डिस्क्लेमर : खालील लेखात प्रत्येक ऊल्लेख हा केवळ पी.एम.टी. शी संबंधित आहे. नोंद घ्यावी.
काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ? अहो नामकरन झालं ना? पी.एम.टी आणि पी.सी.एम.टी. विलीनीकरण झालंरे टार्या... "अर्रे होन दे रे भई... अप्पन तो ईसको मरते दम तक पी.एम.टी. इच बोलेंगा !"
हुह्ह! काही दिवसांपुर्वी ख.फ. वरील चर्चेत पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली. हा लेख म्हणजे काही पी.एम.टी.चा इतिहास नाही.माझ्या वाटेला पी.एम.टी.चे जे पराक्रम अनुभवले ते लिहीतोय. अजुनही माहित नाही की काय लेखात लिहिणार आणि काय ऊतरणार... संभालके लो भिडू लोग.
जवळपास १२-१५ वर्षापुर्वीचं आठवतंय, तेंव्हा मी नगररोड वरच्या कोरेगाव भिमा आणि वाघोलीच्या मधलं एक छोटसं गाव लोणीकंदला रहात असे. बाकी नातेवाईक पुण्यात रहात असल्याने दर सुट्ट्यांमधे पुण्यात यायचा योग येत असे. अशा वेळी एकमेव साधन म्हणजे पी.एम.टी.,कॉपिटीशन ला फक्त कमांडर(जिबडं) ही प्रायव्हेट वाहतुक.आतासारख्या डुगडुग(?!?) सारख्या ६(ऍक्चुअली १२) आसनी डुकरांचा त्याकाळी वावर नव्हता. पण पी.एम.टी. सगळे निमशहरी आणी खेडी-पाडी पुण्याला जोडण्याचं काम केलय. असो .. बालपणचा सुट्ट्यांमधला प्रवास, नंतर मोठा झाल्यावर कॉलेजला जातानाचा रोजचाच पी.एम.टी. प्रवास. पी.एम.टी. प्रत्येक पुणेकराच्या मनात एक धृव स्थान तयार करून आहे.
पण काय हो ? कशी आहे पी.एम.टी. सेवा? तिचे कर्मचारी कसे वागतात प्रवाशांशी ? गाड्यांची कंडिशन कशी असते? तिला वेळेचं काही धरबंधन आहे का ?
सगळ्यांची ऊत्तरे नकारात्मक मिळतात. आहाहा काय ते पी.एम.टी वाहक आणि चालक.
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता खालील प्रमाणे :-
१) आपल्याला कमीत कमी शब्दात प्रवाशाचा कारण नसताना जास्तित जास्त अपमान करता आला पाहिजे.
२) आपल्या तोंडावर माईक टायसन सारखी मगृरी+घमेंड्+*डमस्ती असली पाहिजे.
३) आपल्यात पैसे खाऊ गिरी कुटून कुटून भरलेली असली पाहिजे.
४) बाई बद्दल थोडा सॉफ्टकॉर्नर असणे आवश्य. (वासूगिरी का काय ते)
५) थोबाड हे संवादासाठी नव्हे तर गुटखा किंवा तंबाखू साठवण्याचं कोठार आहे हे समजलं पाहिजे.
६) दृष्टीदोष असणे आवश्यक, तो बसस्टॉप १०० मिटर मागे किंवा पुढे आणि बहुतदा दिसलाच नाही पाहीजे या साठी.
७)आपण अशोक सराफ चे जबरदस्त फॅन असले पाहीजे, शर्टच्या पहिल्या ३ गुंड्या फक्त भरतकामाच्या आहेत हे कळल पाहीजे.
८) डोळ्यात एक प्रकारची लाली हवी.
९) नवख्या पॅसेंजरचा पोपट करण्याची कुशलता हवी.
१०) ५० पैशाचा क्षुद्र रक्कम न समजता, त्या लेव्हलचा भ्रष्टाचार करता यायला हवा.
