त्यावेळी मी बी.ई.ला अॅडमिशन घेत होतो. ३ मार्क्सनी माझं फ्रीसीट गेलं, आणि फ्री सीट हवं असल्यास पुण्याबाहेर जावं लागणार होतं , पण नाईलाजानं पे-सिट घेण्याचं कारण म्हणजे पुणं सोडायचं नव्हतं आणि पुणे युनिव्हर्सिटीतंच अॅडमिशन हवी होती , त्यावेळी बाबांचं वर्कशॉप ठिक ठाक चालू होतं, वार्षिक ६०,०००ची फी ही काही मोठी गोष्ट नाही वाटली, मी फर्स्ट इयर ला डाउन झालो आणि त्याच दरम्यान बाबांचं एक मोठं काँट्रॅक्ट गेलं, आणि इथेच खरा उतार सुरू झाला, बाबा इमोशनल असल्याने आधीच मागे राहिलेले. माझ्या चुलत भावांबरोबर पार्टनरशिप मधे धंदा होता. जेंव्हा तो बुडाला, तेंव्हा बाकी लोकं हात वर करून निघून गेले, बाबा कर्ज भरायचे राहिले, माझं शिक्षण मधे नको संपायला म्हणून लोकांकडून भलत्याच व्या़जावर कर्ज पण घेतलेलं (जे मलाही माहित नव्हतं) ... त्यांनी वर्कशॉप तरेल या आशेवर कर्ज घेतलेलं, जी.ई.कंट्रिवाईडचं नाव ऐकूनच असाल .. ते लोक घरी येत , पैसे मागत, घरची थोडी इज्जत असल्याने कोणाची हिम्मत झाली नाही आवाज चढवून बोलण्याची. त्यातच वडिलांनी त्या काळी एका मित्राचं दुकान सेट होण्यासाठी त्याच्या कर्जाला साक्षिदार होते. त्याला दुकान चालवता आलं नाही आणि १०,००० कर्ज बाकी ठेऊन तो पळून गेला, त्याचे काळाच्या ओघात ५०,००० रुपये झाले, त्या बँकेचे लोकंही घरी येत ... २००५ ते जुन २००७ हा काळ अत्यंत क्लेशदायक काळ होता मित्रांनो. कोणी ना कोणी पैसे मागायला येत, कोर्टाच्या धमक्या देत, २००६ च्या दसर्याला आईचं मंगळसुत्र गहाण ठेवावं लागलेलं, अर्थात अशा काळात कोणाचं मानसिक संतुलन रहात नाही, आई बाबांना नाही ते बोले, आणि बाबा रडत .. सो आम्ही रडत असू .. पण घरातले पाच जण कधीच वेगळे झालो नाही. एक टाईम आई अत्यंत साध्या तांदळाचा भात करे.जो गळ्याखाली काय, तोंडात घेतानाच मळकी भरे. मी २००६ ला पास आउट झालो खरा, पण जॉबच्या बाबतीत यथातथाच .. कोणतंही सर्टिफिकेशन नाही, भाड्याला पैसे कसे मिळत याचं आश्चर्य वाटे (घेताना तर त्याहुन अधिक लाजंच वाटायची) ,पैसे वाचवण्यासाठी मी टिकीट बुडवत असे. ह्या ना त्या राउंडला बाहेर पडायचो. बाबांना मी जॉब शोधायला गेलो की एक आशा वाटे, पण मी रिटर्न आलो की ती मावळत असे. ४ वेळा मी पुर्ण सिलेक्ट होउन पण फक्त वाय.डी. आहे म्हणून एच.आर. राउंड मधे निघालो होतो.एका मित्राने मला सॉफ्टवेयर टेस्टिंग साठी १५००० दिले होते, माझी परिस्थिती माहीत असून. पण त्या क्लासचा काही फायदा झाला नाही. आमचे पुणे युनिव्हर्सिटीचे ५८% हे पटना, केरळ, भोपाल युनि.