Saturday, February 1, 2014

VCR



90's च्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी VCR चं युग होतं तेंव्हाची गोष्ट . VCR ची वाट बघताना जेवढी एक्साईटमेंट असे तेवढी हल्ली कशात असते ते माहित नाही ( हल्ली कशातच एक्साईटमेंट वाटत नाही म्हणा )
त्यावेळी गणेशोत्सवात मंडळातर्फे VCR आणि २९" मोठा डबडा CRT  कलर टीव्ही आणला म्हणजे मंडळाने लै मोठा तीर मारलाय वगैरे वाटायचं. खेडेगावात VCR येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची . २ हिंदी आणि १ मराठी सिनेमा असलं गणित ठरलेलं असायचं. गणपतीच्या दिवसात अंथरून पांघरून घेऊन गणेशोत्सव मंडळाच्या मांडवाच्या आवारात पिक्चर बघण्याचा प्रोग्राम असे . त्यासाठी फळ्यावर कोणता पिक्चर किती वाजता आहे हे २ दिवस आधीपासून लिहिलं जायचं. ठरलेल्या दिवशी मंडळातली थोडी थोराड पोरं शेजारच्या गावातून टीव्ही + VCR घेऊन येत . ते कधी येतात याची बाकी मेम्बर फार आतुरतेने वाट बघत. बेडशीट मध्ये गुंडाळून एक जन तो भला मोठा टीव्ही आणि एक जन तो VCR  घेऊन येत असे . सगळी चिल्लर ग्यांग त्यांच्या मागे मंडळाच्या स्टेज पर्यंत मागे यायची. थोराड पोरं बळेच मोठे शास्त्रज्ञ असल्याच्या अविर्भावात टीव्ही आणि VCR ची असेल्म्बी करत.  ( माइंड  इट , हे काम मला त्यावेळी 'so cool'  वगैरे वाटायचं ) हळू हळू हळू पब्लिक सेट व्हायचं. मंडळात असलेला नसलेला व्हीसीआर वरचा पिक्चर बघायला हजर व्हायचा .  नेहमी प्रमाणे सेट अप करता करता बराच वेळ निघून जात असे . बर्याचदा कॅसेट अडकायची . बर्याचदा कोणीतरी रिमोट दाबून ते फास्ट फोरवर्ड /ब्याकवर्ड करायचे. गाणी चालू असतील तर तो फास्ट  फोरवर्ड मधला डान्स पाहून मला मोठी गमत वाटायची .

मावशीकडे गेलो की तिकडेहि VCR आणायचो.घरीच कलर टीव्ही असल्याने तिकडे फक्त VCR आणला की काम भागायचं. शिवाय माझ्या मावसभावाचा मित्रच व्हीसीआरवाला असल्याने नवीन चित्रपटांच्या कॅसेट मिळत . २ दिवस व्हीसीआर असला की आम्ही ब्याक टू ब्याक चित्रपट बघायचो . त्यावेळी अक्षय कुमार - सुनील शेपटी (शेट्टीचे त्यावेळचे आम्ही ठेवलेले नाव ) चे चित्रपट नुसते ओरपून ओरपून बघायचो  :)  जिगर , मोहरा , खिलाडी , खिलाडीयो का खिलाडी पासून बरेच चित्रपट त्याकाळी आम्ही VCR वर पाहिले. त्यावेळी चित्रपट बघायचे म्हटलं की भयंकर थ्रिल असायचं. आताची परिस्थिती वेगळीच आहे . VCR कालबाह्य झाले. मल्टीप्लेक्स आले , मल्टीच्यानेल संस्कृती आली . नवीन चित्रपट महिन्याभरात टीव्हीवर येउन जातो  पण बघावासा वाटेलच असे नाही . चित्रपट आता मी माझ्या आवडी-निवडीने बघतो . आता ते चित्रपट बघताना फास्ट फोरवर्ड ऐवजी फक्त स्किप चं बटन चालतं . ते फास्ट फोरवर्ड केल्यावर स्पीड मध्ये नाचणाऱ्या नट -नटी  दिसत नाहीत . चित्रपट बघताना पूर्वी सारखं थ्रिल नाही .

असो , आत्ताच एक मुव्ही IMDB वर सिनोप्सिस आणि रेटिंग पाहून डाऊनलोडिंग ला लावला. कधी बघेन माहिती नाही . गेल्या महिन्याभरात किती पिक्चर डाऊनलोड केलेत आता आठवतही नाही . ते बघायचा मुहूर्त कधी लागेल माहित नाही .

व्हीसीआर ची आठवण मला नेहमी नॉस्टेल्जिक करते .