या पात्रता असल्या तरच तुम्ही मग १० पास/नापास आहात का ? बेरीज-वजाबाकी जमते का? लिहीता वाचता येतं का ? या गौन गोष्टी विचारात घेतल्या जातात.
असे असतात पी.एम.टी. चालक :
चालक लोक हे सुरूवातीचं आणि शेवटचं स्टेशन फक्त मजबूरी म्हणून बस थांबवतात.फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर ऊपकार म्हणून थांबवतात (ऊरनारी माणसं गलका करतील, हे एक अजुन छोटंस कारण). बस मोकळी नेली तरी यांच्या तिर्थरूपांच काहीही जात नसतं. पी.एम.टी.चे ब्रेक्स एक तर अति टाईट नाही तर अति वाईट असावेत (अरे दृष्टीदोष असने ही पात्रता आहे नाही का ?) कारण क्वचितच बस योग्य ठिकाणी थांबते. आणि चालक प्रवाशांना कसं पळवलं याचा असुरी आनंद घेऊन मनात हसतो. हा, कोणी बाई कुठे दिसली की लग्गेच काच्च कन् बस तिच्या पायाजवळ थांबते बरका !! आज्जी-अजोबांना बस मधून ऊतरण्यास वेळ लागला म्हणून चालकाच्या बायकोची डिलेव्हरी हुकली अशा रागाने त्यांना २ शब्द बोलण्याचे अधिकार परमेश्वरानेच बहाल केले असावेत. कोणालाही बस मधे सहजा-सहजी प्रवेश मिळू नये, कारण यामुळे प्रवाशांना कोणतीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्याची जिद्द तयार होईल असा नेक हेतु या मागे असावा. चालक(पायलट) लोक पुण्याच्या अति खड्डेमुक्त रोड( हवाईपट्टी)वरून ही बस (विमान) फार शिताफीने चालवतात(उडवतात). जबरा. काही चालक तर ईतक्या जोरात गाडी हाणतात जणू काही त्यांना 'जोराची' लागलेली आहे .. कधी एकदा थेवटचा स्टॉप येतो आणि कधी मी 'सुलभ' मोकळा होतो असे त्यांना होत असावे
यांना चालत्या गाडीतुन साइड विंडोतुन तोंडामृत थुंकण्याचे जबरदस्त स्किल असते. स्टेरिंग सोडून तंबाखु मळण्यात यांचा हात कोणीच चोळू शकत नाही. आणि कोण आडवा गेला की हे लोक ऊभी शिवी देऊन आई-बहिणींचे पावित्र्य काढतात. घरी खाण्याचे हाल असोत पण एकदा का सिट वर बसलो की सबंध जगाला चालवण्याची ताकद आपल्यात आली असं हे लोक दाखवतात. बस मधे कोणी ओळखीचा चढला की त्याला खास चालक महाराजांशेजारी "इंजिनासनावर" बसण्याचा मान मिळतो, मग हे लोक वैश्विक विषयांवर भारी-भारी चर्चा करतात, ते ऐकण्याचं भाग्य फार थोर. चालकांना छोट्या गाड्यांना कट मारणे, दुचाकीवाल्यांना दाबून रोडखाली ऊतरवणे,एखाद्याच्या पार जवळ जाऊन बसं थांबवून त्याला चादरीसारखं पांढरं करणे या लिलांपासून एक स्वर्गिय आनंद मिळत असावा.