च्या ८०अन्प ९०% समोर तोकडे पडायचे. ऑफकँपसला क्रायटेरिया मधूनच बाहेर ... मार्च २००६:त्यातच आज्जी वारलेली,बाबांनी चुलत भावाबरोबर एक स्टिल ट्रेडींगचा बिझनेस चालू केलेला, पण पुन्हा पैशांअभावी कोणा बिगशॉटला पकडून भांडवल घ्यावं लागलं.. आणि अर्थात, इनकमचा मेजर भाग तिकडे जात, बरकत अशी नाहीच. अशा फ्रस्ट्रेशन मधे. एका फेक जॉब मधे मी मुंबईलाही गेलो, माझे सर्व ओरिजिनल्स देउन दीड वर्षाचा दिड लाखाचा बाँडही साईन करून बसलो ,पगार ६,५०० .. सांगितलेली पोस्ट : सॅप कंसल्टंट , ऍक्चूअल जॉब : सॅप ट्रेनर ते ही एका इंस्टिट्युट मधे. घरून आई ने उसने दिलेले ४००० घेउन आलेलो, जॉबच्या खुषीत १००० खर्च पण केलेले. पण जेंव्हा साक्षात्कार झाला, तेंव्हा संयम उरला नाही, तो एक आठवडा माझ्या आयुष्यातला सर्वांत घाण आठवडा होता. रोज त्या इंस्टिट्यूट मधनं आलो की रडत बसे, बाबांचा फोन यायचा, त्यांच्या आशा, अपेक्षा... मी पुर्ण भरडला गेलो होतो.पण मला तिथल्या बाकी मुलांपैकी एकाने उत्तम समजावले, म्हणाला तु तुझे ओरिजनल्स घे आणि निघ इथून .. इथं तुझं करियर बरबाद होइल.. त्याचे खरंच उपकार झाले,कारण त्याने ठिणगी नसती टाकली, तर मी आज मुंबईमधे ७-८००० चा ट्रेनर असतो ... मी जेंव्हा सर्टिफिकेट्स मागितले आणि जायची मागणी केली, त्या मॅनेजरने नाही म्हणाला, मी त्याला "मोगलाई आहे का ?" असे म्हणालो , तो लांड्या निघाला, आणि प्रकरण चिघळलं, फारच वादावादी झाली,मला माझं करियर,लाईफ सगळंच संपलेलं दिसलं, मी कसलाही विचार न करता, त्याला पुर्ण ईस्टिट्यूट मधे सर्वांदेखत बदडून काढला. कोणाचीही मला आवरायची हिंमत झाली नाही(तसंही कोणी आलंच नसतं,सगळे माझ्यासारखेच अडकलेले.) .शनिवारी हा सगळा प्रकार घडला होता. मी गेस्ट हाऊस वर निघून गेलो. बाकी मुलं अर्थात खुष झाली. कारण जे ही आले होते सगळेच मजबुरीने आलेले. मी पोलीसांची वाट पहात होतो. पण झालं नाही,सोमवारी ऑफिसबॉय माझी सर्व कागदपत्र घेउन आला, आणि मी घरी आलो . जॉब लागला म्हणून मुंबैला जाताना जसे सगळे लोक पहात होते, तसेच घरी आलो तेंव्हाही पहात होते. वडीलांना फारच दु:ख झालं.. पण त्यांनी अशाही परिस्थितीत मला संभाळून घेतलं. घरात कोणी कोणाशी चुकूनंच बोलत होतं .. मुंबईहून आल्यावर घराच्या बाहेर पाउल पडलं नाही, त्या दिवशी नंतर केवळ आणि केवळ अभ्यास करून अॅप्टिट्यूड आणि टेक्निकल फंडे मजबूत करत ह्तू. २० जुन २००७ गेमलोफ्ट - ऑल राउंड्स क्लियर, २१ जुन २००७ - सी.जी.ई.मुंबई, ऑल राउंड्स क्लियर. २२-जुन २००७: ओपस सॉफ्टवेअर , ऑल राउंड्स क्लियर. ३ दिवसात तीन ऑफर लेटर्स मिळालेली. जेंव्हा बाबांना कळालं तेंव्हा फक्त "पगार किती रे? " एवढंच बोलले, बाकी मी समजलो. गेम्स खेळून एकेकाळी वायडी झालेलो. आणि जॉब लागायला उशीर झालेला, ती अपराधी भावना कित्येक दिवस मनात होती. गेमलोफ्टचं २.२चं पॅकेज नाकारलं. सी.जी.ई. मुंबई, अंधेरी(पुर्व) तोच इलाका जिथं कडू आठवणी ताज्याच होत्या.२.८ देणार्या सी.जी.ई.ला लांबुनच बाय केला.. ओपस मधे ५० जणांत फक्त एकटा सिलेक्ट झालेलो. डोमेन उत्तम होता, जॉब प्रोफाईल मधे फार मोलाचा एक्पिरियंस मिळेल हे कळलेलं. १०,५००वर अर्ज साईन करून रुजू झालो. एच.