Saturday, November 22, 2008

काळा इतिहास

त्यावेळी मी बी.ई.ला अ‍ॅडमिशन घेत होतो. ३ मार्क्सनी माझं फ्रीसीट गेलं, आणि फ्री सीट हवं असल्यास पुण्याबाहेर जावं लागणार होतं , पण नाईलाजानं पे-सिट घेण्याचं कारण म्हणजे पुणं सोडायचं नव्हतं आणि पुणे युनिव्हर्सिटीतंच अ‍ॅडमिशन हवी होती , त्यावेळी बाबांचं वर्कशॉप ठिक ठाक चालू होतं, वार्षिक ६०,०००ची फी ही काही मोठी गोष्ट नाही वाटली, मी फर्स्ट इयर ला डाउन झालो आणि त्याच दरम्यान बाबांचं एक मोठं काँट्रॅक्ट गेलं, आणि इथेच खरा उतार सुरू झाला, बाबा इमोशनल असल्याने आधीच मागे राहिलेले. माझ्या चुलत भावांबरोबर पार्टनरशिप मधे धंदा होता. जेंव्हा तो बुडाला, तेंव्हा बाकी लोकं हात वर करून निघून गेले, बाबा कर्ज भरायचे राहिले, माझं शिक्षण मधे नको संपायला म्हणून लोकांकडून भलत्याच व्या़जावर कर्ज पण घेतलेलं (जे मलाही माहित नव्हतं) ... त्यांनी वर्कशॉप तरेल या आशेवर कर्ज घेतलेलं, जी.ई.कंट्रिवाईडचं नाव ऐकूनच असाल .. ते लोक घरी येत , पैसे मागत, घरची थोडी इज्जत असल्याने कोणाची हिम्मत झाली नाही आवाज चढवून बोलण्याची. त्यातच वडिलांनी त्या काळी एका मित्राचं दुकान सेट होण्यासाठी त्याच्या कर्जाला साक्षिदार होते. त्याला दुकान चालवता आलं नाही आणि १०,००० कर्ज बाकी ठेऊन तो पळून गेला, त्याचे काळाच्या ओघात ५०,००० रुपये झाले, त्या बँकेचे लोकंही घरी येत ... २००५ ते जुन २००७ हा काळ अत्यंत क्लेशदायक काळ होता मित्रांनो. कोणी ना कोणी पैसे मागायला येत, कोर्टाच्या धमक्या देत, २००६ च्या दसर्‍याला आईचं मंगळसुत्र गहाण ठेवावं लागलेलं, अर्थात अशा काळात कोणाचं मानसिक संतुलन रहात नाही, आई बाबांना नाही ते बोले, आणि बाबा रडत .. सो आम्ही रडत असू .. पण घरातले पाच जण कधीच वेगळे झालो नाही. एक टाईम आई अत्यंत साध्या तांदळाचा भात करे.जो गळ्याखाली काय, तोंडात घेतानाच मळकी भरे. मी २००६ ला पास आउट झालो खरा, पण जॉबच्या बाबतीत यथातथाच .. कोणतंही सर्टिफिकेशन नाही, भाड्याला पैसे कसे मिळत याचं आश्चर्य वाटे (घेताना तर त्याहुन अधिक लाजंच वाटायची) ,पैसे वाचवण्यासाठी मी टिकीट बुडवत असे. ह्या ना त्या राउंडला बाहेर पडायचो. बाबांना मी जॉब शोधायला गेलो की एक आशा वाटे, पण मी रिटर्न आलो की ती मावळत असे. ४ वेळा मी पुर्ण सिलेक्ट होउन पण फक्त वाय.डी. आहे म्हणून एच.आर. राउंड मधे निघालो होतो.एका मित्राने मला सॉफ्टवेयर टेस्टिंग साठी १५००० दिले होते, माझी परिस्थिती माहीत असून. पण त्या क्लासचा काही फायदा झाला नाही. आमचे पुणे युनिव्हर्सिटीचे ५८% हे पटना, केरळ, भोपाल युनि.च्या ८०अन्प ९०% समोर तोकडे पडायचे. ऑफकँपसला क्रायटेरिया मधूनच बाहेर ... मार्च २००६:त्यातच आज्जी वारलेली,बाबांनी चुलत भावाबरोबर एक स्टिल ट्रेडींगचा बिझनेस चालू केलेला, पण पुन्हा पैशांअभावी कोणा बिगशॉटला पकडून भांडवल घ्यावं लागलं.. आणि अर्थात, इनकमचा मेजर भाग तिकडे जात, बरकत अशी नाहीच. अशा फ्रस्ट्रेशन मधे. एका फेक जॉब मधे मी मुंबईलाही गेलो, माझे सर्व ओरिजिनल्स देउन दीड वर्षाचा दिड लाखाचा बाँडही साईन करून बसलो ,पगार ६,५०० .. सांगितलेली पोस्ट : सॅप कंसल्टंट , ऍक्चूअल जॉब : सॅप ट्रेनर ते ही एका इंस्टिट्युट मधे. घरून आई ने उसने दिलेले ४००० घेउन आलेलो, जॉबच्या खुषीत १००० खर्च पण केलेले. पण जेंव्हा साक्षात्कार झाला, तेंव्हा संयम उरला नाही, तो एक आठवडा माझ्या आयुष्यातला सर्वांत घाण आठवडा होता. रोज त्या इंस्टिट्यूट मधनं आलो की रडत बसे, बाबांचा फोन यायचा, त्यांच्या आशा, अपेक्षा... मी पुर्ण भरडला गेलो होतो.पण मला तिथल्या बाकी मुलांपैकी एकाने उत्तम समजावले, म्हणाला तु तुझे ओरिजनल्स घे आणि निघ इथून .. इथं तुझं करियर बरबाद होइल.. त्याचे खरंच उपकार झाले,कारण त्याने ठिणगी नसती टाकली, तर मी आज मुंबईमधे ७-८००० चा ट्रेनर असतो ... मी जेंव्हा सर्टिफिकेट्स मागितले आणि जायची मागणी केली, त्या मॅनेजरने नाही म्हणाला, मी त्याला "मोगलाई आहे का ?" असे म्हणालो , तो लांड्या निघाला, आणि प्रकरण चिघळलं, फारच वादावादी झाली,मला माझं करियर,लाईफ सगळंच संपलेलं दिसलं, मी कसलाही विचार न करता, त्याला पुर्ण ईस्टिट्यूट मधे सर्वांदेखत बदडून काढला. कोणाचीही मला आवरायची हिंमत झाली नाही(तसंही कोणी आलंच नसतं,सगळे माझ्यासारखेच अडकलेले.) .शनिवारी हा सगळा प्रकार घडला होता. मी गेस्ट हाऊस वर निघून गेलो. बाकी मुलं अर्थात खुष झाली. कारण जे ही आले होते सगळेच मजबुरीने आलेले. मी पोलीसांची वाट पहात होतो. पण झालं नाही,सोमवारी ऑफिसबॉय माझी सर्व कागदपत्र घेउन आला, आणि मी घरी आलो . जॉब लागला म्हणून मुंबैला जाताना जसे सगळे लोक पहात होते, तसेच घरी आलो तेंव्हाही पहात होते. वडीलांना फारच दु:ख झालं.. पण त्यांनी अशाही परिस्थितीत मला संभाळून घेतलं. घरात कोणी कोणाशी चुकूनंच बोलत होतं .. मुंबईहून आल्यावर घराच्या बाहेर पाउल पडलं नाही, त्या दिवशी नंतर केवळ आणि केवळ अभ्यास करून अ‍ॅप्टिट्यूड आणि टेक्निकल फंडे मजबूत करत ह्तू. २० जुन २००७ गेमलोफ्ट - ऑल राउंड्स क्लियर, २१ जुन २००७ - सी.जी.ई.मुंबई, ऑल राउंड्स क्लियर. २२-जुन २००७: ओपस सॉफ्टवेअर , ऑल राउंड्स क्लियर. ३ दिवसात तीन ऑफर लेटर्स मिळालेली. जेंव्हा बाबांना कळालं तेंव्हा फक्त "पगार किती रे? " एवढंच बोलले, बाकी मी समजलो. गेम्स खेळून एकेकाळी वायडी झालेलो. आणि जॉब लागायला उशीर झालेला, ती अपराधी भावना कित्येक दिवस मनात होती. गेमलोफ्टचं २.२चं पॅकेज नाकारलं. सी.जी.ई. मुंबई, अंधेरी(पुर्व) तोच इलाका जिथं कडू आठवणी ताज्याच होत्या.२.८ देणार्‍या सी.जी.ई.ला लांबुनच बाय केला.. ओपस मधे ५० जणांत फक्त एकटा सिलेक्ट झालेलो. डोमेन उत्तम होता, जॉब प्रोफाईल मधे फार मोलाचा एक्पिरियंस मिळेल हे कळलेलं. १०,५००वर अर्ज साईन करून रुजू झालो. एच.आर. म्हणाला स्लिपर्स घालून ऑफिसला येउ नको इथून पुढे. हे घे ऑफर लेटर. ज्याने मला कोर्स साठी पैसे दिलेले तोच मित्र मला २ फॉर्मल ड्रेस आणि फॉर्मल शुज घ्यायला घेउन गेला. कोणालाही जॉब लागल्याचे पेढे वाटले नाही . २६जुन २००७ : करियरची सुरूवात झाली. पहिल्यांदा ऑफिसात जाण्याचं फिलींग माझ्यासाठी बरंच वेगळं असावं. पहिला पगार १ जुलैला व्हायला हवा होता. पण अकाऊंट ओपनींग मधे जरा डिले झाला असावा. अकाउंट वाले म्हणाले पुढच्या महिन्यात सगळा पगार जमा होईल. एक ऑगस्ट ची किती अतुरतेने वाट पाहिली. १ ऑगस्ट गेला.. २ गेला.. ३ गेला .. ४ गेला.... ५ गेला.... ६ गेला .. मी वेड्यासारखा पहिला पगार मिळण्याची वाट पहात होतो. ७ तारखेला पगार झाला. जंगली महाराज रोडच्या ए.टी.एम. वरुन दहा हजार , पाचशेच्या हिरव्या करकरीत नोटा.. माझा पहिला पगार ... मी त्या दिवशी रडलो अक्षरशः .. चितळ्यांकडून पेढे आणले,माझी फाटकी बॅग लाकडी पुलाहून फेकून दिली, आणि नवीन सॅक विकत घेतली, घरी आलो रात्री ११ ला. घरचे वेड्यासारखी वाटच पहात होते.. पगार हातात दिल्यावर पुन्हा माझा छोटा भाऊ सोडून सगळे रडले. सगळे पैसे दुसर्‍याच दिवशी संपले. याच काळात माझी 'जेन' भेटली. आयुष्यातल्या नव्या एक्साईटमेंटचा अनुभव येत होता. १५ ऑगस्ट२००७: मला पहिल्यांदा हैदराबादला ऑनसाईट पाठवत होते. मुंबै हुन फ्लाईट होती. जेनला भेटशील का विचारलं , ती भेटली नाही पण मला तिने फोन वरून मिस कॉल केला.चला भेट नाही किमान कॉल तरी आला ! मी खुष होतो. ही आमच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात.मी विमानाने तेही किंगफिशरने जाणार हे गल्लीत व्हायला वेळच लागला नाही. जेंव्हा एयरपोर्ट वर प्रथम पाउल ठेवलं, सगळा इतिहास पुन्हा डोळ्यांसमोरून गेला. आई-बाबांची लै आठवण आली. बोर्डिंग करताना , विमानात त्या सुंदर्‍यांचं प्लास्टिक हास्यही सुखाउन गेलं, आत ढंगांत आलो की काय असा धूर पसरलेला. हैदराबादेत मला दिवसाला ३०० रुपये अधिक मिळत, मी ऑटो न करता हॉटेल पासून ४ किमी चालत ऑफिसला ये-जा करायचो. दिवसाचा प्रत्येक रुपयाचा हिशेब असे. एकच टाईम जेवायचो, हैदराबादात हे उत्तम होतं, ३०-४० रुपयांत फोट फुटेस्तोवर जेवण.. २० दिवसांत ५००० सेव्ह, केवळ १००० खर्च. पण आयुष्यात प्रथमच घराबाहेर राहिल्याने जबरदस्त होमसिक झालेलो. आजारी पडलो तेंव्हा जेन ने माझी मानसिक काळजी घेतली, फोन वरून औषधं प्रिस्क्राइब केलेली. ऍक्चुअली डेटा सेंटर मधल्या ए.सी. मुळे तब्बेत बिघडली होती. २००७ च्या दसर्‍याला आईचं मंगळसुत्र माझ्या पगारातून सोडवलं गेलं, भावाचा धंदा बर्‍यापैकी सेट होत होता. पुढच्या हैदराबाद दौर्‍यात सेव्हिंगच्या जोरावर मोत्यांची ज्वेलरी खरेदी केलेली.. कळत काही नव्हतं पण निसता जाउन भाजीपाल्यासारखं उचलून आलो. आश्चर्य म्हणजे ते घरी लैच आवडलं .. आणि होतं ही उत्तम ... Smile ... त्या नंतर आमच्या खानदानातला सर्वप्रथम देशाटन करणारा मी, बाबांचा उर भरून आला होता. ते तुम्ही इट्स अफ्रिका ब्वना मधे वाचलंच असेल. हा आमचा २००५-२००७ चा इतिहास. तुम्हाला का सांगितला माहित नाही, आज का आठवण आली माहित नाही.बरंच काही होऊन गेलंय पण लिहीणं टाळलंय ..

