Saturday, November 22, 2008

काळा इतिहास

त्यावेळी मी बी.ई.ला अ‍ॅडमिशन घेत होतो. ३ मार्क्सनी माझं फ्रीसीट गेलं, आणि फ्री सीट हवं असल्यास पुण्याबाहेर जावं लागणार होतं , पण नाईलाजानं पे-सिट घेण्याचं कारण म्हणजे पुणं सोडायचं नव्हतं आणि पुणे युनिव्हर्सिटीतंच अ‍ॅडमिशन हवी होती , त्यावेळी बाबांचं वर्कशॉप ठिक ठाक चालू होतं, वार्षिक ६०,०००ची फी ही काही मोठी गोष्ट नाही वाटली, मी फर्स्ट इयर ला डाउन झालो आणि त्याच दरम्यान बाबांचं एक मोठं काँट्रॅक्ट गेलं, आणि इथेच खरा उतार सुरू झाला, बाबा इमोशनल असल्याने आधीच मागे राहिलेले. माझ्या चुलत भावांबरोबर पार्टनरशिप मधे धंदा होता. जेंव्हा तो बुडाला, तेंव्हा बाकी लोकं हात वर करून निघून गेले, बाबा कर्ज भरायचे राहिले, माझं शिक्षण मधे नको संपायला म्हणून लोकांकडून भलत्याच व्या़जावर कर्ज पण घेतलेलं (जे मलाही माहित नव्हतं) ... त्यांनी वर्कशॉप तरेल या आशेवर कर्ज घेतलेलं, जी.ई.कंट्रिवाईडचं नाव ऐकूनच असाल .. ते लोक घरी येत , पैसे मागत, घरची थोडी इज्जत असल्याने कोणाची हिम्मत झाली नाही आवाज चढवून बोलण्याची. त्यातच वडिलांनी त्या काळी एका मित्राचं दुकान सेट होण्यासाठी त्याच्या कर्जाला साक्षिदार होते. त्याला दुकान चालवता आलं नाही आणि १०,००० कर्ज बाकी ठेऊन तो पळून गेला, त्याचे काळाच्या ओघात ५०,००० रुपये झाले, त्या बँकेचे लोकंही घरी येत ... २००५ ते जुन २००७ हा काळ अत्यंत क्लेशदायक काळ होता मित्रांनो. कोणी ना कोणी पैसे मागायला येत, कोर्टाच्या धमक्या देत, २००६ च्या दसर्‍याला आईचं मंगळसुत्र गहाण ठेवावं लागलेलं, अर्थात अशा काळात कोणाचं मानसिक संतुलन रहात नाही, आई बाबांना नाही ते बोले, आणि बाबा रडत .. सो आम्ही रडत असू .. पण घरातले पाच जण कधीच वेगळे झालो नाही. एक टाईम आई अत्यंत साध्या तांदळाचा भात करे.जो गळ्याखाली काय, तोंडात घेतानाच मळकी भरे. मी २००६ ला पास आउट झालो खरा, पण जॉबच्या बाबतीत यथातथाच .. कोणतंही सर्टिफिकेशन नाही, भाड्याला पैसे कसे मिळत याचं आश्चर्य वाटे (घेताना तर त्याहुन अधिक लाजंच वाटायची) ,पैसे वाचवण्यासाठी मी टिकीट बुडवत असे. ह्या ना त्या राउंडला बाहेर पडायचो. बाबांना मी जॉब शोधायला गेलो की एक आशा वाटे, पण मी रिटर्न आलो की ती मावळत असे. ४ वेळा मी पुर्ण सिलेक्ट होउन पण फक्त वाय.डी. आहे म्हणून एच.आर. राउंड मधे निघालो होतो.एका मित्राने मला सॉफ्टवेयर टेस्टिंग साठी १५००० दिले होते, माझी परिस्थिती माहीत असून. पण त्या क्लासचा काही फायदा झाला नाही. आमचे पुणे युनिव्हर्सिटीचे ५८% हे पटना, केरळ, भोपाल युनि.च्या ८०अन्प ९०% समोर तोकडे पडायचे. ऑफकँपसला क्रायटेरिया मधूनच बाहेर ... मार्च २००६:त्यातच आज्जी वारलेली,बाबांनी चुलत भावाबरोबर एक स्टिल ट्रेडींगचा बिझनेस चालू केलेला, पण पुन्हा पैशांअभावी कोणा बिगशॉटला पकडून भांडवल घ्यावं लागलं.. आणि अर्थात, इनकमचा मेजर भाग तिकडे जात, बरकत अशी नाहीच. अशा फ्रस्ट्रेशन मधे. एका फेक जॉब मधे मी मुंबईलाही गेलो, माझे सर्व ओरिजिनल्स देउन दीड वर्षाचा दिड लाखाचा बाँडही साईन करून बसलो ,पगार ६,५०० .. सांगितलेली पोस्ट : सॅप कंसल्टंट , ऍक्चूअल जॉब : सॅप ट्रेनर ते ही एका इंस्टिट्युट मधे. घरून आई ने उसने दिलेले ४००० घेउन आलेलो, जॉबच्या खुषीत १००० खर्च पण केलेले. पण जेंव्हा साक्षात्कार झाला, तेंव्हा संयम उरला नाही, तो एक आठवडा माझ्या आयुष्यातला सर्वांत घाण आठवडा होता. रोज त्या इंस्टिट्यूट मधनं आलो की रडत बसे, बाबांचा फोन यायचा, त्यांच्या आशा, अपेक्षा... मी पुर्ण भरडला गेलो होतो.