इंग्रज म्हणायचे , भारतीय लोकं शासन करण्यास नालायक आहेत. पूर्वी मला त्याची खूप चीड यायची. पण आता पटतंय ! स्वातंत्र्य उपभोगण्याची आपली लायकी नाही, भारतीय मानसिकताच गुलामगिरीची आहे. पूर्वी इंग्रज होते, आणि आता दादा , भाई , मामा , तात्या , इत्यादी. ही लोकं पैसा - पॉवर साठी राजकारणात येणार. जनतेला वाकवणार . जो आडवा येईल त्याला आडवे करणार. आणि निवडणुकीच्या वेळी आपण पुन्हा त्यांनाच निवडून देणार. पक्ष कोणताही असो , पक्षातले पक्षी फक्त गिधाडं . झेंडा बदलला म्हणजे वृत्ती बदलत नाहीत . आणि ह्या उपरही आपल्याकडे लोकशाही ( आणि तीही जगात श्रेष्ठ ) आहे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक दादा/भाई/नाना/काका चा प्रदेश आहे , जिथे त्याच्याशिवाय कसलीच पानं हलत नाहीत , मोठे आर्थिक व्यवहार होत नाहीत. जागांची हस्तांतरण होत नाहीत . "मला नाही जाणवलं बॉ हे कधी , मी तर किती सुखवस्तू जगतोय " असे म्हणणारे निद्रिस्त गणले जावेत.
राज ठाकरे आत्ता आत्ता पर्यंत थोडे वेगळे वाटायचे. पण आता वाटचाल पाहून थोडं दचकायला होतं, अर्थात इतक्यात अजून काही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. माझी सामाजिक बांधिलकी शून्य आहे . मला माझ्याच व्यापातून उरकेनासे झाले आहे , मी काय कोणाला मदत करू. पण जरी माझे उरकून उरत असेल तर मी ते पुढच्या पिढीसाठी ठेवेन , अजून उरले तर त्या पुढच्या .. सो ओंन . ही टिपिकल भारतीय मानसिकता आहे . रोडवर कोणी पडलेला जरी दिसला तरी त्याला थांबून मदत करायला आपल्याकडे ना वेळ ना इच्छाशक्ती. जास्तीत जास्त शेजारी उभं राहून कसं आणि किती झालंय त्याचा अंदाज बांधत आम्ही उभे मात्र राहू .
जसं मतदान करू लागलो तसा अनुभव एकच आहे , ज्यालाही मतदान करतो तो पडतो. नंतर कळतं दादा / भाइ / डॉन वगैरेच निवडून येतात . दर वेळी येतात . पुन्हापुन्हा येतात . आणि कितीही काहीही घाण केली , उघड उघड राडे केले तरी यांचे काही वाकडे होत नाही. प्रत्येक एरियात हे तिथल्या "तरुणांचे आशास्थान , समाजाचे आधारस्तंभ , धडाडीचे नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते असतात . आमच्या इथे प्राधिकरणात एकदम चकाचक रोड बनले जातात . विमानची धावपट्टी काय असेल एवढे मस्त रोड , पण त्याचा आनंद आम्ही आठवडाभरही घेऊ शकत नाही . कारण रोड खोदण्याचे काम लगेच निघते. सरकारी कामं नाही निघाली तर आमचीच लोकं सटरफटर कामं काढून रोड ला बरोबर आडवा छेद देतात . एक वेळ स्पीडब्रेकर परवडतो पण ते खड्डे नाही . थोडक्यात काय ? पुन्हा कंत्राट काढायला रिकामे. माझ्या घरामागाचा रोड गेल्या ३ महिन्यात ६ वेळा करून झाला आहे , आणि आता पुन्हा कोणीतरी खड्डा पाडला आहे. हे तर एक साधं उदाहरण झालं, अशी चिक्कार उदाहरणं तुम्हालाही माहित आहेत.
जागांचे व्यवहार असोत , कंपनी सुरु करायची असो , किंवा फुटपाथ वर साधी हातगाडी लावायची असो , लोकल माफिया ( उर्फ दादा/भाई ) किंवा आमदार/खासदार यांचे खिसे भरावेच लागतात. पासपोर्ट काढताय ? व्हेरिफिकेशन साठी पोलीस घरी येत नाहीत , आपल्याला स्तेशनच्या १० चकरा मारायला लागतात , त्यातही चिरीमिरी शिवाय फाईल पुढे सरकत नाही . वरून त्यांची मग्रुरी ऐकून घ्या , नव्हे आपण ती ऐकून घेण्यात धन्य मानतो. आपल्याला चीड येत नाही , आली तरी "हे असंच असतं" म्हणून आपण आपली समजूत घालून घेतो. ह्या उलट जिथे आपली कामं सरळ मार्गाने होत नाही , तिथे आपण सुमडीत पैसे सारून कामे करवून घेतो . शहर नियोजन नियमानुसार आपल्याला किती जागेवर बांधकाम करण्याची परवानगी आहे, आणि आपण किती करतो ? काही ठिकाणी घराचं फ्लोरिंग थोडं वर असेल तर घरापुढच्या पायऱ्या थेट रोड वर काढतात , तेवढीच फुट दीड फुट जागा मारता येते . नेत्यांना भ्रष्ट कामाबद्दल शिव्या देत आपण आपल्या अडकलेली काम मागच्या दराने करून घेतच असतो.