माझ्या पणजोबांच्या काळी श्रीमंती होती. पणजोबा पाच-पाचशे म्हशींचा व्यापार करत, पुण्यात बग्गीतुन फिरत. पण घोड्यांची रेस, आणि दारू यामुळे आणि महामारीत म्हशी मेल्यामुळे आपली श्रीमंती गेली असं बाबा जेंव्हा सांगत तेंव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारतो. इतिहासात रमू नका, उद्या काय करायचं ते पहा. ते शांत बसतात मग .. घरात नेहमी हसतं-खेळतं वातावरण असतं , आई-बाबांची मतं प्रत्येक गोष्टीत विरुद्ध. नेहमी भांडी वाजणं सुरूच. कधी बंद पडली तर मी ती हळूच चालू करून कलटी मारतो.

तर हा असा मी असामी ... कोणी मला ओळखावं म्हणून मी लिहीत नाही, तर मी लिहीतो माझ्यासाठी, जेंव्हा मी आयुष्यात निराशेच्या गर्तेत जातो , तेंव्हा मी माझा हा काळ आठवतो .

(आपला ऋणी)
टारझन

Sunday, August 31, 2008

सेंटर शॉक

.......... मावसभावाच्या लग्नासाठी २ वर्षांपुर्वी नासकात गेलो होतो. सकाळी मुलीकडच्यांनी राहण्या साठी घर दिलेलं..अंघोळ आणि नाष्ट्याची सोय होती . दुसर्‍या दिवशी सगळं आवरून नाष्ट्यासाठी जाणार तोच २ टोपड्यांनी मला पकडलं. माझं शिक्षण आणि मी कोण हे पुर्ण माहित होतं त्यांना. पण मी त्यांना ओळखत नव्हतो. मला म्हणे इथे अंमळ गर्दी आहे, आपण आमच्या घरी चलावे. मी म्हंटलं असंल कोणी तरी पोरीकडचा, इथला खाऊ संपला म्हणून आपली खास व्यवस्था केली असेल. मी होकार द्यायच्या २ मिनीटात एका रिक्षात कोंबून मला त्या घरी नेण्यात आलं. मी फक्त नाष्टा करायला जायचं या मानसिकतेत होतो. १० मिनीटावर घर होतं .

......... मस्त २ मजली बंगला होता, बाहेर धान्य वगैरेचं गोदाम , ट्रॅक्टर , एक जिप ..घरामागे मोठ्ठ वावर. एक द्राक्षाची बागही होती साइड ला. फॅमिली बक्कळ पैका वाली असावी.मी येण्याची आधीच कल्पना आहे की काय आत सगळं नीट नेटकं आवरलेलं, एका बाजुला झोक्यावर त्या घरातले पुराणपुरूष झोका घेत लिहिता आणि उच्चारता न येणारा झोक्याचा आवाज करत शांतता भंग करत होते. हॉल मधे लाकडी सोफे त्यावर कुशनच्या उशा (हे मला बिककुल कंफर्टेबल वाटलं नाही) आणि उत्तम बैठकीची व्यवस्था होती. कुठे कोणी पादलं तरी एका मोठ्या दिवाणखाण्यात सगळी फॅमिली वास हवेत विरायच्या आत जशी जमा होते इथे सगळी फॅमिली हजर. कर्णधाराने फिल्डींग लावल्याप्रमाणे सगळे आपापल्या पोझिशन वर होते. घरातले कर्ते आणि मुखिया वाटनारे गृहस्थ ३-४ लटकेलछाप लोकांना घेउन बसले होत.त्यांची मुले पण एका कोपर्‍यात बसलेली. एक जण आभ्यास करत होता (एप्रिल मधे अभ्यास? मी ताडले ते बेनं नुसतं नाटक करत होतं ) सुना स्वयंपाक घरातुन डोकवत होत्या. १२-१५ वर्षांच्या ३ मुली उगाच मला पाहून एकादा लै भारी विनोद झाल्यावर ह ह पु वा व्हावी तशा(किंवा पौराणिक मालिकांमधल्या राजकन्या व तिझ्या मैत्रिणी जशा कारण नसताना हसतात तशा) उगाच हसून एकडून तिकडून येऊन स्वैंपाकघरात पळत होत्या. मी अजुन ही निरागस मनाने गंमत पहात, मी मुलाचा भाउ आहे म्हणून आपल्याला काही फॉरेन रिटर्न सारखी वागणुक मिळते आहे असे समजुन फुगत होतो. मी आल्यावर सगळेच आपल्याघरी कृष्ण दही चोरायला आला असा आनंद त्यांना झालेला. सगळे उभे राहिले. आणि "आमच्या घरी चला" म्हणनारे कुठे तरी धान्याच्या पोत्यांवर विराजले.अजुनही ट्युब पेटत नव्हती. मग घरातुन चहा आला. आम्ही अंमळ बोर माणूस , चहाच्या बाबतीत बाजीराव नखरे फार. "चहा नको .. मला त्याबरोबर गुडडे ची बिस्किटे लागतात." असं म्हंटल्याबरोबर एका आदेशासरशी अभ्यास करणारं(!!) ते बेनं बाणासारखं बाहेर पळालं मोजुन २ मिनीटात चहा गार व्हायच्या आत माझ्या पुढ्यात बिस्किटे हजर. आपण ऑलिंपीक मेडल जिंकल्याचा आनंद त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत होता.

च्या-बिस्किटं झाल्यावर, एक काकू मला स्वयंपाक घरातुन येत आहेत असं मला ८० अंशाच्या कोनातुन दिसलं.. त्यांच्या मागे एक गोरी पान,सुंदर,ऍव्हरेज उंचीची मुलगी मस्त साडी घातलेली, पदर थोडा डोळ्यांपर्यंत , हातातल्या ट्रे भल्या मोठ्या ट्रे मधे पोहे, बालुशाही,गुलाबजाम, समोसे, आणि अजुन कसलासा पदार्थ होता. चहा+बिस्किट नाकात गेलं आणि खोकला लागला .४४० किलो व्होल्टचा झटका लागावा आणि काळजात धस्स्स व्हावं आणि मति खुंटावी असलं फिलींग मला पुर्वी कधीही आलं नव्हतं.मला परिस्थितीची कल्पना आल्यावर सावरायला ५-१० सेकंद गेले. मी बावळटासारखा तिच्याकडे पहात होतो. आयला "आपल्याला दाखवण्याचा" प्रोग्रॅम आहे , ही गोष्ट पटतच नव्हती. मी खरोखर स्वता:ला पिंच करून पाहिलं. बापरे.. मी जाम घाबरलो. पोहे खाऊन झाले. गुलाबजाम मला आवडतात हे सिक्रेट माहिती असावं , मोठ्याबाउल मधे २०+ गुलाबजाम होते. मी कसे बसे (जबराइच्छा होत असताना) फक्त ६-८ गुलाबजाम खाल्ले. आणि त्या कर्त्याने डायरेक्ट विषयाला हात घातला.
"काय मंग जावायबाप्पू .. पोरगी पसंत का ? आम्हाला तुम्ही कालच पसंत पडले ........." असली खतरा सुरूवात ...( आयचा घो ... टार्‍या ... तुझी कन्यारास यावेळी कशी गप्प बसली बे ?) माझी बोलती बंद झालेली .. मी त् त् प् प् करत होतो. मी म्हणालो मी असला विचार नाही हो केला अजुन .. मी तर आजुन जॉबलेस आहे हो .. त्यावर ते म्हणाले आवो .." कुटं चाकर्‍या करत बसता .... आमची बागायती हाय, द्राक्ष, कापशी आन् उसाचं आमुक आमुक मिळतं .. " खुल्लमखुल्ला ऑफर ? मला काहीही सुचत नव्हतं ... चहा-पोहे खाऊन नाय कसं म्हणू याचं बळच जिवावर आलेलं... कसं बसं बडबडायला लागलो (मला सुचलं नाही की उगाच इंग्लिश बोलायची सवय आहे) ... मी इंग्लिश सुरू झाल्यावर तर सगळे लोक अजुन ४ पावलं पुढे सरकुन मी काय बोलतोय हे ऐकत आहेत असा भास मला झाला.आईशी चर्चा करावी लागेल, असं पटेबल कारण देत शेवटी कसा बसा निसटलो ..

जाताना पोरीकडे एक फिल्मी लुक दिला, बिचारी 'चक्क' लाजली आणि मी 'तिला नाही म्हणनार आहे' हे शल्य मनात ठेउन निघालो .
(समाप्त)

अविवाहित
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पी.एम.टी.

पी.एम.टी.

डिस्क्लेमर : खालील लेखात प्रत्येक ऊल्लेख हा केवळ पी.एम.टी. शी संबंधित आहे. नोंद घ्यावी.


