहुन माझी अंमळ फाटली होती. पण "बो" करुन फाईट स्टार्ट म्हणताच माझ्यात कुठुन शक्ती आली कुणास ठाऊक, मी एक मुहासी किक अगदी परफेक्टली त्याच्या छातीवर मारली आणि तो भुईसपाट झाला. माझी फाईट ९ सेकंदात संपली होती. मला ऑरेंज बेल्ट सह एक प्रशस्तीपत्रक भेटलं, मी त्यादिवशी उड्या मारत मारत घरी आलो. आईनंही पोतंभर कौतुक केलं.

मी वाट पहात असलेली संधी तशी आयतीच चालुन आली. क्रिकेट खेळतांना मी बाळ्याला रन आउट केला, तोच बाळ्या माझ्या नकळत माझ्या मागे बॅट  घेउन पळत आला , आणि त्याने रप्पकन माझ्या पाठीत बॅट मारली. मी कळवळलो. मरणाचं उन होतं, मी बेशुद्ध पडलो तसं कोणी हापश्यावरुन पाणी आणुन माझ्यावर शिंपडलं ... बाळ्या मला शिव्या देत होता. मी तसाच उठलो आणि बाळ्याच्या तोंडावर एक जोरदार पंच लावला. बाळ्यानं तो पंच खाऊनही माझ्यावर बॅट उगारली पण ह्यावेळी मी ब्लॉक वापरला. आणि उलटा फिरुन एक किक मारली ती बरोब्बर बाळ्याच्या काखेकाली बरगडीत बसली. ह्यावेळी बाळ्या कळवळला. त्याच्या हातातली बॅट खाली पडली. तशी बाळ्याला दुसरी किक पोटात बसली, बाळ्या जमिनीवर आडवा पडला. मी त्याच्या तोंवावर मारणार तोच त्याचा डोळा टरटरुन फुगला.आणि बघता बघता काळानिळा झाला. आधीच लाल असणार्‍या बाळ्याचा एक डोळा उघडलाही जाणार नाही इतपत सुजला होता. मी आणि बाकी सगळी पोरं पळुन गेलो. मी गुपचुप घरी येऊन बसलो.

थोड्यावेळाने बाळ्याची भांडकुदळ आई बाळ्याला आमच्याघरी आली. आई बाहेर गेली.नंतर बाळ्याची आई अखंडपणे बोलत होती. थोड्यावेळानं आई घरात आली, आतुन कडी लावली आणि लाटण्याने माझी यथेच्छ धुलाई झाली. माझ्यातला व्हायलंस पाहुन माझे कराटेचे फॅड बंद करण्यात आलं. थोड्या दिवसांनी जास्त पोरं नसल्याने सराला क्लास बंद करावा लागला.


काल ते सर्टिफिकेट पाहुन मला माझे तायक्वांदो चे दिवस आठवले. अ‍ॅक्चुली अजुनही बरीच वेगवेगळी सर्टिफिकेट्स होती. आणि अजुन बरंच काही आठवलं , आणि मी ह्या लेखात बरंच काही लिहीणारंही होतो, पण हा एकंच किस्सा भरभर लिहीता लिहीता एवढा मोठा झाला की बाकी गोष्टी पुढच्या भागात (अर्थात जमल्यास)

- (कराटे फायटर) टार ली - दी ऑरेंज बेल्ट ओनर

5 comments:

प्रभो said...

hahaaa...taroba ..yala 50 pratisaad nakki hote bgha....TRP vadhala asata....aso... :)

Ashish Sarode said...

Hahaha - Tarzan ekdam barobar nav ahe tuzyasathi!

Deepak said...

bhava..
jara balyachi chaukashi kara...
dola neat zala ki ajun sujalelach ahe :)

Unknown said...

haha :) .. mala pan aathwan zali mazya lahanpanachya karate class chi .. keep it up ...

सुshant said...

tulaa orkuTwarachaa 'teaser' milaalaa kaa?

tu muddam reply det nasasheel tar raahu de.

tu chukich samajalaas ewadhach boleen