आर. म्हणाला स्लिपर्स घालून ऑफिसला येउ नको इथून पुढे. हे घे ऑफर लेटर. ज्याने मला कोर्स साठी पैसे दिलेले तोच मित्र मला २ फॉर्मल ड्रेस आणि फॉर्मल शुज घ्यायला घेउन गेला. कोणालाही जॉब लागल्याचे पेढे वाटले नाही . २६जुन २००७ : करियरची सुरूवात झाली. पहिल्यांदा ऑफिसात जाण्याचं फिलींग माझ्यासाठी बरंच वेगळं असावं. पहिला पगार १ जुलैला व्हायला हवा होता. पण अकाऊंट ओपनींग मधे जरा डिले झाला असावा. अकाउंट वाले म्हणाले पुढच्या महिन्यात सगळा पगार जमा होईल. एक ऑगस्ट ची किती अतुरतेने वाट पाहिली. १ ऑगस्ट गेला.. २ गेला.. ३ गेला .. ४ गेला.... ५ गेला.... ६ गेला .. मी वेड्यासारखा पहिला पगार मिळण्याची वाट पहात होतो. ७ तारखेला पगार झाला. जंगली महाराज रोडच्या ए.टी.एम. वरुन दहा हजार , पाचशेच्या हिरव्या करकरीत नोटा.. माझा पहिला पगार ... मी त्या दिवशी रडलो अक्षरशः .. चितळ्यांकडून पेढे आणले,माझी फाटकी बॅग लाकडी पुलाहून फेकून दिली, आणि नवीन सॅक विकत घेतली, घरी आलो रात्री ११ ला. घरचे वेड्यासारखी वाटच पहात होते.. पगार हातात दिल्यावर पुन्हा माझा छोटा भाऊ सोडून सगळे रडले. सगळे पैसे दुसर्याच दिवशी संपले. याच काळात माझी 'जेन' भेटली. आयुष्यातल्या नव्या एक्साईटमेंटचा अनुभव येत होता. १५ ऑगस्ट२००७: मला पहिल्यांदा हैदराबादला ऑनसाईट पाठवत होते. मुंबै हुन फ्लाईट होती. जेनला भेटशील का विचारलं , ती भेटली नाही पण मला तिने फोन वरून मिस कॉल केला.चला भेट नाही किमान कॉल तरी आला ! मी खुष होतो. ही आमच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात.मी विमानाने तेही किंगफिशरने जाणार हे गल्लीत व्हायला वेळच लागला नाही. जेंव्हा एयरपोर्ट वर प्रथम पाउल ठेवलं, सगळा इतिहास पुन्हा डोळ्यांसमोरून गेला. आई-बाबांची लै आठवण आली. बोर्डिंग करताना , विमानात त्या सुंदर्यांचं प्लास्टिक हास्यही सुखाउन गेलं, आत ढंगांत आलो की काय असा धूर पसरलेला. हैदराबादेत मला दिवसाला ३०० रुपये अधिक मिळत, मी ऑटो न करता हॉटेल पासून ४ किमी चालत ऑफिसला ये-जा करायचो. दिवसाचा प्रत्येक रुपयाचा हिशेब असे. एकच टाईम जेवायचो, हैदराबादात हे उत्तम होतं, ३०-४० रुपयांत फोट फुटेस्तोवर जेवण.. २० दिवसांत ५००० सेव्ह, केवळ १००० खर्च. पण आयुष्यात प्रथमच घराबाहेर राहिल्याने जबरदस्त होमसिक झालेलो. आजारी पडलो तेंव्हा जेन ने माझी मानसिक काळजी घेतली, फोन वरून औषधं प्रिस्क्राइब केलेली. ऍक्चुअली डेटा सेंटर मधल्या ए.सी. मुळे तब्बेत बिघडली होती. २००७ च्या दसर्याला आईचं मंगळसुत्र माझ्या पगारातून सोडवलं गेलं, भावाचा धंदा बर्यापैकी सेट होत होता. पुढच्या हैदराबाद दौर्यात सेव्हिंगच्या जोरावर मोत्यांची ज्वेलरी खरेदी केलेली.. कळत काही नव्हतं पण निसता जाउन भाजीपाल्यासारखं उचलून आलो. आश्चर्य म्हणजे ते घरी लैच आवडलं .. आणि होतं ही उत्तम ... Smile ... त्या नंतर आमच्या खानदानातला सर्वप्रथम देशाटन करणारा मी, बाबांचा उर भरून आला होता. ते तुम्ही इट्स अफ्रिका ब्वना मधे वाचलंच असेल. हा आमचा २००५-२००७ चा इतिहास. तुम्हाला का सांगितला माहित नाही, आज का आठवण आली माहित नाही.बरंच काही होऊन गेलंय पण लिहीणं टाळलंय ..