काय, पी.एम.टी ? कान टवकारले ना ? अहो नामकरन झालं ना? पी.एम.टी आणि पी.सी.एम.टी. विलीनीकरण झालंरे टार्‍या... "अर्रे होन दे रे भई... अप्पन तो ईसको मरते दम तक पी.एम.टी. इच बोलेंगा !"
हुह्ह! काही दिवसांपुर्वी ख.फ. वरील चर्चेत पी.एम.टी.चा विषय निघाला आणि मनात असलेल्या कडू गोड आठवणींनी या लेखातून मोकळी वाट काढली. हा लेख म्हणजे काही पी.एम.टी.चा इतिहास नाही.माझ्या वाटेला पी.एम.टी.चे जे पराक्रम अनुभवले ते लिहीतोय. अजुनही माहित नाही की काय लेखात लिहिणार आणि काय ऊतरणार... संभालके लो भिडू लोग.

जवळपास १२-१५ वर्षापुर्वीचं आठवतंय, तेंव्हा मी नगररोड वरच्या कोरेगाव भिमा आणि वाघोलीच्या मधलं एक छोटसं गाव लोणीकंदला रहात असे. बाकी नातेवाईक पुण्यात रहात असल्याने दर सुट्ट्यांमधे पुण्यात यायचा योग येत असे. अशा वेळी एकमेव साधन म्हणजे पी.एम.टी.,कॉपिटीशन ला फक्त कमांडर(जिबडं) ही प्रायव्हेट वाहतुक.आतासारख्या डुगडुग(?!?) सारख्या ६(ऍक्चुअली १२) आसनी डुकरांचा त्याकाळी वावर नव्हता. पण पी.एम.टी. सगळे निमशहरी आणी खेडी-पाडी पुण्याला जोडण्याचं काम केलय. असो .. बालपणचा सुट्ट्यांमधला प्रवास, नंतर मोठा झाल्यावर कॉलेजला जातानाचा रोजचाच पी.एम.टी. प्रवास. पी.एम.टी. प्रत्येक पुणेकराच्या मनात एक धृव स्थान तयार करून आहे.
पण काय हो ? कशी आहे पी.एम.टी. सेवा? तिचे कर्मचारी कसे वागतात प्रवाशांशी ? गाड्यांची कंडिशन कशी असते? तिला वेळेचं काही धरबंधन आहे का ?
सगळ्यांची ऊत्तरे नकारात्मक मिळतात. आहाहा काय ते पी.एम.टी वाहक आणि चालक.
पी.एम.टी. मधे नोकरी मिळण्यासाठीची (अनिवार्य) पात्रता खालील प्रमाणे :-
१) आपल्याला कमीत कमी शब्दात प्रवाशाचा कारण नसताना जास्तित जास्त अपमान करता आला पाहिजे.
२) आपल्या तोंडावर माईक टायसन सारखी मगृरी+घमेंड्+*डमस्ती असली पाहिजे.
३) आपल्यात पैसे खाऊ गिरी कुटून कुटून भरलेली असली पाहिजे.
४) बाई बद्दल थोडा सॉफ्टकॉर्नर असणे आवश्य. (वासूगिरी का काय ते)
५) थोबाड हे संवादासाठी नव्हे तर गुटखा किंवा तंबाखू साठवण्याचं कोठार आहे हे समजलं पाहिजे.
६) दृष्टीदोष असणे आवश्यक, तो बसस्टॉप १०० मिटर मागे किंवा पुढे आणि बहुतदा दिसलाच नाही पाहीजे या साठी.
७)आपण अशोक सराफ चे जबरदस्त फॅन असले पाहीजे, शर्टच्या पहिल्या ३ गुंड्या फक्त भरतकामाच्या आहेत हे कळल पाहीजे.
८) डोळ्यात एक प्रकारची लाली हवी.
९) नवख्या पॅसेंजरचा पोपट करण्याची कुशलता हवी.
१०) ५० पैशाचा क्षुद्र रक्कम न समजता, त्या लेव्हलचा भ्रष्टाचार करता यायला हवा.

या पात्रता असल्या तरच तुम्ही मग १० पास/नापास आहात का ? बेरीज-वजाबाकी जमते का? लिहीता वाचता येतं का ? या गौन गोष्टी विचारात घेतल्या जातात.

असे असतात पी.एम.टी. चालक :
चालक लोक हे सुरूवातीचं आणि शेवटचं स्टेशन फक्त मजबूरी म्हणून बस थांबवतात.फॉर्मुला वनचे चालक पी.एम.टी. हायर करते. आणि मधली स्टेशनं (पिट स्टॉप्स) मनात आलंच तर ऊपकार म्हणून थांबवतात (ऊरनारी माणसं गलका करतील, हे एक अजुन छोटंस कारण). बस मोकळी नेली तरी यांच्या तिर्थरूपांच काहीही जात नसतं. पी.एम.टी.चे ब्रेक्स एक तर अति टाईट नाही तर अति वाईट असावेत (अरे दृष्टीदोष असने ही पात्रता आहे नाही का ?) कारण क्वचितच बस योग्य ठिकाणी थांबते. आणि चालक प्रवाशांना कसं पळवलं याचा असुरी आनंद घेऊन मनात हसतो. हा, कोणी बाई कुठे दिसली की लग्गेच काच्च कन् बस तिच्या पायाजवळ थांबते बरका !! आज्जी-अजोबांना बस मधून ऊतरण्यास वेळ लागला म्हणून चालकाच्या बायकोची डिलेव्हरी हुकली अशा रागाने त्यांना २ शब्द बोलण्याचे अधिकार परमेश्वरानेच बहाल केले असावेत. कोणालाही बस मधे सहजा-सहजी प्रवेश मिळू नये, कारण यामुळे प्रवाशांना कोणतीही गोष्ट स्ट्रगल करून मिळवण्याची जिद्द तयार होईल असा नेक हेतु या मागे असावा. चालक(पायलट) लोक पुण्याच्या अति खड्डेमुक्त रोड( हवाईपट्टी)वरून ही बस (विमान) फार शिताफीने चालवतात(उडवतात). जबरा. काही चालक तर ईतक्या जोरात गाडी हाणतात जणू काही त्यांना 'जोराची' लागलेली आहे .. कधी एकदा थेवटचा स्टॉप येतो आणि कधी मी 'सुलभ' मोकळा होतो असे त्यांना होत असावे
यांना चालत्या गाडीतुन साइड विंडोतुन तोंडामृत थुंकण्याचे जबरदस्त स्किल असते. स्टेरिंग सोडून तंबाखु मळण्यात यांचा हात कोणीच चोळू शकत नाही. आणि कोण आडवा गेला की हे लोक ऊभी शिवी देऊन आई-बहिणींचे पावित्र्य काढतात. घरी खाण्याचे हाल असोत पण एकदा का सिट वर बसलो की सबंध जगाला चालवण्याची ताकद आपल्यात आली असं हे लोक दाखवतात. बस मधे कोणी ओळखीचा चढला की त्याला खास चालक महाराजांशेजारी "इंजिनासनावर" बसण्याचा मान मिळतो, मग हे लोक वैश्विक विषयांवर भारी-भारी चर्चा करतात, ते ऐकण्याचं भाग्य फार थोर. चालकांना छोट्या गाड्यांना कट मारणे, दुचाकीवाल्यांना दाबून रोडखाली ऊतरवणे,एखाद्याच्या पार जवळ जाऊन बसं थांबवून त्याला चादरीसारखं पांढरं करणे या लिलांपासून एक स्वर्गिय आनंद मिळत असावा.
अशाच सौजन्यमुर्तीचा एक किस्सा :
एक इसम मुंबैहुन पुण्यात प्रथमच आलेले. भोसरी स्टॉपवर बस थांबलेली. चालक महाराज रेडीएटर मधे पाणी भरत होते. भोसरीची बहुतेक बस नाशिक फाट्याहूनच जाते(पिंपरी-चिंचवड कडे जाणार्‍या गाड्या सोडल्या तर). त्या इसमाने चालकाला विचारलं "बस नाशिक-फाट्याहुन जाईल काहो ? " , चालक (अत्यंत मंजूळ आवाजात्,ज्या आवाजात आपण कुत्र्याला हाकलतो) "नाय नाय .. बस आळे-फाट्यावरून जाते..." ... मी आणि आमचा ग्रुप मागेच बसलेलो .. "तिथे काय तुझी बायको व्याली आहे का रे लब्बाडा ? " --बाईच्या आवाजात अस्मादिक.आणि पुर्ण बस हास्यझटक्याने हालली. (ड्रायव्हरला थोडी अक्कल असल्याने बिचारा गुपचुप निघुन गेला. नडला असता तर पुर्ण भोसरी-मनपा त्याला नको नको ते ऐकावे लागले असते. आम्ही पी.एम.टी कर्मचार्‍यांविरूद्ध पुकारलेले हे बंड होते). त्याइसमाला सांगितलं बाबा बस तिकडूनच जाते बसा तुम्ही.. पण बाबांचा त्या चालकावर विश्वास, परत ४ लोकांना विचारून चौकशी करत होते. असो ..
असाच एक विनोद आठवला , एक माणूस रोज कामाला जाण्यासाठी सकाळी ९च्या बस ची वाट पाहत असे. एक बस चालक हटकुन थोडी पुढे बस थांबवत असे. आणि माणुस चढायच्या आत पुण्हा बस चालू करून जात असे. एकदा माणसाला बस पकडण्यात यश आलं. तो ड्रायव्हर ला म्हणाला , ही बस काय तुमची आई आहे का हो ? चालक - "नाही", माणूस- "मग बहीण ? " चालक - "नाही", मग बायको असेल, चालक म्हणाला नाही बुआ ...
माणुस - " मग मला चढून का देत नाही ? "

