Friday, November 22, 2013

बाराशे डॉलरचा शॉक

सारांश : ५ दिवसांपूर्वी घेतलेल्या कार्डवर SMS नोटिफिकेशन आलं की १२०० डॉलर खर्च झालेत. थोडावेळ चमकलो पण ब्यांक जरी सेम असली कार्डचे डीजीट वेगळे होते त्यामुळे आधी नंबर वापरणाराचे अलर्ट आपल्याला आल्याचे उमगले.

हा अत्यंत साधा प्रकार "मुक्तपीठ" स्टाईल मध्ये पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत. ज्यांना मुक्तपीठ काय पीठ आहे ते माहित नसलेल्यांसाठी काही प्री-रिक्विझीट :
  • * - जाहिरात 
  • ** - लै मोठी जाहिरात 
  • *** - लैलै मोठी जाहिरात 

||श्री. श्री. लुनावले ब्रम्हे प्रसन्न ||                                                                                     || सौ.सौ. पावसकर-पोतदार म्याडम कृपा ||


गेल्याच आठवड्यात प्रोजेक्टच्या कामासाठी हॉंगकॉंग* वरून सिंगापूरला* ट्रान्सफर झाली. मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघेही सिंगापूर एयरलाईन्स च्या विमानात** बसून इकडे येणार होतो. हॉंगकॉंग* ला आता मस्त पैकी थंडी पडू लागली होती. म्हणून माझ्या पत्नीने माझ्यासाठी मस्त सेटिंग लावून गरम कपडे दिले होते. सवयीप्रमाणे मी माझं ऑफिसच्या कम्प्युटरला लॉगइन करायचं स्मार्ट कार्ड हॉंगकॉंग*च्या ऑफिस मध्येच विसरलो. निघायच्या दिवशी अगदी निघायच्या वेळी म्हणजे सुमारे ८:०० वाजता आठवल्याने मला घाम फुटला. आता काय करायचं म्हणून बायकोने गणपतीची मूर्ती पाण्यात ठेवली. आणि मी योग्य वेळात परत यावा म्हणून गणरायाकडे धावा करू लागली. मी घाई घाईत कॅब करून ऑफिसला गेलो. पोचतात मला माझ्या स्मार्टकार्डचे दर्शन झाले आणि माझा जीव भांड्यात पडला. मी लगेच माझ्या पत्नीला फोन करून खुशखबरी दिली. तिने देवाचे आभार मानून त्याला पाण्यातून काढले , गणपतीचाही जीव भांड्यात पडला.

आम्ही ९ ला निघायला हवे होतो. पण या गडबडीत मला घरी यायलाच ९:१० झाले. मी घरी आल्यावर सगळा पत्नीने सगळ समान प्याक करूनच ठेवलं होतं. हा सगळा लवाजमा घेऊन आम्ही एयरपोर्टवर** गेलो. तब्बल १० मिनिटे उशीर झाल्यामुळे मला त्या कारच्या एसीतही घाम फुटत होता . फ्लाईट भेटेल की नाही म्हणून पत्नीची काळजी-कम-बडबड सुरु होती. मी तिला धीर देत म्हणालो , भेटेल ग अजून ३ तास आहेत. अर्ध्या तासात एयरपोर्ट येईल. तिकडे जाऊन चेक इन केल्यावर कळले की फ्लाईट ४० मिनिटे उशीर आहे.
"अरे देवा ! आता काय करायचं आपण ४० मिनिटे ? "
" या एयरपोर्टच्या गर्दीत ४० मिनिटे कशी काढणार आपण ?"
"इथे फक्त १००-१ फूड कोर्ट आणि कॉफी शॉप आहेत , कसं होणार आपलं ? "
माझी पत्नी या अवघड परिस्थितीत काय करावं म्हणून पुन्हा एकदा किरकिर करू लागली. पण ती ४० मिनिटे आम्ही दोघांनी कॅन्डी-क्रशची गेम खेळत कशी घालवली ते आमचं आम्हाला माहित. आजही ६ दिवस झाले तरी ते ४० मिन्टे आठवले की अंगाला काटा येतो.

सारसबागेतल्या गणपतीची श्रद्धा थोर म्हणून ४० मिनिटांनी का होईना आमचं विमान सिंगापूरकडे** निघालं. घाई घाई मध्ये आम्ही सिंगापूरचे* हवामान आमच्या सेम्संग ग्यालेक्सी नोट३ *** च्या एंड्रोईड एप मध्ये बघायलाच विसरलो. गरम कपडे घातलेले , सिंगापूरला** आल्यावर ती भयंकर गर्मी , आम्ही दोघेही प्रचंड घामाघूम झालो. सिंगापूर सारख्या देशात आता आपले कसे होणार म्हणून पत्नीची पुन्हा ओरड सुरु झाली. कॅब करून पटकन कंपनीच्या व्यवस्था केलेल्या अपार्टमेंटमध्ये जावे म्हणून आम्ही मर्सिडीज*** ची कॅब केली. पत्नी गालातल्या गालात हसत म्हणाली .. "होऊ दे खर्च " !

अपार्टमेंटमध्ये आल्यावर सेट वगैरे झालो. आता प्रश्न होता सिमकार्ड कोणतं घ्यावं. लागलीच एकदोघांना ल्यांडलाईन वरून फोन करून विचारल तर सिंगटेल कंपनीचे कार्ड घ्या म्हणाले. त्यानुसार आम्ही सिंगटेलची २ कार्ड खरेदी केली. त्यावर इन्टरनेटही सुरु करून घेतलं. ४ दिवस मोठे मजेत गेले . पण अचानक फोनवर एसेमेस आला ,
DBS Alert : You've made a VISA transaction of $1,190.00 with your DBS/PSOB card on 22 Nov 19:21 . If Txn not made by you Please call back.
माझ्याकडे DBSचंच कार्ड आहे. दोन मिंट शॉक लागला. डोळ्यासमोर अंधारी आली. पत्नीने एसेमेस वाचला आणि तिला रडू येणे बाकी होते. तिने कुलदेवतापासून पुर्वाजांपर्यंत सगळ्यांना दूषण लावायला सुरुवात केली. मी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मी माझ्या मनातून जरी प्रचंड घाबरलेलो असलो तरी माझ्या पत्नीला मी ते दाखवू शकत नव्हतो. त्यामुळे ती अजूनच घाबरली असती. मी घामाघूम होत e-Banking ला लॉगइन केलं. पाहिलं तर ब्यालंस आहे तसाच. ऑन होल्ड ब्यालंस पण शून्य नंतर ट्यूब पेटली ,ब्यांकेचं नाव जरी सेम असलं तरी एसएमएस मध्ये कार्डचे शेवटचे चार डिजीट वेगळे आहेत. आणि मी हा नंबर ब्यान्किंग साठी सेट केलेलाच नाही. ५ दिवसांपूर्वीच नवीन कार्ड घेतलंय .असो , १२०० डॉलर दोन मिनिटे हवा करून गेले . त्या नंतर पत्नी आणि मी आमच्या खुळचटपानावर खूप हसलो. या घटनेला आता जवळ जवळ ३०-४० मिनिटांचा काळ लोटला , पण आजही जेंव्हा आमच्या फोनवर आर्थिक व्यवहारांचे अलर्ट येतात तेंव्हा पत्नी आणि मी एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसतो.

- मुक्तपीठ चरणी अर्पण.