माझ्या पणजोबांच्या काळी श्रीमंती होती. पणजोबा पाच-पाचशे म्हशींचा व्यापार करत, पुण्यात बग्गीतुन फिरत. पण घोड्यांची रेस, आणि दारू यामुळे आणि महामारीत म्हशी मेल्यामुळे आपली श्रीमंती गेली असं बाबा जेंव्हा सांगत तेंव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारतो. इतिहासात रमू नका, उद्या काय करायचं ते पहा. ते शांत बसतात मग .. घरात नेहमी हसतं-खेळतं वातावरण असतं , आई-बाबांची मतं प्रत्येक गोष्टीत विरुद्ध. नेहमी भांडी वाजणं सुरूच. कधी बंद पडली तर मी ती हळूच चालू करून कलटी मारतो.
तर हा असा मी असामी ... कोणी मला ओळखावं म्हणून मी लिहीत नाही, तर मी लिहीतो माझ्यासाठी, जेंव्हा मी आयुष्यात निराशेच्या गर्तेत जातो , तेंव्हा मी माझा हा काळ आठवतो .
(आपला ऋणी)
टारझन
17 comments:
जबरा भाउ !
तु घेतलेल्या कष्टाला व तुझ्या फॆमेलीला माझा सलाम !
जिवनभर असाच आई-वडीलांना धरुन रहा मित्रा !
जगात सर्व मिळतं हे तुला कळालेच असेल.. तेव्हा धीर धर नेहमी !
आज तुझे सर्व व्यवस्थीत आहे.. तेच उत्तम राख !
अजून काय लिहू !
तुज्या अनुभवातून गेला आहेस त्यात तु सर्व काही शिकलाच असशील !
अगदी लई भारी...
खूपच करुण वाट्ला.....
नशीबदार आहे तू के तुला अशे आई काका आहे.....
जिवनात दुख तर अनेकांनाच असतोच....
पण त्या काळात हे अशे एकमेकां बरोबर राहणे अगदीच आवश्यक आहे.....
असाच प्रकारे आई काकांना प्रेम कर आणि सांभाळून घे.....
तुला भविष्यात नक्कीच काही उत्तम मिळ्णार आहे म्हणूनच आता थोडे स्ट्र्गल आहे....
जे झाले ते तर झाले......आता तुझा चांगला काळ येणार आहे....
माझी तर सगळीच शुभेच्छा आहे तुझ्याबरोबर.....
सलाम मित्रा
डोळे पाणावले मित्रा वाचुन..
अर्थात यातील काही moments मी जवळुन पाहीलेले आहेत.
त्यामुळे i'm one of them who know, what u were going through that period.
पण आता सारे कसे सुरळीत चालु आहे...(आपल्या सर्वांचेच including u, me n bapu )
Life throws challanges at us and how well we have responded !
so, cheers mate n rock on as u always do.
तुझा स्ट्र्गल वाचून मला माझी उमेदवारीची वर्ष आठवली. मित्रा...... गहिवरुन आलं.
लिहिलयसही सुंदर. असाच लिहित रहा..
तुझ्या मेहनत आणि चिकाटीला माझा मानाचा मुजरा!!
खरंच सलाम मित्रा! ह्या सगळ्यातुन मिळालेली अनुभवची शिदोरी पुढील वाटचाल यशस्वी करोच पण आनंददायी देखिल होवो ही सदिच्छा!!
-कोलबेर
घाशीराम कोतवाल : साला टार्या खुप सोसलस यार आई शपथ पण पगाराचा चांगला उपयोग केलास आईचे दागीने सोडवलेस खरच
मस्त लिहिले आहेस
सलाम दोस्त, मानलं तुला!
ग्रेट!! प्रत्येकालाच स्ट्रगल होतं, काहींना जबरा होतं... पंण त्यातून शिकणारे अन् परिस्थितीला वळवणारे कमी असतात.
छान लिहिलेस मित्रा. तुझ्यापुढे आपला स्ट्रगल काहीच नाही! त्या मित्राला कधीच विसरणार नाहीस तू. त्यालाही सलाम!