असे असतात पी.एम.टी.चे वाहक :
वाहक हे चालकाला बरोबर कॉप्लिमेंट देत असतात. यांचा पॅसेंजर्स शी जास्त संबंध येतो. हे लोक तोंडात मध घेऊनच असतात. बाई बरोबर कशी वासूगिरी करावी यात एकदम निष्णात. आणि कोणी कॉलेजचा पोर्‍यादिसला रे की त्यांचा टोनच बदलतो. म्हणूनच आम्ही असे वाहक फाट्यावर मारलेत (लिट्रली). यांना पैशाचं फार मोल असतं. ५० पैसे देखिल हे लोक खाण्याच सोडत नाहीत. प्रवाशाने टिकीट मागणे म्हणजे आपला अपमान आहे आणि उरलेले सुट्टे मागणे म्हणजे या बाप्पूला त्याची २ एकर बागायतीच मागितली असं वाटतें.आपण पी.एम.टीचे मालक आणि प्रवाशी आपले कर्जदार आहेत अशी वाहकाची समजूत असते. कोणी दरवाज्यात उभा राहीला की यांना मिरची का लागते कळत नाही. स्वतः तिथेच ऊभे राहतील मग. सकाळी सकाळी १००-५००ची नोट काढणार्‍याची हे लोक भारी आरती करतात. प्रवाशाला बस मधे घेऊन आपण फार ऊपकार केलेत अशी यांची धारणा असते.कोणी यांना अमुक ठिकाण आले की सांगा हो असं विचारलं की हमखास माणूस २ स्टेशनं पुढे ऊतरून पुण्हा रिटर्न येतोच.बाकीच्या पैशांसाठी हे लोक प्रवाशाला शेवटच्या स्टॉप पर्यंत रखडवतात.बिचार्‍या प्रवाशाचा जिव हरणीच पाडस व्याघ्रिये धरीयेले सारख्या हरणी सारख होतं ...आणि शेवटी जर काही घोळ झाला तर हे लोक "बेनिफिट ऑफ डाऊट" स्वता:ला घेतात. प्रवाशी काहीही करो .. पैसे मिळत नाहीत. काही वाहक हे बाजिराव असतात. त्यांनी प्रवाशाकडे येण्या पेक्षा प्रवाशाने त्यांच्या कडे जाऊन टिकीटासाठी भिक मागावी असे त्यांना अपेक्षित असते. अशा कंडक्टर्स कडे आम्ही कधीही जात नाही. आपसूकमग रागारागाने मागे येऊन टिकीट देताना त्याचं तोंड बघताना आम्हाला पण एक असूरी आनंद होतो.चालक -पॅसेंजर्स चे भांडण पी.एम.टी. मधे फार कॉमन आहे. आणि हे झाले की सगळे लोक अगदी सापा-मुंगसाची लढाई बघावी तसे कौतुकाने बघतात. आणि मधुनच येणार्‍या कमेंट्स फारच भारी असतात.एकदा टिपीकल बामन बाईचं सुट्ट्या पैशावरून कंडक्टर शी वाजलं. कंडक्टर आपण पैसे दिलेत या भुमिकेवर (नेहमीप्रमाणे) ठाम होता. पण बाईच पण बामनी रक्त होतं .. कडाक्कड भांडणाला सुरूवात झाली.. कंडक्टर नी अतिऍग्रेसिव्ह भुमिका घेत.."पैशे धिलेत आं.. बोलायच काम न्हाय सांगुन ठीवतो..च्यायला हेवडंच आसल तर सुट्ट काढायचं (आमच्या ग्रुप मधुन एक बायल्या आवाज ',काय काढायचं हो ?' )जास टरंमटरंम करायच काम नाय". बाई "काय पण हा निर्लज्जपणा ? ३ रुपयांसाठी कसे बोलताय ? तुम्हाला काही रित आहे की नाही...माझे ३ रुपये द्या नाही तर गाडी पोलिसस्टेशनात घ्या ". समोरचा जेवढं शुद्ध मराठी बोलेल त्याच्या १० पट वाहकाची मराठी खालवते. शेजारची बाई लगेच त्या बाईंच्या मदतीला धाऊन आली "होना! कित्ती निर्लज्ज असतात ही लोकं, मेले.." वाक्य तोडत वाहक " ए शेंगदाणे .. तुला काय करायचंय गं?" "तिला कुट घालायचाय"-पुन्हा ग्रुप मधुन एक बायल्या आवाज" भांडण पेटत पेटत जातं शेवटचं स्टॉप येतं .. बाई शेवटचे (बस मधले शवटचे,ती दिवसभर याला ३ लाख शिव्याशाप देणार हे नक्की.) ऊद्धारोद्गार काढून ऊतरतात. वाहक अगदीच काही झालं नाही असं दाखवून बेल मारतो.

अशी असते पी.एम.टी बस :
आहाहा ! आमच्या सारखे क्षुद्र काय ये वर्णन करणार या महान वस्तुचं ? पी.एम.टी.ला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला धुण्यात येतं (जाहिराती रंगवायच्या असल्यास तो अपवाद) ... ३६३ दिवस त्यावर हवा,पाणी, धुळ या गोष्टींचा परिणाम होऊन एक सुरक्षाकवच तयार झालेल असतं.एका धुळीने मळलेल्या बस वर कोणीतरी "आता तरी पुसा" अशी सुचना लिहीली होती. बर्‍याच सिटच्या मागे तुम्हाला पुण्याच्या मजनुने आपल्या लैलेच नाव लिहीलेलं आठळेल, किंवा आमका कसा *डवा किंवा *दर*द आहे. आमुक सर कोण्या मॅडमवर डोरे टाकतो, ई. गोपणीय माहीती पी.एम.टी. च्या सीट मागे मुद्रित असते. काही ठिकाणी सुचनांचे काने-मात्रे काढून त्याला एक विशिष्ट अर्थ देण्याचा पुणेरीपण आपले पुणेरी पॅसेंजर्स करतात. तुम्ही कधी पी.एम.टी. च्या मागे बाईक चालवली आहे का हो ? कीतीही स्वच्छ रोड असू देत,पी.एम.टी मागे एक धूराळा ऊडवत चालते, जेने करून मागच्यांना त्रास व्हावा. जेंम्स बॉंड चित्रपटांत असाच फंडा त्याच्या गाडीसाठी इंप्लिमेंट केला होता. पी.एम.टी. ची अजुन एक खासियत म्हणजे, अशी एकही पी.एम.टी नाही, जिला कुठूनतरी एखादी खोच लागलेली नाही (हे नजर लागू नये म्हणून असावे) तिच्या अनेक खिडक्यांपैकी किमान एक तरी खिडकी निखळलेली असतेच. जिच्या सर्व खिडक्या शाबूत ती पी.एम.टी. नव्हेच. पी.एम.टी.चा गियर दांडू पाहिलाय का आपण ? तो एक मिटर व्यासाच्या वर्तुळाकार परिघात घुमत असतो. पी.एम.टी प्रवाशांच्या कंफर्ट चा फार विचार करते. म्हणूनच की काय ती एक चालते फिरते मसाज सेंटर आहे. त्यात बसलं की त्या व्हायब्रेशन्स ने तुमचा पुर्ण बॉडी मसाज होऊन तुम्हाला दिवस ऊत्साहात जाईल किंवा दिवसाचा थकवा निघेल.
पी.एम.टी. तुम्हाला संयम कसा ठेवावा हे शिकवते. बसची वाट पाहून पाहून तुमच्या संयमाला एक नविन ऊंची प्राप्त होते. आपल्या राहुल द्रविडच्या संयमाचं हे एक गुपित आहे. तोही पी.एम.टी. ची वाट पाहून पाहूनच शिकला असावा.
वेळेवर बस आली की तुम्ही फटाके फोडून आनंद साजरा केला पाहीजे. आणि चालकाचा जाहिर सत्कार पण. पी.एम.टी एवढी मजबुत असते(दिसते) की काय सांगू... बहुतांश वेळा डाव्या बाजुला पुर्ण वाकलेली पी.एम.टी. पाहीली की पुणेकराने तिच्यावर किती बलाक्तार केला आहे असा विचार येवुन डोळे पाणवतात. काहींना पी.एम.टी. म्हणजे एक स्वर्गाचे दार वाटते. दर महिना एक बळी या हिशोबाने पी.एम.टी. यमराजाचं काम फुकट करते.

पण मला काही गुणांचं कौतुक करावसं वाटतं... हे चालक लोक कमालीचे डोंबारी आहेत. शनिवार वाडा ते स्वारगेट या रस्त्यावरन दुचाकी चालवनं ही एक कौशल्याचं काम आहेत. आजुबाजुलाच बसलेले ओलं खोबरं,आलं,कोथंबीर विकणारे भाजीवाले, फेरीवाले, आणि पुण्याचे अतिशिस्तप्रिय वाटसरू लोक, आणि जेमतेम बसच्याच रुंदीचे रस्ते... यातुन आपला चालक शिताफीने वाट काढतो. वृद्ध व्यक्तींना चढण्या-उतरण्यास मदत करणारे वाहक आणि जरा जास्त वेळ बस थांबवुन "नीट ऊतरा हो मावशी, बस थांबलेली आहे, घाई करू नका!" असे म्हणनारे चालक ही आहेत पी.एम.टी. मधे.
वाकडे तोंड न करता अगदी ७ रुपयांच्या टिकीटासाठी १००ची मोड देणारे वाहक ईथे विरळच.सगळ्या प्रवाशांशी नम्र पणे हसत खेळत प्रवास करवणारे वाहक " मधले पुढे चला, गर्दी करू नका , ऊतरणारे पुढच्या दाराने ऊतरा " एका विशिष्ट तालीत म्हणतात तेंव्हा मजाच वाटते. गणपती, दसरा,दिवाळी ला आपल्या बसला चालक-वाहक मस्त सजवतात. जणु आपल्याला रोजी-रोटी दिल्याबद्दल एक छोटीशी परतफेड. सगळे चांगले-वाईट अनुभव घेऊन पण मला माझ्या पी.एम.टी.चा अभिमान आहे. तिच स्थान प्रत्येक पुणेकराच्या मनात अढळ आहे. म्हणूनच कोणी तरी म्हंटलं च आहे...

वाट पाहीन ... पण पी.एम.टी. नेच जाईन..

---------------------------------------------------------------------------------------------------टारझन (१६-०८-०८)

ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

डीस्लेमर : या भागात काहीही चटपटीत नाही.. ६ महिने अफ्रिकेत राहून जेवढी अफ्रिका कळाली ती मांडत आहे.

सविस्तर डिटेल फोटू पहाण्यासाठी चित्रांवर टिचकी मारण्याची मेहनत घ्यावी Smile

ईट्स अफ्रिका ब्वनापासून पुढे ...

सगळ्यात पहिल्यांदा अफ्रिका म्हंटले की ऊभी रहाते ती दक्षिण अफ्रिका. बाकी अफ्रिकन कंट्रीज आपण वाळीत टाकल्या सारख्या तुच्छ लेखतो. आणि त्यात युगांडा म्हटलं की (मराठी माणसाला) मनातल्या मनात हसू आल्याशिवाय रहात नाही. आपल्याला अजुनही अफ्रिका म्हणजे नुसती जंगल आणि डांबरमेड कल्लू आदिवासी आठवतात. काही अंशी खरं आहे. पण पुर्ण नाही. ईथे थोडा प्रकाश टाकतो.

जसे विमान युगांडाच्या हद्दीत येते, सर्व प्रथम दर्शन होते ते "लेक व्हिक्टोरिया" चे. जगातील २ नंबरचे तळं. (बहूदा भुमध्य सागर पहिला आहे) याच विशाल तळ्यातून द ग्रेट रिव्हर नाईल ऊगम पावते. विमानातून एवढे विशाल पाणी पाहून आपण समुद्रावरून जात असल्याचा भास होतो. एंटीबे एक छोटंस अंतरराष्ट्रिय विमानतळ. तिन्ही बाजुंनी लेक व्हिक्टोरियाच्या पाण्याने वेढलेलं.