अशाच सौजन्यमुर्तीचा एक किस्सा :
एक इसम मुंबैहुन पुण्यात प्रथमच आलेले. भोसरी स्टॉपवर बस थांबलेली. चालक महाराज रेडीएटर मधे पाणी भरत होते. भोसरीची बहुतेक बस नाशिक फाट्याहूनच जाते(पिंपरी-चिंचवड कडे जाणार्या गाड्या सोडल्या तर). त्या इसमाने चालकाला विचारलं "बस नाशिक-फाट्याहुन जाईल काहो ? " , चालक (अत्यंत मंजूळ आवाजात्,ज्या आवाजात आपण कुत्र्याला हाकलतो) "नाय नाय .. बस आळे-फाट्यावरून जाते..." ... मी आणि आमचा ग्रुप मागेच बसलेलो .. "तिथे काय तुझी बायको व्याली आहे का रे लब्बाडा ? " --बाईच्या आवाजात अस्मादिक.आणि पुर्ण बस हास्यझटक्याने हालली. (ड्रायव्हरला थोडी अक्कल असल्याने बिचारा गुपचुप निघुन गेला. नडला असता तर पुर्ण भोसरी-मनपा त्याला नको नको ते ऐकावे लागले असते. आम्ही पी.एम.टी कर्मचार्यांविरूद्ध पुकारलेले हे बंड होते). त्याइसमाला सांगितलं बाबा बस तिकडूनच जाते बसा तुम्ही.. पण बाबांचा त्या चालकावर विश्वास, परत ४ लोकांना विचारून चौकशी करत होते. असो ..
असाच एक विनोद आठवला , एक माणूस रोज कामाला जाण्यासाठी सकाळी ९च्या बस ची वाट पाहत असे. एक बस चालक हटकुन थोडी पुढे बस थांबवत असे. आणि माणुस चढायच्या आत पुण्हा बस चालू करून जात असे. एकदा माणसाला बस पकडण्यात यश आलं. तो ड्रायव्हर ला म्हणाला , ही बस काय तुमची आई आहे का हो ? चालक - "नाही", माणूस- "मग बहीण ? " चालक - "नाही", मग बायको असेल, चालक म्हणाला नाही बुआ ...
माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "
असे असतात पी.एम.टी.चे वाहक :
वाहक हे चालकाला बरोबर कॉप्लिमेंट देत असतात. यांचा पॅसेंजर्स शी जास्त संबंध येतो. हे लोक तोंडात मध घेऊनच असतात. बाई बरोबर कशी वासूगिरी करावी यात एकदम निष्णात. आणि कोणी कॉलेजचा पोर्यादिसला रे की त्यांचा टोनच बदलतो. म्हणूनच आम्ही असे वाहक फाट्यावर मारलेत (लिट्रली). यांना पैशाचं फार मोल असतं. ५० पैसे देखिल हे लोक खाण्याच सोडत नाहीत. प्रवाशाने टिकीट मागणे म्हणजे आपला अपमान आहे आणि उरलेले सुट्टे मागणे म्हणजे या बाप्पूला त्याची २ एकर बागायतीच मागितली असं वाटतें.आपण पी.एम.टीचे मालक आणि प्रवाशी आपले कर्जदार आहेत अशी वाहकाची समजूत असते. कोणी दरवाज्यात उभा राहीला की यांना मिरची का लागते कळत नाही. स्वतः तिथेच ऊभे राहतील मग. सकाळी सकाळी १००-५००ची नोट काढणार्याची हे लोक भारी आरती करतात. प्रवाशाला बस मधे घेऊन आपण फार ऊपकार केलेत अशी यांची धारणा असते.कोणी यांना अमुक ठिकाण आले की सांगा हो असं विचारलं की हमखास माणूस २ स्टेशनं पुढे ऊतरून पुण्हा रिटर्न येतोच.बाकीच्या पैशांसाठी हे लोक प्रवाशाला शेवटच्या स्टॉप पर्यंत रखडवतात.बिचार्या प्रवाशाचा जिव हरणीच पाडस व्याघ्रिये धरीयेले सारख्या हरणी सारख होतं ...आणि शेवटी जर काही घोळ झाला तर हे लोक "बेनिफिट ऑफ डाऊट" स्वता:ला घेतात. प्रवाशी काहीही करो .. पैसे मिळत नाहीत. काही वाहक हे बाजिराव असतात. त्यांनी प्रवाशाकडे येण्या पेक्षा प्रवाशाने त्यांच्या कडे जाऊन टिकीटासाठी भिक मागावी असे त्यांना अपेक्षित असते. अशा कंडक्टर्स कडे आम्ही कधीही जात नाही. आपसूकमग रागारागाने मागे येऊन टिकीट देताना त्याचं तोंड बघताना आम्हाला पण एक असूरी आनंद होतो.