पण मला तिथल्या बाकी मुलांपैकी एकाने उत्तम समजावले, म्हणाला तु तुझे ओरिजनल्स घे आणि निघ इथून .. इथं तुझं करियर बरबाद होइल.. त्याचे खरंच उपकार झाले,कारण त्याने ठिणगी नसती टाकली, तर मी आज मुंबईमधे ७-८००० चा ट्रेनर असतो ... मी जेंव्हा सर्टिफिकेट्स मागितले आणि जायची मागणी केली, त्या मॅनेजरने नाही म्हणाला, मी त्याला "मोगलाई आहे का ?" असे म्हणालो , तो लांड्या निघाला, आणि प्रकरण चिघळलं, फारच वादावादी झाली,मला माझं करियर,लाईफ सगळंच संपलेलं दिसलं, मी कसलाही विचार न करता, त्याला पुर्ण ईस्टिट्यूट मधे सर्वांदेखत बदडून काढला. कोणाचीही मला आवरायची हिंमत झाली नाही(तसंही कोणी आलंच नसतं,सगळे माझ्यासारखेच अडकलेले.) .शनिवारी हा सगळा प्रकार घडला होता. मी गेस्ट हाऊस वर निघून गेलो. बाकी मुलं अर्थात खुष झाली. कारण जे ही आले होते सगळेच मजबुरीने आलेले. मी पोलीसांची वाट पहात होतो. पण झालं नाही,सोमवारी ऑफिसबॉय माझी सर्व कागदपत्र घेउन आला, आणि मी घरी आलो . जॉब लागला म्हणून मुंबैला जाताना जसे सगळे लोक पहात होते, तसेच घरी आलो तेंव्हाही पहात होते. वडीलांना फारच दु:ख झालं.. पण त्यांनी अशाही परिस्थितीत मला संभाळून घेतलं. घरात कोणी कोणाशी चुकूनंच बोलत होतं .. मुंबईहून आल्यावर घराच्या बाहेर पाउल पडलं नाही, त्या दिवशी नंतर केवळ आणि केवळ अभ्यास करून अ‍ॅप्टिट्यूड आणि टेक्निकल फंडे मजबूत करत ह्तू. २० जुन २००७ गेमलोफ्ट - ऑल राउंड्स क्लियर, २१ जुन २००७ - सी.जी.ई.मुंबई, ऑल राउंड्स क्लियर. २२-जुन २००७: ओपस सॉफ्टवेअर , ऑल राउंड्स क्लियर. ३ दिवसात तीन ऑफर लेटर्स मिळालेली. जेंव्हा बाबांना कळालं तेंव्हा फक्त "पगार किती रे? " एवढंच बोलले, बाकी मी समजलो. गेम्स खेळून एकेकाळी वायडी झालेलो. आणि जॉब लागायला उशीर झालेला, ती अपराधी भावना कित्येक दिवस मनात होती. गेमलोफ्टचं २.२चं पॅकेज नाकारलं. सी.जी.ई. मुंबई, अंधेरी(पुर्व) तोच इलाका जिथं कडू आठवणी ताज्याच होत्या.२.८ देणार्‍या सी.जी.ई.ला लांबुनच बाय केला.. ओपस मधे ५० जणांत फक्त एकटा सिलेक्ट झालेलो. डोमेन उत्तम होता, जॉब प्रोफाईल मधे फार मोलाचा एक्पिरियंस मिळेल हे कळलेलं. १०,५००वर अर्ज साईन करून रुजू झालो. एच.आर. म्हणाला स्लिपर्स घालून ऑफिसला येउ नको इथून पुढे. हे घे ऑफर लेटर. ज्याने मला कोर्स साठी पैसे दिलेले तोच मित्र मला २ फॉर्मल ड्रेस आणि फॉर्मल शुज घ्यायला घेउन गेला. कोणालाही जॉब लागल्याचे पेढे वाटले नाही . २६जुन २००७ : करियरची सुरूवात झाली. पहिल्यांदा ऑफिसात जाण्याचं फिलींग माझ्यासाठी बरंच वेगळं असावं. पहिला पगार १ जुलैला व्हायला हवा होता. पण अकाऊंट ओपनींग मधे जरा डिले झाला असावा. अकाउंट वाले म्हणाले पुढच्या महिन्यात सगळा पगार जमा होईल. एक ऑगस्ट ची किती अतुरतेने वाट पाहिली. १ ऑगस्ट गेला.. २ गेला.. ३ गेला .. ४ गेला.... ५ गेला.... ६ गेला .. मी वेड्यासारखा पहिला पगार मिळण्याची वाट पहात होतो. ७ तारखेला पगार झाला. जंगली महाराज रोडच्या ए.