हवामान :
अतिशय सुंदर मनमोहक स्वच्छ हवामान, मन गार करणारा हिरवागार निसर्ग , भारताच्या मानाने फार फार कमी प्रदुषित, (ईथे नद्या अजुन नद्याच आहेत, गटारं नाही झाली अजुन त्यांची मुळा-मुठे सारखी ). निसर्गाने दिलेला सुंदर नजराणा अफ्रिकेत अजुन शाबूत आहे. याची प्रत्येक क्षणी ओळत पटते.
युगांडा हे विषुववृत्तावर (ईक्वेटरच ना?) येतं. त्यामुळे सुर्याची लंबवर्त किरणे थेट पृथ्वीवर येतात, म्हणून काही जेनेटिक बदल होऊन अफ्रिकन डांबर झाले असं मला कोणी तरी सांगितलं. ईथे ऊन्हाळा-पावसाळा-हिवाळा ऋतूही नाहीत. बारा महिने कधीही पाऊस पडतो आणि काही क्षणात लख्ख ऊनही पडतं. हवामान अगदीच मानवेल असं (ना इंग्लंड-रशिया सारखं गोठवणारं , ना आखाती देशांसारखं वाफावणारं), एकदम झकास वातावरण.ऊत्तम शरिरासाठी लागणारी हवा (नक्की माहीत नाही काय ते) ईथे आहे. म्हणूनच की काय , जागतिक मॅरेथॉन मध्ये यांच्या स्टॅमिन्याचा हात(पाय) कोणी धरू शकत नाही. अस्मादिकांना व्यायामाचा शौक असल्याने , सकाळीच ४ किमी रनिंग करून जिमला जातो. मला माझ्या सारखेच धावणारे दिसत. आधी विचार केला की हे मॅरेथॉन ची तयारी करतात की काय ? पण नंतर कळलं हे महाभाग पळतच कामाला जातात.

संस्कृती / सभ्यता :
माझा मुक्काम युगांडाची राजधानी, कंपाला मधे होता. एंटिबे एअरपोर्ट पासून ८० किलोमीटर. मायकेल ने गाडी सुसाट आणली .... निसर्ग भरभर डोळ्यांसमोरून पळत होता, आणि मी अचंभित होऊन नुसता पहात होतो. मध्येच कुठे तुरळक पुर्णता: नैसर्गिक पणे (सिमेंट्,विटा,पत्रे ,ई न वापरता) बांधलेली घरे दिसायची, आपल्या सारख्या पारावरच्या गप्पा ईथे भरत नाहीत. अफ्रिकेत, मु़ख्यता : युगांडा, केनिया, टांझानिया, मालावी, सुदान ई. देशांत ३ पिढ्यांपासून स्थालांतरित झालेले भारतिय (मोस्टली केम छो भाई ) जास्त आहेत. ईतके की , तुम्हाला आपण भारता बाहेर रहातोय याची जाणिव फार कमी होते. ईथले बहुतांश भारतिय फार श्रीमंत आहेत. तर स्थानिक लोक खालच्या दर्जाची शारिरीक कामे करतात.एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाट्टे.ईथे मी येतानाच मन मोठ करण्याच्या औषधांच्या जाहिरातींचे मोठे मोठे फलक पाहिले. मायकेल ला विचारल्यावर तो हसला. मिळालेली माहीती अशी. अफ्रिकन माणसाच्या सुंदरतेची व्याख्या ईतर जगापेक्षा वेगळी आहे. चेहरापट्टी, त्वचा,बांधेसूद शरिर त्यांना सुंदर वाटत नाही.स्त्रीचं मन जेवढ मोठ तेवढी ती सूंदर. Smile मग बाकी माप बेमाप असले तरी चालेले. ईथल्या स्त्रीला बाई म्हणन्या पेक्षा "बाईमाणूस" म्हटलेलं योग्य. स्त्री-पुरुष दोघांना केस एकदम गवत ऊगवल्या सारखे ऊगवतात.म्हणून हे टकलेच असतात. ९९% स्त्रिया विग घालतात. (मला खटकलेली गोष्ट अशी, तुम्हाला विग घालून केशभुषा करायची आहे तर करा ना , एकसे एक भयानक प्रकार करून ठेवतात, काय माहीत तेही यांना सुंदर वाटत असेल. चिन मध्ये मार्शल आर्ट जसं प्राणांच्या हालचालींवर आधारित आहे, तशी यांची केशभुषा पण प्राण्यांपासून प्रेरित झालेली असावी.) शाळेला जाणार्‍या टकल्या पोरी पाहिल्या की गंमत वाटते.

ईथे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड च्या डायरेक्ट फायटिंग होतात .. एकदम सन्नी देओल ष्टाईल मधे. अफ्रिकेत मुळ भाषा इंग्रजी आहे.युगांडन, स्वाहीली ई. लोकल भाषा आहेत, पण इंग्रजी सर्वांना कळते.मला येऊन २ महिने झाले होते. एका बॅंक ईसमाला मी रोज तसा पहात होतो. एक दिवस माझ्या कडे आला , त्याच्या बरोबरच एक पोरगी होती. मला थोडा बाजुला घेऊन गेला. माझी थोडीशी विचारपूस केली. म्हणाला "स्टे विथ माय डॉटर फॉर अ मंथ,इफ यु लाईक हर, किप हर" , माझी कानशिलं गरम झाली. बधीर होऊन मी पुन्हा त्याला विचारलं "व्हाट डिड यु से?" त्याने त्याच टोन मधे पुन्हा तेच ऊत्तर दिलं. मी म्हटल "ऊठ *डव्या , चालायला लाग !! " किप हर म्हणजे काय ? साला काय शोकेस चा माल वाटला का काय !!! मी त्याचा अपमान करून पण त्याला वाईट वाटलं नसावं. कारण जाताना मला म्हणाला "थिंक ओव्हर ईट अगेन !!" माझा पारा आधिच चढलेला, मी मराठीतल्या चतुर्थ श्रेणीतली स्तुतीसुमनं बिंधास्त हासडली. मी बँकेच्या मॅनेजरला हा किस्सा सांगितला.तो भारतिय मुळाचा होता. त्याने मला सांगितले ते ऐकून चाट पडलो. ईथे लोक १०-१० वर्षे सुद्धा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून एकत्र रहातात. त्यात "प्रजनन" पण करतात. आणि मग कुठे यांना लग्न करावं वाटलं तर करतात. त्यामुळे त्या माणसाने मला "किप हर" ची दिलेली 'ऑफर' काही मोठी गोष्ट नाही ईथे. माझ्या हॉटेल च्याचमागे एक चर्च आहे. एक विवाह सोहळा चालू होता. जोडपं तसं वयस्करच दिसत होतं. एक ६-८ वर्षाचा मुलगा(पक्क चिंपाजी वाटत होतं) हातात पुष्पगुच्छ घेऊन जोडप्याच्या दिशेने चालला होता. तोही एकदम सुट-बुट टाकून होता (अर्रे वा चिंपाजी सुट-बुटात?) . म्हंटलं हा कोण? तर तो त्या जोडप्याचा एक पुर्व पराक्रम होता. आई-बापाचे लग्न लावणारा तो ईवलासा शाहिद कपूर पाहून मी धन्य झालो.बर लग्न पण लै भारी होतात. माझ्या हॉटेलच्याच आवारात मला बुधवार-शुक्रवारी ४०-५० लोक खुर्च्या टाकून काही तरी करताना दिसायचे. म्हंटलं भिषी बिशी लावत असतील. खरी गोष्ट अशी की ते नवर्‍याचे-नवरीचे मित्र आणि नातेवाईक असतात. लग्नाआधी सगळ्यांना एकत्र बोलावून पैसे गोळा केले जातात. हे नैतिक सक्तीचं असावं. (लग्न करतो एक, आणि बाकीचे पैसे देतात !!! वा !! चांगला बिझनेस होईल , दर महिना अखेरीला लग्न केलं असत मी तर ..) आपल्या ऊलट, ईथे मुलगा(?) मुलीच्या बापाला हुंड्यात गाई देतो. सही ना ? तर लग्नाची प्रोसिजर मला फार आवडली. मोजके लोक( पुणे -३० सारखे, तुमचे ५० आमचे ५० ) चर्च बुक करायंच.मस्त भाड्याने मर्सिडीज आणायच्या. पादरी(फादर) हाही तरी नाकात बोलतो, गुलाबजल दोघांवर शिंपडतो, मग दोघांनी एक मेकांच एक जाहिर चुंबन घ्यायचं,. झालं लग्न. बाजा नाही ,फटाके नाही, काही नाही.प्लस लग्नाला आपलीच कार्टी उपस्थित .(म्हंटलं ईथ जर पोरा-पोरीला हळद लावण्याची प्रथा असती तर ही ध्यानं टॅक्सी/ऑटो च दिसली असती, ते काळ--पिवळं काँबिनेशन). ईथे अमेरिकन कल्चर फार पाळल जातं. साधा सफाई कामगारही सेफटी बुट-हेलमेट , पिवळा पोषाख घालूनच रस्ते साफ करतो. टॅक्सी ड्राईव्हर पण मस्त टाय घालून प्रोफेशनल वागतो. कंपाला शहर फारं सुंदर आणि स्वच्छ आहे, मोठे सुटसुटीत रस्ते,सुंदर बगिचे, सुंदर ईमारती आहेत.

युगांडा-केनियाला तुम्ही अमेरिका-जपानच जंकयार्ड म्हणू शकता. तिकडे फेकून दिलेल्या कार ईकडे येतात. यात टोयोटचं प्रमाण जवळ जवळ ९०% आहे. तरीही ईथे बी.एम.डब्लु. , मर्सिडीज , जीप , वोक्स वॅगन ,मित्सुबीशी, निस्सानच काय हम्मर पण दिसते. कारण ईथले लोक ३ गोष्टींचे फार आशिक आहेत. बाई-बाटली आणि कार. खायला नसलं चालेलं यांच्या बुडाला कार हवी. ईथे भारतिय-चायनिज बाईक्स दिसतील. ऑटो सारखा खाजगी वाहतूक म्हणून याचा वापर होतो. याला "बोडा-बोडा" म्हणतात.

चलन :
युगांडाचे चलन आहे युगांडन शिलींग , १ डॉलर म्हणजे १६००-१७०० युगांडन शिलींग्स. १ रुपया =४४ युगांडन शिलींग्स
केनियाचं केनियन शिलींग , १ डॉलर = ६० के.शिलींग्स किंवा १ रुपया = १.५० के. शिलींग्स.
युगांडात कमीत कमी १०० शिलींगचं तर जास्तित जास्त ५०,०००शिलींग्सच चलन आहे. मला सुरुवातीला खर्चाचा ताळमेळ लागेच ना !!
मी आल्यावर १००डॉलर बदलून घेतले मला १ लाख ७० हजार शिलींग मिळाल्या , तिथल्या तिथे मी लखपती झालो म्हणून आनंद साजरा केला.

यामुळे झालं काय की मी रोज ३०,००० - ५०,०००शिलींगचं एकटा खातो हे मला पचायला जड जात होतं. पण चलन भिकार असलं तरी महागाई फार आहे. त्यातही मी सेंट-सेंटचा विचार करणारा अट्टल पुणेकर असल्याने ऑर्डर करण्याआधी मोबाईल वर ते किती रूपयांत पडतं याचा विचार करत असे. ५०,०००शिलींग म्हणजे बापरे १२०० रुपयांच जेवण? अबब !!! ते जेवण खाताना रत्न जडीत जेवण जेवल्याचं फिलींग येत असे (सोन्याचा घास काय असतो ते मला ईथे कळाले) . पण भारतिय खायचं म्हटलं की किंमत मोजावीच लागणार होती.