चालक -पॅसेंजर्स चे भांडण पी.एम.टी. मधे फार कॉमन आहे. आणि हे झाले की सगळे लोक अगदी सापा-मुंगसाची लढाई बघावी तसे कौतुकाने बघतात. आणि मधुनच येणार्या कमेंट्स फारच भारी असतात.एकदा टिपीकल बामन बाईचं सुट्ट्या पैशावरून कंडक्टर शी वाजलं. कंडक्टर आपण पैसे दिलेत या भुमिकेवर (नेहमीप्रमाणे) ठाम होता. पण बाईच पण बामनी रक्त होतं .. कडाक्कड भांडणाला सुरूवात झाली.. कंडक्टर नी अतिऍग्रेसिव्ह भुमिका घेत.."पैशे धिलेत आं.. बोलायच काम न्हाय सांगुन ठीवतो..च्यायला हेवडंच आसल तर सुट्ट काढायचं (आमच्या ग्रुप मधुन एक बायल्या आवाज ',काय काढायचं हो ?' )जास टरंमटरंम करायच काम नाय". बाई "काय पण हा निर्लज्जपणा ? ३ रुपयांसाठी कसे बोलताय ? तुम्हाला काही रित आहे की नाही...माझे ३ रुपये द्या नाही तर गाडी पोलिसस्टेशनात घ्या ". समोरचा जेवढं शुद्ध मराठी बोलेल त्याच्या १० पट वाहकाची मराठी खालवते. शेजारची बाई लगेच त्या बाईंच्या मदतीला धाऊन आली "होना! कित्ती निर्लज्ज असतात ही लोकं, मेले.." वाक्य तोडत वाहक " ए शेंगदाणे .. तुला काय करायचंय गं?" "तिला कुट घालायचाय"-पुन्हा ग्रुप मधुन एक बायल्या आवाज" भांडण पेटत पेटत जातं शेवटचं स्टॉप येतं .. बाई शेवटचे (बस मधले शवटचे,ती दिवसभर याला ३ लाख शिव्याशाप देणार हे नक्की.) ऊद्धारोद्गार काढून ऊतरतात. वाहक अगदीच काही झालं नाही असं दाखवून बेल मारतो.
अशी असते पी.एम.टी बस :
आहाहा ! आमच्या सारखे क्षुद्र काय ये वर्णन करणार या महान वस्तुचं ? पी.एम.टी.ला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला धुण्यात येतं (जाहिराती रंगवायच्या असल्यास तो अपवाद) ... ३६३ दिवस त्यावर हवा,पाणी, धुळ या गोष्टींचा परिणाम होऊन एक सुरक्षाकवच तयार झालेल असतं.एका धुळीने मळलेल्या बस वर कोणीतरी "आता तरी पुसा" अशी सुचना लिहीली होती. बर्याच सिटच्या मागे तुम्हाला पुण्याच्या मजनुने आपल्या लैलेच नाव लिहीलेलं आठळेल, किंवा आमका कसा *डवा किंवा *दर*द आहे. आमुक सर कोण्या मॅडमवर डोरे टाकतो, ई. गोपणीय माहीती पी.एम.टी. च्या सीट मागे मुद्रित असते. काही ठिकाणी सुचनांचे काने-मात्रे काढून त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याचा पुणेरीपण आपले पुणेरी पॅसेंजर्स करतात. तुम्ही कधी पी.एम.टी. च्या मागे बाईक चालवली आहे का हो ? कीतीही स्वच्छ रोड असू देत,पी.एम.टी मागे एक धूराळा ऊडवत चालते, जेने करून मागच्यांना त्रास व्हावा. जेंम्स बॉंड चित्रपटांत असाच फंडा त्याच्या गाडीसाठी इंप्लिमेंट केला होता. पी.एम.टी. ची अजुन एक खासियत म्हणजे, अशी एकही पी.एम.टी नाही, जिला कुठूनतरी एखादी खोच लागलेली नाही (हे नजर लागू नये म्हणून असावे) तिच्या अनेक खिडक्यांपैकी किमान एक तरी खिडकी निखळलेली असतेच. जिच्या सर्व खिडक्या शाबूत ती पी.एम.टी. नव्हेच. पी.एम.टी.चा गियर दांडू पाहिलाय का आपण ? तो एक मिटर व्यासाच्या वर्तुळाकार परिघात घुमत असतो. पी.एम.टी प्रवाशांच्या कंफर्ट चा फार विचार करते. म्हणूनच की काय ती एक चालते फिरते मसाज सेंटर आहे. त्यात बसलं की त्या व्हायब्रेशन्स ने तुमचा पुर्ण बॉडी मसाज होऊन तुम्हाला दिवस ऊत्साहात जाईल किंवा दिवसाचा थकवा निघेल.