बेशिस्त ही भारतीयांच्या रक्तात असते. मला नेहमी ह्या गोष्टीची जास्त चीड येते कारण ही गोष्ट घराबाहेर पडलं की १००% "भोगावी" लागते. विनाकारण हॉर्न वाजवणे , सिग्नल हा रोडवर मनोरंजक लाईट शो असल्यासारखे ट्रीट करणे , ८ तासांच्या ड्युटी मध्ये ४ तास टाईमपास करणे आणि तरीही वाढीव पगाराची अपेक्षा करणे , असंख्य गोष्टी आहेत . आम्ही जर्मन कार वापरतो , पण ती चालवताना जर्मन शिस्त आमच्या अंगी येत नाही . आमच्याच वाढदिवसाचे हार्दिक अभिनंदन आम्ही चौकाचैकात करून स्वत:चेच कुल्ले बडवून घेतो. शुभेच्चुकांना जर एवढाच वाढदिवसाचा पुळका आला असेल तर ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन त्याला मिठ्या मारा , केक कापा किंवा अजून काही करा , चौकात घाण करण्याचे कारण समजत नाही . बरं यांना बघून गार वाटतं असही नाही. रेड्यासारखे राकट चेहरे , मैदा फुगाल्यासारखे शरीर अंगावर सरळ(?) मार्गाने किंवा कष्टाने(?) मिळवलेलं सोनं आणि खाली काडी पैलवानांची पंगत ह्यांचे पोस्टर हेच पन्नास वेळा बघतात.
राजकारणाचा आणि समाजकारणाचा तिळमात्र संबंध राहिलेला नाही. समाजकारण करणारास मूर्ख समजले जाते. ह्याचा अर्थ समाजकारण करणारे शून्य आहेत असे नाहीत. ते त्यांचं कार्य वर्षानुवर्षे विना कोणत्या चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावल्याविना करत आहेत . बाबा आमटेचे वाढदिवसाचे अभिनंदन करणारा फ्लेस्क एकही नाही. न्यूज च्यानेल वर त्यांना शुभेच्छा देणारी जाहिरातही कोणी देत नाही . किंवा ते स्वत: देखील त्यांचे वाढदिवस १००-१०० केक कापून किंवा जंगी दारू-मटणाच्या पार्ट्या देऊन साजरे करत नाहीत. बाबा आमटे करोडोमध्ये एकच .. दादा / मामा / भाई मात्र चौकाचौकात २०-१ असे सापडतात.
नाना पाटेकर म्हणतो ते खरेच, भारताची जी प्रांतवार रचना झाली तीच मुळात चुकीची आहे. देशात आम्ही प्रांतवार भांडतो . राष्ट्रात आम्ही गाववाले आणि उपरे म्हणून भांडतो. तर समाजात जातीधर्मावर भेदभाव आहेच . थोडक्यात "भारतीय" वगैरे अस्म काही नसतं , असतं ते "मी" आणि "माझे". व्हिसा घेऊन कल्टी मारायची आणि तिकडे जाऊन भारतप्रेम जागे करायचे . आपण अतिसर्वसामान्य आहोत. जगाला शून्य दिला म्हणून लाल करतो अरे पण त्यानंतर तुम्ही केवळ शून्यात आहात. तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या की राग येतो. माझ्या भारतावर माझे भरपूर जीवापाड वगैरे प्रेम आहे असे म्हणणारे माझ्या आजूबाजूला खूप आहेत. त्यांना आपल्या भारताविषयी ( किंवा भारतीय बाण्याविषयी ) छेदल्यास खूप राग येतो . पण तो राग फुसका असतो ,त्या रागाला काही मजबूत बेस नाही. बाहेरच्या देशात काय चांगलं आहे हे त्यांना सांगितल्यास ते मला त्या देशातले नकारात्मक गुण ऐकवतात. पण "आपण आपली ग्रोथ करून घेण्यासाठी दुसरीकडून चांगलं का उचलू नये ? " ह्या प्रश्नांचे उत्तर मला अद्याप भेटलेले नाही .
असो , फार फ्रस्ट्रेषण काढलं . भारत, भारतीय आणि लोकशाही आहे ही अशी आहे , ती भविष्यात बदलेल ह्याची चिन्ह नाहीत आणि इच्छाशक्ती अत्यंत कमजोर आहे. मान्य करा / करू नका ( काय फरक पडतो ? )
- टारझन