मुमुक्षु
धन्य ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ।
कर्मभोग कोणालाच चुकलेला नाही. तो भोगूनच संपेल. उलट, लहान वयात कठिण परिस्थितीतून जावे लागले की पुढचा काळ चांगलाच असेल ही
खात्री बाळगा. असो. आपल्यावर चांगले संस्कार करणार्या आपल्या आई-वडिलांचे विशेष अभिनंदन.
_________________________________
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित पुरुषोत्तम.
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित
करणारे नेते
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहित आहे
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि
शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर त्याला
द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला
गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !
जमेल तेवढं दाखवित चला त्याला
ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव,
मात्र त्या बरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला.
पाहू दे त्याला पक्षांची अस्मान भरारी...
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर
डोलणारी चिमुकली फुलं.
शाळेत त्याला हा धडा मिळू दे -
फसवून मिळवलेल्या यशापेक्षा
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना आपले विचार
यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी.
त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्या
भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद
त्यानं कमवायला हवी.
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं...
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दु:ख दाबून.
आणि म्हणावं त्याला,
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला
अन् चाटुगिरीपासून सावध राहायला.
त्याला हे पुरेपुर समजवा की
करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून
पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा !
धिक्कार करणार्यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला,
आणि ठसवा त्याच्या मनावर –
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेनं वागवा पण
लाडावून ठेऊ नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
आणि धरला पाहिजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत राहा त्याला –
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.
माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे,
खूप काही मागतो आहे... पण पहा..
जमेल तेव्हढं अवश्य कराच.
माझा मुलगा -
भलताच गोड छोकरा आहे हो तो.
- श्री. अब्राहम लिंकन
- अनुवाद कवि श्री. वसंत बापट
क्या बात है यार.
मनापासून सलाम.
मला निकाल लागल्यावर ओफर लेटर मिळायला 2-4 महिने लागले होते.
पण तेवढ्या वेळात सुद्धा जाम वाईट अवस्था झाली होती.
त्यावरूनच तुझी काय अवस्था झाली असेल याची कल्पना येते.
खरंच सलाम मित्रा!
This is not black history my dear friend. This was a great lesson which life has taught to you. And you also learned a great from that. You are very lucky to have a family like this which is very important. Wish u all success in your life...
मिसळपाव वर तुमचे लेख,प्रतिक्रिया वाचून कुतुहल वाटले. ब्लॉग ची लिंक मिळाली. जवळ जवळ आख्खा ब्लॉग वाचून काढला.
पण ही एन्ट्री बेश्टॆट!!!!
आम्ही तुमचे पंखे झालो!!!
+1
Sahamat..
pahila pagar ghari detana kay hot te aapalyaasarakhya lokanach samaju shakat
आज अपघाताने तुमच्या जालनिशीवर आलो....बहुतेक सर्व पोस्ट वाचल्या (प्रतिक्रिया टंकवायला "कं" केला)...ही पोस्ट मनाला सर्वात जास्त भावली...थोड्या फ़रकाने मी पण अशीच परिस्थिती अनुभवली आहे...मनापासुन सलाम तुम्हाला!!
Taru bhai, Tula khota vatel.... mi radat hoto he vachta na...
Same nahi pan javal javal yach paristhitun gelelo aslya mule sagle kahi dolya samor ale mitraaa… Aso apalya parisharamache fal apalya la bhetle yat aanand ahe.
“ Duniya lakh bura chae kya hota hai , Wahi hota hai jo manjure Khuda hota hai”
Kharach apalya aai bapachi nakkich kahi tari punyai aaplya kama yet asnar ase vatte re...
Pan eak sangto mitra kahi aso apalya hatat jovar takat ahe to var kona samor zukayche nahi ... ani tya Mogalya la marles te kharach bare keles.... tya baddal abhinandan.... Nahi tar aaj hi tu tithach khitpat padla astaaas layki asun pan.
Mi suddha SAP consultent ahe. ya prakare baryach janani fasavaych prayatna kelela mala pan yogya te guidence bhele seniors kadun mahanun vachlo.
Any wayas , best of luck for your future
पुनःश्च सर्व प्रतीसादाकांचे मनापासून आभार मानतो.
होता तो एक काळा च इतिहास होता. कधी तरी आफ्रिकेतल्या एकांतवासात नोस्तेल्जिक झालेलो तेंव्हा लिहिलेला. आता सगळं मजेत आहे.
शुभेछुकांचे पुन्हा आभार :)
Post a Comment