आहार :
ईथले लोक मुख्य करून मांसाहारी आहेत. बिफ , पोर्क, हॅम, चिकन , मासे आहारात रोज असतात. यांचा आहार बघून मला पण न्यूनगंड आला. एक बाईच २-३ भारतियांच्या सहज कानाखाली मारेल एवढ सहज खाते. एक नॉनव्हेज करी, भलामोठा भाताचा ढिग , केळ्यापासून बनवलेला कसलासा पदार्थ , बिनस् ,नुसतेच ऊकडलेले बटाटे हा ईथला मुख्य आहार. तसे ईथे भारतिय रेस्टॉरेंट्स ही भरपूर आहेत. तुम्हाला पुर्ण कांदा-लसूण मुक्त सात्विक भोजना पासून , नॉर्थ-साऊथ इंडियन ही भेटेल.वडापाव पण मिळतो. पण तो मॅक'डी चा बर्गरच वाटतो. त्याच्या चवी विषयी नं बोललेलंच बरं. मला सगळ्यात डोक फिरवणारी गोष्ट वाटली ती म्हणजे, माणून हॉटेलात आला, की ईथे फुकटचे पाणी मिळत नाही. ते विकत घ्यावे लागते. साधी पाण्याची बाटली पण ऑर्डर करावी लागते. वेटर पाणी देत नाही... ड्रिंक्स च मेनुकार्ड पुढे करतो. मी त्याला पुन्हा लहान मुला सारखा सोडा (कोक, फंटा) किंवा पाणी आणायला सांगतो .छोटीशी पाण्याची बाटली ८० रुपये ? ते पाणी पिऊन घसा अजून कोरडा पडतो.

भटकंती :
युगांडात असताना थोडासा फिरण्याचा योग आला ! त्यामुळे ईथलं सामान्य लोकांच जिवन कसं आहे हे अगदी जवळून पहाता आलं. अफ्रिकेत अमेरिका,युरोप आणि बाकी ठिकाणांहून लोक जंगल सफारी साठी येतात. त्यामुळे भारी भारी हॉटेल्स आहेत. हे हाय-हाय हॉटेल्स आणि त्यांपासून थोडी दुर आदिवासी लोकांची ६ बाय ६ ची घर (खरं तर झोपड्या) पाहील्याकी मोठा विरोधाभास दिसतो.कुठेही तुम्हाला केळीची झाड दिसतील.ईथल्या फळांना जगात तोड नाही हो. आंबे, कलिंगड, आननस, फणस आहाहा !! एवढी रसाळ .. वा भाई मजा आ गया ! तुमच्या तोंडून हे शब्द निघाल्या शिवाय रहाणार नाहीत. वन्य-जिवन अजुनही समृद्ध आहे. ईथली पोरं माकडांच्या फार जवळ आहेत. अत्यंत चपळ, झाडांवर ईकडून तिकडे माकडा ईतक्याच सराईत पणे हे ऊड्या मारत असतात. (फोटू नाहीत याचा खेद वाटतो)
पोरं गरिब असंली तरी जाम खूष असावित. शिक्षणाचं यांना सोयरसुतक नसाव. शहरात चांगल्या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या महागड्या शाळा आहेत पण.
ही एक चिमुरडी .. फारच गोड वाटली.

ईथल्या जंगली लोकांना (जे शेती करतात, पशुपालन करतात) त्यांना मसाई म्हणतात. खरेदीची आवड असल्यास मसाई लोकांनी हाताने बनवलेल्या अतिशय सुंदर कलाक्रुती आपणास मिळतील.

युगांडाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे, ईथे भरपूर टेकड्या आहेत. सपाट पठारी भाग कमी आहे. आणि या हिरव्या गर्द टेकड्यांवर मस्त मस्त बंगले बाधलेले आहेत.ते लांबून बघायलाच ईतकं सुंदर वाटतं.

जिंजा :
कंपाला शहरापासून ८० किमी दुर जिंजा नावाच टाऊन आहे. वाटेतला रस्ता खरोखर सुंदर आहे. मस्त वाटतं


शहराबाहेर निघालं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगल आहे. रस्ता भरभर जातो पण जंगल काही संपत नाही. निसर्गाच्या सुंदरतेला मर्यादा नाहीत. सलाम करावा वाटतो. मन मोहून तिथेच तंबू टाकून काही काळ रहावसं वाटतं.
जिंजा मध्ये नाईल नदीचं ऊगम स्थान आहे. प्रचंड व्हिक्टोरिया लेक च्या पोटातुन प्रचंड नाईल नदीचा जन्म पहाणे एक वेगळीच मजा आहे. ईथे तुम्ही बंजी जंपिंग, राफ्टींग चा मनमुराद आनंद घेऊ शकता. हॉटेल्सही सर्व सुखसोईंनी युक्त आहेत. वाटेत आदिवासींची घरे आहेत. त्यात मला वाकून जाताना पण त्रास होत होता. कसे रहातात काय माहीत बुआ. यांना कसलाच खर्च नाही. इंटरनेट, केबल टीव्ही , कार , फॅशनेबल कपडे (कपडे हवेत असं ही नाही) किंवा कसल्याच मानवनिर्मित वाढीव गरजा नाहीत. निसर्ग सगळं देतो. आपल्या सारखी गुंठ्यावरून , बांदावरून मारामारी कोर्ट कचेरी ईथे नसावी. कुठेही एखाद झोपड मचान बांधाव,नैसर्गिक रित्या फुकट मिळेल ते खावं आणि दिवस ढकलावे. ऐकीव माहीतीच्या आधारे, काही लोक आयुष्यभर काहीही ऊद्योग न करता जगतात.

स्पिक कॉमन्वेल्थ रिसॉर्ट, मुन्योन्यो :
मी ज्या बँकेच्या कामासाठी आलो , त्या बँकेचा सर्वेसर्वा "सुधीर रुपरेलीया" हा युगांडातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती.एवढा की युगांडा मधे तो काहीही करू शकतो. १० पंचतारांकित हॉटेल्स , क्लब्स , बँका, अजुन बरंच काही.. स्पिक कॉमनवेल्थ रिसॉर्ट ,मुन्योन्यो हे सप्त तारांकित रिसॉर्ट देखिल त्याचंच.ईथे राजकिय मिटींग्ज होतात. काही महिन्यांपुर्वीच आपले सर सर्दार मनमोहन ईथे येवून भारताचा खजिना थोडासा रिकामा करून गेले.

व्हिक्टोरिया लेक च्या कडेला (जिंजा मधे नव्हे, हे दुसर्‍या टोकाला आहे हे रिसॉर्ट आहे. दिवसाचा रेंट ६००-७०० डॉलर प्रतिदिन. अरबी देशांची बैठक झाली तेंव्हा सगळं हॉटेल बुक केल होतं ५ दिवस. (तेलाच्या किमती का वाढतात ते कळलं आता).

आणखी काही :
भारतात जसं क्रिकेटच वेड आहे, तसंच ईथे फुटबॉलच प्रचंड वेड आहे.मॅच डे ला क्लब्स चे मोठ्या स्क्रीनचे टीव्ही सर्वांसाठी खुले केलेले असतात.फार जोषात हे लोक मॅचचा आनंद घेतात (आमच्या पुण्यातला एक खडूस ईलेक्ट्रानिक्स दुकानदार क्रिकेट मॅच रंगात आली असताना , शो ला ठेवलेल्या टिव्हीचं मुद्दाम चॅनल बदलत असतो.) ईथल्या लोकांना संगिताचं ही वेड आहे. ४-५ लोकं एक मिनी ट्रक काढतात, त्यावर एक म्युझिक सिस्टीम असतं, आणि एक गाणारा. शहरातल्या रस्त्यांवरून मस्त म्युझिक वाजवत फिरतात.थोडक्यात फिरता ऑर्केस्ट्रा. कमर्शीय एरियातुन चालताना बर्‍याच शॉप्स मधून झिंग आणनार्‍या संगिताचे सूर ऐकू येतात. नाईट लाईफ पण एकदम झकास आहे. कसिनो आणि क्लब्स मधे दारू पासून ते विषेश सेवा , सगळं ऊपलब्ध आहे.पोरी बाळींचा द्राक्षासवाचा स्टॅमिना पाहून तोंडात बोट घालायला होतं .. अहो एवढ तर मी पाणी पण नाय पित दिवसाला. पण एक बियर साठी शारिरीक चाळे करणार्‍या किळसवाण्या ध्यानाकड पाहिलं की कससं च होतं... रात्री ८ ला सामान्य जीवन सगळ चिडीचुप होतं... ऊगाच एकटं फिरून सुपरमॅन बनणाराला चाकू,गनपॉईंट वर लुटण्याचे प्रकार होतात. आणि फिरलात तर कृपया थोडे पैसे असू द्यात. कारण काही नाही मिळालं तर ते लोक फटकवतात म्हणे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी.

सारांश :
अफ्रिका फार सुंदर आहे, आणि ईथलो लोकही, कोणीही तुम्हाला हाय-गुड मॉर्निंग करेल. आठवा ते पुण्या-मुंबईतले लोक. ओळखीचे असून एक तर वाट बदलतात एक तर त्यांचा मोबाईल तुम्ही दिसले की मगच वाजतो. आणि ते सराईतपणे टाळून जातात.अफ्रिकन लोक तुमच्या पर्सनल लाईफ मधे ढवळाढवळ करणार नाही. ते फार हुषार आहेत. अगदी रूमक्लिनर पण ईंग्लिश मधे बोलतो Smile
या आमची अफ्रिका बघायला , मला विश्वास आहे तुम्हाला अफ्रिका निराश नाही करणार

(संपुर्ण)

Friday, July 25, 2008

ईट्स् अफ्रिका ब्वना !



घरी :
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !
"अरे हा काळा टी-शर्ट पण ठेऊ का ? आणि तुच एकदा चेक करून बघ ! " - ईति मातोश्री.

