काल म्हणे शिवसेनेच्या युवा सेनेचा पहिला वर्धापनदिन का काही तरी साजरा झाला, आनंद आहे . ही युवा सेना कधी स्थापन झाली आणि तिने आत्तापर्यंत काय कार्य केले ह्याची साधी हवाही नसल्याने त्याबद्दल काही बोलता येणार नाही. खरी मजा अली ती स्टेज वर चाललेला धिंगाणा पाहून. खरं सांगायचं म्हंटले तर "तो" धिंगाणा पाहायला आम्हालाही आवडतो, खोटं का बोला ? पण आश्चर्य ह्याचं वाटलं की शिवसेनेने असे कार्यक्रम करावेत ? मी कोणत्या राजकीय पार्टीचा नाही, किंवा माझ्या शब्दांना काही राजकीय वजन देखील नाही. पण मला हे वाटलंच, संस्कृतीक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेत गिफ्ट हाउस ची तोडफोड करणारे , बागेत किंवा किल्यांवर जाऊन युगुलांना मारझोड करणारे आमचे खंदे शिवसैनिक उर्फ ढाण्या वाघ ( जे खरोखर लुप्त झालेत ) ते आज चक्क आयटम नाचवत आहेत ? बिहार किंवा युपी मधल्या कोण्या पार्टी ने करायचे हे धंदे चक्क शिवसेना करते ? मी पटकन चारपाच हाजमोला खाल्ल्या पण ते काही पचनी पडलं नाही.
अपेक्षे प्रमाणे शिवसेना विरोधी राजकीय पार्ट्यांनी ह्या संधी चे सोने करत शिवसेनेला टोचण देण्याची संधी सोडली नाही . त्यामुळे आजच्या सामन्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तसं बोर झालं की मी "सामना" उघडतो. सामानाची भाषा मला अत्यंत भुरळ पडते. आहाहा ! एकेक शब्द निवडावा कसा ? पण सामना फार बायस्ड आहे बुवा . ह्यात कधी " मालवणहृदयसम्राट नारायण साहेब राणे यांनी उद्ध्याची पिसे काढली " किंवा "राजसाहेबांनी शिवसेनेला माती चारली " अशी भाषा नसते. म्हणजे शिवसेना टू ऑदर्स च्या वेळी जी भाषा वापरली जाते ती ऑदर्स टू शिवसेना एवढी कशी बदलावी ? अर्थात हे त्यांचे मुखपत्र असल्याने तेवढी अपेक्षा करणेच मुळी चूक आहे . घरातून हाकललेलं कुत्र , आमच्या जीवावर मोठा झाला आणि आमच्यावर च उलटला , दगाबाज , हिंदुहृदयसम्राट , तुडवले , किंवा आणिक काय केले अशा अनेक वाक्प्रचारांनी आणि शब्दांनी सामानाचे माधुर्य टिकून आहे. माणूस / संस्था जेवढी मोठी होते तेवढी तिची जबाबदारी वाढते हे तत्वच मुळी इथे गैरलागू होते. आपण चारचौघात जशी भाषा वापरतो तशी थेट पेपरात उतरते. कौतुक आहे.
असो , सामानाचे कौतुक करता करता विषयांतर कधी झालं ते समजलंच नाही बघा. तर विषय होता आज च्या संपादकीयचा. संपादकीय विनोदी असावा ह्या सामना च्या परंपरेचा मी मनापासून आदर करतो. संपादकीय वाचून त्यावर मनमुराद हसून त्याला दाद हि देतो. आजही दिली . पहिल्या ओळीपासून लेखकाने जो टेम्पो राखला आहे तो शेवटपर्यंत कसा चढत च गेलाय .
मुद्दा होता युवा सेने च्या वर्धापन दिनी जो थरार नृत्याविष्कार साजरा झाला त्यावर सेने चे स्पष्टीकरण. सुरुवात होते ते शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचे चि. आदित्य यांच्या कौतुकारतीने. बायका नाचवणे म्हणे तरुणाई च्या जोशात झाले . पहिल्याच वर्षी म्हणे आदित्यारावांच्या मेहेनतीने ( ही मेहेनत म्हणजे आदित्याराव रोज ४ किलोमीटर चा रोड बनवण्यासाठी उन्हातान्हात दगडं फोडत असतात ह्या अंगाने घ्यावी ) युवसेनेने भल्याभल्यांची झोप वगैरे उडवली आणि लोकांची डोकी न पिताच गरगरू लागली. तरीच मला गेले कित्येक दिवस झोप येत नसे आणि डोकेदुखी सुद्धा असे. अधून मधून सर्दी आणि खोकला पण झाला होता. लहान पाणी मी बिरबलाची गोष्ट ऐकलेली. अकबर एकदा बिरबलाला एक झाडाची काठी देतो आणि म्हणतो , ह्या काठी ला न तोडता हिला छोटी करून दाखव. बिरबल एक मोठी काठी घेऊन येतो आणि त्या काठी शेजारी ठेवतो. साहजिकच ती काठी छोटी होते. शिवसेने चा स्टान्स पाहता आम्ही स्टेज वर बायका नाचवल्या ही मोठी गोष्ट नाही , कारण कॉंग्रेस राष्ट्रवादी ह्या पेक्षाही खालच्या थराला जातात. ते कसे धान्यापासून दारू बनवतात , वगैरे वगैरे .