पी.एम.टी. तुम्हाला संयम कसा ठेवावा हे शिकवते. बसची वाट पाहून पाहून तुमच्या संयमाला एक नविन ऊंची प्राप्त होते. आपल्या राहुल द्रविडच्या संयमाचं हे एक गुपित आहे. तोही पी.एम.टी. ची वाट पाहून पाहूनच शिकला असावा.
वेळेवर बस आली की तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला पाहीजे. आणि चालकाचा जाहिर सत्कार पण. पी.एम.टी एवढी मजबुत असते(दिसते) की काय सांगू... बहुतांश वेळा डाव्या बाजुला पुर्ण वाकलेली पी.एम.टी. पाहीली की पुणेकराने तिच्यावर किती बलाक्तार केला आहे असा विचार येवुन डोळे पाणवतात. काहींना पी.एम.टी. म्हणजे एक स्वर्गाचे दार वाटते. दर महिना एक बळी या हिशोबाने पी.एम.टी. यमराजाचं काम फुकट करते.
पण मला काही गुणांचं कौतुक करावसं वाटतं... हे चालक लोक कमालीचे डोंबारी आहेत. शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्यावरन दुचाकी चालवनं ही एक कौशल्याचं काम आहेत. आजुबाजुलाच बसलेले ओलं खोबरं,आलं,कोथंबीर विकणारे भाजीवाले, फेरीवाले, आणि पुण्याचे अतिशिस्तप्रिय वाटसरू लोक, आणि जेमतेम बसच्याच रुंदीचे रस्ते... यातुन आपला चालक शिताफीने वाट काढतो. वृद्ध व्यक्तींना चढण्या-उतरण्यास मदत करणारे वाहक आणि जरा जास्त वेळ बस थांबवुन "नीट ऊतरा हो मावशी, बस थांबलेली आहे, घाई करू नका!" असे म्हणनारे चालक ही आहेत पी.एम.टी. मधे.
वाकडे तोंड न करता अगदी ७ रुपयांच्या टिकीटासाठी १००ची मोड देणारे वाहक ईथे विरळच.सगळ्या प्रवाशांशी नम्र पणे हसत खेळत प्रवास करवणारे वाहक " मधले पुढे चला, गर्दी करू नका , ऊतरणारे पुढच्या दाराने ऊतरा " एका विशिष्ट तालीत म्हणतात तेंव्हा मजाच वाटते. गणपती, दसरा,दिवाळी ला आपल्या बसला चालक-वाहक मस्त सजवतात. जणु आपल्याला रोजी-रोटी दिल्याबद्दल एक छोटीशी परतफेड. सगळे चांगले-वाईट अनुभव घेऊन पण मला माझ्या पी.एम.टी.चा अभिमान आहे. तिच स्थान प्रत्येक पुणेकराच्या मनात अढळ आहे. म्हणूनच कोणी तरी म्हंटलं च आहे...
वाट पाहीन ... पण पी.एम.टी. नेच जाईन..
---------------------------------------------------------------------------------------------------टारझन (१६-०८-०८)
1 comment:
लय भारी मित्रा.......
Post a Comment