छोट्याश्या हॉल मधे मला लागणार्‍या न लागणार्‍या गोष्टींनी पसारा घालून ठेवला होता. आई बहीन एक एक गोष्ट आठवून काय काय लागेल याचा विचार करत होते. वडील गुपचूप माझ्या बुटांना बाहेरून पॉलिश करून आले होते. कारण त्यानी माझ्या बुटाला हात लावलेला मला मुळीच आवडत नाही हे त्यांना माहीत आहे.पासपोर्ट,स्नॅक्स,क्लोज अप ,टुथ ब्रश, कंगवा , हातरूमाल , नेक टाय ,सॉक्स, किरकोळ आजारांवरची औषधे,कॉस्मेटिक्स (हे आमच्या भगिनींचं प्रेम) , वॅसलिन , फॉर्मल शर्ट-पँटस् , कॅजूअल्स पासून ते नेलकटरच काय पण काही प्लास्टिकच्या पिशव्या (मला अफ्रिकेत गरज भासेल म्हणून) एवढ्या सार्‍या बारिक-सारिक गोष्टींची तयारी आईने केली होती, तिच्या मनात अजून काहीतरी राहीलय हेच विचार आणि त्यामुळे तिला कोणी आपल्याला काय बोलतंय हे प्रथम हाकेला ऊमगत नव्हतं. त्यात आई-बाबांचं भारत-पाकिस्तान युद्ध झालेलं असल्यामुळे काही चुक झाली की एकमेकांना टोमणे मारणे चालू होतं.पहील्यांदाच पोरगं घरं सोडून देश सोडून एवढ्या लांब चाललं होत.गेल्या २३ वर्षात कधी आईला सोडून एक आठवड्यापेक्षा जास्त राहिलो नव्हतो. आमच्या खानदानात कधी कोणी ग्रॅज्यूएशन ची पायरी चढलं नव्हतं आणि साधारण मध्यमवर्गिय खाऊन-पिऊन सुखी मराठी कुटूंबात जन्मल्या मुळे कोणी फिरण्याचे शौक पुरे करण्यासाठी परदेशवारी करण्याचा संबंध नव्हता. आप्पा-काकू आल्या होत्या आईच्या खास मैत्रिणी पण आल्या होत्या.चुलत भाऊ आलेला.जिगरी मित्र आले होते.सगळे अगदी ऊत्साहात होते. बाबांच्या डोळ्यात एक गर्व एक अभिमान होता. त्यांचे डोळे नक्कीच पाणवलेले होते.ते बोलणे पण टाळत होते कारण बोललो तर तोल सुटेल अशी त्यांना भिती असावी. त्याना काही विचारले की ते हातवार्‍यांनीच ऊत्तर देत होते. त्यांनी मी जाणार असं कळल्यावर सर्व नातेवाईकांना फोन करून करून बातमी पसरवून मोकळे झाले होते, तर आईने "कशाला सांगायचं?कळतं आपोआप !" म्हणून नेहमी प्रमाणे विरोधप्रदर्शन केलं. बाबांना मला कष्टाने शिकवल्याचा अभिमान होताच. पण आता मी ईतक्या लगेच परदेशात जाणार म्हणून एक सार्थक झाल्याचा आनंदही झाला होताच. आईने लगेच आपल्या स्त्रीसुलभतेची ऊदाहरणे द्यायला सुरूवात केली. "शेजारच्या आवटे बाईंना मी बोलले की आमचा गणेश अफ्रिकेला चाललाय , तर ते ऐकून न घेता तिने माझा धाकटा भाऊ कॅनडाला जाणार , त्याला किती डॉलर पगार मिळणार ई. चालू केलं , तो कॅनडाला जाणार हे मी गेली १० वर्षे ऐकते आहे (अतिशयोक्ती आहे, समजून घ्या) , बिड्या फुकत गावगुंडांबरोबर तर फिरतो गांजा न ताडी पण पितो असं ऐकलय(आमच्या आईला एवढ्या बातम्या कुठून मिळतात मला अजून कळालेलं नाही) , मरू देना आपल्याला काय करायचय ?(स्वत:च विषय काढून स्वतःलाच त्यात इंटरेश्ट नाही असं दाखवते) ". बहिण कोणतं क्रिम कशासाठी, काय कशात मिक्स करून तोंड रंगवायचं हे एकदम ऊत्साहाने सांगत होती. मी अफ्रिकेला जाऊन निग्रो होईल असं तिला वाटत असावं

ऑफिसात :
(शुक्रवार) आज रात्री मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघायचं होतं. कंपनी मध्ये इंश्योरंस , डॉलर्स ,इंव्हीटेशन लेटर आणि बाकी फॉर्मालिटी मध्ये अर्धा दिवस गेला होता.कॅब कनफर्म करून घेतली. ई-टिकीट च्या प्रिंटस मारल्या.पिएम या जायच्या वेळी पण नेहमी प्रमाणे चरख्यात ऊस ७-८ वेळा पिळतात तसा पिळत होता. तो जगातला एक नंबरचा रिकामटेकडा माणूस आहे आणि त्याच्या कडे मला पकवण्याशिवाय एकही काम नाही असं मला वाटत होतं. या गोष्टींची कुनकुन असल्याने आज धाकट्या भावाची सिबीझी मागून घेतली होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काम ऊरकंलं. गाडीला किक मारली न सुसाट घराकडे निघालो. कॅब वाल्याला घर सापडेल का ? तो वेळेवर येईल का ? आला तर निट विमानतळावर पोचवेल का ? आपला पासपोर्ट गायब होऊन घरी गेला तर ? ई-टिकीट हारवलं तर ? हे ईमिग्रेशन काय ? अरायव्हल विसा नाकारला तर ? एक ना अनेक प्रश्न डोक्यातून बाहेर पडायला तडफडत होते. सिग्नल सुटायच्या आधीच पळायचा पुणेरीपणा अंगात असल्याने सराईत पणे सिग्नल तोडत मनातल्या प्रश्नांना ऊत्तरे देत देत २० मिनीटात घर गाठले.गाडीपार्क करून जिना चढून वर गेलो. छोट्याश्या घरातला पसारा न गर्दी पाहून वैतागलो. बॅग टाकली अन फ्रेश होण्यासाठी बाथरूम कडे वळालो.
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !

कॅब वाल्याला दर १० मिनीटांनी फोन करून करून वैतागावला. शेवटी ८:१० ला कॅब आली. घराखाली कॅब लागताच घरचे आणि शेजारचे "मला घ्यायला विष्णू ने गरूड पाठवलाय" या अविर्भावात कॅब कडे पाहात होते. शेजारचे मास्तरचे कुटूंब हळूच दरवाज्याच्या फटीतून काय चाललय हे बघत होतं ( हे मास्तरच कुटूंब एक नंबर भेदरट पण निर्लज्ज पणे लांबून गंमत बघणार्‍यातलं ,एकदा कॉलनीत भांडण-मारामार्‍या झाल्या, हे पब्लिक दरवाज्याच्या फटीतुन नेहमी प्रमाणे एकावर एक डोकी बाहेर काठून ऊंदरासारखी गंमत बघत होतं,कार्टून मधल्या अंलक स्कृज च्या पुतण्यांसारखं). भावाने गाडीच्या डिकीत बॅग्ज भरल्या. आईच्या पाया पडायला वाकणार ईतक्यात आईने कवटाळून ऊराशी लावलं. बाबा कुठे गायब झाले ते कळल नाही,ते टेरेस वर गेल्याचं नंतर कळालं.सर्व वडीलधार्‍यांच्या पाया पडणे ,आशिर्वाद+एक सल्ला घेऊन झालं. आईचं दर मिनीटाला "स्वतःची काळजी घे","नीट रहा","फोन कर","व्यवस्थित जेवण कर" ही वाक्य लूप मध्ये चालूच होती.गाडीत बसताना वडीलांनी मीच त्यांना काल दिलेले १००० रुपये माझ्या खिशात कोंबत म्हणाले "राहूदे, तिकडे कामात येतील" म्हणू माझ्या संयमाचा बांध फोडला.आईने वडिलांना सावरत मला गाडीत बसायला सांगितलं.
शेवटी सर्व मित्रांच हाय-बाय झालं. अतिशय जड अंत:करणाने मी निघालो. कार हायवे ला लागली आणि मी मोबाईल काढून म्युझिक सूरू केलं (विचारांच थैमान चालूच होतं).. किशोरदांचा जादूई सूर कानी पडू लागला ...
जिंदगी के सफर मे , गुजर जाते है जो मकाम.... वो फिर नहीं आते...वो फिर नाहीं आते(२)
फुल खिलते है .. लोग मिलते है.. फुल खिलते है .. लोग मिलते है मगर,,
पतझड मे जो फुल मुर्झा जाते है वो बहारो के आने से खिलते नही...
कुछ लोग एक रोज जो बिछड जाते है .. वो हजारों के आए से मिलते है ..
उमर भर चाहे कोइ पुकारा करे उनका नाम ... वो फिर नही आते (२)

मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट (भारत) :
रात्री १२:१५ ला मुंबई अंतरराष्ट्रीय एअरपोर्टला पोचलो.
माझ्याबरोबर कॅब मध्ये एक अमेरिकेला जाणारा मराठी माणूस आणि एक व्हिएअतनामी होता. मराठी माणूस म्हणूल लगेच पटकन (स्वार्थी हेतूने)ओळख करून घेतली. पहीलीच परदेश वारी असल्याने व्हिसा-ईमिग्रेशन वगैरे भानगडी माहीत नव्हत्या. म्हटलं याच्या बरोबर राहून कळेल तरी.पण बॅडलकने नेहमीप्रमाणे साथ दिली. अमेरिकेला जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल आणि अफ्रिकन कंट्रीज मध्ये जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल वेगळं आहे हा खुलासा झाला. अमेरिका, युरोपात जाणार्‍या टर्मिनल वर सगळे गोरे भारी पॉश लोक होते. पाहून हादरून घेलो होतो . तशाच बॅग्ज घेऊन विचारपूस करत ईथोपियन एअरलाईन्स वाले आपले बस्तान कुठे लावतात शोधत आलो. अफ्रिका, आणि आखाती देशांत जाणार्‍या फ्लाईटचं टर्मीनल सापडलं. ईकडे थोडी कमी वर्दळ, सलवार-बुर्खा धारी पब्लिक होती. ते युएस ला जाणारी वर्दळ ईकडे का नाही? मी का ईकडे ? थोडं वाईट वाटलं. पुर्वीही डोमॅस्टिक विमान प्रवास केला असल्याने टिकीट न बोर्डींगची प्रोसेस माहीत होती. फ्लाईट ५:२५ ला होती. आता ५ तास एकटा काय करायच हा विचार डोक्यात गोंधळ घालत होता. व्हिसा हा ईथोपियाच्या कार्यालयात मिळेल या वेडपट कल्पनेने मी ईथोपियन्सच ऑफिस कुठे आहे हे विचारु लागलो. त्यांनी अजून त्यांच दुकान मांडलं नव्हत. कोणाला तरी पत्ता विचारला त्याने एका बोळकांडातून एका अंधार्‍या रस्त्याने सरळ जायला सांगितले.[डोक्यातले विचार जात नव्हते. कन्या राशीचे गुण जन्मजात असल्याने काही तरी विसरलोय म्हणून अस्वस्थ होत होतो. दर ५ मिनीटाला पासपोर्ट आणि ई-टिकीट ची प्रिंट चेक करत होतो.] मग त्या बोळकांडातुन निघालो. तो भाग रामसेच्या पिक्चर मधल्या भूताटकीवाड्या सारखा
वाटत होता. जवळपास २००-३०० मीटरचा ती अरुंद वाट पाहून मी विचारात पडलो हेच का ते झगमगणारे युएस टर्मिनल
वालं एअरपोर्ट. शेवटी ईथोपियन्स च्या कार्यालयात पोचलो. विचारपूस केल्यावर थोडीफार प्रोसिजर कळाली. विसा ऑन अरायव्हल यूगांडा मधे मिळेल असं कळलं. पुन्हा कन्या राशीने प्रश्न विचारला, तिकडे विसा नाकारला तर ? ते म्हणाले ,तुमचं तिकीट परतीचं आहे. आम्ही तुम्हाला नेऊ शकतो. विसा नाही मिळाला तर तुम्ही पुन्हा भारतात येवू शकतात. थोडा आश्वस्त झालो. पुन्हा माणसात येवून बसलो. शेजारचा ईसम पण माझ्या सारखाच पहील्या परदेशवारीचा असावा. मलाच तो नाना प्रश्न विचारू लागला. शेवटी मी जागा बदलून बसलो. ३:०० ला ईथोपियन्स ने दुकान लावलं. पटकन् बोर्डिंग पास घेतला. चेक इन केलं. इमेग्रेशन वाला मी कोणी आतंकवादी आसावा असा संशय असल्यासारखा प्रश्न विचारत होता. सगळं दिव्य पार केल्यावर शेवटी एकदा योग्य गेट पाशी येवून बसलो. फ्रांसला जाणारी फ्लाईट ही सेम गेटला लागणार असल्याने काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते. कोपर्‍यात येवून बसलो. झोप लागत होती.एक्दा तर डुलकी पण लागली (तेवढ्यात स्वप्न पडलं की मला अशीच झोप लागली आणि मी रवीवारच्या शेड्युल प्रमाणे म्हणजे दु १२ ला ऊठलो आणि माझी फ्लाईट मिस झाली...) खाडकन् जागा झालो.झोप पुर्ण ऊडाली. फ्रेंच संस्कृती आपला प्रचार अजुनही करत होती. चकाचक फ्रेशरूममध्ये जाऊन चकाचक फ्रेश होऊन आलो.काही तरी खाऊ म्हाटलं आणि एक कुरकुरेचा पुडा घेतला, सुट्टे नव्हते ५० दिले आणि ४० मिळतीय या आशेने त्याच्या कडे पाहीले."अरे ४०रुपिया दो ना भाई! ५० दिया मैने"- मी. "वो ५० काही है" - तो. "च्यायला १०रुपयाचं भुसकाट ५० ला देतो काय साल्या.. तुला पचणार नाही.. जुलाबावर बसशील ४० दिवस" -स्वगत.
पहाटे ५:४५
शेवटी फ्लाईट मध्ये बसलो. आणि अंग टाकून निश्चिंत झालो. पण थोड्याच वेळात लांबसडक पाय आपली जागा करू न शकल्या ने अवघडून आले. कसे बसे वाकडे तिकडे करून बसलो. सिट मागे घेतली. लगेच चिपड्या थोबाडाची एअर होस्टेस पचकली "स', विल यु प्लिस रीसेट द सिट ? यु कॅन रिलॅक्स व्हेन वी'र ईन द एअ' " ..."तुझ्या *******" एअरहोस्टेसला २-३ स्तुतीसुमनं झाडून त्या छोट्याश्या जागेत मन मारून बसलो." धड झोपही येत नव्हती. आजूबाजूला काही भारतिय (मोस्ट्ली केम छो भाई) भयानक अफ्रिकन्स आणि काही गोरे होते. एअर होस्टेस बळेच मधल्या लेन मधून येजा करून करवली सारखी मिरवत होती. "एका जागी गूमान बस की बाई ! का मुळव्याध झाला तुला ? " -माझे स्वगत. शेवटी फ्लाईट थोडी हलली,पुर्वी विमानप्रवास केल्यामुळे मी फारसा ऊत्तेजित नव्हतो, पण बाकी कोण पहीला प्रवास करतय हे त्यांच्या अतिऊत्साहाने चटकन लक्षात येत होते. तरी बरे बाहेर अजून अंधार होता. विमान धावपट्टीवर आले,आणि काही सेकंदात झटका देऊन वेग घेतला.. अलगद जमिनीपासून वर जाताना किंवा खाली येताना, पोटात गुददुल्या होतात, लै भारी वाट्ट.. विमान प्रवासात मला एकमेव आवडणारी गोष्ट.
थोड्या वेळात ती मघाशीचीच चिचकुळी एअरहोस्टेस डिंक्स ची ट्रॉली घेऊन आली. आमच्या शेजारच्या काळ्या महिलांनी द्राक्षासव घेतलं आणि मी लहान मुलाने मागावे तसे "वन, डाएट कोल प्लिज" म्हणताच त्यादोघी माझ्यावर तुच्छतेने हसत असल्याचा भास मला झाला. मग मी त्यांना "बेवड्या कुठल्या" म्हणून एक असूरी बदला घेतला. काल जेवण झालं नव्हतं, निघताना घाई झाली होती. विमानात फुकट आहे .. जाम चेपू म्हटलं तर साला ,"चिकन पफ" आणि केक न फ्रुट सॅलड, ति प्लेट त्या चिचकुळ्या तोंडाच्या होस्टेसच्या मुखकमलावर लेपावी असं मनोमन वाटलं. मग ४-५ वेळा एवढंस "चिकन पफ" मागितल्या वर तिने त्रासून म्हटल " सॉरी स',वी आर फिनिश्ड नाऊ, वुड यु लाईक इन वेज ?". "च्यायला आम्ही काय वाघ-सिंह वाटलो का गवताला तोंड न लावायला ?" . "या! प्लिज गेट ईट!! " -मी. आता कुठे दाढीतल्या फटी भरल्या होत्या पण तरी अजुन मागायला तिचं तोंड बघूनच नको वाटल". मग मस्त सिट लांबवलं तंगड्या पुढच्याच्या पायांपर्यंत गेला. मागून कोणी तरी सिट ऍडजस्टक करा असं केकळलं पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून तानून दिली. मध्येच कसली तरी अनाऊंसमेट सूरू झाली म्हणून जाग आली, तर पुन्हा त्याच चिचकुळ्या होस्टेसचं दर्शन झालं.पुन्हा डोळे बळच मिटून घेतले. आताशा थोडं ऊजाडलं होतं. सुर्योदय सुर्यास्त काय असेल माहीत नही पण सुर्य फार लोभस वाटत होता. एक सोनेरी कडा फारच मनमोहक वाटत होता. फटकन मोबाईल स्टार्ट करून २०-३० सेम दिसणारे फोटो क्लिकवले. आता थकवा थोडा दूर झाला होता.शेजारची ध्यानं , गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यांनतर स्थानिक पूणेकर जशी शांत झोप घेतो, तशा पहूडल्या होत्या. तेवढ्याश्याच जागेत कसं बसं अंग टाईट करून आळस दिला.आताशा पुर्ण ऊजाडलं होतं. खाली निळा प्लेन रंगाचा समुद्र, ढगांच्या छटा लोभस दिसत होत्या, विमानाचं पातं थरथरत होतं,"हे जर आत्ता तुटलं तर ?" -कन्यारास. ईथोपियाला विमान अलगद लँड झालं.

अदीस अबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट (ईथोपिया) :
सकाळचे १०:३०
पहिल्यांदा अफ्रिकन धरतीवर पाय ठेवताना,कोण्या एका पिक्चर मधे अमिताभ ट्रेन मधून जसा मुंबईच्या प्लॅटफॉर्म वर पाय ठवतो तसं वाटून गेलं. (हे फिलींग म्हणजे माझ्या बालपणी जुन्या ब्लॅक&व्हाइट टीवीला केबल पहिल्यांदाच जोडताना आलेल्या फिलींग सारखं वाटलं) ईथोपिया ते युगांडा कनेक्टींग फ्लाईट होती. माझ्यासाठी एक अजुन दिव्य. पुन्हा विचारपूस करत नेक्ट टर्मिनल आणि गेट शोधलं. एव्हाना धीट झालो होतो. २ तास वेटींग होतं. ईकडे तिकडे टाईमपास केला. सगळ्याबरोबर कोणी ना कोणी होतं, मला सगळ्या जगात मीच एकटा आहे असं वाटू लागंल. गर्दीत पण मग एकाकी पणा वाटू लागलं. मग मोबाईल काढला,हेडफोन कानात घुसवला .. आणि एव्हरग्रीन ओल्ड सॉंग लिस्ट प्ले केली...गाणं सुरू झालं
"मेरी भिगी भिगी सी ... पलकों पे रेह गये..जैसे मेरे सपने बिखर के ..
जले मन तेरा भी किसीके मिलनको ...अनामिका तु भी तरसे.........
तुझे बिन जाने ; बिन पेहेचाने.. मैने हृदयसे लगाय......
पर मेरे प्यार के बद्लेमे तूने मुझको ये दिन दिखलाया ............... "
दुपारचे १२:३०
अनाऊंसर : " ऑल पॅसेंजर्स टू एंटीबे आर रिक्वेस्टेड टू प्रोसिड टोवर्डस् गेट नंबर ११ "
तडक ऊठलो, बोर्डींग करताना, पुन्हा कन्यारास कुजबुजली "तुझं लगेज लोड नसलं झालं तर ? " दुर्लक्ष करून मस्त विंडो सिट घेतली, यावेळी शेजारी कोणीच नव्हत.. मग ही फ्लाईट आपल्या तिर्थरुपांचीच आहे अशा अविर्भावात मोकळा बसलो, यावेळी एअर होस्टेस पण जबरा होती नव्हे होत्या , सगळा आनंदी आनंद च होता, यथेछ पफड् एग आणि कोंबडीचा (मराठीत) ऊच्चारता न येणारा पदार्थ ४ वेळा मागून घेतला, आणि तिनेही अगदी गोड चेहर्‍याने दिला,
आणि ईतकी मादक(!) हसली की , एक क्षण "माझ्याशी लग्न करशील का गं, आज आत्ता, ताबडतोब , या ईथे ?" असं विचारावंस वाटलं ...
ऊरलेल्या दाढांच्या खाचा भरल्यावर तरतरी आली.चहा आणि मिल्क केक चापून एक (अत्तृप्तीचा) ढेकर दिला आणि झोपलो आणि ऊठलो ते थेट यूगांडा आल्यावरंच !

एंटीबे इंटरनॅशनल एअरपोर्ट(युगांडा) :
दुपारचे ३:३०
शेवटी ऊतरलो एकदाचा. सुदैवाने बँकेचा (क्लायंट) माणूस "मायकेल" माझ्या नावाची पाटी घेऊन ऊभा होता. व्हिसाला प्रॉब्लेम आला नाही. सगळे त्यानेच केले. चला सुटलो बुआ. आता लगेज साठी कन्व्हेयर बेल्ट पाशी जाऊन ऊभा राहीलो. १० बॅग्स गेल्या ..२० गेल्या ..३० गेल्या ---२० मिनीटे झाली.. कन्यारास-"तुझी बॅग मुंबईतच तर नाही ना राहीली चढवायची ? " टाळक सटकायला लागलं .. नंतर नंतर येणारी प्रत्येक दुसरी बॅग माझीच आहे असं वाटू लागलं, पण ती आधीच कोणी तरी ऊचलून घेत असेल... आआआआआणि शेवटी माझी बॅग सुखरूप हातात आली आणि माझं काळीज पुन्हा छातीत फिट झालं . "मायकेल" माझ्यासाठी चकाचक टोयोटा करोला घेऊन आला होता.
स्वगत ; "मायला! पुण्यात एवढी वर्षे पीएमटी ने कसा प्रवास केला रे आपण? ऑटो करताना ३ जण असून पण किती विचार करायचो ! आणि चक्क करोल्ला ! अर्रे वा !! चला बसा , फुकट आहे !!! फुकट ते (अति) पौष्टीक नाही का ? "
आणि मायकेल ने काही सेकंदात गाडीचा काटा १२० किमी/ताशी वर नेला.

(विमानातुन लँड व्हायच्या आधी जे विलोभनीय (युगांडन) दृश्य मी पाहीले त्याने माझ्या सर्व (दुषित) पुर्वग्रहांना ऊपग्रहा सॉरी धक्का दिला ! ते पुढे ....)

क्रमशः
----------------------------------------------------------------------------Prashant Nimbalkar (२५-०७-२००८ ००:४५)

टिप : ब्वना : मित्र /दोस्त या अर्थी स्वाहीली मधे