अहो पण राष्ट्रवादी काय अन कॉंग्रेस काय ,... हे पाच पायऱ्या खाली गेले ( जे ऑलरेडी गेलेच आहेत ) म्हणजे तुम्हाला तुमचीच पातळी सोडायचे कारण मिळते काय ? आणि ते ह्याचे स्पष्टीकरण होऊ च कसे शकेल ? मग उद्या हो हो , कॉंग्रेस ने ५०००० कोटी चा भ्रष्टाचार केला , मग द्धा शिवसेना भ्रष्टाचार निर्मुलन यात्रा काढून आमच्या २०० करोड च्या भ्रष्टाचाराने काय अधपतन होणार आहे ? हे म्हणण्यासारखे झाले. असो .
संपादकीय पुढे जातो. राजकीय पक्षाच्या पुढे जात लेखक वृत्तपत्राच्या आणि वाहिन्यांचा जाहिराती यांच्यावर टीका करतो. आता पेपरात/वाहिनीला जो पैसे देतो तो त्याची जाहिरात देतो . पेपर/वाहिनी ला जाहिरात कशी आहे आणि कोणत्या प्रोडक्ट चि आहे ह्याच्याशी काही देणेघेणे असण्याचे कारण नाही. वाहिन्या किंवा पेपर ह्या कंपन्यांना तुम्ही कशा जाहिराती शूट कराव्यात ह्यावर मार्गदर्शन देत असल्याचेहि कधी ऐकले नाही . पण मनोरंजन होईल कसे? मग बळेच त्यात जपानी तेलाच्या आणि कसल्या कसल्या जाहिरातींचे वर्णन. जपानी टेल जर पैसे देत असेल तर का कोणी त्यांची जाहिरात छापणार / दाखवणार नाही ? आणि जर ते प्रोडक्ट नागाच्या संदर्भात असेल तर त्यात नाग फणा काढताना दाखवण्या ऐवजी काय सुकलेली फुलं दाखवावीत अशी लेखकाची अपेक्षा होती काय ?
असो , विनोदवीर संपादक पुढे जात इतिहासाचे दाखले देतात. मग आम्ही आज स्टेजवर ज्या मुन्नी आणि शीला नाचवल्या त्याची तुलना आम्ही शिवकालीन पोवाड्या बरोबर दाखवल्या जाणाऱ्या लावणीशी करतो. मग त्याच काळात लोकं प्रेम व्यक्त करत नव्हती काय ? किल्ल्यांवर युगुलं आढळल्यास किल्याचे पावित्र्य नष्ट होते असे मानून त्यांना बेदम चोप देताना हे कसे विसरले जाते की किल्यांवर जर हे पावित्र्य नष्ट होत असते तर तेंव्हा मावळ्यांची संख्या रोडावली असती आणि हळू हळू नष्ट झाली असती. आज जमाना बदलला आहे म्हणून आम्ही जमान्या बरोबर बदलतो हे मौलिक विचार तोडफोड करून राडे घालण्याच्या दिवशी आम्ही बरोबर विसरतो . तेंव्हा "सुंदरा मनामध्ये .." होती म्हणून आज शीला जवान आहे असे आम्ही मानतो . जवानांसाठी देखील "ठसकेबाज" गाण्यांची फर्माईश असते म्हणून आम्ही मुन्नी ला बदनाम करू शकतो. पण जेंव्हा आम्हाला चर्चेत यायचे असते , जेंव्हा आम्हाला राडे घालायचे असते तेंव्हा आम्ही आमचे हेच नियम विसरून जातो.
आजचा अग्रलेख वाचून समजायचे काय ? , आपला तो ** आणि दुसऱ्याचा तो नाऱ्या. ( नाऱ्या माफ कर रे बाबा ;) )