टी.एम. वरुन दहा हजार , पाचशेच्या हिरव्या करकरीत नोटा.. माझा पहिला पगार ... मी त्या दिवशी रडलो अक्षरशः .. चितळ्यांकडून पेढे आणले,माझी फाटकी बॅग लाकडी पुलाहून फेकून दिली, आणि नवीन सॅक विकत घेतली, घरी आलो रात्री ११ ला. घरचे वेड्यासारखी वाटच पहात होते.. पगार हातात दिल्यावर पुन्हा माझा छोटा भाऊ सोडून सगळे रडले. सगळे पैसे दुसर्‍याच दिवशी संपले. याच काळात माझी 'जेन' भेटली. आयुष्यातल्या नव्या एक्साईटमेंटचा अनुभव येत होता. १५ ऑगस्ट२००७: मला पहिल्यांदा हैदराबादला ऑनसाईट पाठवत होते. मुंबै हुन फ्लाईट होती. जेनला भेटशील का विचारलं , ती भेटली नाही पण मला तिने फोन वरून मिस कॉल केला.चला भेट नाही किमान कॉल तरी आला ! मी खुष होतो. ही आमच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात.मी विमानाने तेही किंगफिशरने जाणार हे गल्लीत व्हायला वेळच लागला नाही. जेंव्हा एयरपोर्ट वर प्रथम पाउल ठेवलं, सगळा इतिहास पुन्हा डोळ्यांसमोरून गेला. आई-बाबांची लै आठवण आली. बोर्डिंग करताना , विमानात त्या सुंदर्‍यांचं प्लास्टिक हास्यही सुखाउन गेलं, आत ढंगांत आलो की काय असा धूर पसरलेला. हैदराबादेत मला दिवसाला ३०० रुपये अधिक मिळत, मी ऑटो न करता हॉटेल पासून ४ किमी चालत ऑफिसला ये-जा करायचो. दिवसाचा प्रत्येक रुपयाचा हिशेब असे. एकच टाईम जेवायचो, हैदराबादात हे उत्तम होतं, ३०-४० रुपयांत फोट फुटेस्तोवर जेवण.. २० दिवसांत ५००० सेव्ह, केवळ १००० खर्च. पण आयुष्यात प्रथमच घराबाहेर राहिल्याने जबरदस्त होमसिक झालेलो. आजारी पडलो तेंव्हा जेन ने माझी मानसिक काळजी घेतली, फोन वरून औषधं प्रिस्क्राइब केलेली. ऍक्चुअली डेटा सेंटर मधल्या ए.सी. मुळे तब्बेत बिघडली होती. २००७ च्या दसर्‍याला आईचं मंगळसुत्र माझ्या पगारातून सोडवलं गेलं, भावाचा धंदा बर्‍यापैकी सेट होत होता. पुढच्या हैदराबाद दौर्‍यात सेव्हिंगच्या जोरावर मोत्यांची ज्वेलरी खरेदी केलेली.. कळत काही नव्हतं पण निसता जाउन भाजीपाल्यासारखं उचलून आलो. आश्चर्य म्हणजे ते घरी लैच आवडलं .. आणि होतं ही उत्तम ... Smile ... त्या नंतर आमच्या खानदानातला सर्वप्रथम देशाटन करणारा मी, बाबांचा उर भरून आला होता. ते तुम्ही इट्स अफ्रिका ब्वना मधे वाचलंच असेल. हा आमचा २००५-२००७ चा इतिहास. तुम्हाला का सांगितला माहित नाही, आज का आठवण आली माहित नाही.बरंच काही होऊन गेलंय पण लिहीणं टाळलंय ..

माझ्या पणजोबांच्या काळी श्रीमंती होती. पणजोबा पाच-पाचशे म्हशींचा व्यापार करत, पुण्यात बग्गीतुन फिरत. पण घोड्यांची रेस, आणि दारू यामुळे आणि महामारीत म्हशी मेल्यामुळे आपली श्रीमंती गेली असं बाबा जेंव्हा सांगत तेंव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारतो. इतिहासात रमू नका, उद्या काय करायचं ते पहा. ते शांत बसतात मग .. घरात नेहमी हसतं-खेळतं वातावरण असतं , आई-बाबांची मतं प्रत्येक गोष्टीत विरुद्ध. नेहमी भांडी वाजणं सुरूच. कधी बंद पडली तर मी ती हळूच चालू करून कलटी मारतो.

तर हा असा मी असामी ... कोणी मला ओळखावं म्हणून मी लिहीत नाही, तर मी लिहीतो माझ्यासाठी, जेंव्हा मी आयुष्यात निराशेच्या गर्तेत जातो , तेंव्हा मी माझा हा काळ आठवतो .

(आपला ऋणी)
टारझन